गिरणी कामगार ते नॉलेज वर्कर
चंदूमामा आपल्या मुलाच्या टॉवरमधल्या फ्लॅटच्या बाल्कनीत उभा होता. नजर खाली रस्त्यावर होती. मन वीसएक वर्षापूर्वीच्या आठवणीत गुंतलं होतं. आज एक मे. महाराष्ट्र दिन आणि कामगार दिन सुद्धा. चंदूमामाच्या गिरणीत कामगार दिन काय उत्साहाने साजरा व्हायचा. मिलच्या चाळीत उत्सवाचं वातावरण असायचं. पुढारी यायचे, प्रभातफेऱया निघायच्या, भाषणं व्हायची. चंदूमामा बघत होता... रस्त्यावर शुकशुकाट होता. सभा समारंभाची तयारी कुठेच दिसत नव्हती. कामगार दिनाची तर कुठे चाहूलच नव्हती. बरोबरच होतं. कामगार दिन साजरा करायला गिरणी कामगार राहिलाच कुठे होता? गिरण्या बंद होऊन दशक लोटलेलं. मिलची चाळ पाडून तिथे टॉवर्स झालेले आणि या टॉवर्समधून मराठी माणूस हद्दपार होऊन मुंबईच्या बाहेर गेलेला. गिरणगावातल्या परळची अप्पर वरळी झाली होती. कामगार दिन तरी कोण साजरा करणार आणि महाराष्ट्र दिनाचा उत्साह तरी कोणाला? तेवढ्यात बेल वाजली. प्रकाश आला होता. चंदूमामाचा मुलगा प्रकाश. तो एका मल्टिनॅशनल कंपनीत कामाला होता. बायकोही त्याच कंपनीत. आयटी इंडस्ट्री की बीपीओ म्हणून काहितरी होतं. काय ते चंदूमामाला कधीच कळलं नाही, पण कळत एवढंच होतं की प...