गायकीतला घराणा - सुलभा पिशवीकर

आपल्या पैकी किती लोक शास्त्रीय संगीत ऐकतात , किती लोकांना  कळते आणि किती लोक  त्याचे रस ग्रहण करू शकतात हा खरा कळीचा प्रश्न आहे. भारतीय शास्त्रीय संगीताचा उगम , प्रसार  आणि त्याचे सद्य स्वरूप हा प्रवास फार प्राचीन पण  तितकाच  उद्बोधक  देखील आहे .  हे संगीत  ऐकतांना आपण कधीतरी "घराणा " हा उल्लेख  ऐकतोच पण साधारणपणे कुतुहूल म्हणून का होईना हा काय नेमका प्रकार आहे या बद्दल माहितीय आंतरजालावर मुशाफिरी करतांना मला अचानक सुलभा पिशवीकर यांनी लिहलेला एक अत्यंत सुंदर आणि तितकाच माहितीपूर्ण लेख लोकसत्ता दिवाळी अंक २००९ मध्ये मिळाला तो खालील प्रमाणे: 

शास्त्रीय संगीतातली घराणी ही कल्पना सर्वसामान्य श्रोत्याला कोडय़ासारखी वाटते. शास्त्रीय संगीताच्या बैठकीत राग ओळखीचा नाही. वाहवाच्या जागा, सम या गोष्टी आपल्याला कळत नाहीत, असं एक अवघडलेपण श्रोत्याच्या मनात असतं. त्यात पुन्हा हा अमुक घराण्याचा गायक आहे वगैरे ऐकल्यावर तर हे सारं आपल्या आवाक्याबाहेरचं आहे, असं वाटून श्रोता शास्त्रीय संगीताच्या परिघाबाहेरच राहू लागतो.
खरं तर घराण्याचा एवढा बाऊ करण्याचं कारण नाही. घराणं कुठे नसतं? आपणापैकी बहुतेक लोक आपल्या घराण्याचा आनुवंशिक गुणांचा अभिमान अगर दुरभिमान बाळगत असतात ना? पूर्वीची राजेशाही संपली तरी लोकशाहीत आज नवीन राजेशाही-घराणेशाही चालू झाली आहे. कलेच्या क्षेत्रातही अशी घराणी, संप्रदाय दिसतात.
घराणं म्हटल्यावर खानदान, रीतीभातीचे नियम, परंपरा, शिस्त, संयम, घरंदाजपणा अशा काही गोष्टी डोळ्यासमोर येतात. संगीतात घराण्याची व्याख्या कशी करायची? गायकीची विशिष्ट रीत टिकवणारी परंपरा म्हणजे घराणं. या रीतीत आवाज
 
लावण्याची पद्धती, राग मांडण्याची पद्धती, सुरांचा आणि लयीचा विचार, बंदिशीची मांडणी, आलापी, बोल, ताना अशा शास्त्रीय गायनाच्या सर्व अंगांचा विचार असतो. या संबंधीच्या वेगळ्या वेगळ्या विचारांमुळे वेगवेगळी घराणी निर्माण झाली. ही विचाराची रीती, परंपरा साचेबंद होऊन चालत नाही. गायनाच्या रीतीला बुरसटलेपण अगर शेवाळलेपण आलं, त्यातलं चैतन्य हरवलं तर घराण्याचा विकासच कुंठित होईल. प्रज्ञावान गायक त्या घराण्याच्या रीतीला ताजं ठेवतो, रीतीच्या नवनवीन वाटा शोधतो आणि असे कलाकार घराण्याला समृद्ध करतात.
एखाद्या घराण्याच्या प्रवर्तकाची वंशपरंपरा असा संगीतातल्या घराण्याचा अर्थ होत नाही. प्र्वतकाची संगीत परंपरा निर्माण होते. तीन पिढय़ा तरी ती परंपरा अनुसरणारे कलाकार असतात तेव्हा ती घराण्याची गायकी म्हणून प्रस्थापित होते. घराण्याची गायकी नेहमी वंशपरंपरेनं पुढे नेली जाते, असं नाही. उदाहरणार्थ, भारतरत्न पं. भीमसेन जोशी हेच सवाई गंधर्वाच्या किराना घराण्याचे सच्चे वारस. भारतीय संगीत विद्या गुरुशिष्य परंपरेतूनच प्राप्त होते. त्यातूनच हा वारसा टिकवला जातो.
ग्वाल्हेर, आग्रा, किराना जयपूर, पतियाळा, भेंडीबाजार, रामपूर- सहस्वान मेवाती ही हिंदुस्थानी शास्त्रीय गायनाच्या क्षेत्रातली काही प्रमुख प्रातिनिधिक घराणी. बहुतेक वेळा गावांच्या नावावरून घराण्याची नावं रूढ झालेली दिसतात. बरीचशी घराणी उत्तरेत निर्माण झाली पण त्यांचे प्रवर्तक आणि प्रमुख गायक महाराष्ट्रात स्थिरावले हे महाराष्ट्राचं भाग्य. ‘उत्तर पैदा करती है और दख्खन दाद देती है’, असं म्हटलं जायचं ते यामुळेच.
ग्वाल्हेर घराणं
ग्वाल्हेर घराणं हे सर्वात जुनं घराणं. सर्व घराण्यांचं हे उगमस्थानच. ग्वाल्हेर गायकी महाराष्ट्रात आणण्याचं श्रेय बाळकृष्णबुवा इचलकरंजीकर यांच्याकडे जातं. त्यांनी मुक्त हस्ते विद्यादान केलं आणि त्या काळात संगीत-दर्पण हे मासिक काढलं हे विशेष. विष्णू दिगंबर पलुस्कर हे बुवांचेच शिष्य. त्यांनी भारतभर गांधर्व संगीत महाविद्यालयांची स्थापना करून संगीत प्रसाराचं मोठं काम केलं. संगीतकलेला प्रतिष्ठाही मिळवून दिली.
बाळकृष्णबुवांचे इतर शिष्य असे -
मिराशीबुवा, पं. गजाजनबुवा जोशी यांचे वडील अनंत मनोहर जोशी, मल्लिकार्जुन मन्सूर यांचे गुरू नीलकंठबुवा जंगम. बी. आर. देवधर, डी. व्ही. पलुस्कर, शंकरराव पंडित, विनायकबुवा पटवर्धन, वझेबुवा, राजाभय्या पूंछवाले, इंगळेबुवा ही या घराण्यातली काही पटकन आठवणारी नावं. बी. आर. देवधरांचे शिष्य कुमार गंधर्व यांनी वेगळं घराणं वाटावं, अशी गायकी स्वयंप्रज्ञेनं निर्माण केली. सदारंग व अदारंग यांच्या बंदिशी म्हणजे या घराण्याची देणगीच. एका रागातल्या अनेक अंगांच्या चीजांची व तराण्यांची जपणूक व तालीम या घराण्यात दिसते. सरळ ताना, सावकाश घेतलेल्या गमकाच्या ताना (मट्टी तान) रागाची सुबोध मांडणी व विस्तार ग्वाल्हेर गायकीत आढळतो. मालिनी राजूरकर, वीणा सहस्रबुद्धे, उल्हास कशाळकर हेग्वाल्हेर गायकीचे आजचे प्रसिद्ध कलाकार.
आग्रा घराणे
गग्गे खुदाबक्ष हे या घराण्याचे मूळ प्रवर्तक. उस्ताद फय्याजखाँ, नथ्थनखाँ, भास्करबुवा बखले, विलायत हुसेनखाँ, मास्तर कृष्णराव, लताफतखाँ, शराफतखाँ, रातंजनकर, राम मराठे, खादीमहुसेन दिनकर कायकिणी, वि. रा. आठवले अशा बुजुर्गानी विद्यादानही मोठय़ा प्रमाणात केले. या घराण्याचे रत्नाकर रामनाथकर यांनी ‘प्रेमरंग’ या नावानं तर पं. जगन्नाथबुवा पुरोहित यांनी ‘गुणिदास’ नावानं बंदिशी रचल्या. ‘गुणिजान’ या नावानं रचना करणारे सी. आर. व्यास, प्रभुदेव सरदार, माणिक वर्मा, जितेंद्र अभिषेकी हे सर्व जगन्नाथ बुवांकडे तालीम घेत. या घराण्यात सुंदर बंदिशी विपुल आहेत आणि रचनाकार, व्यासंगी कलाकारही खूप दिसतात. त्यातलेच अनेकांचे गुरू असलेले बबनराव हळदणकर आहेत.
रागाचीशुद्धता सांभाळणं, तालदृष्टय़ा बंदिशींची रेखीव मांडणी, सुबक लयकारी, ‘रीदन तोम’ अशी अक्षरांची नोम्तोम् करून गाणं आणि ढाला सूर ही या घराण्याची वैशिष्टय़ं.
किराना घराणे
किराना हे गाव बीनकार बंदेअली यांचं. उत्तर भारतात अंबालाजवळ असलेल्या या गावावरून किराना घराणं हे नाव पडलं. अब्दुल करीमखाँ हे या घराण्याचे जनक. बंदेअलीखाँचे ते शिष्य. ‘ताल गया तो बाल गया, सूर गया तो सिरही गया’ असं या घराण्यात सुराचं महत्त्व सांगतात. स्वरांवर ठहराव करून कल्पकतेनं केलेली संथ आलापी, साधासरळ ठेका, सूरप्रधानता, गायनातले प्रचलित राग गाणं ही या गायकीची वैशिष्टय़ं.
मिरजेतच राहिलेल्या अब्दुल करीमखाँसाहेबांचे महत्त्वाचे शिष्य म्हणजे सवाई गंधर्व, रोशनआरा बेगम, विश्वनाथबुवा जाधव, बेहेरेबुवा, कपिलेश्वरीबुवा. खाँसाहेबांकडून वंशपरंपरेने आलेलं गाणं सुरेशबाबू माने, हिराबाई बडोदेकर, सरस्वती राणे यांनी लोकप्रिय केलं आणि अनेकांना गाणं शिकवलं. अब्दुल करीम व हिराबाई यांचं योगदान म्हणजे थिएटरमध्ये तिकिटं लावून जलसे जाहीर करून त्यांनी शास्त्रीय संगीत लोकाभिमुख केलं. भारतरत्न भीमसेन जोशी आणि गंगूबाई हनगळ या सवाई गंधर्वाच्या शिष्यांनी आणि सुरेशबाबू- हिराबाईंच्या डॉ. प्रभा अत्रे या शिष्येनं भारतीय संगीत देशात आणि देशाच्या सीमेबाहेर लोकप्रिय केलं तर फिरोज दस्तुरांनी अनेक शिष्य घडवले. संगीत समीक्षिका डॉ. सुलभा ठकार आणि आजचे आश्वासक गायक कैवल्यकुमार गुरव व जयतीर्थ मेवुंडी याच घराण्यातले.
खाँसाहेब बडे गुलाम अली आणि पाकिस्तानी गझलगायक गुलामअली यांचं पतियाळा घराणं, लता मंगेशकरांचे गुरू अमानअली आणि प्रसिद्ध गायिका अंजनीबाई मालपेकर यांचं भेंडीबाजार घराणं, डॉ. वसंतराव देशपांडे आणि आजचे आघाडीचे गायक रशीदखाँ यांचं रामपूर-सहस्वान घराणं, अमीरखाँसाहेबांचं इंदौर घराणं, पं. जसराज, संजीव अभ्यंकर यांचं मेवाती घराणं या सर्व घराण्यांबद्दलही थोडं विस्तारानं लिहिणं गरजेचं आहे पण तूर्त केवळ नामोल्लेखच..
जयपूर- अत्रौली घराणे
जयपूर-अत्रौली घराण्याचे जनक अल्लादियाखाँसाहेब हे आहेत. अल्लादियाखां मूळचे उनियारा गावचे. राजस्थानातलं हे गाव. खाँसाहेबांचे वडील अहमदखाँ आणि चाचा जहागिरखाँ यांनी त्यांना शेकडो ध्रुपदांची तालीम दिली. खाँसाहेब मात्र ख्यालिये बनले आणि शिष्यांना ख्यालाचीच तालीम त्यांनी दिली. खाँसाहेबांचं गाणं तेजस्वी होतं, आवाज प्रभावी होता. खाँसाहेब एकदा आमलेटा संस्थानात गेले असता राजाला त्यांचं गाणं इतकं आवडलं की चार दिवस-रात्री सतत त्यांचं गाणं त्यानं ऐकलं. याचा अतिताण आवाजावर पडून खाँसाहेबांचा आवाज बिघडला तो कायमचाच. थोडा सुधारला पण पूर्वीची ‘रोशनी’ गेली होती. त्या आवाजावर अपार मेहनत घेऊन त्यांनी त्याला साजेशी स्वत:ची गायकी निर्माण केली. तीच जयपूर गायकी.
खाँसाहेबांनी याला जयपूर गायकी असं नाव का दिलं असावं? त्यांचं वास्तव्य वास्तविक अलिगढजवळच्या अत्रौली गावी अधिक होतं. जयपूरचे दरबारगायक मुबारकअली यांच्यापासून त्यांनी स्फूर्ती घेतली म्हणून जयपूर-अत्रौली असं नाव त्यांनी आपल्या गायकीच्या घराण्याला दिलं असावं. मुबारकअलीच्या जबरदस्त तानेचा आदर्श समोर ठेवून त्यानुसार त्यांनी आपला गळा घडवला. या तनाइतीबद्दलची एक गोष्ट सांगतात. अल्लादियाखाँ आणि आग्रेवाले नथ्थनखाँ ऐन तारुण्यात होते तेव्हा एकदा जयपूर दरबारी महाराजांच्या आज्ञेवरून जुगलगान करत होते. चुरशीचं ते गाणं ऐन रंगात आलं असता वयोवृद्ध मुबारकखाँ काठी टेकत टेकत दरबारात आले. अतिसारामुळे त्यांची तब्येत नरमच होती. महाराजांना याची कल्पना देऊनही त्यांनी मुबारकअलींना थोडं तरी गाच अशी फर्माईश केली. नाइलाज म्हणून खाँसाहेब गायला बसले. गायनसाथीला अल्लादियाखाँ अन् नथ्थनखाँ ही जोडी होतीच. विश्रांती मिळावी म्हणून अधूनमधून खांसाहेब या मुलांना गायला सांगत. गायला सांगितलं की या दोघांची तानबाजीच सुरू व्हायची. खाँसाहेबांनी परोपरीनं समजावलं, ‘अरे जरा ‘हौले हौले’ गा, जरा सावकाश!’ हे दोघे ऐकत नाहीत, असं पाहिल्यावर खाँसाहेबांनी हिसका देऊन अशी जबरदस्त तान घेतली की, दचकून नथ्थनखाँच्या हातातला तंबोराच गळून पडला.
‘खरं तर ‘घराणं’ अगर गायकी बनण्यासाठी, ती गानशैली विकसित होण्यासाठी तीन-चार पिढय़ा तरी जाव्या लागतात. पण आपल्या सदोष आवाजाला शोभेल, पेलेल अशी जी शैली उस्ताद अल्लादियाखाँनी निर्माण केली ती इतकी विकसित होती की एकाच पिढीत तिला गायकीची मान्यता प्राप्त झाली, असं पं. बबनराव हळदणकर यांनी आपल्या ‘जुळू पाहणारे दोन तंबोरे’ या पुस्तकात लिहिलंय.
अल्लादियाखाँसाहेबांचं व्यक्तित्व तेज:पुंज, ऋषितुल्य असं होतं. त्यांच्या घराण्याचे मूळ पुरुष नाथविश्वंभर होते. गानसम्राट तानसेनाचे गुरू हरिदास यांचा जन्मही नाथविश्वंभर यांच्या वंशात झाला होता, असं आपल्या वंशाविषयी खाँसाहेब अभिमानाने सांगत. खाँसाहेबांचं मूळ घराणं ध्रुपदियांचं. खाँसाहेबांनी ध्रुपदांवरून हिंदू देवदेवतांच्या स्तुतिपर कितीतरी बंदिशी बांधल्या. भारतीय संस्कृती हिंदू-मुस्लिम यांच्या एकजिनसीपणातूनच समृद्ध झाली आहे. विशेषत: संगीतात हे सौहार्द खूपच प्रत्ययाला येतं. ‘आदिदाता अनंत दयावंत तूही जगतकरता, एकही निराकार’ ही खाँसाहेबांची मनोहारी बंदिश मालकंस रागात आहे. अशाच अनेक बंदिशी आहेत.
११ ऑगस्ट १८५५ रोजी अल्लादियाखाँसाहेबांचा जन्म झाला. १६ मार्च १९४६ हा त्यांचा मृत्युदिवस. वयाच्या पंधराव्या वर्षांपासून नव्वदाव्या वर्षांपर्यंत खाँसाहेब सतत गात राहिले, गाण्यात, गाणं शिकवण्यात राहिले. मुंबईच्या विक्रमादित्य संमेलनात १९४५ मध्ये ते गायले. नव्वद वर्षांचे खाँसाहेब आणि साथीला कीर्तिमान आणि तयार शिष्या केसरबाई केरकर! सकाळी सहा वाजता लावलेल्या रामकलीच्या अनोख्या सुरांनी सभागृह दिपून गेले. ‘आज राधे तेरे बदनपर श्याम मिलेकी चोरी’ ही प्रसिद्ध अस्ताई. कंप असलेल्या आवाजानेही झोकात आणि डौलदार समेवर येण्यानं सभागृह त्यांनी ताब्यात घेतलं. परिचित राग असूनही केसरबाईही मूक झाल्या अशा प्रकारचं वर्णन गोंविदराव टेंबे यांनी केलंय.
वयाच्या पंधराव्या वर्षी अल्लादियाखाँ साहेबांचे वडील निधन पावले. पुढे चाचा जहागीरखाँ यांनी खाँसाहेबांना रात्रंदिवस तालीम दिली. लहानपणी लिहिण्यावाचनाच्या व्यसनापायी खाँसाहेबांनी घरच्या वडीलधाऱ्या मंडळींचा मार खाल्ला होता हे ऐकून मजा वाटेल. गवयाच्या पोराला जुजबी लिहितावाचता आलं म्हणजे झालं. गाणंबजावणं हाच आपला पेशा. गाण्यात प्रावीण्य मिळवणं हीच विद्येची आराधना, तेच आपलं धन असं मानणारे वडीलधारे मुलाला शाळेतही नाराजीनं पाठवत.
अल्लादियाखाँ बुद्धीनं तीक्ष्ण होते, सततची तालीम असे.. सहजपणे दहाबारा हजार चीजा लहान वयातच मुखोद्गत झाल्या. मात्र विद्येचा गर्व त्यांना कधी नव्हता. आपल्यापेक्षा आपल्या आधीचे गायक केवढे विद्वान, तयार होते हेच ते सतत सांगत राहत.
१८९६ ते १९२२ पर्यंत खाँसाहेब कोल्हापूरला राजगायक म्हणून राहिले. शाहूमहाराजांशिवाय अन्य कोणाची नोकरी त्यांनी केली नाही.
शाहूमहाराजांच्या मृत्यूनंतर अल्लादियाखाँसाहेब नाइलाजाने मुंबईला कायम राहण्यासाठी आले. त्यांची तहहयात मिळावयाची असलेली पेन्शन राजाराम महाराजांनी बंद केली. खाँसाहेबांनी त्याबद्दल कधी याचना केली नाही. शिकवण्या करूनच चरितार्थ चालणार होता. मुंबईतच त्यांनी सूरश्री केसरबाई केरकर यांना प्रदीर्घ तालीम देऊन एक गानशिल्पच रसिकांपुढे ठेवलं. गानतपस्विनी मोगूबाई कुर्डीकर, या शिष्येच्या रूपानं गुरूवर श्रद्धा ठेवून केलेली साधना, लयतत्त्वाची सूक्ष्म जाण, चपल आणि नोकदार आवाज यातून काय किमया होऊ शकते ते जगाला दाखवलं.
अल्लादियाखाँसाहेबांच्या जयपूर घराण्याच्या गायकीची वैशिष्टय़ं कोणती?
बंदिशीचा स्थाई-अंतरा मांडण्यातली शिस्त, तालाच्या प्रत्येक मात्रेचा विचार करून अतूटपणे बंदिश भरून सहजपणे समेवर येणं ही जयपूर गायकीची खासियत आहे. यामुळे चीजेच्या पहिल्या समेलाच रसिकांची वाहवा मिळते. श्रोत्यांसमोर रागाची मूर्ती उभी राहते. या घराण्यात शुद्ध व मोकळ्या आकारस्वरात आलापी, ताना घेतल्या जातात. यामुळे स्वराची आस, मींड प्रभावी होतात. सूर-लयीचा मेळ जयपूर गायकीत कायमच असतो त्यामुळे तबल्याच्या ठेक्याची लय आणि लयीचं भान ठेवून केलेलं सुरांचं नक्षीकाम यांचा असर श्रोत्यांवर होतो. तानक्रियेवर या घराण्याच्या गायकीचा भर आहे. ‘भैय्या जहाँ तेरी तान जाती है वहां हमारी नजर भी नही पहुंचती’ असं आग्रेवाले नथ्थनखाँ अल्लादियाखाँना त्यांच्या मुश्किल तानांबद्दल म्हणाले होते. प्रचंड दमसासाच्या दाणेदार, स्पष्ट, पेंचदार आणि सुराला चिकटून असणाऱ्या आणि सहजतेनं येणाऱ्या ताना हे या घराण्याचं वैशिष्टय़ आहे. यासाठीत खाँसाहेबांनी प्रचंड रियाज केला आणि शिष्यांकडूनही करवून घेतला. गोविंदराव टेंबे यांनी खाँसाहेबांच्या रियाजाची हकीकत सांगितली. आहे. टेंबे एकदा नाटक पाहण्यासाठी निघाले होते. वाटेतच खाँसाहेबांचं घर होतं. त्यांचा रियाज चालला होता. पाच-दहा मिनिटं बाहेरच थांबून रियाज ऐकून गोविंदराव नाटकाला गेले. ते संगीत नाटक पाच तास चाललं. परतताना पहाटे तीच तान वेगळी झिलई घेऊन आलेली गोविंदरावांनी ऐकली. असा हा पूर्णत्वाचा ध्यास पाहून ते चकित झाले. बोलआलाप हे या घराण्याचंच वैशिष्टय़. लयीच्या अंगाने बोलांचे पूर्ण शब्द इथे शब्दांचं सौष्ठव सांभाळून शब्दांची ओढाताण न करता गाऊन कलाकार बोलआलाप करतात. जोड राग एका रागाला दुसऱ्या रागाचं ठिगळ लावल्यासारखा न वाटता ते दोन रागांचं एकसंध रूप असले पाहिजे याची प्रचिती लतितागौरी, बसंती-केदार, सावनी-नट, कामोद-नट हे राग ऐकताना येते. अनवट रागांचा अनवटपणा यांच्या सहज मांडणीत पार नाहीसा होतो.
जयपूर घराण्याचे खाँसाहेबांच्या घरातले वारसदार असे- खाँसाहेबांची तीन मुले- नसिरुद्दिनखाँ, मंजीखाँ आणि भूर्जीखाँं, हैदरखाँ हा भाऊ तसंच पुतण्या नथ्थनखाँ आणि नातू अझिजुद्दिन ऊर्फ बाबा या सर्वाना खाँसाहेबांची तालीम कमीअधिक प्रमाणात मिळाली. यातील नसिरुद्दीन इकडे आलेच नाहीत. त्यांचा आवाजही बिघडला. मंजीखाँना तरुण वयात गवयाचा पेशा प्रतिष्ठेचा वाटला नाही म्हणून कोल्हापूरला त्यांनी वनविभागात नोकरी धरली. वनातल्या मोकळ्या वातावरणात ते शिकलेल्या गाण्याचा रियाज मात्र करीत. पुढे मात्र ते गाण्याकडे वळले. त्यांच्या मैफली, त्यांचा सुरेल, तरल आवाज, कल्पनाशक्ती, तयारी यामुळे रंगू लागल्या. त्यांना काठय़ाची गोडी लागली. मैफलीत ते ‘ऐकव तव मधु बोल’सारख्या मराठी रचना गायचे. दुर्दैवाने ते अकाली मृत्यू पावले. मल्लिकार्जून मन्सूर हे त्यांचे शिष्य मंजीखाँनंतर ते भूर्जीखाँकडे शिकायला लागले. भूर्जीखाँ हे तब्येतीच्या तक्रारीमुळे मैफलीचे गायक म्हणून नावारूपाला आले नाहीत पण त्यांनी अनेकांना शिकवलं. आजच्या गायिका श्रुती-सडोलीकर-काटकर यांचे वडील वामनराव सडोलीकर, मधुकर सडोलीकर, मधुकर कानेटकर, पी. बालाजी, आझमबाई असा त्यांचा शिष्यपरिवार.
अल्लादियाखाँना मंजीखाँच्या अकाली मृत्यूचं फारच दु:ख झालं-घराण्यातला संगीताचा वारसा उरला नाही म्हणून. तथापि खाँसाहेबांनी अनेकांना जीव ओतून शिकवलं. कोल्हापूरचे गोविंदराव शाळिग्राम गात असताना खाँसाहेबांचा भास होत असे जुने लोक सांगतात. खाँसाहेबही तसं म्हणायचे. गुलुभाई जसदनवाला यांच्याकडे खाँसाहेबांच्या चीजांचं भांडारच होतं. श्रुती सडोलीकर, जितेंद्र अभिषेकी यांनी त्यांच्याकडून तसंच खाँ-साहेबांचे नातू बाबा यांच्याकडे कोल्हापूरला येऊन बंदिशी घेतल्या आहेत. बाबांकडे खाँसाहेबांच्यात गाणे बंदिशींच्या स्वरूपात आज आहे आणि त्यांनी मोकळ्या मनानं हे विद्याधन दिलं हे विशेष. शिरगांवकर भगिनी आणि सुशिलाराणी पटेल यांनाही त्यांनी शिकवले.
सूरश्री केसरबाई केरकर
वयाच्या जवळपास पंचविसाव्या वर्षी गायिका म्हणून बोलबाला होत असतानाही खाँसाहेबांची तब्बल दहा र्वष सकाळ-संध्याकाळ अशी आठ आठ तासांची तालीम घेणाऱ्या केसरबाई म्हणजे जिद्दीचं मूर्तिमंत रूपच. त्यांच्या नावाचा दरारा भारतभर होता. त्यांच्या गाण्याला खूप गर्दी असे. समकालीन बुजुर्ग तिथे हमखास हजर असत. एकदा पाल्र्याच्या एका मैफलीत व्हायोलिन वादक-गायक गजानन बुवा जोशी पुढे बसले होते. स्टेजवरून बाई मोठय़ानं म्हणाल्या. ‘काय बुवा? इथलं ऐकूनच उद्या व्हायोलिनवर वाजवणार आहात ना? मग आत्ता तंबोरे जुळवा की.’ बुवांनी आनंदानं तंबोरे जुळवले ही गोष्ट वेगळी. केसरबाईंच्या वागण्याच्या अशा अनेक गोष्टी सांगितल्या जातात.
केसरबाईंच्या गाण्याची वर्णनं आणि ध्वनिफीती ऐकून त्या भव्य गाण्याची थोडी कल्पना करता येते. एकाच वजनानं सर्व सप्तकांमध्ये सहजपणे फिरणारा त्यांचा आवाज, भरीव आलापी, दमसासाच्या ताना सर्व कसं जिथल्या तिथं. सुरांनी भव्य वास्तुशिल्प साकार करणारं त्यांचं गाणं! धोंडूताई कुळकर्णी आणि मजिदखाँ (सांरंगिये) हे त्यांचे शिष्य महंमद सईद व रशीद ही मजिदखाँची मुलंही गातात.
लक्ष्मीबाई जाधव
हैदरखाँ यांच्या शिष्या असलेल्या लक्ष्मीबाई या जयपूर घराण्याच्या बुजुर्ग गायिका लक्ष्मीबाईंचं गाणं रियाजानं संपन्न झालेलं, सुराला गाज असलेलं आणि घोटीव असं होतं. पुणे आकाशवाणीवर त्यांचं काही ध्वनिमुद्रण उपलब्ध आहे. धोंडूताईंनी त्यांची दीर्घकाळ तालीम घेतली. ललिता खाडिलकरांनाही त्यांनी प्रेमानं शिकवलं.
सरदारबाई करदगेकर
जयपूर घराण्याच्या सरदारबाई करदगेकर एके काळी पेशावपर्यंत मैफली गाजवून आल्या, पण पुढे प्रसिद्धीच्या झोतात राहिल्या नाहीत. अल्लादियाखाँ यांचे पुतणे नथ्थनखाँ आणि निवृत्तीबुवा सरनाईक हे त्यांचे गुरू. मला बाईंची शिष्या होण्याचं भाग्य लाभलं. नितळ, झारदार, लवचिक आवाज, बोलतान आणि तान यांची खासियत ही त्यांच्या गाण्याची वैशिष्टय़ं.
वामनराव देशपांडे
ज्येष्ठ संगीत समीक्षक वामनराव देशपांडे यांचा संगीत प्रवास सुरेशबाबू माने- नथ्थनखाँ- मोगूबाऊ कुर्डीकर असा आहे. ‘घरंदाज गायकी’ या आपल्या पुस्तकात ‘स्वर आणि लय यांचा समतोल साधणारी उच्च गायकी’ असं जयपूर गायकीचं वर्णन त्यांनी केलंय. मंजिरी कर्वे- आलेगावकर ही त्यांची शिष्या.
मधुसूदन कानेटकर
अनेक आकाशवाणी केंद्रांमधून कार्यक्रम अधिकारी, केंद्रप्रमुख म्हणून काम केलेले कानेटकर हे भूर्जीखाँ यांचे शिष्य. गाण्याचा चौफेर व्यासंग करणाऱ्या अप्पांकडून मलाही थोडंफार घेता आलं. रेखा देशपांडे, अलका देव- मारुलकर, मंजिरी असनारे या त्यांच्या नावारूपाला आलेल्या शिष्या.
गानतपस्विनी आणि गानसरस्वती
जयपूर घराण्याच्या मानदंड असलेल्या मायलेकी म्हणजे गानतपस्विनी मोगूबाई कुर्डीकर आणि गान सरस्वती किशोरी अमोणकर. दोघीही जयपूर गायकीचं उत्तुंग शिखर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या. मोगूबाईंना अल्लादियाखाँसाहेबांची खंडित स्वरूपात तालीम मिळाली. त्यांची गंडाबद्ध शागीर्द म्हणून ओळख मिळविण्यासाठी त्यांनी जवळचं सर्व सोनं, पैसा खर्ची घातला. त्यांना तिसाव्या वर्षीच वैधव्य आलं. तीन मुलांचा सांभाळ करण्यासाठी गाण्याच्या शिकवण्या करणं, स्वत:चं शिकणं आणि कार्यक्रम यात माई गुंतल्यामुळे कदाचित ताईंना माईंचं ‘आई’ म्हणून प्रेम नाही मिळालं. शिवाय मुलांवर चांगले संस्कार व्हावेत म्हणून माईंमधली ‘कठोर’ आईच अधिक जागृत होती. माईमधल्या ‘गुरू’नं ताईंना सुरांची ‘माया’ मात्र भरपूर दिली.
माईंच्या लहान वयातच त्याचं मातृछत्र हरपलं. मोठी गायिका होण्याचं आईला दिलेलं वचन पूर्ण करण्यासाठी खडतर, काटेरी मार्ग त्यांच्या वाटय़ाला आला पण त्यांनी कधी तत्त्वांशी तडतोड केली नाही. जयपूर गायकीची शिस्त, टापटीप, सौंदर्यदृष्टी त्यांच्या भाजी चिरणं, स्वयंपाक करणं अशा दैनंदिन व्यवहाराच्या गोष्टींमध्येही होती. त्यांची आतिथ्यशीलता ही अनुभवण्याचीच गोष्ट. पहाटे पाचपासून रात्री दहापर्यंत माई सतत काही ना काही करत असत तेव्हा त्यांच्या मनातलं गाणं त्यांचे ओठ गुणगुणत असत.
कोमल, हळुवार आणि तारसप्तकातल्या पंचमापर्यंत लीलया जाणारा आर्जवी सूर, सूक्ष्म लयीचे बोलआलाप, सुरांची कामगत चालली असेल त्यात विरघळून येणारी सम, ऐकताना आपला श्वास रोखला जावा अशा विविध स्वराकृतींच्या दमसाच्या ताना.. किती म्हणून गाण्याची वैशिष्टय़ं सांगायची?
किशोरीताईंना माईंनी गाणं शिकवलं, त्यांच्याकडून रियाज करून घेतला त्याचबरोबर त्याचं गाणं चौफेर व्हावं म्हणून त्यांच्या कुठल्याही शिकण्याला अडसर केला नाही. किशोरीताईंनी गाण्याचे सर्व प्रकार गायले. गझल गाण्यासाठी त्यांनी उर्दूचा अभ्यास केला. हातात पेटी घेऊन घरी त्यांनी गायलेल्या गझला आठवतात. अभंग, मीरेची भजनं यांच्या त्याच्या ध्वनिफिती अप्रतिम आहेत. ‘हे श्यामसुंदर’ आणि ‘जाईन विचारीत रानफुला’ ही त्यांची भावगीतं आजही भुरळ घालतात. ‘गीत गाया पत्थरों ने’ मुळे तर पाश्र्वगायनातली त्यांची उंची लोकांना समजली. पण या लोकप्रियतेच्या आहारी न जाता आपली मुलगी शास्त्रीय संगीतातली ‘एकमेवाद्वितीय’ अशी कलाकार झाली पाहिजे, अशी माईंची तळमळ होती. यासाठी त्या आईनं आणि गुरूंनी काय नाही केलं?
ताई मुळात बंडखोर वृत्तीच्या. पण माईंचा प्रेमाचा धाक आणि अंकुश यामुळे ताईंच्या स्वैर कल्पनाविलासातही नकळतच एक शिस्त आली. आलाप, तान अशी रागाची चौकटीत मांडणी. घराण्याचं प्रयोजन, लय, स्वराकृतींची अंतर्गत लय, रागाचं भावसौंदर्य अशा प्रकारचे विविध संगीतविषयक प्रश्न आपणच उपस्थित करायचे; डोकं फाटेपर्यंत विचार करताना, रियाज अन् मैफली करताना येणाऱ्या अनुभवांमधून त्यांची उत्तरं मिळवायची या प्रक्रियेतूनच त्यांचा ‘स्वरार्थमणी’ हा ग्रंथ सिद्ध झाला. टीकाकार म्हणतात, ताईंनी जयपूर गायकीची चौकट मोडली. पण खरं म्हणजे त्यांनी जयपूर गायकीची चौकट अधिक समृद्ध केली. राग मांडणीलाच भावसौंदर्याची नवी चौकट दिली.
ताईंनी माणिक भिडे, मीरा पणशीकर, आज लोकप्रिय असलेले रघुनंदन पणशीकर, आरती अंकलीकर, देवकी पंडित यांना शिकवलं. नंदिनी पणशीकर आणि ताईंची नात तेजस्विनी अमोणकर या शिष्यांना त्यांच्या गाण्याची साथ करताना आपण ऐकतो. कमल तांबे, कौसल्या मंजेश्वर, सुहासिनी मुळगावकर, बबनराव हळदणकर, पद्मा तळवलकर हा मोगूबाईंचा शिष्यवर्ग.
माणिक भिडेची कन्या आणि शिष्या अश्विनी हिनं रत्नाकर पै यांच्या कडेही जयपूर गायकीचं शिक्षण घेतलं. ती जयपूर घराण्याची आश्वासक गायिका आहे. कोल्हापूर ही खाँसाहेबांची कर्मभूमी असल्यानं जयपूर गायकी शिकलेले, गाणारे अनेक कलाकार कोल्हापुरात दिसतात. निवृत्तीबुवा सरनाईक यांना भाऊशंकरराव सरनाईक यांच्या खाँसाहेबांच्या तालमीतून जयपूर गायकीचे संस्कार मिळाले. त्यांनी स्वत:ही अनेक गायकांकडून राग- बंदिशी मिळवले; स्वत: बंदिशी रचल्या आणि अनेकांना शिकवलं. आनंदबुवा लिमये, सुधारकबुवा डिग्रजकर यांनी अनेकांना शिकवलं. सुधीर पोटे, भारती वैशंपायन, विनोद डिग्रजकर, मंगला जोशी हे त्यापैकीच. मुंबईला जाधवबुवा मोहन पालेकर, रत्नाकर पै यांनी जयपूर गायकीतल्या रागांचा चिकित्सक अभ्यास केला आणि अनेकांना ही गायकी शिकवली. कमल तांबे, कौसल्या मंजेश्वर यांचीही कुमुदिनी काटदरे, प्रतिमा टिळक ही आणि अशीच शिष्यमंडळी आहेत. धोंडूताईंचेही वसंत कर्नाडांसारखे शिष्य आहेत. जयपूर गायकीचा असा विस्तार होतो आहे आणि ती लोकांना आवडतेही आहे. धारवाडकडे राजशेखर मन्सूर हे या गायकीचे प्रतिनिधी आहेत. जयपूर घराण्याचा हा धावता आढावा.
जयपूर घराण्याच्या कलाकारांचं सौहार्द, एकमेकांविषयीची जिव्हाळ्याची भावना दाखवणारे काही प्रसंग आठवतात. लक्ष्मीबाई जाधव यांच्या पहिल्या पुण्यतिथीसाठी माई (मोगूबाई) ताईंसह आपल्या सर्व शिष्यांना पुढे घालून कोल्हापूरला आल्या होत्या. ललित खाडिलकर यांनी सांगितलेली आठवण आहे. लक्ष्मीबाईंच्या घरी एकदा लक्ष्मीबाई यांना ‘काली काली कमालिया ही बंदिश शिकवत होत्या. अचानक मल्लिकार्जुन मन्सूर बाईंना भेटायला आले. ‘परज’मधली ही बंदिश मला येत नाही मलाही सांगा असं म्हणून चक्क ललिताताईंबरोबर गायला बसले. गाणं बंदिस्त होतं तेव्हा घराणेदार गाण्याचं महत्त्व होतं. आज सीडी, व्हीसीडी यातून सर्व घराण्यांच्या गायकांची उत्तम गाणी शिकणाऱ्याला उपलब्ध होतात. घराण्याच्या काटेकोर भिंती टिकणार नाही. टिकाव्यात असा अट्टहासही असू नये. कोणताही मोठा गायक आपलं घराणं कायम ठेवूनही इतर घराण्यांच्या त्याला भावणाऱ्या गोष्टी घेऊन आपलं गाणं बनवतो. भीमसेनजींची तनायत ‘जयपूर’च्या खुणा दाखवते. पूर्वी भास्करबुवा बखले यांनी आग्रा आणि जयपूर घराण्याची तालीम घेतली. जितेंद्र अभिषेकी, अजय पोहनकर, वसंतराव देशपांडे अशी कितीतरी उदाहरणं सांगता येतील.
एकूण घराण्याच्या खुणा कलाकाराच्या गाण्यात दिसायला हव्यात- ते अपरिहार्य आहे. पण त्यापलीकडे जाऊन डोळसपणे इतर घराण्यांमधलं चांगलं ते त्यानं आत्मसात केलं पाहिजे. सर्व घराण्यांचं गाणं रसिकतेनं ऐकलं पाहिजे आणि आपलं क्षितिज विस्तारलं पाहिजे. असे जागृत आणि मेहनती कलाकारच भारतीय संगीताला समृद्ध करतील.
(संदर्भ - लोकप्रभा दिवाळी अंक -२००९)

Comments

Popular posts from this blog

आठवण आईची-पाचवे पुण्यस्मरण

आई -तृतीय पुण्यस्मरण

आई-चतुर्थ पुण्यस्मरण