सुंदर तेचि वेचावे..
घरांसमोर नित्यनियमांनं घातली जाणारी सडा-सारवणं, त्यावरील रांगोळ्या, प्रसंगानं बांधली जाणारी दरवाजांवरील तोरणं, घरांसमोरील तुळशीवृंदावनं, गुढीपाडवा-होळी-रंगपंचमी-गणेशो त्सव-दीपावलीसारखे सणप्रसंग यांमधून महाराष्ट्राच्या दृश्यसंस्कृतीचं सुखद दर्शन घडत असतं. मान्य, की मराठी दृश्यसंस्कृतीच्या या साऱ्या खुणा आज केवळ रिवाजापुरत्या शिल्लक आहेत. काही तर भ्रष्ट बनल्या आहेत! पण कधी काळी याच खुणांमधून आम्ही आमच्या सौंदर्य-आराधनावादी जीवनशैलीबाबतचा पुकारा करत असू. खरं ना? या विशिष्ट पुकाऱ्यामागचा सांस्कृतिक इतिहास आजवर कुणी लिहिलाय व कधी लिहिलाय, ते ठाऊक नाही! पण या पुकाऱ्याचा मथितार्थ विसरताना आम्ही कधी काळी अजंठा-वेरूळ निर्माण करणारं निर्मितीक्षम जीवन जगत होतो, हेही विसरून गेलो. आम्ही विसरलो, की ‘सुंदर तेचि वेचावे, सुंदर करोनी मांडावे, इतरांसाठी!’ हे आमचं अत्यंत साधं असं निर्मितीक्षम तत्त्वज्ञान होतं. आम्ही विसरलो, की कुठलीही गोष्ट सुंदर करून ‘इतरां’साठी मांडताना आमच्या औचित्य आणि सौंदर्यविषयक जाणिवा एकत्र येत होत्या.. आपल्या हातांना सुंदर काही घडवण्याची प्रेरणा देत होत्या.. गती देत होत्या! या ...