फर्मानबाडीचे महत्त्व-सदानंद मोरे
पानिपतचा पराभव मराठय़ांच्या इतिहासातील सर्वात क्लेशकारक घटना मानायचे असेल, तर सर्वात सुखद घटना म्हणून पेशव्यांना वस्त्रे देण्याचा, म्हणजे 'फर्मानबाडी'च्या कार्यक्रमाचा उल्लेख करता येईल. बादशाहची मुखत्यारी मिळाल्यामुळे मराठे दिल्लीच्या मोगल सत्तेचे अधिकृत प्रतिनिधी बनले. इंग्रजांनाही अडवण्याचा व चाप लावण्याच्या अधिकार त्यांना प्राप्त झाला. या प्रक्रियेत अनेकांचा सहभाग असला तरी शेवटास नेली ती महादजी शिंदे यांनी.. पानिपतच्या युद्धात मराठय़ांचे जे नुकसान झाले, त्याचा विचार करता एखाद्यास तो मराठय़ांच्या इतिहासाचा 'अँटिक्लायमॅक्स' वाटणे शक्य आहे. पण मग 'क्लायमॅक्स' कोणत्या घटनेला मानायचा, असा प्रश्न उपस्थित होईल. येथे कोणालाही छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्याची आठवण होईल. शेकडो वर्षांच्या पराभवाच्या व पारतंत्र्याच्या परंपरेला छेद देणारी व खुद्द औरंगजेबाला 'हाय तोबा' करायला लावणारी ही घटना मराठय़ांच्या इतिहासास कलाटणी देणारीही होती. तथापि, त्या वेळी मराठय़ांच्या पराक्रमाची व सत्तेची तयारी महाराष्ट्रापुरती मर्यादित होती. पानिपतची लढाई दूर महाराष्ट...