फर्मानबाडीचे महत्त्व-सदानंद मोरे

पानिपतचा पराभव मराठय़ांच्या इतिहासातील सर्वात क्लेशकारक घटना मानायचे असेल, तर सर्वात सुखद  घटना म्हणून पेशव्यांना वस्त्रे देण्याचा, म्हणजे 'फर्मानबाडी'च्या कार्यक्रमाचा उल्लेख करता येईल. बादशाहची मुखत्यारी मिळाल्यामुळे मराठे दिल्लीच्या मोगल सत्तेचे अधिकृत प्रतिनिधी बनले. इंग्रजांनाही अडवण्याचा व चाप लावण्याच्या अधिकार त्यांना प्राप्त झाला. या प्रक्रियेत अनेकांचा सहभाग असला तरी शेवटास नेली ती महादजी शिंदे यांनी..

पानिपतच्या युद्धात मराठय़ांचे जे नुकसान झाले, त्याचा विचार करता एखाद्यास तो मराठय़ांच्या इतिहासाचा 'अँटिक्लायमॅक्स' वाटणे शक्य आहे. पण मग 'क्लायमॅक्स' कोणत्या घटनेला मानायचा, असा प्रश्न उपस्थित होईल. येथे कोणालाही छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्याची आठवण होईल. शेकडो वर्षांच्या पराभवाच्या व पारतंत्र्याच्या परंपरेला छेद देणारी व खुद्द औरंगजेबाला 'हाय तोबा' करायला लावणारी ही घटना मराठय़ांच्या इतिहासास कलाटणी देणारीही होती. तथापि, त्या वेळी मराठय़ांच्या पराक्रमाची व सत्तेची तयारी महाराष्ट्रापुरती मर्यादित होती. पानिपतची लढाई दूर महाराष्ट्राच्या सीमेबाहेर लढली गेली आणि मुख्य म्हणजे ती देशाबाहेरील शत्रूबरोबरची होती. आता या लढाईला मराठय़ांच्या इतिहासातील सर्वात क्लेशकारक घटना मानायचे असेल, तर सर्वात सुखद घटनाही त्याच प्रकारची म्हणजे जिचा संबंध महाराष्ट्राबरोबरच जगाशी पोहोचतो अशी असणे सयुक्तिक ठरेल. 
असा तार्किक विचार केला, तर आधी क्लायमॅक्स व मग अँटिक्लायमॅक्स अशी कालानुक्रमिक ऐतिहासिक पद्धत अवलंबिण्याचेही कारण नाही. शिवाय अशी घटना आढळली तर पानिपतच्या धक्क्याने मराठय़ांची अप्रतिष्ठा होऊन ते संपले असा समजही दूर होईल. पानिपतच्या पराभवानंतर मराठय़ांना रणमैदान सोडून पळ काढावा लागला. शिंदे-होळकरांचे वाचलेले सैनिक त्यांच्या त्यांच्या संस्थानात परतले. महाराष्ट्रातून मोहिमेवर गेलेले लढवय्ये महाराष्ट्रात परतले. मराठय़ांची ही फजिती पाहून मनोमन सुखावलेल्या उत्तरवासीयांना मराठय़ांची कटकट आता कायमची गेल्याचे वाटू लागले. तथापि, मागच्याच लेखात सांगितल्याप्रमाणे अब्दाली हा उमदा शत्रू असल्याने त्याने स्वत: होऊन मराठय़ांनी परत उत्तर हिंदुस्थानचा बंदोबस्त करावा असा प्रस्ताव केला. मराठय़ांना ते हवेच होते. त्यानुसार थोडय़ाच दिवसांनी आपल्या गेलेल्या ठाण्यावर कब्जा करून आपले बस्तान बसवले. या प्रक्रियेत मल्हारराव होळकर यांचा मोठा वाटा होता. रामचंद्र गणेश कानडे, विसाजी कृष्ण बिनीवाले यांनीही पराक्रम गाजवला. मात्र ही प्रक्रिया शेवटास नेली ती महादजी शिंदे यांनी. यालाच आपण 'क्लायमॅक्स' म्हणू या!
अर्थात, उत्तरेत बस्तान बसवणे आता इतके सोपे नव्हते. प्लासी आणि बक्सर येथील लढाया जिंकून प्रबळ झालेल्या इंग्रजांनी बादशाहकडून बंगालच्या दिवाणीचे अधिकार प्राप्त केले होते व अयोध्येच्या नवाबाला निष्प्रभ करून थेट दिल्लीला शह दिला. अर्थात, दिल्लीवर ताबा मिळवून अंमल करण्याची त्यांची अद्याप तयारी नसल्याने त्यांनी बादशाह शाहआलम यास ताब्यात घेऊन अलाहाबाद येथे आपल्या संरक्षणात ठेवले. या काळात राजधानी दिल्ली रोहिल्यांचा सरदार झाबेतखान याने दाबली होती. हा झाबेतखान म्हणजे पानिपतमधील मराठय़ांचा जालीम दुश्मन नजीबखान याचा मुलगा. गंगा व यमुना यांच्याच दोआबात म्हणजेच अंतर्वेदीत त्याचे राोहिले प्रबळ होते. मराठय़ांपुढील पहिली समस्या दिल्ली ताब्यात घेण्याची होती. हिंदुस्थानच्या राजधानीचे हे शहर घेण्यासाठी इंग्रज टपून बसले होते. दिल्लीचा मालक असलेला बादशाह त्यांच्या ताब्यात होता, ही त्यांची जमेची बाजू होती. मराठय़ांनी दिल्ली घ्यायचे ठरवले. त्यांनी आधी रोहिल्यांच्या अंतर्वेदीत घुसून तो प्रदेश जिंकून घेतला. दिल्लीत प्रवेश करून शहरात शाहआलमच्या सत्तेची द्वाही फिरवली. तो दिवस ७ फेब्रुवारी १७७१ हा होता. स्वत: झाबेतखान लाल किल्ल्यात ठाण मांडून बसला होता. महादजीने तोफांचा भडिमार करून त्याला किल्ला खाली करण्यास भाग पाडले. १० फेब्रुवारीला किल्ला पडला. मराठय़ांचे झेंडे शहरात आणि किल्ल्यावर फडकले. साहजिकच रोहिल्यांच्या भीतीने इंग्रजांच्या आश्रयास गेलेल्या शाहआलमवरील दडपण दूर झाले. दिल्ली मराठय़ांकडे गेल्यामुळे तो आता इंग्रजांना डावलून सरळ मराठय़ांशी करार करू शकत होता. तसे घडलेसुद्धा. त्याच्या मर्जीविरुद्ध इंग्रज त्याला अलाहाबादेत रोखू शकत नव्हते. खरे तर गव्हर्नर जनरल वॉरन हेस्टिंग्जला पत्रांवर पत्रे लिहून तो थकला होता. पण हेस्टिंग्जची हिंमत होत नव्हती. आता बादशाहला व इंग्रजांनाही मराठय़ांच्या सामर्थ्यांची खात्री पटली. मराठय़ांच्या संरक्षणात शाहआलमने दिल्लीकडे कूच केले. २५ डिसेंबर १७७१ या दिवशी त्याने राजधानीत प्रवेश केला व तो तख्तावर बसला म्हणजे त्याची पुन:स्थापना झाली. याचे शंभर टक्के श्रेय मराठय़ांकडे जाते. माधवराव पेशव्यांनी याबाबत अभिनंदन करताना लिहिले- 'इंग्रजांस जी गोष्ट न जाहली ती तुम्ही सिद्ध करून असाधारण लौकिक मिळवला.' माधवराव असाही इशारा देण्यास विसरले नाहीत, की 'इंग्रजांचा प्रवेश दिल्लीत होऊ नये. प्रवेश जालियावरी उखलणार नाही.' अर्थात याची पुरेपूर जाणीव महादजींना होती व त्यांचे राजकारण या जाणिवेच्या अनुषंगानेच चालले होते. त्यांच्याच शब्दात सांगायचे म्हणजे, 'दिल्लीचे राजकारण इंग्रजांच्या हातात जाऊ न द्यावे.'
झाबेतखानला दिल्लीमधून हुसकावून देऊन भागणार नव्हतेच. महादजीने विसाजीपंतांसमवेत झाबेतच्या मुलखावर स्वारी केली. झाबेत पळाला. नजीबाबाद ऊर्फ फत्तरगड हे रोहिल्यांचे मुख्य ठाणे मराठय़ांनी काबीज केले. तेथील नजीबची कबर फोडून मराठय़ांनी आपला राग व्यक्त केला. पण नजीबचे खानदानच जणू मराठय़ांच्या पाचवीला पुजले होते. झाबेतखानानंतर त्याचा मुलगा गुलाम कादिर बादशाहला नडू लागला. महादजी लालसोट येथील लढाईत गुंतलेला असताना कादिरने दिल्लीवर स्वारी केली. तेथे तेव्हा मराठेच अंमल बजावीत होते. महादजींचा जावई लाडोजी शितोळे हा मुख्य होता. त्याचा पराभव झाला व कादिरने लाल किल्ल्याचा ताबा मिळवला. बादशाहवर जबरदस्ती करून मीरबक्षीपद मिळवले. बादशाहच्या बेगमांची विटंबना केली. खुद्द बादशाहला तख्तावरून खाली खेचून त्याचे डोळे काढले. काही शाहजाद्यांना ठार मारले. बादशाह व त्याच्या कुटुंबीयांचा पैशांसाठी अमानुष छळ केला. दिल्लीच्या तख्ताची प्रतिष्ठा राखायचे काम पुन्हा एकदा मराठय़ांकडे आले. महादजीने ते तुकोजी होळकर आणि मस्तानी-बाजीरावाचा नातू अलिबहादर यांच्या साहाय्याने पार पाडले. कादिरला लाल किल्ल्याच्या बाहेर काढून हुसकावून लावण्यात मराठय़ांना यश आले. पळून जाणाऱ्या कादिरास अलिबहादराच्या लोकांनी पकडले. त्याने लुबाडलेला बादशाहचा खजिना हस्तगत करून महादजीने तो त्याचा त्याला परत केला. १ मार्च १७८९ या दिवशी कादिराच्या डोक्याचे पाच पाट करून त्याला लष्करातून मिरवत त्याची विटंबना केली. बादशाहच्या सूचनेवरून त्याचे डोळे काढून ते बादशाहला पाठवण्यात आले. ३ मार्चला त्याचा अंतिम निवाडा करण्यात आला. पानिपतबरोबरच नजीबाचा तीन पिढय़ांचा हिशेब चुकता करण्यात मराठय़ांनी यश मिळवले. त्यामुळे उत्तरेत मराठय़ांना त्यांची गेलेली पत व प्रतिष्ठा यांचा पुनर्लाभ होऊन त्यांचा वचक पूर्ववत बसला. दरम्यान, इ.स. १७९१ मध्ये महादजींच्या नेतृत्वाखाली मराठय़ांनी इंग्रजांबरोबर वडगाव येथे झालेली लढाई जिंकून इंग्रजांनाही शह दिला होताच.
बादशाह शाहआलम जरी मराठय़ांच्या ताब्यात असला, तरी त्याचा शाहजादा जवाँबख्त याला ताब्यात ठेवून मराठय़ांना शह द्यायचे इंग्रजांचे राजकारणही महादजीने हाणून पाडले.
अशा प्रकारे दिल्ली दरबारावर मराठय़ांचे वर्चस्व पूर्णपणे स्थापन झाले. महादजींच्या इशाऱ्याशिवाय मोगल दरबारचे पानही हलू नये अशी स्थिती निर्माण झाली. हिंदुस्थानातील सार्वभौम सत्ताधीश दिल्लीचा मोगल बादशाह. त्यामुळे त्याचा क्रमांक तसा एकच. पण त्याच्या दरबारातील सर्वात श्रेष्ठ पद वकील मुतलकीचे. ते महादजीने बादशाहकरवी आपला स्वामी पुण्याचा बाळ पेशवा सवाई माधवराव याच्यासाठी मिळवले. म्हणजे जे पेशवे हे पूर्वी सातारच्या छत्रपतींचे दुय्यम होते, ते आता हिंदुस्थानच्या बादशाहचे दुय्यम बनले. हिंदुस्थानातील क्रमांक दोनचे सत्ताधीश बनले!
तथापि, बादशाहने दिलेली खिलत व नालकी (पालखीसारखे विशेष वाहन) पेशव्याने स्वीकारले तर महादजीचा मोठेपणा वाढतो, या भीतीने पुणे दरबारने कारस्थाने करीत हा सारा सरंजाम काही दिवस उज्जैनमध्येच पाडून ठेवला. शेवटी नाइलाजाने महादजीला स्वत:च प्रस्थान ठेवावे लागले. १२ जून १७९२ या दिवशी तो पुण्यात दाखल झाला. पुणेरी मुत्सद्दय़ांचा विरोध मोडीत काढून शेवटी २२ जून या दिवशी गारपिराजवळ उभारलेल्या खास शामियान्यात पेशव्यांना वस्त्रे देण्याचा म्हणजे 'फर्मानबाडी'चा कार्यक्रम पार पडला. 
महाराष्ट्राच्या इतिहासातील या फर्मानबाडी प्रकरणाचे महत्त्व ओळखण्यात अभ्यासकांनी कुचराई केली म्हणा, की अंगचोरपणा केला म्हणा! बादशाहची मुखत्यारी मिळाल्यामुळे मराठे दिल्लीच्या मोगल सत्तेचे अधिकृत प्रतिनिधी बनले. इंग्रजांनाही अडवण्याचा व चाप लावण्याच्या अधिकार त्यांना प्राप्त झाला. हिंदुस्थानच्या सत्ता स्पर्धेत इंग्रजांवर मात करून ते Preempt झाले. हे सारे श्रेय महादजीला. आणि फर्मानबाडी हा महाराष्ट्राच्या इतिहासातील 'क्लायमॅक्स'. दुर्दैवाने त्यानंतर थोडय़ाच दिवसांत महादजींचा मृत्यू ओढवला व सवाई माधवरावांनीही आत्महत्या केली. त्यानंतर या मुखत्यारीचा उपयोग करून घेण्याची धमक कोणाकडेच नसल्यामुळे मराठय़ांचे राज्यही लयाला गेले. पण त्यामुळे त्यांच्या आधीच्या पराक्रमाचे महत्त्व कमी होत नाही.
(सदानंद मोरे*लेखक पुणे विद्यापीठात तत्त्वज्ञानाचे प्राध्यापक असून संतसाहित्याचे व्यासंगी व विचारवंत आहेत.)

Link-http://www.loksatta.com/sampadkiya-news/mahadaji-shinde-and-farmanbadi-581094/?nopagi=1

Comments

Popular posts from this blog

आठवण आईची-पाचवे पुण्यस्मरण

आई -तृतीय पुण्यस्मरण

आई-चतुर्थ पुण्यस्मरण