नेमेचि येतो पावसाळा
पावसाळा म्हटलं तर काहींचा अत्यंत आवडता तर काहींचा नावडता ऋतू! मान्सून(नैरुत्य मारुत )थोड्या फार फरकाने कधी लवकर तर कधी उशिराने का होईना एकदम इमान-एतबारे समस्त भारतभूमीतच नाही तर भारतीय उपखंडात बरसतच असतो. साधारण एप्रिल -मे महिन्यात महाराष्ट्रातील (भारतातील पण म्हटले तरी चालेल)महानगर/नगर पालिका तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी आणि सजग नागरिक /विरोधी पक्ष यांचे नाले,मलनिस्सारण यंत्रणा साफ-सफाई(?) ,रस्ते दुरुस्ती(??)वरुन दावे-प्रतिदावे ,आरोप -प्रत्यारोप सुरु होतात. हे सर्व इतके सरावाचे झालेले आहे कि वर्तमानपत्र छापणाऱ्या किंवा बातम्या देणाऱ्या वाहिनीवरील मंडळीनी बहुधा फक्त तत्कालीन कर्मचाऱ्यांचे नाव आणि तारीख बदलून कुठल्याही वर्षीच्या मजकूरात टाकली कि एकदम ताजी बातमी(ब्रेकिंग न्यूज ) तयार!! म्हणजे आता फक्त पाऊसाने बोहनी करण्याचीच बाकी राहिलेली असते. मग कधी तरी मुख्य परीक्षेआधी सराव चाचणी घ्यावी असा एखादा अवकाळी पाऊस कोसळतो (जो अलीकडील ४-५ वर्षात अगदी नियमितपणे येतोच ) आणि बहुतेक सर्वांचे पितळ उघडे पाळतो म्हणा किंवा काही मंडळीना रोजी-रोटीची तरतूद ...