नेमेचि येतो पावसाळा

पावसाळा म्हटलं तर काहींचा अत्यंत आवडता  तर काहींचा नावडता ऋतू! मान्सून(नैरुत्य मारुत )थोड्या फार फरकाने कधी लवकर तर कधी उशिराने का होईना  एकदम इमान-एतबारे समस्त भारतभूमीतच नाही तर भारतीय उपखंडात बरसतच असतो.  साधारण एप्रिल -मे महिन्यात महाराष्ट्रातील (भारतातील पण म्हटले तरी चालेल)महानगर/नगर पालिका तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाचे  अधिकारी आणि सजग नागरिक /विरोधी पक्ष यांचे नाले,मलनिस्सारण यंत्रणा साफ-सफाई(?) ,रस्ते दुरुस्ती(??)वरुन दावे-प्रतिदावे ,आरोप -प्रत्यारोप सुरु होतात. हे सर्व इतके सरावाचे झालेले आहे कि वर्तमानपत्र छापणाऱ्या किंवा बातम्या देणाऱ्या वाहिनीवरील मंडळीनी  बहुधा फक्त तत्कालीन कर्मचाऱ्यांचे नाव आणि तारीख बदलून कुठल्याही वर्षीच्या मजकूरात टाकली कि एकदम ताजी बातमी(ब्रेकिंग न्यूज ) तयार!! म्हणजे आता फक्त पाऊसाने बोहनी करण्याचीच बाकी राहिलेली असते. मग कधी तरी मुख्य परीक्षेआधी सराव चाचणी घ्यावी असा एखादा अवकाळी पाऊस कोसळतो (जो अलीकडील ४-५ वर्षात अगदी नियमितपणे येतोच ) आणि  बहुतेक सर्वांचे पितळ उघडे पाळतो म्हणा किंवा काही मंडळीना रोजी-रोटीची तरतूद झाल्याने, आपले म्हणणे खरे असल्याचे पावसाने सिध्द केल्यामुळे  आनंद होतो म्हणा. मग घाईघाईत आधीच तयार करून घेतलेले, आधीच खराब दर्ज्याचे काम केलेल्या ठेकेदारांकडून फुगलेल्या रकमेचे टेंडर पास होऊन परत जोमात (आनंदात)कामाला सुरुवात होते आणि मग आपण पण सॉलिड खूष. पण थोडेच दिवस. पुन्हा एखाद्या दिवशी पाऊस धो-धो बरसतो नि सगळे रस्ते रेल्वे मार्ग,इमारती, वस्त्या ,वाड्या, गटारी किंवा जे त्याच्या वाटेत येईल ते अगदी अमानुष वाटावे अश्या तऱ्हेने साफ धुवून काढतो. २६ जुलै २००५ मध्ये मुंबईमध्ये झालेला जलप्रलय असो,मागच्या वर्षी घडलेला उत्तराखंडचा प्रलय असो, किंवा पुण्याजवळील शिंदेवाडी परिसरातील दुर्दैवी घटना असो ;पुन्हा पुन्हा घडत राहतात .आपण बातमी स्वरूपात बघून/वाचून /ऐकून ते विसरतो न विसरतो तोच माळीन गाव इतिहास जमा करून टाकणारी एखादी अत्यंत दुख:द ,अगदी मनाला चटका लावून जाणारी घटना आपल्या समोर येउन उभी राहते आणि जणू पुन्हा-पुन्हा आपण खरेच किती पाण्यात आहोत हे दाखवून देते.
अगदी कालच फारतर १ किंवा २ तास पाऊस आला  आणि विविध शहरात/गावात  गल्लोगल्ली झालेल्या धुमाकुळाच्या सचित्र बातमांचाही जणू पूरच आला. कश्यामुळे घडतेय  हे सर्व कोण जबाबदार आहे याला- शासकीय यंत्रणा की आधी आपल्यासारखे वापरून झाल्यावर निष्काळजीपणे इस्तत:कचरा/प्लास्टिक भिरकावून देणारे आणि मग पावसाने झालेल्या त्रासामुळे गळा काढणारे नागरिक कि जागतिक तापमान वाढ कि परग्रहावरून आलेली एखादी शक्ती?काय असेल ते असेल पण बहुतेक वेळा घटनेची दुर्घटना होण्यामध्ये निसर्गापेक्षा मानवनिर्मीत घटकांचाच मोठा हात असतो हे वारंवार दिसून येतेय मग पावसाला दोष तो किती आणि का द्यायचा ?
सर्व जगभर असेच होते का याचा कानोसा घ्यायचा प्रयत्न केला असता बरेच चांगले-वाईट तथ्य समोर येतात जसे कि भारतात अगदी पुरातन काळापासून वसविलेली काही प्राचीन शहरे असो कि पाशिमात्य देशांमध्ये  १५/१६व्या शतकांपासून राबविले गेलेले नगर-नियोजनाचे दूरदर्शी धोरण असो. शक्यतो नैसर्गिक घटकांवर मात करण्याचा प्रयत्न करण्यापेक्षा सुयोग्य ते नियोजन करून होणारी हानी टाळणे किंवा त्याची तीव्रता होईल तितकी कमी करणे हाच बचावाचा पारंपारिक आणि खात्रीशीर उपाय दिसतो पण अलीकडे जोमात होणारे शहरीकरण/लोकसंख्या वाढ जे अपरिहार्य आहे हे बघता भारतात/राज्यात/शहरात नगर/गाव नियोजन नावाचा प्रकार फक्त कागदावरच शिल्लक राहिला आहे का असा  प्रश्न वारंवार मनात आल्यापासून राहत नाही. बर पाऊस इतका बेभरवश्याचा वगैरे ठरवून झाल्यावरपण नियमितपणे अनियमित पडून /राडा करून धरणं  वगैरे भरूनपण पाऊस-पुरण/आख्यान  संपत नाही.लगेच हिवाळा संपतो न संपतो तोच पिण्याच्या /शेतीच्या पाण्याचा तुटवडा/टंचाई सुरु होते  आणि हळूहळू गाव,वाड्या आणि शहरे टॅंकरमय होऊन जातात आणि पुन्हा पाण्याचा ओघ/झरा आटल्यामुळे जनता नाखूष तर अगदी मुठभर मंडळी पैश्यांचा ओघ/झरा सुरु झाल्यामुळे जाम खूष !पुन्हा  पावसाच्या नावाने शिमगा!!मग अगदी फुल तो रेट्रो स्टाईल मंत्री -मुख्यमंत्री झालेच तर प्रधान मंत्र्यांचे सुद्धा पांडूरंगाच्या चरणी निदान येणाऱ्या वर्षात तरी चांगला पाउस-पाणी  पडू दे म्हणून डोळ्यात परत पाणीच(?) आणून साकडे !!! मग आणेवारी-टंचाई  निवारण आराखडे- जलसंधारण-सिंचन खात्यांच्या जोरदार बैठका-कोट्यावधी रुपयांचे धरण प्रस्ताव-(जे वर्ष भर नाही केले ते निस्तरण्या साठी ) शहरांमध्ये पाणी पुरवठा नियोजन वगैरे अगदी शिस्तीत आणि मग परत येरे माझ्या  मागल्या!! मागच्या पानावरून पुढे सुरु वर्षानु वर्ष आणि कदाचित दशकानु दशक सुद्धा  कारण  नेमेचि येतो पावसाळा .

Comments

Popular posts from this blog

आई -तृतीय पुण्यस्मरण

आठवण आईची-पाचवे पुण्यस्मरण

आई-चतुर्थ पुण्यस्मरण