गरीब ज्वारीचे भरजरीपण-अशोक तुपे
खेळात कुस्ती , लोककलेत लावणी , अध्यात्मात अभंग तसे पिकात ज्वारी हे महाराष्ट्राचे वैभव. गहू आला मेक्सिकोतून , पण जोंधळा अस्सल मराठमोळा. हरितक्रांतीनंतर मात्र या वैभवाला उतरती कळा लागली. त्यात पंजाबमुळे गहू , तर दक्षिणेमुळे तांदूळ रेशिनगवर दिला गेला. तेथे ज्वारीला डावलले. चपाती हे श्रीमंतांचे तर भाकरी हे गरिबांचे खाणे. राजकीय अजेंडय़ावर बागायती पिकांची जशी बाजू घेतली जाते तसे जिराईत असल्याने ज्वारीला कुणाचाच आधार नव्हता. गेली ५० वष्रे उपेक्षा होत असलेल्या जोंधळ्याला आता लोकाश्रयाचा आधार मिळू लागला आहे. एवढेच नव्हे तर बहुराष्ट्रीय कंपन्यांनाही ज्वारीने भुरळ घातली आहे! वजन कमी करण्याचे फॅड आता आले असल्याने अनेक जण ज्वारीलाच प्राधान्य देतात. ग्लुटेन नसल्याने ज्वारी पचायला सोपी असते. अॅसिडिटी होत नाही. त्यामुळेच आता लोकांना जुने ते सोने या उक्तीप्रमाणे ज्वारीचे महत्त्व कळू लागले आहे. हैदराबाद येथे राष्ट्रीय ज्वारी संशोधन केंद्र आहे. यापूर्वीचे संचालक व शास्त्रज्ञ डॉ. जे. व्ही. पाटील यांच्या पुढाकारातून या संस्थेबरोबर ब्रिटानियाने करार केला. ज्वारीची बिस्किटे निर्मितीच्या तंत्रज्ञानाकरिता त्...