गरीब ज्वारीचे भरजरीपण-अशोक तुपे

खेळात कुस्ती, लोककलेत लावणी, अध्यात्मात अभंग तसे पिकात ज्वारी हे महाराष्ट्राचे वैभव. गहू आला मेक्सिकोतून, पण जोंधळा अस्सल मराठमोळा. हरितक्रांतीनंतर मात्र या वैभवाला उतरती कळा लागली. त्यात पंजाबमुळे गहू, तर दक्षिणेमुळे तांदूळ रेशिनगवर दिला गेला. तेथे ज्वारीला डावलले. चपाती हे श्रीमंतांचे तर भाकरी हे गरिबांचे खाणे. राजकीय अजेंडय़ावर बागायती पिकांची जशी बाजू घेतली जाते तसे जिराईत असल्याने ज्वारीला कुणाचाच आधार नव्हता. गेली ५० वष्रे उपेक्षा होत असलेल्या जोंधळ्याला आता लोकाश्रयाचा आधार मिळू लागला आहे. एवढेच नव्हे तर बहुराष्ट्रीय कंपन्यांनाही ज्वारीने भुरळ घातली आहे! वजन कमी करण्याचे फॅड आता आले असल्याने अनेक जण ज्वारीलाच प्राधान्य देतात. ग्लुटेन नसल्याने ज्वारी पचायला सोपी असते. अ‍ॅसिडिटी होत नाही. त्यामुळेच आता लोकांना जुने ते सोने या उक्तीप्रमाणे ज्वारीचे महत्त्व कळू लागले आहे. हैदराबाद येथे राष्ट्रीय ज्वारी संशोधन केंद्र आहे. यापूर्वीचे संचालक व शास्त्रज्ञ डॉ. जे. व्ही. पाटील यांच्या पुढाकारातून या संस्थेबरोबर ब्रिटानियाने करार केला. ज्वारीची बिस्किटे निर्मितीच्या तंत्रज्ञानाकरिता त्यांनी संस्थेला ४० लाख दिले. आता ही कंपनी लवकरच ज्वारीची बिस्किटे बाजारात आणणार आहे. ज्वारीचा पास्ता, शेवया, पोहे, रवा तयार करण्यात आला. तो बिग बाजारमध्ये ठेवला असता त्याला मोठी मागणी आली. इडली, डोसा, उपमा याकरिता ज्वारीचा रवा वापरता येतो. मधुमेहींचा नाश्ता त्यामुळे रुचकर व गोड होणार आहे. संस्थेने त्यासाठी पुढाकार घेतला आहे. असे असले तरी हल्ली स्वयंपाकाची पद्धत बदलल्याने ज्वारीची भाकरी करणे अडचणीचे होते. ग्लुटेन नसल्याने ज्वारीच्या पिठाचा गोळा तयार करून भाकरी करायला कष्ट पडतात. गव्हाच्या पिठाचा उंडा चिकट होतो. मैद्याचेही तेच आहे. त्यामुळे रोटी व चपातीने स्वयंपाकघरात सहज प्रवेश केला. रोटी मेकिंग मशीन बाजारात उपलब्ध आहे. असे असले तरी लुधियानाच्या एका संस्थेने तासाला १२०० भाकरी करणारे स्वयंचलित यंत्र विकसित केले. त्याची किंमत सहा ते सात लाख रुपये आहे. कमी किमतीला व सहज हाताळता येणारे यंत्र उपलब्ध झाले तर भाकरी पुन्हा स्वयंपाकघरातील जागा घेईल. आता तसे प्रयत्न सुरू आहेत. पूर्वी केवळ गव्हाची चपाती, ज्वारी, बाजरीची भाकरी, मद्याची रोटी खाल्ली जात असे. पण काळ बदलला आहे. मल्टिग्रेन आटा बाजारात आला आहे. त्याला मोठी मागणी आहे. अनेक कंपन्या त्याची विक्री करीत आहेत. त्यात ज्वारीचा समावेश आहे. साहजिकच ज्वारीचा समावेश असलेली चपाती आता बनेल. पुन्हा एकदा स्वयंपाकघरात ज्वारीला गहू, सोयाबीन, तांदूळ या पिठात सहभाग मिळून तिची रुची वाढेल. शेतकऱ्यांसाठी हे आशादायी आहे.
 खरे तर ज्वारी हे अस्सल भारतीय व महाराष्ट्रीय पीक असले तरी ब्रिटिशांनी त्याची दखल १९३० सालीच घेतली. मोहोळला कृषी विभागाचे केंद्र होते. नंतर १९३७ मध्ये त्याचे ज्वारी संशोधन केंद्रात रूपांतर झाले. असे असले तरी १९६८ पर्यंत ज्वारीवर विशेष संशोधन झाले नाही. जुन्याच जाती होत्या. हलक्या, भारी, मध्यम अशा सर्वच प्रकारच्या जमिनीत ज्वारी येते. १९६८ मध्ये डॉ. बापट यांनी स्वाती ही जात संशोधित केली. नंतरच्या काळात डॉ. शिवाजीराव उगले, डॉ. नारखेडे, डॉ. जे. व्ही. पाटील, डॉ. शरद गडाख, डॉ. मनाजी शिंदे  यांच्यासह अनेक शास्त्रज्ञांनी चांगल्या जाती बाजारात आणल्या. मालदांडी, फुले यशोदा, रेवती, माऊली, वसुधा, सावित्री, अमृता, हुरडय़ाकरिता गोड ज्वारी संशोधित केली. बिल अँड मेलिंडा गेट फाऊंडेशनच्या होप प्रोजेक्टमुळे ज्वारीचे तंत्रज्ञान शेतकऱ्यांच्या शिवारात गेले. पूर्वी ज्वारीचे हेक्टरी उत्पादन हे तीन क्विंटल होते. आता ते ११ क्विंटलपर्यंत जाऊन पोहोचले. उत्पादनाची क्षमता तिप्पट झाली. विशेष म्हणजे हैदराबाद येथील राष्ट्रीय ज्वारी संशोधन केंद्रात देशभरातील ज्वारीच्या ३१ हजार जाती जतन केल्या आहेत. राहुरीच्या महात्मा फुले कृषी विद्यापीठात अडीच हजार जाती जतन केलेल्या आहेत. जगभर ज्वारीचे पीक घेतले जाते. अमेरिका व ऑस्ट्रेलियात ते कोंबडीचे खाद्य म्हणून वापरले जाते. पण आजही ज्वारीचे चांगले बियाणे खासगी नव्हे तर सरकारी क्षेत्राद्वारे शेतकऱ्यांपर्यंत जाते. गरीब शेतकरी सिंचनाची सोय नसेल तर ज्वारी पीक घेतो. आजही सोलापूर, नगर, पुणे, जळगाव व मराठवाडय़ाच्या दुष्काळी टापूत हे पीक शेतकऱ्यांना वरदान ठरले आहे. उद्या ग्लोबल वार्मिंगच्या काळात हे पीकच शेतकऱ्यांना तारणार आहे. ज्वारीला पाणी कमी लागते. ज्वारीच्या ताटात ३२ दिवसानंतर मेण तयार होते. ते पानावर येऊन बसते. त्यामुळे बाष्पीभवन कमी होते. पाने हिरवीगार राहतात. दुष्काळाला प्रतिकार करण्याची क्षमता या पिकात आहे. पाऊस नसला तरी पीक हिरवेगार राहू शकते. त्यामुळेच आता दुष्काळरोधक जनुक शोधून ते अन्य पिकांत टाकण्याचे शास्त्रज्ञांचे प्रयत्न आहेत. त्यामुळेच आता ज्वारीला चांगले दिवस येण्याची चिन्हे आहेत. मधुमेहावर गुणकारी जागतिक तापमानवाढीत ज्वारी हेच पीक टिकू शकते, हे सर्व शात्रज्ञांना मान्य आहे. ज्वारीत ग्लुटेन नसते. तंतुमय पदार्थ, कर्बोदके जास्त असतात. ती हळूहळू पचते. मधुमेहाला कारणीभूत असलेला ग्लायसेमिक इंडेक्स ज्वारीत ५६ टक्के, गव्हात ६२ टक्के, तर तांदळात ७२ टक्के आहे. नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ न्यूट्रिशन या संस्थेने तसा अहवाल दिला आहे. आता आंध्र प्रदेशसारख्या राज्यात मधुमेहींची संख्या वाढल्याने त्यांना ज्वारी खाण्याचा सल्ला दिला जातो. त्यामुळेच हैदराबादमध्ये आता ज्वारीच्या भाकरी मोठय़ा प्रमाणात मिळू लागल्या आहेत. 

अशोक तुपे – ashok.tupe@expressindia.com
---------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
Reference-http://www.loksatta.com/lokshivar-news/sorghum-facts-and-information-1194713/

Comments

Popular posts from this blog

आई -तृतीय पुण्यस्मरण

आठवण आईची-पाचवे पुण्यस्मरण

आई-चतुर्थ पुण्यस्मरण