उंचीचे गट करायला काय हरकत आहे? अशोक नायगावकर
प्रिय तातूस, ‘मन की बात’ ऐकता ऐकता गेल्या आठवडय़ापासून ऑलिम्पिकमुळे आपण ‘तन की बात’मध्ये गुंग झालो. टीव्हीमुळे हे सगळं बघायला मिळतं बघ! अरे, या जगात काय काय खेळ आहेत- बघून आपण थक्क होतो. मुळात जगात इतके देश आहेत याचंच आश्चर्य वाटतं. लहानपणी मला फक्त आपल्याच गावात लोक राहतात असं वाटायचं. पण एवढी वेगवेगळी नाकी, डोळी, उंची अशी माणसं बघून गंमतच वाटत राहते. अरे, बास्केटबॉल खेळणाऱ्या बायका किती उंच असतात! आपल्या बायकांना साधा फळीवरचा डबा काढायचा तर स्टुल घ्यावं लागतं. या बायका किती अलगद एसटीत बॅगा वर ठेवत असतील! मला आश्चर्य वाटतं, ते म्हणजे माणूस वजन वाढवू शकतो, दाढी वगैरे वाढवतो, पण ताडमाड उंची कशी काय वाढवतात, काही कळत नाही. पण यामध्ये खरे तर अन्यायदेखील आहे असं मला वाटतं! कुस्तीत कसं वेगवेगळ्या वजनाचे गट असतात, तसे उंचीचे गट करायला काय हरकत आहे! आणि त्याप्रमाणे बास्केटची उंची पण कमी-जास्त करायला हवी. असो. पण खरी मजा ‘जिम्नॅस्टिक्स’ बघताना येते. अरे, डोळ्यांचं पारणं फिटेल अशा शरीराच्या होणाऱ्या अद्भुत, लयबद्ध कसरती बघायला मिळतात. काय ते खेळाडू हवेत कोलांटय़ा मारून अलगद गादीवर पावले टेकतात...