‘बाल्टिमोर बुलेट‘

खेळाडू कितीही जन्मजात प्रतिभावान असला तरी त्याचे विक्रमवीरात रूपांतर होणे, हे एकट्याचे काम नसते. त्याचे यश वैयक्‍तिक असले, तरी त्याच्या पूर्वतयारीत अनेकांचा हातभार लागावा लागतो. फेल्प्सच्या पदकविक्रमानेही हेच दाखवून दिले आहे. 

युद्धे, उत्पात, चक्री वादळे, महापूर असल्या रेट्यांमध्ये साम्राज्ये लयाला जातात. राजशकटे उलथतात. खंदे वीर मातीत मिसळतात. इतिहास कूस बदलत राहातो. पण पुन्हा नव्याने सारे उभे राहाते, नव्याने सारे जमीनदोस्त होते. इतिहास आणि वर्तमानाचे चक्र चालूच राहाते. पण साऱ्याचा अर्थ ‘मातीवर चढणे एक नवा थर अंती‘ एवढाच. पण मानवजातीनेच मांडलेल्या या खेळात सारेच काही निरर्थकाचे प्रवासी नसतात. यद्धभूमी वा राजकारणाविनाही काही व्यक्‍तिमत्त्वे इतिहास घडवताना दिसतात. मानवी क्षमतांच्याही पलीकडे जाणाऱ्या या अतिमानवी व्यक्‍तींना खरे व्यासपीठ मिळते ते ऑलिंपिक खेळांचे. युद्धे आणि रणांगणाविनाही अजिंक्‍यवीराचा सन्मान प्राप्त करता येतो, ही शिकवण ऑलिंपिक चळवळीने जगताला दिली. प्राचीन ग्रीक इतिहासातही अशा अलौकिक वीरांच्या गाथा उपलब्ध आहेत. प्राचीन ऑलिंपिक सोहळ्यात, नेमके सांगावयाचे तर सुमारे 2160 वर्षांपूर्वी या पृथ्वीतलावर लिओनिडास नावाचा असाच एक अफलातून खेळगडी जन्माला आला होता. ख्रिस्तपूर्व 152 पर्यंत सलग चार ऑलिंपिक खेळांमध्ये मिळून त्याने डझनभर वैयक्‍तिक सुवर्णपदके पटकावली होती. लिओनिडास हा विक्रमवीरांचा विक्रमवीर ठरला आणि जगातील वेगवान धावपटू म्हणून इतिहासात अमर झाला. ‘तो देवाच्या वेगाने धावतो‘ असे त्याचे काव्यमय वर्णन ग्रीक पोथ्यांमध्ये सापडते. कालांतराने इतिहास कूस बदलतो, हेच खरे. तब्बल दोन हजार वर्षे उलटून गेल्यानंतर अमेरिकेतल्या बाल्टिमोर प्रांतात जन्माला आलेल्या एका अलौकिक क्षमतेच्या जलतरणपटूने लिओनिडासच्या बारा ऑलिंपिक सुवर्णपदकांचा विश्‍वविक्रम मोडीत काढून मानवी इतिहास नव्याने लिहून काढला. मायकेल फ्रेड फेल्प्स हे त्याचे नाव. 

‘बाल्टिमोर बुलेट‘ या लाडक्‍या संबोधनाने ओळखला जाणारा मायकेल फेल्प्स हे मानवी इतिहासातले एक जितेजागते आश्‍चर्य आहे. जलतरण तलावात निर्विवाद अजिंक्‍य मानल्या जाणाऱ्या या विक्रमवीराच्या तोडीचा खेळगडी पुन्हा जन्मण्यासाठी कदाचित आणखी दोनेक हजार वर्षेही लागू शकतील. त्याचेही पुतळे उभे राहतील आणि ‘तो देवाच्या वेगाने पोहत असे‘ असे त्याचे इतिहासात वर्णन होईल. खरे तर आता जेमतेम वयाच्या एकतिशीत असलेल्या फेल्प्सने 2012 मध्येच निवृत्ती जाहीर केली होती. पण कंटाळलेला फेल्प्सही नव्या दमाच्या जलतरणपटूपेक्षा दशांगुळे पुढेच असतो, हे पाहून त्याच्या प्रशिक्षकांनी त्याला ‘पोहत राहा‘ असा सल्ला दिला. त्याची परिणती म्हणजे फेल्प्स पुन्हा पाण्यात उतरला! आजमितीस तब्बल 22 ऑलिंपिक सुवर्णपदके आणि काही विश्‍वविक्रमाची पदके फेल्प्सच्या गळ्यात कायमची लटकू लागली आहेत. ‘‘छे, माझाच विश्‍वास बसत नाहीए, काय अफलातून करिअर झालं!‘‘ 200 मीटर बटरफ्लायचे सुवर्णपदक गळ्यात घालून घेतल्यानंतर तो स्वत:शीच बोलल्यासारखा म्हणाला. त्याची ही प्रतिक्रिया बरीच बोलकी मानावी लागेल. त्याच्या 22 सुवर्णपदकांपैकी नऊ पदके रिले शर्यतींची आहेत. याचाच दुसरा अर्थ असा, की तो एक चांगला संघसहकारीदेखील आहे. म्हणूनच की काय, यंदा रिओ ऑलिंपिकमध्ये अमेरिकेच्या भल्याभक्‍कम पथकाचे नेतृत्व करताना अमेरिकी ध्वज मायकेल फेल्प्सच्या समर्थ हातात सोपविण्यात आला होता. 

विशेष म्हणजे याच मायकेल फेल्प्सने पुस्तकी अभ्यासापुढे मात्र कायम नांगी टाकली. सहावीत असतानाच तो एकाग्रतेचा अभाव आणि अतिचंचलतेचा (अटेन्शन डेफिसिट हायपरऍक्‍टिविटी डिसॉर्डर) शिकार असल्याचे निदान झाले होते. अभ्यासात गडी काही दिवे लावू शकणार नाही, हे त्याच्या पालकांना कळून चुकल्याने, वारंवार जलतरण तलावाकडे पळणाऱ्या मायकेलला त्यांनी कधीही आडकाठी केली नाही. उलटपक्षी जलतरणाचे उत्तम प्रशिक्षण मिळेल अशी व्यवस्था केली. त्याच्या शाळेनेही त्याला सक्रिय पाठबळ दिले. खेळाडू कितीही जन्मजात प्रतिभावान असला तरी त्याचे विक्रमवीरात रूपांतर होणे, हे एकट्याचे काम नसते. त्याचे यश वैयक्‍तिक असले, तरी त्याच्या पूर्वतयारीत अनेकांचा हातभार लागावा लागतो, हे अधोरेखित करणारी ही बाब आहे. 



फेल्प्स हा एव्हाना चालतीबोलती दंतकथा बनला आहे. इतिहास असाच घडत असतो. मायकेल फेल्प्स हे त्याचे मानवी रूप आहे.

संदर्भ : १) बाल्टिमोर बुलेट! (अग्रलेख)- www.esakal.com-शनिवार, 13 ऑगस्ट 2016 - 03:30 AM IST
२)मायकेल फ्रेड फेल्प्स छायाचित्रे : 
(i) http://edition.cnn.com/2016/08/09/sport/michael-phelps-katie-ledecky-swimming/index.html?eref=rss_topstories
(ii) http://www.thehindu.com/sport/other-sports/rio-olympics-2016-michael-phelps-rules-the-pool-as-he-gets-his-gold-no21/article8967685.ece

Comments

Popular posts from this blog

आई -तृतीय पुण्यस्मरण

आठवण आईची-पाचवे पुण्यस्मरण

आई-चतुर्थ पुण्यस्मरण