‘‘कलानंद ही काही चूष नव्हे’’-मुकुंद संगोराम
किशोरीताईंचा जन्म झाला, तेव्हा भारतीय चित्रपट बोलायला लागून दोनच वर्षे झाली होती. ते बोलपट गीतांनी भरलेले असायचे. पहिल्याच ‘आलम आरा’ या बोलपटात गाणी खचाखच भरलेली होती. जी होती, तीही अभिजात संगीतातील बंदिशींवर आधारित. ‘अयोध्येचा राजा’ या पहिल्या मराठी बोलपटातही गोिवदराव टेंबे यांच्यासारख्या कसलेल्या कलावंताच्या संगीत दिग्दर्शनाखाली भरपूर गाण्यांचा समावेश करण्यात आला होता. तेव्हा भारतातील कानाकोपरा अभिजात संगीतात न्हाऊन निघत असे. कारण संगीत हे असे साधन होते, की प्रत्येकाला त्याने भुरळ पाडली होती. किशोरीताईंच्या मातोश्री मोगुबाई कुर्डीकर या, त्या काळातील एक तपस्वी आणि तालेवार कलावंत. त्या अल्लादिया खाँसाहेबांच्या तालमीत तयार झालेल्या एक कसदार आणि पेचदार गायिका होत्या. त्या काळात अल्लादिया खाँ यांच्यासारख्या प्रतिभावंताने एका नव्या गायनशैलीला जन्म दिला होता आणि ती रसिकांच्या पसंतीला पुरेपूर उतरत होती. कोल्हापूरसारख्या कलानगरीत खाँसाहेबांनी आपली कला अशा एका अत्युच्च कोटीला पोहोचवली होती, की त्या काळातील अन्य घराण्यांच्या कलावंतांनाही त्याने मोहवून टाकले होते. प्रत्येक कलावंत आपापली स...