आपल्याला क्रिकेट का आवडतं? (अभिजीत पवार)
भारतीय उपखंडात बाकी सगळ्या क्रीडाप्रकारांपेक्षा सर्वाधिक लोकप्रियता लाभली आहे ती क्रिकेटला. असं का आहे याच्या कारणांची उजळणी-
सध्या शहरी तरुण वर्गात अधूनमधून एका मुद्दय़ावर चर्चा सुरू असते. तो मुद्दा म्हणजे ‘माध्यमांनी, लोकांनी क्रिकेट सोडून इतर खेळांना महत्त्व द्यावे!’ यासाठी बहुतेक वेळा त्या खेळाबद्दल काहीही न बोलता, क्रिकेटने इतर खेळांची कशी दुर्गती केली आहे, क्रिकेटनेच कसा पैसा खेचलाय, इतर खेळांना कसे दुर्लक्षित केले जाते असा सूर लावून धरला जातो. अशी चर्चा म्हणजे १५ ऑगस्ट, २६ जानेवारीला देशप्रेम दाखवणं, ऑलिम्पिक जवळ आलं की इतर खेळ कसे वर आले पाहिजेत यावरचे विचार मांडणं अशीच असते. या लोकांनी इतर खेळ खेळले असण्याची शक्यता जवळ जवळ शून्य असते. खरं सांगायचं तर इतर खेळांचं मला वावडं नाहीये. सर्व खेळांनी आपापल्या क्षमतेने प्रगती करत राहावी; पण त्यासाठी इतर खेळांच्या समर्थकांनी क्रिकेटचा भारतीय उपखंडातील प्रवास जाणून घेणे गरजेचे आहे.
उपखंडात क्रिकेटच का?
याचं सोपं उत्तर आहे, आपले सगळ्यांचे राज्यकर्ते क्रिकेट खेळायचे म्हणून. राज्यकर्ते जे करतात, त्याकडे लोक आकर्षित होणे स्वाभाविक असते. गोव्यात पोर्तुगीज होते म्हणून तिथे फुटबॉल जास्त खेळला जातो!
हिंदी चित्रपटात नायक जग वाचवण्याचं मिशन पूर्ण करत असेल तर ते अवास्तव म्हटलं जातं आणि तो चित्रपट पडतो. हीच गोष्ट हॉलीवूडच्या चित्रपटात कितीही अवास्तवपणे दाखवली तरी ती पचते आणि पटते, कारण जगाला तारणारा कुणी असेल तर तो पाश्चात्त्य देशातीलच असला पाहिजे. भारतीय नायकाने पडद्यावर नातेसंबंध जपावे, प्रेम करावे आणि काही सामाजिक संदेश द्यावे अशी अपेक्षा असते! थोडक्यात गोरे करतात ते सगळे चांगले अशी आपली मनोवृत्ती आहे.
फक्त क्रिकेटच का?
यासाठी १९४७-१९८३ आणि १९८३ ते आतापर्यंत या दोन कालखंडांकडे पहायला हवे.
इंग्लंड नुकतेच देश लुटून गेले होते; स्वत:च्या गोष्टी संस्कृती स्वरूपात देऊन गेले. इथे मध्यम आणि कनिष्ठ वर्गाची लोकसंख्या जास्त. त्यामुळे खर्चीक खेळांचा प्रसार होणे शक्यच नव्हते. त्यात क्रिकेट म्हणजे साहेबांचा आणि कुठल्याही परिस्थितीशी जुळवून घेण्याची क्षमता असणारा खेळ म्हणून सुवर्णमध्य साधला गेला. त्याला भांडवलाची मर्यादा नव्हती. कुठलीही टणक गोलाकार वस्तू चेंडू होऊ शकली आणि मोरीतील धोपटणी फळी होऊ शकली. हा खेळ मैदानी वगैरे असला तरी त्याला कसल्याही मर्यादा नव्हत्या किंवा त्या मोडीत निघाल्या होत्या.
फलंदाजीत चौफेर मारता येतील असे फटके, गोलंदाजीत फिरकी, मध्यमगती, वेगवान असे अनेक प्रकार, त्यात कुणाचा चेंडू कसा वळतो यावरून अजून प्रकार! खेळाडूंची बलस्थाने आली आणि कच्चे दुवेही आले, मग त्याबद्दल मतमतांतरे! क्रिकेटच्या लोकप्रियतेत दिवसेंदिवस वाढ होत गेली. स्वातंत्र्यानंतर विविधतेत एकता, एकोपा, संघभावना इत्यादी गुणांना महत्त्व आले. वैयक्तिक यशाची कौतुके कमी होऊन सांघिक यशाला महत्त्व प्राप्त झाले. त्यामुळे एकटय़ा खेळाडूने बॅडमिंटनमध्ये काय केले यापेक्षा आपले अकरा वीर मैदानावर काय करतात याला महत्त्व आले. वैयक्तिक पातळीवर खेळले जाणारे खेळ मागे पडले. टीमवर्कचे महत्त्व लहान मुलांना क्रिकेटकडे आकर्षित करून घेऊ लागले!
क्रिकेट हा खेळ अतिशय सुटसुटीत होता. क्षेत्ररक्षक कुठेही असू शकतो, त्यामुळे मैदानावरील प्रत्येक जागेला काही ना काही नाव होतं. एकदा त्याचं ज्ञान लोकांमध्ये पसरवलं, की प्रसारमाध्यमांना त्याचा फायदा होणार होता. पुढे रेडिओ आले, धावते समालोचन आले. मैदान खूप मोठे असल्याने इतक्या दूरचं दिसणार नाही, अशा विचारातून मैदानावर रेडिओ घेऊन जाण्याची पद्धत सुरू झाली. थोडय़ाच कालावधीत घरबसल्या धावते समालोचन ऐकून सामना डोळ्यापुढे आरामात उभा राहत असे. आता धृतराष्ट्राला त्याचा संजय मिळाला होता आणि क्रिकेटला महाभारताच्या युद्धाचा दर्जा!
हळूहळू लोकांच्या भावना त्याच्याशी जोडल्या जाऊ लागल्या. त्यात देशही आता स्थिरावत चालला होता. उत्तमोत्तम फिरकी गोलंदाज येत होते, वाडेकर वगैरे मंडळींनी गोऱ्यांना पराजित करायला सुरुवात झाली होती आणि इथे क्रिकेटने बाजी मारली. इतर खेळ मागे पडले, त्यात या खेळात भारतीय संघ आपल्याच पूर्व राज्यकर्त्यांच्या संघाला हरवू लागलेला. त्यामुळे क्रेझ वाढत गेली. क्रिकेटकडे पूर्णवेळ करिअर म्हणून बघण्याचा विचार आला. वर्षांतून तीन-चार महिने खेळले जाणारे क्रिकेट कुठे ना कुठे वर्षभर खेळले जाऊ लागले. बघता बघता विश्वचषक सुरू झाले.
स्थिरावत चाललेल्या भारतीय संघाने बलाढय़ अशा वेस्ट इंडिज संघाचा पराभव करून १९८३ सालचा विश्वचषक जिंकला! तो ज्या पद्धतीने जिंकला त्याची तुलना एखाद्या चमत्काराशीच होऊ शकते आणि भारतात जादू-चमत्कारांना विशेष महत्त्व आहे. म्हणून क्रिकेटचा हात कुणीही धरू शकत नव्हतं. विश्वचषक जिंकला तो कुठे, इंग्लंडमध्ये, लॉर्ड्सवर! तिथे तिरंगा फडकला आणि संपलं! आता हा खेळ देशप्रेमाशी जोडला गेला. भारत-पाकिस्तान सामन्याला युद्धाचं स्वरूप आलं. क्रिकेट बघणं हे देशभक्तीचं प्रतीक होऊन बसलं. क्रिकेट आता एक धर्म बनू पाहत होता! घोळक्याने, शेजारीपाजाऱ्यांनी एकत्र बसून क्रिकेटचा आनंद घेणे सुरू झाले!
१९८३ ते आतापर्यंत
आता मात्र क्रिकेटकडे व्यावसायिकदृष्टय़ा बघितले जाऊ लागले. त्यानुसार या खेळात बदल करण्याचा स्मार्टनेस त्याच्याशी संबंधित लोकांनी दाखवला. कुणाच्याही लक्षात न येता षटकांच्या दरम्यान जाहिरातींना जागा करून दिली गेली. आता क्रिकेट हे खेळणाऱ्यांव्यतिरिक्त इतरांच्याही उपजीविकेचे साधन बनलं. संथ फलंदाजीची जागा आता वेगाने घेतली होती. नवेनवे फटके अस्तित्वात येत होते. नियम बदलत होते. जास्तीत जास्त स्पर्धात्मकता येत होती.
सामन्यांचे निकाल अनिर्णित न लागता प्रत्येक वेळी कुणी तरी जिंकावे म्हणून कसोटी मालिकेसोबत एकदिवसीय सामने जोर धरू लागले. उपखंडात तर हळूहळू क्रिकेट एक उद्योगच बनत गेला. मग प्रेक्षकांचे लक्ष वेधण्यासाठी मार्केटिंग स्ट्रॅटेजी म्हणून रंगीत कपडे आले. चेंडू सफेद झाला. एकमेकांवर चढाओढ करण्यासाठी अनपेक्षित अशा नवीन पद्धती आल्या.
अनेक धक्कादायक निकाल क्रिकेटला ‘अनिश्चिततेचा खेळ’ म्हणून मान्यता मिळवून देत होते. सामन्याच्या निकालात अनेक घटकांचा प्रभाव दिसू लागला, त्यामुळे त्या घटकांनाही वेगळे महत्त्व प्राप्त झाले. चाकोरी मोडली जात होती. तोचतोचपणा कमी होत होता. क्रिकेट कालानुरूप बदलत गेले आणि आपली मुळे घट्ट करू लागले.
इतर खेळ जसे होते तसेच राहिले. स्लेजिंग वगैरे गोष्टी आल्याने क्रिकेट शारीरिक आणि मानसिक पातळीवर खेळला जाणारा खेळ बनला. योजना बनवण्यासाठी सामना चालू असतानादेखील पुरेसा वेळ मिळत असल्याने क्रिकेटमध्ये शांत डोक्याने करता येणारे डावपेच आले.
सध्याचं क्रिकेट
मैदानी खेळ : साहित्यासहित खेळला तर श्रीमंतांचा आणि साध्या चेंडूफळीने खेळला तर गरिबांचा असं झालं! पण शेवटी दोघंही साहेबांचे खेळ म्हणूनच गणले गेले, कुठलाही भेदभाव न करता. म्हणून लहानपणी टेनिस बॉलवर खेळणारा सेहवाग पुढे आंतरराष्ट्रीय पातळीवर दोन त्रिशतके काढू शकला!
गल्ली क्रिकेट : प्रत्येक गल्लीचे नियम वेगळे; पण काय खेळायला चाललास रे, याचे उत्तर एकच- क्रिकेट!
गल्लीपेक्षाही छोटी जागा/ एखाद्या बंद खोलीत असाल तर अंडरआर्म क्रिकेट.
घराच्या मागच्या बागेतील क्रिकेट- षटकार मारला की बाद असले नियम. ब्रेट लीच्या बँडचं नाव इथूनच आलंय – ‘सिक्स अॅण्ड आऊट’.
अजून असंख्य प्रकार ज्यात बॅटच्या जागी कुठलीही फळी आणि विविध छोटय़ा-मोठय़ा आकारांतील चेंडू.
समुद्राच्या वाळूत खेळले जाणारे क्रिकेट.
पाण्याखाली (अंडरवॉटर) खेळलं जाणारे क्रिकेट.
पुलं म्हणतात त्याप्रमाणे मुंबईच्या चाळीच्या गॅलरीत चालणारे कसोटी सामने.
मुळीच जागा नसेल तर मग पुस्तकाचं क्रिकेट (बुक क्रिकेट).
आणि ज्यांना वर लिहिलेल्यातलं काहीही करायचं नसेल त्यांच्यासाठी चर्चामधलं क्रिकेट – या खेळाला इतके पैलू आहेत की, सहज चर्चा रंगू शकते. त्यात उभं राहण्यापासून, फलंदाजी, गोलंदाजी, क्षेत्ररक्षण या सगळ्यांच्या वेगवेगळ्या शैली. मग त्यांचा प्रभाव, तुलना आणि बरंच.
पालकांना क्रिकेट हा पर्याय मुलांना गुंतवण्यासाठी सोयीचा वाटू लागला. ‘इकडेतिकडे उंडारण्यापेक्षा पोरगा गल्लीत क्रिकेट खेळतोय ते बरं. मुलांमध्ये राहील’ अशी भावना होती. ‘आधी अभ्यास कर, मग क्रिकेट खेळ’ याने मुलांनाही क्रिकेट ही काही तरी मोलाची गोष्ट आहे असे वाटू लागले. मग मुलांचे हट्ट- क्रिकेटची बॅट हवी, सीजन बॉल हवा, किट हवे यावर आले.
आता मुख्य मुद्दा
खूप थोडय़ा लोकांना माहीत असेल, पण दूरदर्शनच्या राष्ट्रीय वाहिनीवर एखाद्या खेळाचे प्रक्षेपण करावयाचे असल्यास त्या वाहिनीला आपले प्रायोजित कार्यक्रम न दाखवता त्या खेळाचे सामने दाखवणे परवडले पाहिजे. इथे क्रिकेट हा खेळ इतर खेळांना मागे टाकतो. एकदिवसीय सामन्यादरम्यान १००-१२५ जाहिरातींच्यामध्ये विश्रांती उपलब्ध झाल्याने प्रश्नच सुटला. भरपूर प्रायोजक मिळाले आणि क्रिकेट टीव्हीवर वारंवार सुरू झाले. व्यावसायिकदृष्टय़ा क्रिकेटच्या फॉरमॅटला हरवणं इतर खेळांच्या आवाक्याबाहेर होतं.
इतर खेळ बघायचे तर केबल टीव्ही हवा, म्हणजे श्रीमंत असायला हवे. ते असले तरी क्रिकेट सोडवेलच असे नाही, कारण क्रिकेटचा ज्वर संपूर्ण भारतात भिनला होता.
सचिनकडे एमआरएफ स्टिकर असलेली बॅट होती, स्वत:कडेही तशीच बॅट असणं कौतुकाचा आणि अभिमानाचा विषय झाला.
खेळाडूंचे स्टिकर्स आले. ते वह्य़ांवर झळकू लागले. लहान मुलांना आवडणाऱ्या वस्तूंवर, गोळ्या-बिस्किटांवरही स्टिकर्स मोफत येऊ लागली. म्हणजे असं नाही तर तसं क्रिकेट घरात येणारच.
पत्त्यांसारखे क्रिकेटचे पत्ते आले आणि बैठय़ा खेळांमध्येही क्रिकेट शिरला.
मग भारताचा निळ्या रंगाचा युनिफॉर्म वस्त्रोद्योगात क्रिकेट घेऊन गेला.
प्रेक्षकांच्या सोयीसाठी सामन्यांच्या वेळेत केलेले बदल, आधी दिवसा होणारे सामने पुढे प्रकाशझोतात होऊ लागले, उन्हाळ्याच्या सुट्टीत आयपीएलला जागा मिळाली इ. गोष्टींसोबत खेळ म्हणून क्रिकेट प्रगल्भ होतच राहिला. निर्णयांमध्ये अचूकता येण्यासाठी वापरले जाणारे नवे तंत्रज्ञान, विश्लेषणासाठी वापरले जाणारे नवे नवे सॉफ्टवेअर आणि पद्धती या खेळाला काळाच्या स्पर्धेत टिकून ठेवण्यास मदत करतात. इतर खेळात ही मजल स्लो-मोशन रिप्लेपर्यंतच येऊ शकेल.
मित्रांसोबत खेळण्याचा मैदानी खेळ म्हणून पाहिले तर यात खेळाडूंच्या संख्येला काहीही मर्यादा नसते. अक्षरश: दोन जणांतसुद्धा रंगतदार सामना होतो आणि साताठ जणांतसुद्धा तितकाच रंगतदार, विषम संख्या असली की कंबाइन खेळाडू ठेवून सामने होतात. खेळाडूंच्या संख्येच्या मानाने मैदान मोठे असेल तर नंबर-नंबर खेळून, फलंदाज सोडून सर्व खेळाडू क्षेत्ररक्षणात! आपसांत खेळल्या जाणाऱ्या सामन्यांची लांबी आपण ठरवू तशी! नाही ठरवली तर कसोटीसारखी, अनलिमिटेड. म्हणजे खेळ सुरू करण्यासाठी कसलीही पूर्वतयारी नाही, जमवाजमव नाही.. तू आलास तर तुझ्यासोबत, नाही आलास तर तुझ्याशिवाय क्रिकेटचा खेळ होणार म्हणजे होणार!
टी. नटराजन नावाच्या खेडय़ातला हमालाच्या मुलाला इतर खेळ कसे खेळता येणार? त्याच्यासाठी खेळ म्हणजे क्रिकेटच आहे आणि त्याला नुकतेच चार कोटी रुपयांसाठी करारबद्ध करण्यात आले आहे, आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा कुठलाही अनुभव नसताना. हीच गोष्ट मस्जीदच्या मौलवींच्या मुलांची, पठाणबंधूंची आणि तीच गोष्ट सात हजार रुपये महिना पगारावर नोकरी करणाऱ्याच्या मुलाची, नाथू सिंगची. भारताचा सर्वोत्तम कर्णधार झारखंडसारख्या मागास समजल्या जाणाऱ्या राज्यातून येतो आणि त्या राज्यात मग आपोआप क्रिकेटच्या सोयी येतात. श्रीरामपूरचा झहीर, दहावी पास न होऊ शकलेला सचिन अशी अनेक विविध वर्गातील आणि थरांतील उदाहरणे एकत्र आणणारा खेळ म्हणजे क्रिकेट!
हा कदाचित एकमेव सांघिक खेळ आहे जिथे प्रतिस्पर्धी संघातील खेळाडूंना मैदानावर जल्लोषात गौरवलं जातं. इतर सांघिक खेळांना हे जमलेलं नाही. सचिनसाठी सिडनीमध्ये होणारा जल्लोष हा ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंच्या नशिबी कधी आला नाही. इथे प्रेक्षकांची परिपक्वता कळते आणि क्रिकेट किती खोलवर जाऊन पोहोचले आहे हे लक्षात येते.
मोदींच्या मार्केटिंग कँपेनमधल्या बहुतेक जाहिराती क्रिकेटचा वापर करून बनवल्या होत्या.
क्रिकेटसंबंधी शब्द हे इतके भिनले आहेत, की प्रेमात पडणं म्हणजे विकेट पडणं, चांगले काही करण्याला बॅटिंग करणं, काहीही चांगलं घडलं की, ‘यऽऽऽस’ हा क्रिकेटने दिलेला शब्द वापरणं यामुळे जीवनाचा अविभाज्य भाग झालाय हा खेळ.
टेनिसच्या चेंडूचा वापर भारतात तरी क्रिकेट खेळण्यासाठीच होतो.
क्रिकेटमध्ये खूप डोकं घालतो, अशी तक्रार ऐकायला मिळत असली तरी क्रिकेट हा बुद्धीला चालना देणारा खेळ आहे.
हर्षां भोगले आपल्या मॅनेजमेंटच्या शिकवणीत सगळा अभ्यासक्रम क्रिकेटची उदाहरणं देऊन शिकवतात.
हा खेळ वातावरण, खेळपट्टी, प्रेक्षकांची उपस्थिती, मैदानाचा आकार यांवर अवलंबून असल्याने त्यात तोचतोचपणा येत नाही, म्हणून त्यातला इंटरेस्ट टिकून राहतो.
सर्वात महत्त्वाचा मुद्दा – क्रिकेट हा सर्वसमावेशक खेळ बनत गेला. शारीरिक व्यंग असलेला व्यक्ती असू द्या अथवा अंध व्यक्ती असू द्या. सगळ्या प्रकारचं क्रिकेट आंतरराष्ट्रीय पातळीवर खेळले जाते. महिलांच्या क्रिकेटमध्येही भारत बऱ्यापैकी अग्रेसर आहे. यात ‘इक्बाल’ चित्रपटाचा उल्लेख करावा लागेल. खेडय़ातल्या शेतकरी कुटुंबातील एका मूकबधिर मुलाची गोष्ट. तो क्रिकेट जीव की प्राण असलेला. ती कहाणी होती, तरी खरी वाटेल अशी होती आणि मनाला भिडलीदेखील! हे असलं काही क्रिकेटमध्येच घडू शकतं.
प्रत्येक मुद्दय़ात खोलात जाऊन उदाहरणांसहित बरंच काही लिहिता येईल, पण मुख्य मुद्दा असा की कारणे न समजून घेता क्रिकेटला नुसती नावं ठेवत राहिलात तर त्याने इतर खेळांचं भलं होणार नाहीये. त्यासाठी इतर खेळांना क्रिकेटने केलाय तसा प्रवास करावा लागेल आणि सर्व थरांतील लोकांना सोबत घेऊन वाटचाल लागेल. क्रिकेटला लाभली तशी सर्वाची साथही मिळवावी लागेलच!
अभिजीत पवार – response.lokprabha@expressindia.com
___________________________________________________________________
मूळ संदर्भ :http://www.loksatta.com/krida-news/why-do-we-love-cricket-1433882/
अभिजीत पवार – response.lokprabha@expressindia.com
___________________________________________________________________
मूळ संदर्भ :http://www.loksatta.com/krida-news/why-do-we-love-cricket-1433882/
Comments
Post a Comment