चवीची उत्क्रांती-रवींद्र मिराशी
'उत्क्रांती' या शब्दाचा जर कुठेही उल्लेख केला असेल, तर मागील कित्येक वर्षांचा थोडक्यात तरी मागोवा घेणे क्रमप्राप्तच असते. उत्क्रांती म्हणजे काय? तर क्रमाक्रमाने होणारा विकास. आता आपण मनुष्याचा विचार करू या. चारशे पन्नास कोटी वर्षांपूर्वी जेव्हा पृथ्वीचा जन्म झाला, तेव्हा मनुष्यप्राणी पृथ्वीवर अस्तित्वात नव्हता. मग त्याचे अस्तित्व नेमके कधी निर्माण झाले आणि त्याच्या जीवनात 'चव' नेमकी कधी आली, हे पाहणे कुतूहलपूर्ण आहे. मात्र, असंख्य गोष्टींपैकी 'चव' या एका गोष्टीचा विचार करण्यापूर्वी मनुष्याच्या अस्तित्वाचा मागोवा घेणे गरजेचे आहे. जीवजंतूपासून अनाकलनीय अशा अवस्थांमधून प्रवास करीत टप्प्याटप्प्याने मनुष्यप्राणी उत्क्रांत झाला. अमिबापासून सुरू झालेल्या या प्रदीर्घ प्रवासात आपल्या पूर्वजांना आत्मा अमर असतो इथपर्यंतचे ज्ञान नेमके कधी झाले, हे कुणालाच सांगता येणार नाही. पृथ्वीच्या जन्मापासून पहिली ४४९ कोटी वर्षे मनुष्यप्राण्याच्या एकूण अस्तित्वाच्या दृष्टीने विचार करता खूपच संथ होती. उत्क्रांतीचा संबंध माणसाच्या केवळ शारीरिक विकासाशी नाही. यात असंख्य गोष्टींच्या विकास...