चवीची उत्क्रांती-रवींद्र मिराशी
'उत्क्रांती' या शब्दाचा जर कुठेही उल्लेख केला असेल, तर मागील कित्येक वर्षांचा थोडक्यात तरी मागोवा घेणे क्रमप्राप्तच असते. उत्क्रांती म्हणजे काय? तर क्रमाक्रमाने होणारा विकास. आता आपण मनुष्याचा विचार करू या. चारशे पन्नास कोटी वर्षांपूर्वी जेव्हा पृथ्वीचा जन्म झाला, तेव्हा मनुष्यप्राणी पृथ्वीवर अस्तित्वात नव्हता. मग त्याचे अस्तित्व नेमके कधी निर्माण झाले आणि त्याच्या जीवनात 'चव' नेमकी कधी आली, हे पाहणे कुतूहलपूर्ण आहे. मात्र, असंख्य गोष्टींपैकी 'चव' या एका गोष्टीचा विचार करण्यापूर्वी मनुष्याच्या अस्तित्वाचा मागोवा घेणे गरजेचे आहे. जीवजंतूपासून अनाकलनीय अशा अवस्थांमधून प्रवास करीत टप्प्याटप्प्याने मनुष्यप्राणी उत्क्रांत झाला. अमिबापासून सुरू झालेल्या या प्रदीर्घ प्रवासात आपल्या पूर्वजांना आत्मा अमर असतो इथपर्यंतचे ज्ञान नेमके कधी झाले, हे कुणालाच सांगता येणार नाही. पृथ्वीच्या जन्मापासून पहिली ४४९ कोटी वर्षे मनुष्यप्राण्याच्या एकूण अस्तित्वाच्या दृष्टीने विचार करता खूपच संथ होती. उत्क्रांतीचा संबंध माणसाच्या केवळ शारीरिक विकासाशी नाही. यात असंख्य गोष्टींच्या विकासाचा समांतर प्रवास अंतर्भूत आहे. ६० ते ७० लाख वर्षांपूर्वी मनुष्यप्राण्याचा पूर्वज चार पायांऐवजी दोन पायांवर चालू लागला. मागील काही हजारो वर्षांच्या कालखंडात तो टोळ्या करून एकत्रित राहू लागला. एकत्रित राहण्याचे ज्ञान सुरक्षिततेच्या दृष्टीने झाले असावे. जंगलात राहणाऱ्या आपल्या पूर्वजांना हिंस्त्र श्वापदांच्या भीतीने दिवस-रात्र ग्रासलेले असणार. माकडांच्या तुलनेत थंडी वाऱ्यापासून संरक्षण देणारे अंगावरील केस व शेपूट गळून पडली. चापल्य तुलनेने कमी झाले. हे जरी खरे असले, तरी पिढ्यान पिढ्यांच्या संक्रमणातून मनुष्यप्राण्याची बुद्धिमत्ता इतर प्राण्यांच्या तुलनेत वाढत राहिली. एकत्रित राहण्याचे ज्ञान झाल्याने संवादाची गरज निश्चितपणे निर्माण झाली असणार. यामुळेच हातवारे, खाणाखुणा, देहबोली, डोळ्यातून संवाद, चित्कार हीच एकमेकांमधील संवादाची भाषा झाली. काळाच्या नक्की कोणत्या टप्प्यावर भाषा उगम पावली हे कुणालाच माहीत नाही. याचे आजही संशोधन चालू आहे; परंतु मध्यंतरी करुणा गोखले यांचे एक पुस्तक माझ्या वाचनात आले. त्यात त्यांनी म्हटले आहे की, 'आज आपण जिला संवादाची भाषा म्हणतो ती केवळ आठ-दहा हजार वर्षे जुनी आहे. तिला लिपी लाभून तर अवघी पाच हजार वर्षे झाली आहेत. आज पृथ्वीवर साडे सहा हजार भाषा आणि बोली भाषा अस्तित्वात आहेत. बोलीभाषा लेखनकलेच्या रूपात विकसित होत गेली. संदेश व्यक्त करण्यासाठी काढलेल्या चित्रांच्या रूपात ती प्रकट होत गेली.' चित्रांपासून व्यवहारी अक्षर लेखनापर्यंतचा प्रवास फार खडतर होता. मात्र, चीनसारखा सर्व क्षेत्रात प्रगती करणारा देश भाषेच्या बाबतीत खूप मागे राहिला. चिनी भाषेत आद्याक्षरे, बाराखडी नाही. प्रत्येक दिसणारे चित्र हाच एक शब्द असतो.
अरण्यात, जंगलात राहताना ऊन, वारा, पाऊस, हिंस्त्र श्वापदे यांच्यापासून बचाव करण्याच्या दृष्टीने मनुष्याला प्रथम गुहांमध्ये राहणे निश्चितच सोईस्कर वाटले असणार. असे राहताना त्याच्या जीवनातील आणखी एक अत्यंत महत्त्वाचे प्रागतिक पाऊल म्हणजे अग्नीचा वापर. झोपल्यावर हिंस्त्र, रानटी प्राणी जवळपास फिरकू नयेत यासाठी अग्नीचा वापर प्रथम झाला असणार. भूक लागेल तेव्हा मिळेल ते खाऊन अर्धपोटी जगणाऱ्या मनुष्याला अग्नीचा उपयोग भविष्यात कुठे-कुठे होईल, याची यत्किंचितही कल्पना त्या वेळी आलेली नसेल. मात्र, यातून उब मिळते याचे ज्ञान लगेचच झाले असेल. या टप्प्यावर मनुष्याने प्रवेश केलेला असताना, त्याने आपल्या बुद्धीच्या जोरावर अनेक प्राणी हेरून व अभ्यासून ते माणसाळवण्याचा प्रयत्न केला. माणसाळलेल्या उपयुक्त प्राण्यांनी मनुष्याच्या जीवनात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. या प्राण्यांचा उपयोग करून सर्वांत महत्त्वाचा शोध मनुष्याने लावला तो म्हणजे शेती.
ख्रिस्तपूर्व सहाव्या शतकात अॅनाक्झिमँडरने उत्क्रांतीचा सिद्धांत मांडला. माणूस माशापासून उत्क्रांत झाला आहे, असे त्याचे प्रतिपादन होते. मात्र, या सिद्धांताला भक्कम पुराव्याचा आधार त्याला देता आला नाही. डार्विनचा उत्क्रांतीच्या सिद्धांतास विज्ञानाने मानले. कारण तो सिद्धांत जीवाश्मांपासून सापडलेल्या जीवसृष्टीच्या अखंड मालिकेवर आधारित होता. याचबरोबर योग्य पुरावे डार्विनच्या सिद्धांताच्या पुष्ट्यर्थ उपलब्ध होते, जे विज्ञानाने मानले. ख्रिस्तपूर्व सहाव्या शतकापर्यंत प्रगल्भ विवेकवाद विकसित झाला. झीनोफेनसने म्हटले, 'माणूस स्वतःच्या कल्पनेतून आपले देव तयार करतो. बैल, घोडे या प्राण्यांना जर मनुष्यप्राण्यासारखी बुद्धी आणि हात लाभले असते तर, त्यांनीदेखील त्यांच्यासारख्या दिसणाऱ्या देवांची निर्मिती केली असती.' आता देवाने मानवाची निर्मिती केली, की मानवाने देवाची निर्मिती केली, हे तत्त्वज्ञानात शोधावे लागेल. (थोर ब्रिटिश तत्त्वज्ञ बर्ट्रांड रसेल यांच्यासारख्या तत्त्वज्ञानीने याचा उहापोह केला आहे.) आणि तत्त्वज्ञानात याचा शोध घेतला, तरी विज्ञानाचे मत व श्रद्धाळू मनुष्याचे मत अर्थातच भिन्न असेल.
अजून एक मुद्धा मांडावा लागेल. मनुष्याचे अन्न समुद्राशीदेखील संबंधित होते. प्रत्येकाचा हेतू जरी निराळा असला, तरी सोळाव्या आणि सतराव्या शतकात खगोलशास्त्रात फार मोठे संशोधन मनुष्याने केले. कोणत्याही कारणाने समुद्रपर्यटनादरम्यान दिशा निश्चितीसाठी खरे तर हा अभ्यास चालू झाला; परंतु ग्रीक जेव्हा खगोलशास्त्र जाणून घेत होते, तेव्हा त्यांना प्रत्यक्ष उपयुक्ततेशी काहीही देणे घेणे नव्हते. मात्र, नंतरच्या काळात जेव्हा खगोलशास्त्राचा संबंध ज्योतिषशास्त्राशी जोडला गेला, तेव्हा त्यांनी या ज्ञानशाखेत स्वारस्य दाखविले. हा असा झाला मनुष्याच्या संबंधित 'उत्क्रांती' या शब्दाचा अगदी थोडक्यात मागोवा. यामध्ये अगणित गोष्टींच्या विकासाचा समांतर प्रवास अंतर्भूत आहे.
या पार्श्वभूमीवर मनुष्य हळूहळू चवीने कसा खाऊ लागला, हे मी अभ्यासण्याचा थोडा-फार प्रयत्न केला आहे. कारण हे संशोधन नक्कीच नाही. सध्या २४ तास 'फूड चॅनल' चालू आहेत. इथं हजारो चविष्ट पदार्थ कसे बनवायचे, हे दिवस-रात्र दाखविले जाते; परंतु या आधीचा चवीचा प्रवास कसा होत गेला, हे अभ्यास म्हणून मांडताना रंजक वाटू शकते. अर्थातच यामध्ये कोणत्याची रेसिपीचा समावेश केलेला नाही. नैसर्गिकरीत्या मनुष्याने चव शोधण्यासाठी काय काय केले हे पाहू या.
दळून (ज्वारी, बाजरी, गहू), भरडून (गहू), भाजून (शेंगदाणे, मक्याची कणसे), वाटून (चटणी, वाटली डाळ), कुटून (मिरच्या कुटून मिरची पावडर), कांडून (सालासहित भात), सडून (गहू, तांदूळ), भिजवून (बदाम, शेंगदाणे), कोळून (चिंच), आंबवून (इडली, डोसा पीठ), उकडून (मोदक), उकळून (चहा पावडर), शिजवून (डाळ, तांदूळ), वाफवून (साबुदाणा खिचडी), धुरवून (चुलीतील रताळी), तळून (पापड), परतवून (पालेभाज्या), तिंबून (पुरणपोळीची कणिक), कुस्करून (पोळी), कालवून (भरीत, कोशिंबीर), मळून (भाकरीचे पीठ), रगडून (सुके खोबरे, शेंगदाणे यापासून बनवलेले तेल), किसून (कैरी, गाजर), पाखडून (धान्य), वाळवून (सांडगे), सुकवून (द्राक्षे), घोळवून (पाकातील गुलाबजाम), आटवून (दूध), आळवून (पुरण), कढवून (लोणी), घुसळून (दही), सोलून (बटाटे), चेचून (आले), ठेचून (लसूण, तिरफळ), खवणून (ओले खोबरे), चिरून (भाज्या), चाळून (पीठ), चुरून (सुकी मिरची), चुरडून (कोथिंबीर), खुडून (देठासहित पालेभाज्यांची पाने), विरघळवून (साखर, खडे मीठ), जाळून (काजूच्या बिया), थापटून (थालीपीठ), लाटून (चपाती, पुरी), फुलवून (लाह्या), फेसून (मोहरी), फेटून (अंडे), मुरवून (लोणचे, मुरांबा), उगाळून (केसर, जायफळ), ढवळून (ताक पिताना अथवा बासुंदी तयार करतानाचे दूध), घोटून (वडी, बर्फी तयार करताना शेवटची प्रक्रिया), चोखून (आंबा), कापून (फळे), पिळून (आमरस), गाळून (फळांचे रस, कैरी पन्हे), गोठवून (आइस्क्रीम दूध), वितळवून (लोणी), कातरून (सुपारी), फोडून (सुपारी, शेंगा), काप करून (सुके खोबरे), नासवून (पनीर), फेसाळून (लस्सी, कॉफी), फुगवून (ढोकळा, केक), तापवून (दूध), कुजवून (दारू), मोडून (घेवड्याच्या किंवा गवारीच्या शेंगा) अशा अनेक प्रक्रियेतून अथवा प्रयोगातून मनुष्याने विविध चवींचा शोध घेण्याचा प्रयत्न केला आहे. एखादा पदार्थ चुरघळून, करपवून किंवा जमिनीत पुरूनसुद्धा मनुष्याने वेगवेगळी चव शोधण्याचा प्रयत्न केला. दह्यातून पाण्याचा अंश काढल्याने मनुष्याला चक्क्याच्या द्वारे एका नवीन चवीचा शोध लागला. तर उसावर शक्तिशाली दाब देऊन उसाचा रस काढला. एवढेच काय एखाद्या पदार्थाचा आकार बदलला, तरी चव बदलते हे उमगले. उदा. पीठ तेच; परंतु जाड शेव केल्यास वेगळी चव लागते, तर बारीक शेव केल्यास वेगळी चव लागते.
काही वेळेस आपण सहज म्हणतो, की 'गारढोण चहा होता, चहाला काही चव नव्हती.' परंतु गरम, गार, कोमट, थंड या काही चवी नाहीत? हे माझ्या मते चवीवर प्रभाव टाकणारे विविध आविष्कार आहेत. विविध धातूंच्या भांड्यात किंवा मातीच्या भांड्यात बनवलेल्या एकसारख्या पदार्थांच्या चवीदेखील भिन्न असतात असे आढळले. मनुष्याने जीवनात 'चव' आणण्यासाठी असे असंख्य प्रयोग केले असले, तरी यावर मनुष्याची मनस्थिती आणि नातेसंबंधदेखील चांगल्या अथवा वाईट प्रकारे प्रभाव टाकत असतात. येथे 'नातेसंबंध' हा शब्द मी जरा व्यापक अर्थाने घेतला आहे. यामध्ये एकमेकांच्या प्रति जिव्हाळा असू शकतो किंवा दुरावादेखील असू शकतो. कधी कधी या संबंधात तटस्थतादेखील असते. म्हणजे कोणत्याही प्रसंगाने मनस्थिती जर बिघडलेली असेल, तर चविष्ट पदार्थाचीसुद्धा चव लागत नाही, तर खूप भूक लागली असेल, अथवा मन:स्थिती खूप आनंदी असेल, तर सर्व पदार्थांना आपोआप चव येते. नातेसंबंध बिघडल्यास मानसिकदृष्ट्यादेखील चव निघून जाते. समजा सासू-सुनेचे संबंध बिघडलेले असतील, तर सुनेने केलेला चहा सासूला पांचट वाटू शकतो आणि सासूने केलेला चहा सुनेला पांचट वाटू शकतो. अर्थात पांचट चहा आवडत असल्यास दाट चहा झाला आहे, असे वाटू शकेल. किंवा गोडीला कमी-जास्ती अथवा कडकपणात कमी-जास्ती वाटू शकतो.
( साभार : चवीची उत्क्रांती-रवींद्र मिराशी https://maharashtratimes.indiatimes.com/editorial/samwad/evolution-of-taste/articleshow/64427683.cms)
Comments
Post a Comment