वाचनानंद २०२५!
आजकाल खरं तर पुस्तकं वाचणारे वाचक तसे कमी होत आहेत हे मानायला वाव आहे. त्यातल्या त्यात आताशी ऑनलाईन पुस्तकं वाचण्याची सुविधा विविध माध्यम संस्थांनी कधी फुकट तर कधी वर्गणी (म्हणजे आपले सब्स्क्रिप्शन की हो! ) तत्वावर उपलब्ध करून दिल्यापासून कार्यमग्न (बीजी) लोकांना त्याचा बराचसा फायदा झाला आहे हे जरूर नमूद करावे लागेल. आता यात कोण कुठल्या भाषेत , कोणत्या विषयावर कोणत्या वेळी वाचणे पसंत करतो हे ज्याचे त्याने ठरवावे. पण वाचावे काय हा मोठाच प्रश्न असतो बऱ्याचदा. पाश्चिमात्य साहित्यविश्वात तश्या खूपविक्या (बेस्ट सेलर्स ) पुस्तकांच्या याद्या नियमित प्रसिद्ध होत असतात त्याबरोबरच बुकर , नोबेल यासारख्या विविध पुरस्कारांसाठी नामाकिंत केल्या गेलेल्या साहित्यिकांची यादीही , काय वाचावे हा प्रश्न बऱ्यापैकी सोडवत असते . आपल्या माय-मराठीसारख्या प्रादेशिक ( पण जागतिकीकरणाच्या रेट्यात वैश्विक होत चाललेल्या ) भाषेत नक्की काय वाचावे याचे उत्तर तितकेसे सोपे सरळ नक्कीच नाही. तेव्हा काही नामांकित माध्यम समूह त्या त्या वर्षात तत्कालीन मान्यवरांना आपण सध्या काय वाचत आहोत...