मॅनेजमेंट महागुरू!
‘मॅनेजमेंट’ ही कला आहे की शास्त्र? गेल्या तीन दशकांत आणि विशेषत: जागतिकीकरणाची प्रक्रिया वेगाने सुरू झाल्यानंतर ‘मॅनेजमेंट’ नावाच्या ज्ञानशाखेला अतोनात महत्त्व प्राप्त झाले. गेल्या १० वर्षांत ‘व्यवस्थापन’ हा विषय शिकविणाऱ्या मॅनेजमेंट इन्स्टिटय़ूट्सचे तर एक पेवच फुटले. भारतातील काही शिक्षणसम्राटांनी ‘एमबीए’ पदव्या देणारी, भलीमोठी फी आकारणारी एक जंगी फॅक्टरीच सुरू केली. उद्योग आणि व्यापार कमी असूनही त्यांचे व्यवस्थापन शिकलेले पदवीधर समाजात दिमाखात फिरू लागले. भले भले सॉफ्टवेअर इंजिनीअर्स, आर्किटेक्ट्स आणि मेडिकल डॉक्टर्सही ‘एमबीए’ होऊ लागले. ‘एमबीए’ शिक्षित इंजिनीअर आणि तोही अमेरिकेतील पदवीधर असेल तर तो स्वत:ला ‘सुपरब्राह्मण’ समजू लागला. भांडवलदारांना भांडवलशाही आणि व्यापाऱ्यांना धंदा करण्याची कला शिकविणारे हे ‘सुपरब्राह्मण’ हवेतच चालू लागले. पण त्यांना जमिनीवर उतरविणारा, जगातील गरिबीचे, विषमतेचे, अन्यायाचे, उपेक्षेचे भान देणारा ‘मॅनेजमेंट गुरू’ म्हणजे शनिवारी निधन पावलेले सी. के. प्रल्हाद! कोईमतूर कृष्णराव प्रल्हाद म्हणजे सी. के. प्रल्हाद. प्रल्हाद यांच्या नावातील पहिले आद्याक्षर ‘सी’...