मॅनेजमेंट महागुरू!
‘मॅनेजमेंट’ ही कला आहे की शास्त्र? गेल्या तीन दशकांत आणि विशेषत: जागतिकीकरणाची प्रक्रिया वेगाने सुरू झाल्यानंतर ‘मॅनेजमेंट’ नावाच्या ज्ञानशाखेला अतोनात महत्त्व प्राप्त झाले. गेल्या १० वर्षांत ‘व्यवस्थापन’ हा विषय शिकविणाऱ्या मॅनेजमेंट इन्स्टिटय़ूट्सचे तर एक पेवच फुटले. भारतातील काही शिक्षणसम्राटांनी ‘एमबीए’ पदव्या देणारी, भलीमोठी फी आकारणारी एक जंगी फॅक्टरीच सुरू केली. उद्योग आणि व्यापार कमी असूनही त्यांचे व्यवस्थापन शिकलेले पदवीधर समाजात दिमाखात फिरू लागले. भले भले सॉफ्टवेअर इंजिनीअर्स, आर्किटेक्ट्स आणि मेडिकल डॉक्टर्सही ‘एमबीए’ होऊ लागले. ‘एमबीए’ शिक्षित इंजिनीअर आणि तोही अमेरिकेतील पदवीधर असेल तर तो स्वत:ला ‘सुपरब्राह्मण’ समजू लागला. भांडवलदारांना भांडवलशाही आणि व्यापाऱ्यांना धंदा करण्याची कला शिकविणारे हे ‘सुपरब्राह्मण’ हवेतच चालू लागले. पण त्यांना जमिनीवर उतरविणारा, जगातील गरिबीचे, विषमतेचे, अन्यायाचे, उपेक्षेचे भान देणारा ‘मॅनेजमेंट गुरू’ म्हणजे शनिवारी निधन पावलेले सी. के. प्रल्हाद! कोईमतूर कृष्णराव प्रल्हाद म्हणजे सी. के. प्रल्हाद. प्रल्हाद यांच्या नावातील पहिले आद्याक्षर ‘सी’ म्हणजेच कोईमतूर हे तामिळनाडूतील त्यांच्या शहराचे नाव. ते स्वत: मध्यमवर्गीय कुटुंबात जन्माला आले आणि पुढे इंजिनीयरिंग आणि व्यवस्थापन या दोन विषयांमध्ये त्यांनी जगभरातल्या अनेक विद्यापीठांतून अध्ययन आणि अध्यापनही केले. प्रल्हाद यांची ख्याती अक्षरश: जगभर होती आणि ते अतिशय प्रतिष्ठित व आधुनिक कंपन्यांच्या (व संस्थांच्याही) संचालक मंडळांवर होते. जगातील ‘टॉप टेन’ व्यवस्थापन विचारवंतांमध्ये त्यांचे नाव घेतले जात असे आणि बिल क्लिंटनपासून बिल गेट्सपर्यंत सर्वजण प्रल्हादांचे विचार समजून घेण्यास उत्सुक असत. प्रल्हाद यांच्या मते ‘मॅनेजमेंट’ हे कला व विज्ञान यापेक्षाही मूलभूत तत्त्वज्ञान आहे. तत्त्वज्ञान म्हणजे अध्यात्माच्या अर्थाने नव्हे. मोक्षप्राप्तीच्या उद्दिष्टाने भारलेलेही नव्हे. प्रल्हाद यांची ‘मॅनेजमेंट फिलॉसॉफी’ आधिभौतिकच होती. माणूस, त्याचे सामाजिक-व्यावहारिक जीवन, त्याची श्रमशक्ती, त्याचे ग्राहकत्व आणि निसर्गाने पुरविलेली अमाप निसर्गसंपत्ती व या सर्वाना जोडणारे मानवनिर्मित तंत्रज्ञान हा त्यांच्या तत्त्वज्ञानाचा पाया होता. जगात गरिबी आहे, याचा अर्थ तो गरीब ‘ग्राहक’ होऊ शकला नाही. म्हणजेच आजचे जगातील सर्व गरीब हे उद्याचे सक्षम ग्राहक होऊ शकतील. जगाची लोकसंख्या किती? साडेसहा अब्ज म्हणजे ६५० कोटी. त्यापैकी मध्यमवर्गीय, सुस्थित, सधन आणि धनाढय़ मिळून किती? सुमारे २५० कोटी. काही अर्थतज्ज्ञांच्या मते ३५० कोटी. तरीही ३०० कोटी लोक उरतात, जे दारिद्रय़रेषेच्या खाली किंवा काठावर आहेत. या ३०० कोटी म्हणजे तीन अब्ज लोकांपैकी बहुसंख्य आहेत- भारत, चीन, बांगलादेश, पाकिस्तान, बहुतांश आफ्रिका आणि दक्षिण अमेरिकेतील अनेक देशांत. भारतात समाजव्यवस्थेचा जो आर्थिक ‘पिरॅमिड’ आहे तो सुमारे ४० कोटी गरिबांवर उभा आहे. दारिद्रय़रेषेखालील लोकांची संख्या आता पंतप्रधानांच्या समितीने मान्यही केली आहे. या सर्व लोकांना दारिद्रय़रेषेखालून बाहेर काढले आणि ‘ग्राहक’ बनवले तर भारतातील ग्राहकांची संख्या आजच ११० कोटी होईल आणि आणखी काही वर्षांनी ती दीडशे कोटी होईल. ही ग्राहकशक्ती समर्थ करण्याचे काम मॅेजमेंटचे आहे, असे प्रल्हाद म्हणत असत. भारताच्या या ‘पिरॅमिड’मधील तळाच्या सुप्त सामर्थ्यांवर त्यांचा प्रचंड विश्वास होता. पूर्वी ‘तिसऱ्या जगात’ असलेले अनेक देश गेल्या तीन दशकांत ‘दुसऱ्या’ वा ‘पहिल्या’ जगात आले. परंतु त्या समाजवादी देशांतील लोकांचे, भांडवली अर्थाने, ग्राहक वर्गात रूपांतर झालेले नव्हते. त्यामुळे समाजवादी देशांतील नागरिक ऊर्फ ग्राहकाला कशाहीबद्दल ‘चॉईस’ नव्हता. त्याने कोणते वृत्तपत्र वाचायचे, कोणता चॅनल पाहायचा, त्यावर कोणत्या बातम्या दाखविल्या जाणार, दुकानात कोणती वस्तू मिळणार, तिची किंमत, गुणवत्ता हे सर्व नियंत्रित असल्यामुळे पर्याय नव्हते. उद्योग-धंदा, व्यापारात स्पर्धा नव्हती. त्यामुळे ‘ग्राहक’ म्हणजेच ‘नागरिक’! समाजवादी व्यवस्थेत ‘ग्रहण’ करतो तो ग्राहक! भांडवलशाहीत ज्याला काय ‘ग्रहण’ करायचे याबद्दल चॉईस असतो म्हणून तो आधुनिक अर्थाने ग्राहक ! ग्राहक ऊर्फ ‘कन्झ्युमर’ या संकल्पनेत स्वातंत्र्य म्हणजेच स्पर्धा, चॉईस आणि त्यासंबंधातील गुणवत्तेचे हक्क हे सर्व अभिप्रेत आहे. ‘ग्राहक’ म्हणजे प्रशासनाने पाळलेला, गळ्यात पट्टा बांधलेला प्राणी नव्हे. समाजवादी व्यवस्थेत तो पाळलेल्या प्राण्याप्रमाणे आज्ञाधारक-नागरिक व ग्राहक असणे गृहित धरलेले होते. सी. के. प्रल्हाद यांच्या तत्त्वज्ञानानुसार गरिबांनाही ‘चॉईस’ हवा असतो. त्यासाठी ग्राहक- स्वातंत्र्य आवश्यक आहे. ज्याप्रमाणे ते समाजवादी व्यवस्थेत नाकारलेले असते, तसेच मक्तेदारी भांडवलशाहीतही नाकारले जाऊ शकते. मक्तेदार भांडवलदाराला स्पर्धा नको असते आणि ग्राहकाला स्वातंत्र्य द्यायला तोही उत्सुक नसतो. त्यामुळे ग्राहकस्वातंत्र्याची तुतारी फुंकली तर समाजवादी एकाधिकारशाही आणि मक्तेदारी भांडवलशाही दोन्हींचा पराभव होऊ शकेल. तशा ग्राहक स्वातंत्र्यातूनच अर्थव्यवस्था विकसित होऊ लागतील आणि गरिबी दूर होऊ शकेल, असे त्यांचे मत होते. ‘आदर्श भांडवलशाही’ नावाची चीज नाही, पण भांडवलशाहीला बाजारपेठेच्या व ग्राहक हक्काच्या माध्यमाद्वारे ताळ्यावर ठेवले जाऊ शकते, असा प्रल्हाद यांचा विश्वास होता. अर्थातच तशी स्थिती येण्यासाठी प्रयत्न करावे लागतील आणि ‘मॅनेजमेंट’ नावाच्या संस्थेचे ते प्रमुख काम आहे, असे त्यांचे मत होते. त्यांच्या पुस्तकांच्या नुसत्या नावांकडे नजर टाकली तरी प्रल्हाद यांचे तत्त्वज्ञान कोणत्या मूलतत्त्वांवर आधारलेले आहे, हे लक्षात येऊ शकेल. ‘द फॉरच्युन अॅट द बॉटम ऑफ पिरॅमिड’ किंवा ‘द न्यू एज ऑफ इनोव्हेशन.’ पिरॅमिडचा पाया प्रचंड आणि रुंद असतो. तो निमुळता होत होत टोकापर्यंत जातो. समाजातील गरीब, कनिष्ठ मध्यम आणि मध्यम वर्ग, हा सर्वात मोठा विभाग. पिरॅमिडचा पाया. जसजसा तो निमुळता होत जातो, तसतसा सधन मध्यम वर्ग व श्रीमंत वर्ग पिरॅमिडच्या टोकाकडे जातो. या व्यवस्थेत सधन मध्यम व श्रीमंत वर्गाला चॉईस असतो, जो गरीब व कनिष्ठ मध्यम वर्गाला परवडत नाही. प्रल्हाद यांच्या सिद्धांतानुसार मॅनेजमेंटचे मुख्य काम पिरॅमिडच्या तळाशी असणाऱ्यांना मुख्य ग्राहक प्रवाहात आणणे. जितके ग्राहक जास्त, तितकी बाजारपेठ मोठी. जितकी बाजारपेठ मोठी, तितकी विक्री अधिक. जितकी विक्री अधिक, तितका नफाही जास्त. परंतु पिरॅमिडच्या तळाशी जायला उत्पादकांमध्ये (भांडवलदारांमध्ये) स्पर्धा हवी. ती नसेल तर उत्पादक म्हणेल ती विक्री किंमत राहील. ती किंमत परवडली नाही तर गरिबाचा ‘आधुनिक’ ग्राहक होणार नाही. ग्राहक आपल्याकडे वळविण्यासाठी उत्पादकाला प्रयत्न करावे लागतील. त्यासाठी त्याला सतत नवनवीन तंत्रज्ञान वापरावे लागेल. तंत्रज्ञानाच्या मार्फतच उत्पादनाची किंमत उतरू शकते आणि वस्तूंचे वितरण कार्यक्षमतेने होऊ शकते. ‘कॉम्पिटिंग फॉर द फ्युचर’ या पुस्तकात त्यांनी बाजारपेठ, स्पर्धा व तंत्रज्ञान या त्रिसूत्रीवर सैद्धांतिक ऊहापोह केला आहे. गेल्या ५० वर्षांत बेबंद भांडवलशाही आणि जाचक समाजवाद या दोन्हींचा निर्णायक पराभव झाला आहे. समाजवादी व्यवस्थेतून निर्माण झालेली समता ही स्वातंत्र्य दडपून केलेली होती. याउलट भांडवलशाहीत फक्त नफा हेच सूत्र वापरले तर बाजारपेठेचा संकोच करूनही भांडवलदार नफा कमवू शकतो. प्रल्हाद यांच्या मते जगातील सर्व लोक म्हणजे आजचे साडेसहाशे कोटी व भविष्यातील हजार कोटी ग्राहक होऊ शकतील, पण त्यासाठी मॅनेर्जसना लोकांकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलावा लागेल. दुर्दैवाने आजचे ‘एमबीए’ हे स्वत:च्या बौद्धिक (!?)औद्धत्यामुळे असंवेदनशील झाले आहेत आणि अवास्तव पगारामुळे स्वत:च्या जीवनशैलीच्या मस्तीत मश्गूल आहेत. प्रल्हाद यांनी त्यांच्या ‘आयआयएम’च्या वर्गातील विद्यार्थ्यांना जगाचे, पिरॅमिडसदृश विषम समाजाचे, गरिबीचे भान दिले. ही परिस्थिती भांडवली नफ्याच्या, बाजारपेठेच्या माध्यमातूनही दूर होऊ शकते, असे सांगण्याचा प्रयत्न केला. त्यांची शिकवण रुजायला वेळ लागेल, पण त्यांच्या अनेक शिष्यांना प्रल्हाद यांची वैचारिक थोरवी मनापासून पटली आहे. ‘महागुरू’ हा किताब त्यांना त्यांच्याकडून उत्स्फूर्तपणे मिळाला आहे!
Comments
Post a Comment