व्यावसायिक शिक्षण : खरोखरच किती व्यावसायिक?- मनोज अणावकर
अभ्यासक्रम आणि त्याचे प्रत्यक्ष उपयोजन करताना त्या क्षेत्रात आवश्यक ठरणारे ज्ञान यात फार मोठी तफावत दिसून येते. आणि मग यातूनच घडतात कमी ताकदीचे व्यावसायिक. शिक्षणव्यवस्थेतील त्रुटी आणि विद्यार्थ्यांची अनास्था याची कारणमीमांसा आणि त्यावरील उपाययोजनांवर एक दृष्टिक्षेप- आज पुन्हा एकदा नोकरीसाठी मुलाखत देऊन आलेल्या शिरीषचा पडलेला चेहरा खरं तर मुलाखतीचा निकाल स्पष्टपणे सांगून जात होता. पण तरीही न राहवून त्याच्या वडिलांनी विचारलंच, ‘‘का रे, आज काय कारण झालं?’’ त्यावर शिरीषने चिडून सांगितलं, ‘‘काही नाही, तीच ती कारणं. कोणाला जास्त टक्केवारी पाहिजे, तर कोणाला जास्त अनुभव पाहिजे. कोणाला मी त्यांच्या जॉबसाठी योग्य वाटत नाही, तर कोणी म्हणतो नोकरी देतो, पण स्टेटस्चं काम देत नाही आणि पगारही १०-१२ हजार रुपये सांगतात. बारावीपासून क्लास, कॉलेज शिक्षणासाठीचे इतर खर्च यावर लाखो रुपये खर्च करून दिवस-रात्र शिक्षणासाठी एवढी मेहनत घेतली. पण वेळ, मेहनत आणि पसा सगळं वाया गेलं.’’ हे अशा प्रकारचे संवाद अनेक घरांमधून आज ऐकायला मिळतात. व्यावसायिक अभ्यासक्रम, मग तो कोणताही असो, अभियांत्रिकीचा, व...