कर्ते आणि नुसतेच करविते- गिरीश कुबेर

उत्पादन करणं, वस्तू निर्माण होणं, याला असलेलं महत्त्व कमी होणार नाही. गेल्या काही वर्षांत मात्र, या ‘वेल्थ क्रिएशन’पेक्षा , संपत्तीच्या प्रत्यक्ष निर्मितीपेक्षा ती वाढलेली असल्याचे देखावे निर्माण करणाऱ्यांनाही महत्त्व आलं. व्यवहार वाढणारच, पण ते फुगवले गेले की फुगा फुटतो. तसा तो फुटलाही. या फुटलेल्या फुग्याची हवा आत्ता आपल्या अवतीभोवती असताना, कर्ते आणि करविते यांमधला फरकही सहज दिसतो आहे.. परवा एका बडय़ा बहुराष्ट्रीय बँकेत काम करणारा मित्र भेटला. सगळय़ा रडगप्पाच सांगत होता. आर्थिक स्थिती किती वाईट आहे..धंदाच नाही.. अर्थव्यवस्था एकदम संकटात आहे.. बँकेतून अडीचशे जणांना काढतायत, वगैरे. शेवट या मुद्दय़ावर.. आमचा क्रमांक कधी येतोय, माहीत नाही. दचकायलाच झालं एकदम. मित्र उत्तम शिकलेला. आई-वडिलांनी अगदी कर्ज वगैरे काढून त्याला चांगल्या नावाजलेल्या कॉलेजातून व्यवस्थापन शिक्षण दिलं. तिथनं हा बाहेर आला तोच टाय घालून. मग सगळं त्याचं ठरल्यासारखं. आधी यूटीआय, आयसीआयसीआय.. मग रॉयल बँक ऑफ स्कॉटलंड.. एचएसबीसी.. गोल्डमन सॅक असं काय काय. एका वर्षांत तीन बेडरूम फ्लॅट. पार्किंगसकट. सोसायटीत जॉगिंग पार्क, क्लब हाऊस.. समोर देरासर.. असं बरंच काही. होंडा सिटीही आली. सोमवार ते शुक्रवार दणकून काम. शुक्रवारी जरा सैल.. फ्रायडे ड्रेसिंग आणि सप्ताहान्त बैठकांचे वेध. त्यातही गप्पा सगळय़ा आर्थिक क्षेत्राच्या. काही कोटींच्या खाली बातच नाही. याचं घर मुळात सेवाभावी वृत्तीचं. आपण समाजाचं काही देणं लागतो, वगैरे मानणारं. हा व्यवस्थापन शिकला आणि सगळाच बदलला. कोणाला काही देण्याची गरजच नसते.. वगैरे सांगायचा. सगळं जगणं सेन्सेक्सभोवती फिरणारं. रक्तदाबालाही इतकं महत्त्व नसेल तितकं सेन्सेक्सच्या खाली-वर होण्याला याच्या लेखी महत्त्व. तो म्हणजे- सेन्सेक्स वर गेला की आज मार्केट कॅप किती कोटींनी वाढली.. ते सगळं उत्साहानं एकमेकांना सांगायचे. तसं झालं की, शुक्रवारच्या सप्ताहान्त बैठका जरा जास्तच रंगायच्या. एकदा विचारलं हे इतके पैसे.. म्हणजे इतका फायदा झाला तितका झाला वगैरे.. प्रत्यक्ष मिळतात का? तर म्हणाला.. ते सगळं नोशनल असतं.. म्हणजे आपण अमुक कंपनीचे सगळेच्या सगळे समभाग विकले तर किती कमाई होईल. तो आकडा म्हणजे मार्केट कॅप.. त्यानं सोपं करून सांगायचा प्रयत्न केला. तर त्याला म्हटलं, हे म्हणजे घराच्या किमतीसारखंच की. त्यातली गुंतवणूक खूप वाढल्यानं आपण खूश व्हायचं. पण राहतं घर विकून राहायचं कुठे.. तेव्हा राहतं घर विकलं की किती पैसे मिळतील या चर्चेला काय अर्थ..? नवीन घ्यायचं ते याहीपेक्षा महागच असणार ना? मग जे विकताच येणार नाहीये, त्याची किंमत वाढल्याचा आनंद मानायचाच कशाला..? या प्रश्नाचं उत्तर बहुधा व्यवस्थापनशास्त्रात शिकवत नसावेत. तो विचारलेलं त्याला आवडलं नाही. तेव्हापासून जरा भेटणंच कमी झालं होतं. आता भेटला ते एकदम हे सगळं सांगायला.. म्हणाला.. ज्यांना आमच्या बँकेने नारळ दिलाय त्या सगळय़ांच्या डोक्यावर इतकी र्कज आहेत.. आता काय करणार आहेत कुणास ठाऊक? बरं यांच्या बायकाही त्याच क्षेत्रातल्या. म्हणजे यातले काही काही तर जोडीनंच घरी बसणार. पंचाईत अशी की ज्या घरांच्या किमती वाढल्या त्याचं हे सगळे गुणगान करीत होते, त्या घरांच्या किमतीही आता पडल्याच. तेव्हा विकून करणार काय..आणि राहायचं कुठे? सगळेच प्रश्न. महत्त्वाचा मुद्दा म्हणजे हे सगळेच्या सगळे एमबीए किंवा तत्सम काही तरी झालेले. मास्टर्स इन बिझनेस अ‍ॅडमिनिस्ट्रेशन वगैरे पण आता बिझनेसच नाही म्हटल्यावर कशाचं अ‍ॅडमिनिस्ट्रेशन करणार? तशी समस्या गंभीरच म्हणायची. ० ० ० ० ० ० ० ० ० ० ० गेल्याच आठवडय़ात बातमी होती. अ‍ॅपल, सॅमसंग, मायक्रोसॉफ्ट, आयबीएम वगैरेंनी भारतात जरा जास्तच हातपाय पसरायला सुरुवात केलीय. या कंपन्या भारतातून जी उत्पादनं करतात त्यांच्यातही वाढ होणार आहे, म्हणे. याची प्रचीती या कंपन्या स्वामित्व हक्कांसाठी भारतातून जे अर्ज करतात त्याच्यात वाढ झाली आहे, यातून येऊ शकते, असं या क्षेत्रातले जाणकार सांगतात. आर्थिक क्षेत्रात सध्या असं सगळं उलटंपालटं झालेलं असताना अशाच एका मोठय़ा कंपनीचा डिझाइनप्रमुख एका कार्यक्रमात भेटला. मुंबईतला पाऊस, खड्डे या नव्या हवापाण्याच्या गप्पा झाल्यावर त्याला विचारलं.. कसं काय चाललंय.. धंदापाणी? तो म्हणाला उत्तम. वाटते तितकी काही समस्या अजिबात गंभीर नाही. आमच्या क्षेत्रात तर माणसं मिळत नाहीत, अशी परिस्थिती आहे. भारतात इतकी अभियांत्रिकी महाविद्यालयं आहेत.पण चांगले अभियंते तयार करणारी फार नाहीत.. आयआयटी वगैरेचा आकार तसा कमीच. ते आयआयटीयन्स किती ठिकाणी पुरणार? एमबीए मित्राचं स्मरण केलं आणि त्याला विचारलं.. पण ठिकठिकाणी नोकर कपातीला सुरुवात झालीये.. अर्थव्यवस्था संकटात आहे असं म्हणतात.. तुम्हाला नाही वाटतं आर्थिक संकट.. त्यावर त्याचं उत्तर बोलकं होतं. हे संकट वगैरे रडतायत ना ते सगळे वित्तीय संस्थांत वगैरे नोकऱ्या करणारे आहेत. यांचा धंदा वाढावा म्हणून पैसा होता तेव्हा ते कर्ज वाटत सुटले.. ज्याला परतफेड शक्य नाही, त्याच्याही गळय़ात या मंडळींनी र्कज घातली. ज्यांनी र्कज घेतली त्यांना ते परवडणारं नव्हतंच; तसंच झालं. त्यांचे हप्ते चुकायला लागले आणि तेव्हापासून यांची परवड सुरू झाली.. हे आर्थिक संकट म्हणजे यांच्याच पापाची फळं आहेत.. त्याची दुखरी नस बहुधा नकळत दाबली गेली असावी. त्याला तसंच बोलतं ठेवलं. तो म्हणाला : हे वित्तीय संस्थावाले.. यांच्या बुडाशी पैसा असतो. तो तयार करतो आम्ही- उद्योजक- अभियंते. तो फक्त मॅनेज करण्याचं काम हे करतात. आमच्याकडून काही तरी निर्मिती होते.. मग भले ती काडेपेटी का असेना, यांच्याकडून सांगा काही होतं का? हे फक्त पैसे फि रवत बसतात.. आम्ही काही उभारतो, तयार करतो, उत्पादन करतो.. संपत्ती निर्मिती करतो.. तसं करताना अनेकांसाठी रोजगाराच्या संधी तयार होत असतात.. आणि या सगळय़ांचं झाल्यावर त्यातून फायदा कमावतो. या फायदा मिळवण्याच्या टप्प्यावर हे एमबीएवाले येतात. आमच्या दोन रुपयांचा फायदा चार रुपयांचा करून देण्याचं आश्वासन घेऊन. आम्हालाही गरज असते आणि यांना जे जमतं ते आम्हाला जमत नाही. तेव्हा आम्ही त्यांच्या हाती माना देतो आमच्या.. मग आमच्या दोन रुपयांचे चार रुपये करण्यासाठी हे लागतात पैसा फिरवायला.. तो बोलत राहिला. दमला. आणि मग भरतवाक्य बोलल्यासारखा एकदम म्हणाला: गेल्या शंभर वर्षांतले जे काही आर्थिक घोटाळे आहेत ना, ते या कार्यालयांत व्यवस्थापक म्हणवून घेणाऱ्या मंडळींनी केलेत. ते होतात कारण त्यांना निर्मिती करायची नसते. नुसतेच पैसे फिरवायचे असतात. वरवर पैसा फिरवत बसणारे घोटाळेच करणार.. दिसतो का तुम्हाला यात एक तरी अभियंता..? खरं असावं बहुधा त्याचं म्हणणं! कारण डोळय़ांसमोरून एकदम रजत गुप्ता ते केतन पारिख व्हाया हर्षद मेहता वगैरे मंडळी येऊन गेली. याच्या म्हणण्याचा अर्थ इतकाच की खरे खरे कर्ते आणि काही न करता नुसतेच असलेले करविते यांच्यातली ही तफावत आहे. त्याच्या म्हणण्यात तथ्य होतं. पण पूर्ण नाही. राज्यातल्या पाटबंधारे वगैरे नामांकित खात्यांतले अभियंतेही काय काय करतात ते याला माहीत नसावं. असो. ० ० ० ० ० ० बरोबर दोनच दिवसांपूर्वी घोषणा झाली : बाक्र्लेज या खूप मोठय़ा ब्रिटिश बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी बॉब डायमंड यांना राजीनामा द्यावा लागलाय. बँकेचे अध्यक्ष मार्कुस अग्येस यांनाही त्या आधी राजीनामा द्यावा लागलाय. परकीय चलन व्यवहारात घोटाळा केल्याचा आणि त्यामुळे बँकेचं नुकसान केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. अमेरिकेतल्याही काही मोठय़ा बँकप्रमुखांवर कारवाईची मागणी होऊ लागलीये. कर्त्यांपेक्षा करवित्यांची संख्या वाढली की असं होत असावं बहुधा. (साभार : लोकसत्ता ,शनिवार, ७ जुलै २०१२)

Comments

Popular posts from this blog

आठवण आईची-पाचवे पुण्यस्मरण

आई -तृतीय पुण्यस्मरण

आई-चतुर्थ पुण्यस्मरण