ढगांना..

मित्रानो हा पावसाळा आला कधी आणि संपला कधी हेच काही कळले नाही. हवामान खात्याच्या माहितीनुसार (?) आता मान्सून राजा परतीच्या मार्गावर आहे आणि १ आठवड्याच्या आत तो उत्तरेकडून खाली दक्षिण भारतातून परत जाईल  असे कळते.पण काही मोजके गाव/तालुके/जिल्हे सोडले तर  बाकी इतर सर्व ठिकाणी अवस्था फार फार बिकट आहे.पाऊस  सुरु असून ही  काही ठिकाणी पानी आणि चाराच्यी स्थिती  आत्ताच गंभीर आहे. नोकरी धंदा  करणारया व्यक्ती / कुटुंबांना  याची झळ कितपत जाणवेल याची शंका आहे पण शेतकरी आणि शेतीवर अवलंबून असलेले इतर घटक यांच्या पोटात आत्ताच गोळा आला आहे हे निश्चित .सण वार अजून नुकेतच सुरू झालेले आहेत पण जर तुम्ही जरा शहराच्या बाहेर जाऊन बघितले तर खरी अवस्था काय आहे  हे ध्यानात यायला फार वेळ लागणार नाही हे नक्की(अर्थात जे ग्रामीण भागातून आलेले आहेत त्यांना फार काही सांगण्याची गरज नाही) बघूया काय होणार आहे ते नजीकच्या भविष्य काळात. पण या क्षणाला मला कवी सौमित्र यांनी लिहलेली अत्यंत  हृदयस्पर्शी कविता आठवते आहे.

"नांगरून ठेवल्या शेतांवरती येण्याआधी दाटून
कोरडय़ाठण्ण पडल्या सगळ्या विहिरी घ्या वाटून
पिवळ्याजर्द माळरानी पिवळी गुरंढोरं पहा
तडे गेल्या भेगांवरती वाट बघत बसून रहा
युगे युगे शेतात उभ्या बुजगावण्यावर नजर टाका
त्याच्या डोळ्यांमध्ये बघायला जरा तरी खाली वाका
तुमच्या भरून येण्यावरती त्यांचा जीव जडू द्या
हिरवी होतील बुजगावणीही तो पाऊस पडू द्या

चालत रहा सोसत ऊन-काहिली झाली पायवाट
ऐका थोडा खोप्यांमधला विरून गेला चिवचिवाट
पंखांमधून ज्यांच्या दिशा उडून गेल्या दाही
सुकून गेल्या झाडांपाशी जरा थोडं थांबा
नितळ ओली गोष्ट त्यांना पाण्यासारखी सांगा
एकेक थेंब डोंगरावरला, छपरावरला अडू द्या
थेंबाथेंबांत नद्या भरतील तो पाऊस पडू द्या

एक शेतकरी झाडाकडे एकटक पाहत असेल
शेंडय़ावरून बघितल्यावर नजरेत त्याच्या जे दिसेल
ते जाणून घेऊन त्याच्या घरावरली सावली व्हा
वेशीवरल्या ढिम्म बसल्या देवाला ही खबर द्या
चिल्लीपिल्ली दिसतील वरून टँकरमागे धावणारी
पोटाखाली त्यांच्या भूक पोटापुरती मावणारी
त्यांना भूकच लागणार नाही असं काही घडू द्या
क्षमेल तहान कायमचीच तो पाऊस पडू द्या
सौमित्र

खरेच असा सर्व तृषित जनतेची  तहान भागवणारा पाउस कधी पडेल का??

Comments

Popular posts from this blog

आठवण आईची-पाचवे पुण्यस्मरण

आई -तृतीय पुण्यस्मरण

आई-चतुर्थ पुण्यस्मरण