एक शहेनशाह कि लंबी कहानी -डॉ. यशवंत रायकर
शहाजानचं आयुष्य म्हणजे एक दीर्घकथा आहे. ज्यात अनेक पापुद्रे आहेत. पति-पत्नीच्या अमेर प्रेम कहाणीचे, पिता-पुत्र संघर्षांचे आणि भाऊबंदकीचे अनेक पदर आहेत.शाहजहान बादशहाचे जीवन एक दीर्घकथा आहे, सत्यकथा आहे. एका महानायकाची ती शोकान्तिका आहे. सुबत्ता आणि सुवर्ण काळातून दुर्दशा आणि दुष्काळात घेऊन जाणाऱ्या घटनांची हकीकत आहे. त्याचबरोबर कथेत कथा गुंफल्या जाव्यात, तशा घडामोडींचे कथा सरित्सागर नव्हे, पण सरोवर आहे. म्हणून हे कथानक वीर, रौद्र, भयानक, बीभत्स, शृंगार, हास्य व करुण अशा रसांची अनुभूती देत पुढे सरकते. शाहजहानचा काळ मोगल साम्राज्याचा सुवर्णकाळ होता. ताजमहल (१६३१-१६४८) हे त्याच्या उच्चांकाचे प्रतीक. सुबत्तेशिवाय अशी किमया साकारणे शक्य नव्हते. या बादशहाची कारकीर्द १६२८ ते १६५८. म्हणजे त्याने तीस वर्षे राज्य केले. पण तो जगला ७४ वर्षे (१५९२- १६६६). म्हणून शाहजहानची म्हणजे खुर्रमची कथा सुरू होते अकबराच्या काळात आणि संपते औरंगजेबाच्या कैदेत. त्यामुळे चार बडय़ा मोगल सम्राटांबद्दल ती बरेच काही सांगून जाते. दिग्विजयाच्या घोडदौडीची परिणती विपन्नावस्था व विनाश यात कशी होत गेली...