एक शहेनशाह कि लंबी कहानी -डॉ. यशवंत रायकर

शहाजानचं आयुष्य म्हणजे एक दीर्घकथा आहे. ज्यात अनेक पापुद्रे आहेत. पति-पत्नीच्या अमेर प्रेम कहाणीचे, पिता-पुत्र संघर्षांचे आणि भाऊबंदकीचे अनेक पदर आहेत.शाहजहान बादशहाचे जीवन एक दीर्घकथा आहे, सत्यकथा आहे. एका महानायकाची ती शोकान्तिका आहे. सुबत्ता आणि सुवर्ण काळातून दुर्दशा आणि दुष्काळात घेऊन जाणाऱ्या घटनांची हकीकत आहे. त्याचबरोबर कथेत कथा गुंफल्या जाव्यात, तशा घडामोडींचे कथा सरित्सागर नव्हे, पण सरोवर आहे. म्हणून हे कथानक वीर, रौद्र, भयानक, बीभत्स, शृंगार, हास्य व करुण अशा रसांची अनुभूती देत पुढे सरकते. शाहजहानचा काळ मोगल साम्राज्याचा सुवर्णकाळ होता. ताजमहल (१६३१-१६४८) हे त्याच्या उच्चांकाचे प्रतीक. सुबत्तेशिवाय अशी किमया साकारणे शक्य नव्हते. या बादशहाची कारकीर्द १६२८ ते १६५८. म्हणजे त्याने तीस वर्षे राज्य केले. पण तो जगला ७४ वर्षे (१५९२-

१६६६).  म्हणून शाहजहानची म्हणजे खुर्रमची कथा सुरू होते अकबराच्या काळात आणि संपते औरंगजेबाच्या कैदेत. त्यामुळे चार बडय़ा मोगल सम्राटांबद्दल ती बरेच काही सांगून जाते. दिग्विजयाच्या घोडदौडीची परिणती विपन्नावस्था व विनाश यात कशी होत गेली व तिला प्रत्येक बादशहाने आपापल्या परीने कसा हातभार लावला हे उलगडू लागते. शाहजहानची कहाणी पाच तरंगांत विभागून सांगितल्यास हे वास्तव ठळकपणे उठून दिसेल. तरंग एक- अकबराचा लाडका नातू व जहांगिराच्या पसंतीचा वारस म्हणून गेलेली पहिली सोळा वर्षे. तरंग दोन- युवराज असतानाच १६०८ पासून पराक्रम गाजविल्यामुळे झालेल्या उत्कर्षांची दहा-बारा वर्षे. तरंग तीन- जहांगीर आजारी पडून (१६२०) दुखणे वाढत गेल्यानंतर फिरलेल्या दिवसात बंडखोरी व भटकंती यात सहा वर्षे काढून अखेर पत्करलेली शरणागती. तरंग चार- बादशहा असताना (१६२८-१६५८) ताजमहल व शाहजहानाबाद वगैरेची उभारणी. दुष्काळग्रस्तांचा आक्रोश. तरंग पाच- मुलाच्याच कैदेत काढलेला सात वर्षांचा अ‍ॅन्टीक्लायमॅक्स.
तरंग पहिला- खुर्रमचे बालपण चांगले गेले तरी वयाच्या तेराव्या वर्षी त्याला पिता-पुत्र संघर्षांचे थरारनाटय़ पाहायला मिळाले. पुढे काय घडत राहणार याचा जणू संकेत देणारा हा प्रसंग असल्यामुळे येथे सांगितला पाहिजे. त्याची पाश्र्वभूमी अशी होती : अकबरला मुलगे तीन : सलीम, मुराद व डॅनियल. तिघांच्या आया वेगवेगळ्या. आपल्या मुलांना उत्तम राज्यकर्ते बनविण्यासाठी अकबर धडपडला. लायक वारस घडविणे त्याला माहीत होते, पण पुत्रप्रेमाचा ओलावा त्याच्याकडे नव्हता. व्यक्तिमत्त्वही प्रखर, करारी व धाक दाखविणारे. परिणामी तीनही मुलगे बापापासून दुरावले व व्यसनाधीन झाले. अर्थात दरबारी वातावरण भोगविलासासाठी पोषक असेच होते. प्रत्येक शाहजाद्याकडे स्वत:ची सत्ता, संपत्ती, सैन्य, जनानखाना, हिजडे, गुलाम वगैरे होते; पण व्यसनापायी मुले बेजबाबदार व्हावीत ही अकबराची घोर चिंता होती. तो स्वत: निव्र्यसनी होता.
सलीमला रोज सकाळी अफूचा डोस लागे, रात्री मदिरा इतकी की तेव्हा काय बोललो हे दुसऱ्या दिवशी लक्षात राहत नसे. त्याचे व्यसन सुटावे म्हणून बापाने त्याला १० दिवस कडक नजरकैदेत ठेवून पाहिले पण व्यर्थ. सलीमला बापाचा भयंकर तिटकारा होता. दुसरा मुराद दक्षिणेत स्वारीवर धाडला असता दारूपायी कुचकामी ठरला म्हणून अबुल फज्लबरोबर डॅनियलला पाठवावे लागले. मुराद पीत पीत मेला. डॅनियलला दारू मिळणार नाही, अशी कडक व्यवस्था अकबराने केली. पण शाहजाद्याच्या सेवकांनी धन्याला चोरून दारू पोहोचविली. कशी? गायीच्या आतडय़ाची पिशवी व बंदुकीची नळी यातून. ते विषारी रसायन पिऊन डॅनियल लवकर संपला. उरला फक्त सलीम. तो बापाला न जुमानणारा. त्याने अकबराच्या काही कर्तबगार अधिकाऱ्यांना ठार केले. (पुढे अबुल फज्लचाही खून करविला.)
सलीमच्या अशा वागण्यामुळे त्याच्याऐवजी त्याचा मोठा मुलगा खुस्रौ याला वारस नेमावे, असे बहुतेक दरबारींचे मत होते. खुस्रौचे नावही चांगले होते. त्यातून तो मानसिंगचा भाचा. अकबराचा ओढासुद्धा या मोठय़ा नातवाकडेच होता. तरी त्याने हा प्रश्न उमराव सभेपुढे टाकला. बहुमत खुस्रौच्या बाजूने पडले. असे असून अकबराला निर्णय घेता येईना. अखेर नशिबाचा कौल पाहावा म्हणून त्याने सलीमचा हत्ती व खुस्रौचा हत्ती यांची झुंज लावली. खेळ पाहायला दोन्ही पक्षाचे पाठीराखे हजर होते. अकबर, खुर्रम, शाही परिवार वरच्या मजल्यावरून पाहत होते. द्वंद्वयुद्धात सलीमचा हत्ती जिंकला. त्यामुळे दोन्ही पक्षाच्या लोकांत प्रथम वादावादी होऊन तिचे रूपांतर हाणामारीत झाले. शेवटी हा प्रकार ताबडतोब बंद करा असा हुकूम अकबराने धाडला तो खुर्रमच्या हस्ते. त्याचा परिणाम झाला. १३ वर्षांच्या मुलाचे कौतुक झाले. पण सत्तेसाठी भाऊबंदकी व पिता-पुत्र वैर यांचा जो नमुना सादर झाला तोच पुढे जहांगीर, शाहजहान व औरंगजेब अनुसरणार होते. जहांगीर म्हणजे जगाचा स्वामी हे नाव धारण करून सलीम गादीवर आला तेव्हा खुर्रम हाच त्याचा लाडका मुलगा होता. १६०८ साली १६ वर्षांच्या खुर्रमला त्याने लाल तंबूचा अधिकार दिला. याचा अर्थ आपला वारस निवडला असा होता.
तरंग दोन- १६०८ पासूनची दहा-बारा वर्षे. जहांगिराला धोका होता तो खुस्रौपासून. म्हणून त्याने या मुलाला स्वत:जवळ ठेवून घेतले व त्याच्या राजपूत मामाला बंगालमध्ये धाडले; पण काहीतरी निमित्त काढून खुस्रौ निसटला. तो पाठीराखे गोळा करीत लाहोरला पोहोचला. तरी जहांगिराने त्वरित पाठलाग करून त्याला पकडले. त्याच्या दोन खास साथीदारांना क्रूर शिक्षा फर्माविली. गाढव कापून त्याच्या ओल्या कातडय़ात एकाला व तशाच बैलाच्या कातडय़ात दुसऱ्याला कोंबून शिवून टाकले. फक्त तोंडे उघडी ठेवली. लोकांना दिसावीत म्हणून. अशा अवस्थेत त्यांची गाढवावरून धिंड काढण्यात आली. दोघे गुदमरून मेले. खुस्रौला मारले नाही. पुत्रवध टाळला. त्याला बेडय़ा ठोकून आग्य््राास नेले. नंतर जहांगिराला मारण्याचा एक कट शिजला होता. त्याचा बीमोड करण्यात आला. त्याला खुस्रौची सहानुभूती होती म्हणून या वेळी त्याला डोळे काढण्याची शिक्षा सुनावण्यात आली. पण त्यामुळे तो संपूर्ण आंधळा झाला नाही. त्याला अंधुक दिसत असे. राजमहालात तो दयनीय अवस्थेत एकटाच फिरत असे. जहांगिराला या मुलाचे तोंड पाह्यला नको असे. बापाच्या कैदेत त्याने १३ वर्षे काढली. खुर्रमलाही खुस्रौ धोक्याचा वाटत होता. म्हणून दख्खनच्या स्वारीवर निघताना त्याला बरोबर मागून घेतले. नंतर खुस्रौ मेल्याचे कळविण्यात आले तेव्हा प्रत्यक्षात खुर्रमने वडील भावाचा खून करविला होता (१६२२). या काळात दोन इतिहासप्रसिद्ध लग्ने झाली. जहांगीर-नूरजहान (१६११) आणि खुर्रम-मुमताज (१६१२). या दोन स्त्रियांची कथा पुढील तरंगात येईल.
खुर्रमने या काळात आपण उत्तम सेनापती व मुत्सद्दी असल्याचे सिद्ध करून दिले. अकबराला जमले नाही ते करून दाखविले. मेवाडवर विजय मिळविला (१६१४). त्यासाठी त्याने एकच तंत्र वापरले. शत्रूचा प्रदेश उजाड करून टाकला. आपली माणसे, उंट, घोडे, हत्ती, गुरेढोरे कितीही मेली, सामग्री फुकट गेली तरी चालेल पण त्यापेक्षा बऱ्याच अधिक पटीने मेवाडचे नुकसान झाले पाहिजे. राणाला हे परवडणारे नव्हते. त्याने तह केला. उदेपूरचा राजा मोगलांचा मांडलिक बनला. पण त्या वेळी खुर्रमने सुज्ञपणा दाखविला. उदेपूर संस्थान खालसा केले नाही व मेवाडच्या राणांना मोगल दरबारात हजेरी लावण्यापासून सूट देण्यात आली. हेच शहाणपण अकबराने राणा प्रतापच्या वेळी दाखविले असते तर मानवनिर्मित अवर्षणे व दुष्काळ यांना बराच आळा बसला असता. खुर्रमने अहमदनगर जिंकले. (१६१६) कांगरा साम्राज्यात आणले (१६२०). विजापूर व गोवळकोंडा त्याला जिंकता आले नाही तरी त्यांच्याशी तह करून बदल्यात नजराणे, हिरे, माणके, पैसा वगैरे रूपात अलोट धन मिळविले. ते जहांगिरापुढे ठेवण्यासाठी तो अजमेरला गेला तेव्हा दरबारात बापाने त्याच्यावर सुवर्णमुद्रा व रत्ने यांचा अभिषेक केला, पदोन्नती दिली व वारस जाहीर केले. नूरजहान तर इतकी खूश झाली की खुर्रमला त्याच्या संपूर्ण झनानखान्यासह मेजवानीचे आमंत्रण दिले. त्यावर तिने तीन लाख रुपये खर्च केल्याचे नमूद आहे. जहांगिराची छावणी अजमेरहून मांडूकडे निघाली तेव्हा व्यापाऱ्यांना आपापला माल घेऊन बरोबर राहण्याची सक्ती करण्यात आली. कारण दुष्काळी भागातून जाताना कशाची टंचाई भासू नये. ही छावणी म्हणजे एक फिरते शहरच असे. कुणी व्यापारी, विक्रेता मागे राहू नये म्हणून अजमेरची छावणी जाळून टाकण्यात आली.
जहांगिराचे निर्णय नूरजहानच घेत असे. तरी या काळात मुलकी प्रशासन सुरळीत चालले होते याचे आश्चर्य वाटेल. त्याचे श्रेय अकबराकडे जाते. त्याने घालून दिलेली व्यवस्था चालूच राहिली. त्याने जास्तीत जास्त जमीन लागवडीखाली आणली. शेतकऱ्यांच्या हिताच्या सुधारणा केल्या होत्या. हिंदूंवरील अन्यायकारक कर हटविले होते. शिवाय लष्करी सत्तेचे महत्त्व कमी करून मुलकी प्रशासनाचे अधिकार क्षेत्र वाढविले होते. त्यामुळे अर्थात ब्यूरोक्रसी फुगत गेली. पण खालच्या पातळीवरील कामे अडून राहत नव्हती. लष्करी सेवेत पैसा, प्रतिष्ठा, सत्ता, पदोन्नती असे बरेच काही असल्याने धाडसी लोक सैन्यात जात. पण सुरक्षित, निर्धोक जीवन पसंत करणारा, देवधर्म सांभाळणारा, अल्पसंतुष्ट वर्ग मुलकी सेवेत शिरला. तो खास करून कलमबहाद्दर कायस्थ व ब्राह्मण जातींचा होता. राज्य मुसलमानांचे असले तरी प्रत्यक्षात हिंदूच ते चालवीत आहेत अशी खंत मुस्लिम विचारवंतांना नेहमीच सतावत राहिली त्याचे हे एक कारण. आपल्या मध्यमवर्गीय चाकरमान्या कारकूनी संस्कृतीची पाळेमुळेसुद्धा या काळापर्यंत मागे जातील. साहित्य व जीवनाचे तत्त्वज्ञान याच वर्गाने निर्माण केले.
जहांगीर क्रूरच नव्हे तर अत्यंत अंधश्रद्ध व लोभी होता. त्याच्या दरबारात कुणी डावा पाय आधी टाकून आला तर तो त्याला बाहेर हाकलत असे. उजवा पाय प्रथम टाकून यायला लावी. एका हिंदू ज्योतिषाच्या सल्ल्याने वागत असे. दरबारात नजराणा घेऊनच जावे लागे, शिवाय आपण आणलेली भेट हात उंच करून दाखवायची असे. ज्याची वस्तू सर्वात जास्त मौल्यवान दिसेल त्याचा अर्ज प्रथम विचारात घेतला जाई. इंग्रजांकडून नजराणे मिळविण्यासाठी तो हापापलेला असे. एकदा टॉमस रोने त्याला नकाशांचे पुस्तक दिले. जहांगिराने ते रागाने परत केले. जगाचा स्वामी म्हणविणाऱ्या राजाला त्याने न जिंकलेले जग किती मोठे आहे हे जाणून घेण्याची इच्छासुद्धा नसावी याचे इंग्रजांना आश्चर्य वाटले होते. जहांगिराच्या काळात भ्रष्टाचार बोकाळला.
तरंग तीन- १६२० साली जहांगीर आजारी पडला. व्यसनांच्या आहारी गेलेला असल्यामुळे तो आता वाचत नाही हे नक्की झाले तेव्हापासून सत्तेची समीकरणे बदलली. नूरजहानच्या खुर्रमविरोधी कारस्थानांचा काळ सुरू झाला. येथे नूरजहानची कथा सांगितली पाहिजे. मिर्झा घियास बेग नावाचा एक धाडसी, कर्तबगार पण कफल्लक इराणी मोगलांच्या पदरी येऊन अकबर व जहांगिराच्या काळात नावारूपाला आला. जहांगिराने त्याला इतिमत् उद्दौला म्हणजे शासनाचा आधारस्तंभ हा किताब दिला व साम्राज्याचा वजीर नेमले. त्याला अपत्ये दोन. मेहरुन्निसा ही कन्या व असफखान हा पुत्र. मेहरुन्निसाचे लग्न शेर अफकून नावाच्या इराण्याशी झाले. त्यांना मुलगी झाली ती लाडली बेगम. असफखानालासुद्धा अपत्ये दोन. अर्जुमदबानू मुलगी व शाहिस्तेखान मुलगा. (शिवाजीने ज्याची बोटे तोडली तो हाच.) मिर्झा घियास बेगच्या परिवाराला मोगल घराण्यात मानाचे स्थान होते. शेर अफकून मेल्यामुळे मेहरुन्निसाला अकबराची एक विधवा सलीमा हिला सोबत म्हणून सन्मानाने शाही झनानखान्यात प्रवेश दिला गेला. मेहरुन्निसा अत्यंत सुस्वरूप, बुद्धिमान, शूर व अनेक कलागुणयुक्त असामान्य स्त्री होती. ती जहांगिराच्या नजरेत भरली अन् मेहरुन्निसाची नूरजहान (जगाचा प्रकाश) बनली. त्याचप्रमाणे असफखानाची लावण्यवती कन्या अर्जुमदबानू खुर्रमला आवडली व मुमताजमहल झाली.
१६२२ मध्ये मिर्झा घियास बेग वारला. शिवाय जहांगीरचा आजार वाढला. त्यामुळे बदललेल्या राजकारणात नूरजहान व असफखान या बहीण-भावंडांचे फाटले. नूरजहानला खुर्रम म्हणजे खतरा ठरला तर असफखानाला जावईच फायद्याचा होता. बादशहा बनविण्यासाठी नूरजहानला आता सोयीस्कर प्यादे हवे होते. परविझ व शहर्रयार या खुर्रमच्या दोन भावांमध्ये परविझ कुचकामी म्हणून प्रसिद्ध होता. मोगल दरबारातली माहिती काढण्यासाठी टॉमस रोने एकदा परविझला हाताशी धरले होते. एकांतात भेटण्याची इच्छा व्यक्त करून त्याला विलायती दारूच्या बाटल्या दिल्या. त्यावर बेहद्द खूश होऊन रोला त्याने त्याच दिवशी वेळ दिली. इंग्रज वेळेवर पोहोचला. पण परविझ महाशय तोपर्यंत विलायती पिऊन इतके तर्र झाले होते की गाढ झोपी गेले. कपाळाला हात लावून रो परत गेला. नूरजहाने शहर्रयारची निवड केली. जहांगिराचा तो सर्वात धाकटा पण रखेलीपासून झालेला मुलगा होता. शिवाय त्याला एक प्रकारचा कुष्ठरोग होता. नूरजहानने त्याला जावई करून घेतले. पहिल्या नवऱ्यापासून झालेल्या लाडली बेगमशी त्याचे लग्न लावून दिले (१६२१). त्याला गादीवर बसविले की सत्ता नूरजहानचीच राहणार होती. खुर्रमच्या जहागिऱ्यासुद्धा तिने शहर्रयारच्या नावे करविल्या. याच अवधीत इराणच्या शाह अब्बासने कंदाहरवर स्वारी करून ते कायमचे घेतले. खुर्रमला तिकडे त्वरित कूच करण्याचा जहांगिराने हुकूम दिला. पण ते टाळून तो आग्य््राावर चालून जाण्यासाठी निघाला. पण महाबतखानाच्या शाही फौजांमुळे त्याचा निभाव लागला नाही. त्याने पळ काढला व महाबतखानाने त्याचा तीन वर्षे पाठलाग चालविला. खुर्रमने उदेपूरच्या राणाकडे काही काळ आश्रय घेतला. दक्षिणेत मलिक अंबरशीसुद्धा दोस्ती जोडली. मुमताज व मुले यांना घेऊन तो फिरत होता. अखेर १६२५ साली तो बापाला शरण गेला. आपले दोन मुलगे दाराशिकोह (वय १०) व औरंगजेब (वय ८) यांना नूरजहानकडे ओलीस ठेवून बालाघाटची मिळालेली सुभेदारी त्याने मान्य केली. जहांगीर तेव्हा लाहोर, काबूल, काश्मीरकडे होता. आता महाबतखानाला सत्तेची लालसा झाली. बंडखोरी करून त्याने जहांगीरचा ताबा मिळविला, पण नूरजहान निसटली व भाऊ असफखानला जाऊन मिळाली. त्याने जहांगीरला सोडविले. महाबतखानाचा प्रयत्न फसल्यामुळे तो दक्षिणेत खुर्रमला जाऊन मिळाला. शाही खजाना लाहोरला शहर्रयारजवळ होता. असफखानने तो ताब्यात घेऊन शहर्रयारला अटक केली. दाराशिकोह व औरंगजेब यांना नूरजहानकडून सोडवून आपल्या ताब्यात घेतले. जावई खुर्रमला त्याने निरोप धाडला- दावर बक्ष (खुस्रोचा मुलगा), परविझ शहर्रयार व त्याचा मुलगा आणि डॅनियलचे दोन पुत्र अशा सहाजणांना ‘अल्लाह को प्यारे बनाके’ आग्य््राास जात आहे. त्या वेळी खुर्रम महाबतखानाबरोबर आग्य््रााच्या वाटेवरच होता.
१६२७ च्या अखेर जहांगीर लाहोर येथे मरण पावला. तेथेच खुर्रम बादशहा झाल्याचे जाहीर करण्यात आले. जानेवारी १६२८ मध्ये खुर्रम शाहजहान हे नाव धारण करून आग्य््राास सिंहासनावर बसला. फेब्रुवारीत असफखान दारा व औरंगजेब यांना घेऊन आग्य््राास पोहोचला. असफखानाला मुख्यमंत्रीपद (वजीर) मिळाले. महाबतखानला अजमेरची सुभेदारी. नूरजहानने आपली हार मानली. तिला चांगले पेन्शन मिळाले. त्यानंतर तिने आग्य््राास बापाचे कब्रस्तान बांधले. नंतर ती लाहोरला गेली. तेथे तिने जहांगीरचे व नंतर स्वत:चेही कब्रस्तान बांधले. जहांगीरमागे ती १८ वर्षे जगली. लाडली बेगमचे काय झाले हे कळत नाही. ‘प्रेमस्वरूप’ आईच्या कारस्थानात पोटची पोर मूकबळी ठरली.
तरंग चार- सुवर्णकाळ. १६२८ पासून जेमतेम १८ महिने शाहजहानला मुले व मुमताजसह आग्य््राामध्ये थाटात राहता आले. १६२९ अखेरपासून दख्खनमध्ये बंडाळ्या सुरू झाल्या. त्या मोडून काढण्यासाठी तो स्वत: स्वारीवर निघाला. मुमताज बरोबर होतीच, पण बऱ्हाणपूर मुक्कामी १४ व्या बाळंतपणात तिला अचानक मृत्यू आला. बादशहाला हे दु:ख विसरणे शक्य झाले नाही. मुमताज आपल्या आत्याहून अगदी वेगळी होती. तिने सर्व प्रसंगांत नवऱ्याला साथ दिली. ही सुस्वरूप, सालस, समंजस व सुज्ञ स्त्री राज्यकारभारात योग्य सल्ला देत असे. एरवी निर्दय व स्त्रीलंपट असलेला शाहजहान प्रेम काय करणार, असा प्रश्न उभा करता येत नाही. या सुमारास त्याचे मुलगे (दारा, शुजा, औरंगजेब व मुराद) आघाडय़ा सांभाळण्यास समर्थ झाले होते. त्यामुळे शाहजहानने आपले आवडते क्षेत्र वास्तू व स्थापत्य याकडे लक्ष वळविले. ताजमहाल (१६३१-१६४८), शाहजहानाबादमधील लाल किल्ला (१६३९-४८) व जामा मस्जीद (१६५०) मयूरासन, लाहोर- दिल्ली- आग्रा या ४०० मैलांच्या रस्त्यावर दुतर्फा झाडे लावणे, लाहोरची शालिमार बाग वगैरे सुवर्णकाळाची साक्ष देतात. त्यामुळे असंख्य लोकांना रोजगार मिळाला. जनानखान्यातील स्त्रियांकडेसुद्धा रग्गड पैसा असे. त्यातल्या काही व्यापारात पैसा गुंतवीत. हिजडय़ांकडेसुद्धा भरपूर धन साठत असे. त्यांना लाच देऊन बरीच कामे होत. ही सर्व मंडळी इस्लामी वर्तुळात खूप दानधर्म करीत.
पण ही सुबत्ता दक्षिणेतून आणलेल्या लुटीचे फलित होते. तो स्रोत थांबला तेव्हा आर्थिक चणचण भासू लागली. कंदाहार परत जिंकण्याच्या विफल प्रयासात बराचसा खजिना रिकामा झाला. जहागीरदार, सुभेदार, जमीनदार करवसुलीसाठी जुलूम करीत म्हणून बरेच लोक आपली पुंजी जमिनीत पुरून आपण गरीब असल्याचे भासवीत. लोकांचे डोळे दिपविण्यासाठी वापरलेली हिरे, माणके, रत्ने व जमिनीत गाडून ठेवलेले सोनेनाणे हे गोठलेल्या निरुपयोगी संपत्तीचे दोन आविष्कार होते.
शाहजहानचा आवडता मुलगा दारा. त्याच्या सर्वधर्मसद्भावाचा प्रभाव बादशहावर होता. शिवाय मुमताज शिया असल्यामुळे तो कडवा सुनी नव्हता. दारा प्रकांडपंडित होता. त्याने अथर्ववेद व ५० उपनिषदांचे फारसीत भाषांतर केले. त्यासाठी अनेक ब्राह्मणांची मदत घेतली. दाराच्या उपनिषदांपुढे अँक्वेटिल डुपेरॉन या फ्रेंच माणसाने लॅटिनमध्ये रूपांतर केले. अठराव्या शतकात पाश्चिमात्य जगाला झालेली उपनिषदांची पहिली ओळख दारा व डुपेरॉनमुळे होय, पण उलेमांना दाराचा तिरस्कार होता. राज्य आर्थिक संकटात व मुलेच बापावर उलटलेली अशी अवस्था आल्यावर शाहजहानाला उलेमांच्या पाठिंब्याची गरज वाटू लागली. १६३१ साली ताजचे बांधकाम सुरू झाले. १६३२ मध्ये गुजरात, महाराष्ट्रात दुष्काळ सुरू झाला. त्याच वर्षी शाहजहाने नव्याने बांधलेली हिंदू मंदिरे पाडण्याचा व नवी मंदिरे उभारण्यास बंदी घालणारा हुकूम जारी केला. १६४१ साली बादशहा लाहोरला असताना भुकेकंगाल लोकांचा एक मोठा जमाव राजमहालासमोर एकत्र जमला. शाहजहानने वरच्या मजल्यावरील झरोक्यातून त्यांचे म्हणणे ऐकून घेतले. सुवर्णकाळ व दुष्काळ हातात हात घालून चालत होते. सुफींना धर्मातराचे कार्य नेटाने रेटण्यासाठी ही परिस्थिती अनुकूल होती. याच पाश्र्वभूमीवर महाराष्ट्रात एक शेतकऱ्यांचा राजा उदयास येत होता, पण तो विषय वेगळा.
तरंग पाच- अ‍ॅन्टीक्लायमॅक्स : पुत्रप्राप्ती हा वर असतो. अपत्य म्हणजे मर्त्यलोकातील आपल्या अमरत्वाचे प्रतीक, पण शाहजहानला तो शाप ठरेल याची कल्पना नव्हती. दारा हा त्याच्या दृष्टीने वारसदार होता. १६५७ सप्टेंबरमध्ये आजार सुरू झाल्याने दारावर सर्व सूत्रे सोपवून कृतकृत्य होताना पिता निवृत्त जीवन जगण्यासाठी आग्य््रााला गेला, पण इतर तीन मुलगे बंड करून उठले. आता शाहजहानच्या कथेचा सूत्रधार औरंगजेब बनतो. त्याने अन्य तीन भावांची वाट कशी लावली हे थोडक्यात पाहू.
शाहसुजा (नं. २) बंगालमध्ये होता. सर्वप्रथम त्याने स्वत:ला बादशहा घोषित करून हमला केला, पण दाराचा मुलगा सुलेमान शुकोह याच्याकडून पराभूत झाल्यामुळे त्याने पळ काढला. पुढे दाराची हार झाल्यावर त्याने पुन्हा स्वारी केली. या वेळी त्याची गाठ औरंगजेबाशी पडली. पुन्हा पराजय व पुन्हा पळ, पण औरंगजेबाच्या फौजांनी त्याचा नेटाने पाठलाग चालविला. जीव वाचविण्यासाठी तो परिवारासह बंगालमधून आराकान पर्वतात पळाला. तेथे सर्वाचा अंत झाला असावा. (जानेवारी १६५९) औरंगजेबाचा स्वत:चा मुलगा मोहम्मद काही काळ शाहशुजाला फितूर झाला होता. त्याला आजन्म कारावास दिला गेला.
मुराद (नं. ४) गुजरातेत होता. त्यानेही बंड पुकारले. पण औरंगजेबाने त्याला दारा हा आपला सामायिक शत्रू असल्याचे पटविले व विजयानंतर साम्राज्याची दोघात वाटणी कशी करायची हेही सांगून टाकले. त्यांच्या एकत्रित सैन्याने दाराचा दोनदा धुव्वा उडविला (एप्रिल व मे १६५८). पण औरंगजेबाचे कारस्थान लक्षात येताच मुराद त्याच्याविरुद्ध गेला. आता मुरादशी लढण्याऐवजी औरंगजेबाने त्याला एकटय़ाला पकडून ग्वाल्हेरच्या किल्ल्यात नेले व मृत्युदंड दिला. (४ डिसें. १६६१)
इतर भावांची वृत्ती पाहून बापाची लढाई लढण्याऐवजी दारानेही बंड पुकारले होते. पण औरंगजेब मुरादच्या सैन्यांनी आग्य््रााजवळ त्याला घेरले. राजपूत सैनिक मरेपर्यंत त्याच्या बाजूने लढले. पण दारा दुर्दैवीच होता. त्याने अटक टाळण्यासाठी पळ काढला. अजमेर, सिंध, कच्छचे रण, गुजरात असा खडतर प्रवास करीत कुठेही थारा न मिळाल्यामुळे त्याने वायव्य सरहद्दीकडे प्रयाण केले. (वाटेत त्याची पत्नी नादिरा बेगम औषधपाण्याविना मरण पावली. त्या धक्क्यातून तो उठलाच नाही. मुमताज- शाहजहानप्रमाणेच त्यांचेही प्रेम उदात्त होते.) एका अफगाण सरदाराने दाराला औरंगजेबाच्या हवाली केले. दिल्लीत दाराची अत्यंत घृणास्पद अवस्थेत धिंड काढण्यात आली. मग शिरच्छेद करून धड सर्वत्र मिरविले. (३० ऑगस्ट १६५९)
दाराचा मुलगा सुलेमान शुकोह याला अटक केली, पण मारले नाही. अफूपासून बनविलेले पौस्ता नावाचे मादक पेय रोज प्यायला दिले. ते स्लो पॉयझनपेक्षाही भयानक असे. त्यामुळे तो संपला. त्याच्या दोन मुलांनाही शिल्लक ठेवले नाही. औरंगजेब मृत्युदंड स्वत: देत नसे. उलेमांनी दिलेल्या शिक्षेची तो फक्त अंमलबजावणी करीत असे.
औरंगजेबाच्या सैन्याने आग्य््राात प्रवेश केला. शाहजहान स्वागत करायला तयार होता व औरंगजेबाने किल्ल्याचा ताबा मागितला. बापाने तो नाकारला. तरी यमुनेच्या बाजूने घुसून औरंगजेबाच्या अधिकाऱ्यांनी खजिना ताब्यात घेतला. मुलाने बापाकडून मागण्या करून एकेक मौल्यवान चीज ताब्यात घेतली. शेवटी त्याची जपमाळही मागितली. ‘माळेतील हिरे- माणक्यांचा कुटून भुगा करीन पण तुला देणार नाही’ असा खडा जबाब मिळाल्यानंतर मात्र पुत्राने त्याचा नाद सोडला. पण यमुनेकडून किल्ल्यात भरले जाणारे पाणी बंद केले. बादशहा व त्याच्या लोकांना विहिरीचे कडवट पाणी पिऊन दिवस काढावे लागले. त्यावर बादशहाने कळविले, ‘धन्य ते हिंदू जे आपल्या मृतांनासुद्धा पाणी देतात आणि तू सच्चा मुसलमान आपल्या बापाला तहानेने मारतोस.’ प्रथम शाहजहान तक्रारीचे खलिते पाठवीत असे. नंतर तेही बंद करून तो मृत्यूची वाट पाहत ताजमहलकडे बघत वेळ काढी. १६६६ साली २२ जानेवारी रोजी त्याला मृत्यू आला त्यापूर्वीच औरंगजेबाने दोनदा राज्याभिषेक करवून घेतला होता.
शाहजहानच्या वरील कहाणीला अनेक पदर आहेत. ती पति-पत्नींच्या अमर प्रेमाची, एका बापाची, अपत्य मोहाची, पिता-पुत्र संघर्षांची आणि भाऊबंदकीची कथा आहे. कुटुंब संस्था व मानवी अस्तित्व यावरील ते एक भाष्य आहे. पहिल्या पाच मोगल सम्राटांत सर्वात बलशाली असून स्वत:च्या मुलांपुढे हतबल होऊन अजीजी करणारा शाहजहान सर्वाधिक अभागी व शोकात्म ठरतो. त्याच्या पराभवात कडव्या धर्मवेडाला लगाम घालून हिंदू- मुसलमानांना सहजीवन शिकविण्याचे प्रयास धुळीला मिळाले. दारा जिंकला असता तरी त्याला ते साधता आले नसते. केव्हातरी त्याचा खून झाला असता. बहुसंख्य मुसलमानांना मनातून जे हवे- इहलोकांत लाभ व फायदा आणि परलोकात स्वर्ग- ते औरंगजेबच देणार होता. एवढे करून या मातीत इस्लाम हरला पण होरपळत राहिला हिंदुस्थान.
( Ref: Lokprabha- 5 Feb.2010)

Comments

Popular posts from this blog

आठवण आईची-पाचवे पुण्यस्मरण

आई -तृतीय पुण्यस्मरण

आई-चतुर्थ पुण्यस्मरण