खरी चूक देवाचीच
रागावू नका मंडळी, कोणाच्याच भावना दुखवायची माझी इच्छा नाही; पण शांतपणे विचार करून पाहिलात, तर तुम्हीसुद्धा 'चूक देवाचीच आहे' हे लगेच कबूल कराल. देवाचा अवमान करण्याचा तर माझा काडीमात्र हेतू नाही. त्याच्याशी पंगा घेऊन, मेल्यानंतर मला नरकात जाऊन पडायचे आहे थोडेच? देव सर्वशक्तिमान आहे. साऱ्या विश्वाचा व्यवहार केवळ त्याच्या इच्छेनुरूप चालतो. आपण कोणाच्या पोटी, केव्हा आणि कुठे जन्म घ्यायचा, जन्मभर काय भोग वा हालअपेष्टा भोगायच्या, केव्हा मरायचे हे सारे देवच ठरवतो. जिवंतपणी आपल्या हातून कोणती कृत्ये व्हावीत, इतकेच काय, पण आपल्या मनात कोणते विचार यावेत, हेही सारे केवळ देवच ठरवतो. टाचणीच्या टोकावर ज्यांचा मेंदू ठेवला तरीदेखील त्या टोकावर मूळ जागेइतकीच जागा शिल्लक राहील, अशा किडय़ा-मुंगीसारख्या क्षुद्र (क्षुद्र केवळ आपल्या लेखी हं, परमेश्वराच्या लेखी नव्हे! कारण तीही त्याचीच निर्मिती आहे ना?) जीवांनासुद्धा आहार, निद्रा, भय, मथुन या गोष्टी परमेश्वराने त्यांच्या जीन्समध्ये आणि डीएनएमध्ये लिखित स्वरूपात दिल्या आहेत. आपण ती लिपी अजून तरी वाचू शकत नाही, ही बाब वेगळी! श्वसन, पचन, उत्सर्जन,...