हवेलीरामचा किमतराय By गिरीश कुबेर

किमतराय गुप्ता हे गेल्या आठवडय़ात गेले. वय तसं काही फार होतं असं नाही. ७७ वर्षांचे होते ते. तब्येतीनं खरं तर ठणठणीत होते. पण हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि जागच्या जागीच गेले. मोठा माणूस. जवळपास २०० कोटी डॉलरची उलाढाल होती त्यांची.
..पण त्यांच्या मरणाची बातमीदेखील आली नाही कुठे. अनेकांना तर माहीतही नसेल कोण हे किमतराय म्हणून. आता व्यक्तीच माहीत नाही तर त्यांची किंमत कशी असणार आपल्याला. आता तर तोही प्रश्न येणार नाही. कारण ते गेलेच. निदान गेल्यानंतर तरी त्यांच्या कर्तृत्वाचा परिचय व्हावा म्हणून हा प्रपंच. आपण तेवढा तरी तो करून घेतला पाहिजे. कारण अगदी आंतरराष्ट्रीय वाटावा असा एक मोठा ब्रॅण्ड त्यांनी आपल्या देशाला दिला. किंबहुना आजही अनेकांना माहीतही नसेल आपण कौतुक करतोय ते उत्पादन आपल्या देशाचं आहे म्हणून.
किमतराय हे काही जन्मजात उद्योगपती नव्हेत. जन्म गरिबीतला. पंजाबातल्या मालेरकोटला गावात. वडील शेतमजुरी करायचे. पोरांना शिकवायची वगरे बोंबच. गरिबाच्या घरी पोरांनी आपापल्या पायावर उभं राहायची गरज असते. शिक्षणापेक्षा जगण्याचं आव्हान केव्हाही मोठंच असतं. त्यामुळे गरिबाची मुलं शिकली नाही तरी जगायला लागतात. किमतरायचं तसंच झालं. खूप लहान वयातच तो कामाला लागला. गावात तेल विकायचा सायकलवरून. नंतर शेजारपाजारच्या गावांतही जायचा तो तेल विकायला. बरं चाललं असणार त्याचं. कारण आपल्याला अधिक बरं काय करता येईल असा प्रश्न त्याला पडू लागला. हे फारच आवश्यक असतं. नाही तर माणसं आहेत त्या अवस्थेत आनंदबिनंद मानू लागली तर फारच पंचाईत. पण तसं काही या किमतरायनं केलं नाही. 
तो अधिक चांगलं जगण्यासाठी दिल्लीला गेला. काय करायचं माहीत नाही. काय होणार आहे ते माहीत नाही. तरी किमतराय राजधानीत जाऊन धडकला. हातपाय मारायला लागला. मग असंच कोणी तरी त्याला सुचवलं, दुकान काढ म्हणून. कसलं? तर विजेचं सामान विकणारं. आता ज्यांनी कोणी ते सुचवलं त्यानं तेच का सुचवलं? किराणा मालाचं का नाही वगरे उत्तरं आता शोधण्यात काही अर्थ नाही. त्याला हे सुचवलं गेलं हे खरं आणि त्याने तो सल्ला शिरसावंद्य मानला हेही खरं.sam02तर मग त्याप्रमाणे त्यानं दुकान काढलं. कुठे? तर जुन्या दिल्लीतल्या भगीरथ प्लेस नावाच्या परिसरात. चालू होतं ते टुकुटुकु. हे असं दुकान.. परत तेही.. जुन्या दिल्लीच्या दरिद्री परिसरात. दोन-पाच पसे मिळत होते. हातातोंडाशी गाठ पडण्याइतपत. श्रीशिल्लक अशी काही नसायची. जवळपास १२ र्वष हा टुकीचा संसार सुरू होता. किमतरायची चिकाटी चांगली होती. तो वाट पाहायला तयार होता. १९७१ च्या आसपास त्याला पहिली संधी मिळाली. एव्हाना व्यवसायात तसा जम बसला होता. आता पुढचं आव्हान काय असे प्रश्न पडू लागले होते. त्याचं उत्तर हवेलीराम गांधी यांनी दिलं.
हे हवेलीराम गांधी म्हणजे सध्याचा विख्यात फॅशन डिझायनर रोहितचे आजोबा. तर या हवेलीराम यांची एक कंपनी होती. इलेक्ट्रिक स्विचगियर बनवणारी. किमतराय त्या उत्पादनांचे विक्रेते होते. त्यामुळे त्यांचा आणि किमतराय यांचा चांगला परिचय होता. कारण काय माहीत नाही, पण ती चालवण्यातला हवेलीराम यांचा उत्साह मावळला. ही कंपनी आपण विकून टाकू या असं त्यांच्या मनानं घेतलं. ते एकदा बोलताना किमतराय यांना तसं म्हणाले. हे म्हणाले, मी घेतो. जवळ भांडवलाइतके पसे नव्हते. तरी म्हणाले मी घेतो. हवेलीराम परिचित होते, त्यामुळे पसे उभे करण्यासाठी थोडा अधिक वेळ मिळणार होता, इतकीच काय ती सवलत.
किमतराय यांनी अखेर ती कंपनी घेतली. थोडय़ाच काळात त्यांना लक्षात आलं, नुसत्या स्विचगियरने आपण फार काही वाढणार नाही. त्यांनी मग आपली उत्पादनं वाढवायचं ठरवलं. विजेवर चालणाऱ्या वस्तू ते बनवायला लागले. मग पंखे, गिझर्स, केबल्स. बरंच काही ते बनवू लागले. मोठी जागा घेतली कार्यालयासाठी. दिल्लीच्या सिव्हिल लाइन्स भागात. चांगलंच बस्तान बसलं त्यांचं या नव्या व्यवसायात. व्यवसायाचा आकार वाढला. मदतीला मुलगा अनिल आणि पुतण्या अमित हेही बरोबरीनं उतरले. भांडवल मोठय़ा प्रमाणावर ओतलं जाऊ लागलं. कारण व्यवसायाचा वाढीचा वेग बघता बघता वाढला. 
पण किमतराय होते तसेच राहिले. उतणं नाही आणि मातणं तर दूरच. काही वर्षांपूर्वी त्यांनी कार्यालयासाठी मोठी जागा घेतली. किती मोठी? तर साडेतीन एकर. तीसुद्धा नॉयडा परिसरात. तिथं दिमाखात १ लाख ३० हजार चौरस फुटांत कंपनीची वास्तू उभी आहे. इतका मोठा विस्तार झाला तरी किमतराय यांची भूक भागली नव्हती. अधिक काही मोठं आपण करावं अशी इच्छा पुन्हा त्यांच्या मनी दाटू लागली. कारण आसपास स्पर्धा वाढू लागली होती. नवनव्या कंपन्या आल्या होत्या. खेतान, पोलार, ओरिएंट, क्रॉम्प्टन ग्रीव्हज् अशा अनेक कंपन्या बाजारात येत होत्या. त्यामुळे नवीन, अधिक धाडसी असं काही करावं लागणार होतं. 
किमतराय यांनी भलताच धाडसी निर्णय घेतला. तो म्हणजे सिल्वेनिया ही कंपनी विकत घेण्याचा. खरं तर ही परदेशी कंपनी. युरोपीय. आणि महत्त्वाचं म्हणजे किमतराय यांच्या कंपनीपेक्षा किती तरी मोठी. पण २००८ सालच्या मंदीनं सिल्वेनियाचं कंबरडं मोडलं. अगदीच दिवाळं निघालं कंपनीचं. ती विकायलाच काढावी लागली. तरी २२ कोटी २७ लाख अशी सणसणीत किंमत होती तिची. ही आपण घ्यायचीच असं किमतराय यांच्या मनानं घेतलं. घास चांगलाच मोठा होता.
किमतराय यांनी तो घेतला.
पण दुर्दैव हे की तो घशात अडकला. बाजारपेठ वाढेना आणि वर हा नव्या कंपनीच्या कर्जाचा डोंगर. हे विकतचं लोढणं गळ्याशी येणार की काय अशी परिस्थिती निर्माण झाली. अनिल आणि अमित तर हादरूनच गेले. मार्ग काही दिसेना. कंपनीचा समभाग घसरू लागला. बँकांचा तगादा वाढला. अखेर २००८ च्या डिसेंबर महिन्यात किमतराय म्हणाले, आता बास झालं. त्यांनी दोघांना बोलावून घेतलं. म्हणाले, आपण या कंपनीत फक्त आíथक गुंतवणूक केली, भावनिक नाही. एखाद्या तटस्थ गुंतवणूकदारासारखेच आपण वागतोय.. तुम्हाला तुमची कार्यशैली बदलायला हवी.. मी तुम्हाला एक महिना देतोय.. ही कंपनी आपली आहे.. नीट हाताळता आली नाही तर परत कधी काही तुम्हाला यश मिळणार नाही.. बाजारातून पत उतरेल तुमची..
या खडय़ा बोलीचा परिणाम झाला. दोघा भावांनी आपली कार्यशैली बदलली. परिस्थिती पालटू लागली. सिल्वेनिया विकत घेणं अंगाशी येईल असं वाटत होतं, तसं काही झालं नाही.
त्या दरम्यान किमतराय यांनी भारतीय उद्योगपतीस न साजेसा असा निर्णय घेतला. आपण इतके वाढतोय पण आपली प्रतिमा काही उजळत नाही. तेव्हा अधिक काही करायला हवं.. आपला ब्रॅण्ड तयार व्हायला हवा..
तोपर्यंत किमतराय यांच्या कंपनीचा जाहिरातींवरचा खर्च होता वर्षांला फक्त १५ कोटी रुपये. त्यात त्यांनी एकाच फटक्यात ४०० टक्क्यांनी वाढ केली. तब्बल ६० कोटी रुपये त्यांनी कंपनीच्या प्रतिमा संवर्धनासाठी काढून ठेवले. लोव लिन्टास या जाहिरात कंपनीला कंत्राट दिलं. अगदी फिलिप्स, क्रॉम्प्टन असं आपल्या कंपनीचं नाव हवं, हे त्यांचं स्वप्न होतं. आपणही बहुराष्ट्रीय व्हायचं. दर्जा कमावलेला आहेच. आता नावही मिळवायचं.
ते त्यांनी मिळवलं. कंपनी जगाच्या नकाशावर नेऊन ठेवली. तशीही त्यांना मिरवायची सवय नव्हतीच. नाव झाल्यावर तर ते अगदीच पडद्यामागे गेले.. असं का, असं विचारलं तर म्हणायचे.. माझं उत्पादन सगळीकडे दिसायला हवं.. मी नाही.. माझं उत्पादन माहीत हवं.. मी नाही..
ते त्यांनी खरं करून दाखवलं. गेल्या आठवडय़ात किमतराय यांचं निधन झालं तर बातमीदेखील आली नाही. किमतराय फार कोणाला माहीतही नाहीत. त्यांचं उत्पादन मात्र चांगलंच प्रसिद्ध आहे.
हॅवेल नाव त्याचं!

(साभार-गिरीश कुबेर - girish.kuber@expressindia.com from Loksatta Dt . २९/११/२०१४)

Comments

Popular posts from this blog

आई -तृतीय पुण्यस्मरण

आठवण आईची-पाचवे पुण्यस्मरण

आई-चतुर्थ पुण्यस्मरण