समाजाला सुसंस्कृत करण्याचे समर्थ माध्यम आणि मोहंमद रफी साहेब

सिनेमा
ज्याला लिहिता-वाचता येत नव्हतं अशा निरक्षरांना सुशिक्षित करण्याचं सिनेमा हे एकमेव तत्कालीन साधन ठरलं. अशा या सिनेमाचा जन्म सन १८९५ मध्ये पॅरिसमध्ये झाला. या नवनिर्मित कलाकृतीच्या किमयेनं माणसाची जीवनशैलीच प्रभावित केली. लोकांना या कलाकृतीचं अक्षरश: वेड लागलं. या वेडानं, महाराष्ट्रातील दादासाहेब फाळके नावाचं प्रभावशाली व्यक्तिमत्त्व इतकं झपाटल्या गेलं की, लगेच परदेशात जाऊन त्यांनी या कलेचे तांत्रिक, वैज्ञानिक आणि आर्थिक बारकावे शिकून घेतले आणि आपल्या हरहुन्नरी व्यक्तिमत्त्वानं सन १९१३ मध्ये ‘राजा हरिश्‍चंद्र’ हा संपूर्ण भारतीय बनावटीचा पहिला चित्रपट तयार करून, भारतात चित्रपटसृष्टीची मुहूर्तमेढ रोवली. मात्र, हा मूक चित्रपट होता. पुढे ध्वनीचं तंत्रज्ञान विकसित होत गेलं आणि सन १९३१ मध्ये ‘आलमआरा’ हा पहिला बोलपट भारतात तयार झाला.

सिनेमा हे जनमाध्यम आहे आणि ते समाजप्रबोधनाचेही माध्यम होऊ शकते, हे तत्कालीन जाणत्या मंडळीला कळून चुकले. अशिक्षितांना चित्रपटांनी करमणुकीसोबतच विविध विषयांचे ज्ञान दिले. स्वातंत्र्य, समता, बंधुता व मानवता या मूल्यांची जोपासना करण्यासाठी आणि अशिक्षितांना सुशिक्षित व समाजाला सुसंस्कृत करण्यासाठी सिनेमा हे माध्यम उपयोगी ठरू लागले. जे विषय कवेत घेण्यासाठी शब्दमाध्यम कमी पडते, ते काम चित्रपट माध्यमाने करून दाखविले.

दादासाहेब फाळके यांनी भारतामध्ये आणलेल्या या सिनेतंत्राला पुढे त्यांचे सहकारी बाबूराव पेंटर यांनी कलात्मक रूप दिले आणि नंतर व्ही. शांताराम या ध्येयवेड्या सिनेकलावंताने उत्कृष्ट ध्येय असलेले, एकाहून एक सरस कलात्मक चित्रपट सादर केले. दादासाहेब फाळके, बाबूराव पेंटर आणि नंतर व्ही. शांताराम ही त्रिमूर्ती सिनेमा क्षेत्रातील विलक्षण प्रगतीसाठी दीपस्तंभ ठरली. कालांतराने सिनेमापासून लोकांच्या अपेक्षा वाढत गेल्या, अभिरुची बदलत गेली आणि त्यानुसार सिनेमाही विविध वळणे घेत गेला.

हे खरे की, आज सिनेमामध्ये प्रचंड बदल झाला आहे. तंत्रज्ञानाने कमालीची प्रगती केली आहे. भक्तिगीतांपासून सुरू झालेला सिनेमा आज आयटम सॉंगवर येऊन ठेपला आहे. काळानुसार जनतेच्या अभिरुची बदलत गेल्या. त्याला वैज्ञानिक प्रगतीची व जागतिकीकरणाची जोड मिळाली. अभिनय करणार्‍या नट-नट्या गॉडफादर, गॉडमदर व्हायला लागल्या. सिनेमातील बदनाम ‘मुन्नी’ लोकांना आवडायला लागली. या सार्‍यांचा परिणाम सामाजिक अभिरुचीवर व्हायला लागला. डोळ्यांना भावतं आणि कानांना सुखकर वाटतं म्हणून जनताही तेच पाहायला आणि ऐकायला सोकावली. पुढे पुढे तर ‘मागणी तसा पुरवठा’ या तत्त्वावर चित्रपट तयार होऊ लागले आणि रंजनासोबत समाजप्रबोधनासाठी उपयुक्त असलेली ही कला बदनाम होते की काय, अशी भीती वाटायला लागली. तथापि, सिनेमामध्ये नृत्यापासून संगीतापर्यंत आणि कथेपासून करमणुकीपर्यंत जीवनाच्या सर्वच कलांचं एकत्रीकरण असल्यामुळे लोक सिनेमाकडे आकृष्ट होऊ लागले. सिनेमा हा प्रगतिशील उद्योग म्हणून गणला जाऊ लागला. असंख्य नट-नट्या, कथा-कादंबरीकार, गीत-संगीतकार, गायक-वादक असे विविध कलाकार; इतकेच नव्हे, तर निर्मात्यापासून सामान्य कामगारांपर्यंत सर्वांना रोजगार आणि आर्थिकप्राप्ती होऊ लागली. चित्रपट हा भारतातील अग्रगण्य उद्योगांपैकी एक उद्योग मानला जाऊ लागला. जागतिकीकरण आणि सामाजिक परिवर्तन यामुळे सिनेमामध्ये बदल होणे अपरिहार्यच होते. या उद्योगातील पैशाच्या प्रचंड उलाढालीमुळे साहजिकच काही प्रमाणात गैरव्यवहारही या क्षेत्रात होऊ लागले. तरीही सिनेमा त्याच्या विविधतेमुळे, समाजाचे महत्त्वाचे अंग बनून गेला.

सिनेमाने समाजामध्ये सर्वधर्मसमभावाची वृत्ती निर्माण केली. उदाहरणच द्यायचे झाल्यास ‘बैजूबावरा’ या सिनेमातील ‘मन तडपत हरी दरशनको आज’ हे गाणं आठवा. हे गाणं शकील बदायुनी या मुस्लिम कवीनं लिहिलं, मोहंमद रफी या मुस्लिम गायकाने गायलं आणि नौशाद या मुस्लिम संगीतकारानं संगीतबद्ध केलं! संपूर्ण भारताला ‘हरी’च्या दर्शनाची आस आणि ध्यास लावणारं हे अप्रतिम सर्वांगसुंदर गाणं भारतातील जनता चवीनं ऐकू-गाऊ लागली, सिनेमातून पाहू लागली.

काव्य, नाट्य, संगीत, नृत्य आणि चित्र या पाचही कला सिनेमामध्ये अंतर्भूत असल्यामुळे साहजिकच जनतेमध्ये रसिकता निर्माण झाली. असंच काहीसं चांगलं सिनेमानं दिलं.

सिनेमानं समाजाला सदाबहार देव आनंद दिला, दु:खाचा बादशहा दिलीपकुमार दिला, खर्‍या अर्थानं जीवनावर प्रेम करणारा हिरव्या-निळ्या डोळ्यांचा राज कपूर दिला, मधाळ मधुबाला दिली, घायाळ मीनाकुमारी दिली, मनस्वी नर्गिस दिली, हास्याची कारंजी उडविणारा जॉनी वॉकर दिला, नाव काढताच थरकाप उडावा असा खलनायक प्राण दिला, अँग्री यंगमॅन म्हणून संबोधित करत असलो तरी समंजस असलेला अमिताभ दिला, जगद्विख्यात गायिका लता मंगेशकर तर दिलीच, पण मधाळ गळ्याचा आणि उमद्या स्वभावाचा मोहंमद रफीही दिला. असंख्य देखण्या, कलाप्रवीण नट्या आणि जिगरबाज देखणे नट दिले. किशोर कुमार, मुकेश आणि तलत मेहमूदसारखे उत्कृष्ट गायक दिले. असे म्हणतात की, किशोरचे स्वर मनाला, मुकेशचे स्वर काळजाला, तलतचे स्वर हृदयाला, तर रफीचे स्वर सर्वांगाला स्पर्शून जात. लता मंगेशकर तर या देशाचं कलदार नाणं! जितकं नाणं कलदार, तितकंच तिचं गाणं कसदार. उमद्या स्वभावाच्या चारही मंगेशकर भावंडांनी आपल्या सुरेल आणि सुरेख गायकीनं आम्हा भारतीयांचे कान तृप्त केले.

मेहबूब नावाचे एक तत्कालीन सिने-दिग्दर्शक यांना ‘चोरी चोरी’ सिनेमातलं, शंकर-जयकिशन यांनी संगीतबद्ध केलेलं आणि लता मंगेशकर यांनी गायलेलं ‘रसिक बलमा...’ हे गाणं फार आवडायचं. त्यांना स्वत:च्या एका ऑपरेशनसाठी लंडनला जावं लागलं. दुसरे दिवशी ऑपरेशन होणार, त्या रात्री मेहबूब फार बेचैन झाले. शस्त्रक्रियेदरम्यान वाचू की मरू, असे त्यांना वाटायला लागले. शेवटची इच्छा म्हणून लताने गायलेलं हे गाणं त्यांना ऐकावंसं वाटू लागलं. त्या अवस्थेत न राहवून त्यांनी रात्री १२ वाजता भारतात लताला फोन करून आपली मन:स्थिती सांगितली आणि हे गाणं ऐकवण्याची तिला विनंती केली. लताने परिस्थितीची निकड जाणली आणि काय आश्‍चर्य! रात्री बारा वाजता, भारतातून लंडनला फोनवर हे गाणं लतानी मेहबूबना गाऊन दाखवलं. याला म्हणतात मनाचा मोठेपणा. सिनेमानं अशी दिलदारी शिकवली. जी गोष्ट लताची तीच गोष्ट रफीची. गीत-संगीतकार सुधीर फडके यांचा विवाह तत्कालीन गायिका ललिता देऊळकरांशी झाला. त्या लग्नाची मराठी मंगलाष्टके स्वत: रफींनी गायली आणि आपल्या विशाल मनाची साक्ष दिली. लता जशी गानसम्राज्ञी तसाच मोहंमद रफी हा गानसम्राट होता. म्हणूनच रफींविषयी म्हणतात-

ना फनकार तुझसा तेरे बाद आया

मोहंमद रफी तू बहोत याद आया...

असे म्हणतात, मोहंमद रफी कधी कुणाशीही गाण्याच्या कार्यक्रमाबाबत पैशाचा करार करत नसे. जे द्यायचे असेल ते बंद पाकिटात टाका, ते द्या. रफी निमूटपणे ते स्वीकारीत असत. अशी गायन व संगीत क्षेत्रातली अजरामर नावं आम्हाला सिनेमानंच दिली.

सिनेमानं आम्हाला व्ही. शांताराम दिला. सिनेमा हा जसा विसाव्या शतकातला चमत्कार आहे, तसाच व्ही. शांताराम हे सिनेमाला लाभलेली अद्भुत देण आहे. कमालीची कल्पकता त्यांच्याकडे असल्यामुळे त्यांनी सिनेमा कल्पकतेच्या शिखरावर नेऊन ठेवला. त्यांच्या ‘दो आँखे बारा हात’ या सिनेमातील ‘ए मालिक तेरे बंदे हम’ हे गाणं १९६५ चे भारत-पाक युद्ध होईपर्यंत पाकिस्तानातील शाळांमधून प्रार्थना म्हणून म्हटलं जात असे.

समाजावर सगळ्यात जास्त मोहिनी घातली, ती भारतीय संगीताने. असे म्हणतात की, भारतीय संगीत दिवसातून किमान १५ मिनिटे ऐका; रागदारी कळत नसली, तरी मनाला आनंद होईल; दिवस चांगला जाईल. एकापेक्षा एक सरस गाणी, सुमधुर संगीतासह सिनेसृष्टीनं दिली. आजही जुन्या काळातील गाण्यांसोबत काही नव्या गाण्यांचीही भुरळ पडते. आपलं भाग्य म्हणून लता मंगेशकर नावाचं गारूड आणि मोहंमद रफी नावाचं इंद्रजाल सिनेमाच्या माध्यमातूनच आपल्याला लाभलं. उभयतांच्या गोड गळ्यांनी चित्रपटातून जणू प्रतिसृष्टीच निर्माण केली. अजूनही घोड्यांच्या टापांचा आवाज कानावर पडला की, ओठांवर सहजपणे गाणं येतं- ‘मांगके साथ तुम्हारा, मैने मांग लिया संसार’ ‘नया दौर’ या सिनेमातलं आणि मग लागोपाठ गाणी ओठांवर येतात; ‘ओ दुनियाके रखवाले,’ (बैजू बावरा), ‘मन डोले मेरा तन डोले’ (नागीन), ‘ए जिंदगी उसी की है, जो किसीका हो गया’ (अनारकली), ‘भोली सूरत दिलके खोटे’ (अलबेला), ‘रमय्या वस्तावया’ (श्री ४२०), ‘लेके पहला पहला प्यार’ (सीआयडी), ‘माना जनाबने पुकारा नही’ (पेईंग गेस्ट), ‘ए महलों ए तक्तों ए ताजोंकी दुनिया’ (प्यासा), ‘आजा सनम मधुर चॉंदनीमे हम’ (चोरी चोरी ), ‘सरपर टोपी लाल हातमे रेशमका रूमाल’ (तुमसा नही देखा), ‘भंवरा बडा नादान है’ (साहिब बिबी गुलाम)... या आणि अशा वेड लावणार्‍या गाण्यासाठी एक एक सिनेमा २०-२०, २५-२५ वेळा पाहणारे बहाद्दर आपल्यापैकीच होते. अशिक्षित माणूसही ही गाणी चवीनं म्हणायचा.

अशा, एका एका गाण्यामागे इतिहास होता, आठवणी होत्या, कथा-दंतकथाही होत्या. राज कपूरच्या ‘मेरा जूता है जपानी’ या गाण्याची तर इतकी क्रेझ होती की, एकदा राज कपूर रशियात गेला तेव्हा मास्को विमानतळावर, पासपोर्ट भारतातच विसरून गेल्याचे त्याच्या लक्षात आले. पण, हाच तो ‘मेरा जूता है जपानी’वाला राज कपूर असं तिथल्या अधिकार्‍यांना कळल्यावर त्याला अजीबात अडवलं नाही; उलट सन्मानानं त्याचं स्वागत केलं आणि इच्छित ठिकाणी त्याला पोहोचवूनही दिलं! सिनेसृष्टीचा ‘दादासाहेब फाळके’ हा सर्वश्रेष्ठ पुरस्कार १९८६ मध्ये राज कपूरला प्राप्त झाला, त्या वेळी तो आजारी होता, वयानं थकला होता. पुरस्कार स्वीकारण्यासाठी स्टेजपर्यंत जाऊ शकत नव्हता. पण काय आश्‍चर्य, त्याच्या सन्मानार्थ भारताचे तत्कालीन राष्ट्रपती, स्वत: सर्व नियम बाजूला सारून, स्टेजखाली उतरले, त्याच्यापर्यंत चालत जाऊन बसल्या ठिकाणीच त्याला पुरस्कार प्रदान केला!  

सिनेसृष्टीतील कुणा-कुणाची नावं घ्यावीत! आणि किती-किती प्रसंग सांगावेत! शब्द आणि रकाने कमी पडतील. अशी कितीतरी माणसांची, भावपूर्व गाण्यांची, सुश्राव्य संगीताची, दिलेर व्यक्तिमत्त्वाची आणि अभूतपूर्व प्रसंगांची देण आपल्याला सिनेसृष्टीतूनच मिळाली; मिळत आहे, मिळत राहणार आहे. सिनेमानं जे काही दिलं त्यातलं काय स्वीकारायचं आणि काय नाकारायचं, हे सुजाण नागरिकांनी ठरवावं. सिनेमाला दोष देत बसलो, तर त्यातलं चांगलंही हाताबाहेर निघून जाईल.
(साभार-शरद पिदडी, दैनिक तरुण भारत -०८/०४/२०१२) 

Comments

Popular posts from this blog

आई -तृतीय पुण्यस्मरण

आठवण आईची-पाचवे पुण्यस्मरण

आई-चतुर्थ पुण्यस्मरण