प्रवास छत्रीचा ! - प्रा. शैलजा सांगळे
पावसाळा तसा यंदा वर्षभरच होता ; नाही म्हणायला इतर ऋतू ही होते अधून-मधून आलटून पालटून. पण आता खराखुरा म्हणजे भरतखंडामधील मान्सून रुपी अधिकृत पावसाळा आता अगदी तोंडावर येउन ठेपलाय. पावसाळा आला की आठवते छत्री. कारण छत्रीच आपले पावसापासून रक्षण करते. दर वर्षी येणाऱ्या वळवाच्या पावसाने किंवा मॉन्सूनच्या पहिल्या वर्षावाने चाकरमान्यांची कशी त्रेधातिरपीट उडते, ते आपण बघतोच. हवामान खात्याने पावसाच्या आगमनाची सूचना दिली की आपण गेल्या वर्षी कपाटात ठेवलेली छत्री शोधतो. कारण तिच्याशिवाय आपले घराबाहेर पडणे अवघड असते. थोडक्यात काय, तर छत्री व पावसाळा यांचा घनिष्ठ संबंध आहे. पावसाळा आला की दुकानाबाहेर लटकवलेल्या रंगीबेरंगी छत्र्या आपले लक्ष वेधून घेतात. पण प्राचीन काळी मात्र छत्रीचा वापर पावसापेक्षा उन्हापासून संरक्षण करण्यासाठी होई. अतिप्राचीन काळी तर मानसन्मान, सामर्थ्य, प्रतिष्ठा यांचे प्रतीक म्हणून छत्रीचा वापर होई. भारतीय पुराणात छत्रीबाबत एक दंतकथा आहे. जमदग्नी हा बाण मारण्यात तरबेज होता. दिवसभर नेमबाजी करणे हा त्याचा सततचा उद्योग. त्यात त्याला त्याची पत्नी रेणुका हिची मोलाची साथ मि...