प्रवास छत्रीचा ! - प्रा. शैलजा सांगळे

पावसाळा तसा यंदा वर्षभरच होता ; नाही म्हणायला इतर ऋतू ही होते अधून-मधून आलटून पालटून. पण आता खराखुरा म्हणजे भरतखंडामधील मान्सून रुपी अधिकृत पावसाळा  आता अगदी तोंडावर येउन ठेपलाय. पावसाळा आला की आठवते छत्री. कारण छत्रीच आपले पावसापासून रक्षण करते. दर वर्षी येणाऱ्या वळवाच्या पावसाने किंवा मॉन्सूनच्या पहिल्या वर्षावाने चाकरमान्यांची कशी त्रेधातिरपीट उडते, ते आपण बघतोच. हवामान खात्याने पावसाच्या आगमनाची सूचना दिली की आपण गेल्या वर्षी कपाटात ठेवलेली छत्री शोधतो. कारण तिच्याशिवाय आपले घराबाहेर पडणे अवघड असते. थोडक्‍यात काय, तर छत्री व पावसाळा यांचा घनिष्ठ संबंध आहे. पावसाळा आला की दुकानाबाहेर लटकवलेल्या रंगीबेरंगी छत्र्या आपले लक्ष वेधून घेतात. पण प्राचीन काळी मात्र छत्रीचा वापर पावसापेक्षा उन्हापासून संरक्षण करण्यासाठी होई. अतिप्राचीन काळी तर मानसन्मान, सामर्थ्य, प्रतिष्ठा यांचे प्रतीक म्हणून छत्रीचा वापर होई. 
भारतीय पुराणात छत्रीबाबत एक दंतकथा आहे. जमदग्नी हा बाण मारण्यात तरबेज होता. दिवसभर नेमबाजी करणे हा त्याचा सततचा उद्योग. त्यात त्याला त्याची पत्नी रेणुका हिची मोलाची साथ मिळे. प्रत्येक मारलेला बाण ती त्याला परत आणून देत असे. एके दिवशी जमदग्नी दिवसभर बाण मारत राहिला व त्याची पत्नी आणून देत राहिली. दिवसभर उन्हात श्रम केल्याने तिची तब्येत बिघडली. आता मात्र जमदग्नीची पंचाईत झाली. त्याचे बाण परत कोण आणून देणार? जमदग्नी अस्वस्थ झाला, संतापला व ज्या सूर्याच्या किरणांच्या उष्णतेमुळे त्याची पत्नी आजारी पडली, त्या सूर्यालाच रागाने त्याने बाण मारला. सूर्याने जमदग्नीची माफी मागितली व प्रखर सूर्यकिरणांपासून संरक्षण करण्यासाठी एक छत्री दिली. दंतकथा काहीही असो, परंतु अतिप्राचीन काळी छत्रीचा वापर उन्हापासून संरक्षणासाठी करत. राजा जेव्हा रथातून प्रवास करे तेव्हा त्याचे चाकर सतत त्याच्या डोक्‍यावर छत्री धरत. पर्शियातील एका शिल्पात घोड्यावर बसलेल्या राजाच्या डोक्‍यावर छत्री धरलेली दिसते. इजिप्तमध्ये गुलाम मालकाच्या डोक्‍यावर सावली यावी म्हणून एक कापड धरत. राजघराण्यातील स्त्रिया उन्हापासून संरक्षण व्हावे म्हणून छत्री वापरत व त्यांच्या दासी/ सेविका ती छत्री राणीच्या डोक्‍यावर धरत. 
भारतात तर अगदी पूर्वीपासून राजे लोकांची छत्री प्रचलित होती. सामर्थ्य व सार्वभौमत्व याचे ती प्रतीक असे. राजांना छत्री किताब असे. शिवाजी महाराजांनासुद्धा राज्याभिषेकानंतर छत्रधारी हा किताब बहाल करण्यात आला होता. राजांना असा किताब बहाल करणे भूषणावह वाटे. मोगलांच्या सिंहासनावरसुद्धा दोन छत्र्या असत. सयाममध्ये तर एकावर एक तीन आच्छादने असलेल्या छत्र्या बनवत व ती राजाची छत्री असे. चीनमध्ये शिकारीला निघालेल्या एका मिरवणुकीत चोवीस छत्र्या असल्याचा उल्लेख आढळतो. आफ्रिकेतील स्थानिक नेते इतरांपेक्षा आपण वेगळे दिसावे म्हणून छत्र्या वापरत. निरनिराळे अधिकार दर्शविणाऱ्या निरनिराळ्या आकाराच्या छत्र्या पूर्वी राजे त्यांच्या सरदारांना बहाल करत. जैन तीर्थंकरांच्या, तसेच बुद्धाच्या स्तूपावरही छत्री असते. युरोपातील पोपजवळ पूर्वी दोन छत्र्या असत. एक उघडी छत्री- जी ऐहिक शक्तीचे द्योतक, तर दुसरी बंद छत्री- ती दैवी शक्तीचे द्योतक. जुन्या धर्मग्रंथात छत्रीधारी व्यक्ती वा देवतांच्या मूर्ती आढळतात. आपल्या देवदेवतांच्या पालख्यांवरसुद्धा छत्री असतेच. 
चीनमध्ये पूर्वी छत्री संपत्ती व सन्मानाचे प्रतीक मानत. हॅन राजवटीत तिसऱ्या दर्जाच्या वरचे अधिकारी हिरवी छत्री वापरत, तर महाराजा मात्र पिवळी किंवा लाल छत्री वापरे. राजा बाहेर निघाल्यावर छत्री डोक्‍यावर असायचीच. राजाचे छत्र सर्व प्रजेवर आहे, असा त्याचा अर्थ मानत. चीनमध्ये 3500 वर्षांपासून छत्र्या बनवतात. चीन हे छत्रीचे माहेरघर आहे. चीनमध्ये छत्रीचा वापर समारंभात व धार्मिक विधीतही केला जातो. लग्नसमारंभ, ऑपेरा, नृत्याचे कार्यक्रम इत्यादी ठिकाणी छत्रीचा वापर होई. हक्का जमातीचे लोक लग्नात छत्री हुंडा म्हणून देतात; कारण छत्री ऊन, वारा, पाऊस यापासूनच नाही, तर वाईट शक्तींपासूनही संरक्षण देते, अशी त्यांची समजूत आहे. चीनमध्ये अजूनही छत्रीचे असे सामाजिक महत्त्व आहे. काही भागात तर मुला-मुलींचा एकमेकांना पाहण्याचा कार्यक्रम झाल्यावर मुलगा मुलीच्या घरी जाताना लाल तेलकट कागदाची (ऑइल पेपर) बनवलेली छत्री नेतो, तर मुलीच्या घरच्यांना जर मुलाचे स्थळ पसंत असेल तर छत्रीच्या कडेला रंगीबेरंगी कापडाची पट्टी लावून त्या पट्टीला एक इंच लांबीचे रंगीबेरंगी रेशमी धागे लावून, त्या धाग्याच्या टोकाला कापडाचे बॉल लावतात. 
    चीनमधील हक्का जमातीचे लोक डोंगरात राहतात. ते मृत्यूनंतर पार्थिव डोंगरउतारावरच पुरतात; पण लगेच तेथे थडगे किंवा कबर बांधत नाहीत. चार-पाच वर्षांनंतर पुरलेल्या जागी उकरून हाडे गोळा करतात व ती हाडे छत्रीखाली ठेवतात, स्वच्छ करून मग परत पुरतात व त्यावर थडगे/कबर बांधतात. 
चीन हे छत्र्यांचे जन्मस्थान. चीनमध्ये पावसापासून संरक्षण करण्यासाठी छत्रीचा जन्म कसा झाला, याबाबतची एक सत्यकथा आहे. लूबान नावाचा एक शेतकरी होता. तो दिवसभर शेतात खूप राबत असे. त्याची बायको त्याला रोज जेवण बनवून देई; पण ते पावसात भिजून खराब होई. त्यामुळे त्याच्या बायकोने कमळाची पाने वापरून एक छत्री बनवली व तिचा वापर तो शेतकरी करू लागला. त्यानंतर लोकांनी पाम वृक्षाच्या पानांच्या छत्र्या बनवल्या. त्यानंतर चीनमध्ये घरोघरी छत्र्या बनू लागल्या. बांबूच्या फ्रेम्स बनवून त्यावर हाताने रंगवलेले व पाना-फुलांचे, पक्ष्यांचे डिझाइन असलेले कापड बसवत व त्या कापडावर तेलाचा थर देत. त्यामुळे त्या छत्र्या पावसात वापरता येत. त्या खूप सुंदर दिसत व टिकतही. पण त्या जाड असत व पावसाने कापड भिजल्यावर अधिकच जड होत. त्यामुळे आता नायलॉन किंवा प्लॅस्टिकचा वापर करून छत्र्या बनवल्या जातात. जपानमध्येसुद्धा पूर्वी बांबूचे दांडे व तुती किंवा मित्सुमाता किंवा गम्पी यापैकी एका झाडाच्या तंतूपासून कापड बनवून छत्र्या बनवत. 

चीनमधून हळूहळू छत्रीचा प्रसार युरोप व जपानमध्ये झाला. युरोपात चर्चमध्ये छत्रीचा उपयोग धार्मिक विधी करताना करत. पोप ही छत्री एखाद्याचा सन्मान करायचा असेल त्याला देत. रोममध्ये बॅसिलिकात छत्री लावत. पूर्वी इजिप्तमध्ये एका दांड्यावर रंगीबेरंगी पिसे लावून बनवलेल्या छत्र्या वापरत. तेथील राण्या उपयुक्ततेपेक्षा सजण्यासाठी किंवा फॅशन म्हणून छत्री वापरत. आज जशी प्रत्येक स्त्री पर्स घेऊन बाहेर पडते तसे स्त्रिया वेगवेगळ्या छत्र्या घेऊन बाहेर पडत. युरोपात पावसापासून संरक्षण करण्यासाठी छत्रीचा वापर प्रथम फ्रान्समध्ये सतराव्या शतकात करण्यात आला. ऍन राणीच्या काळात लंडनमध्ये स्त्रिया पावसात छत्रीचा वापर करत. जोन्स हॅन्वे हे लंडन शहरात पावसात छत्री घेऊन फिरणारे पहिले गृहस्थ होत. तत्पूर्वी पुरुषांनी छत्री घेऊन बाहेर जाणे बायकीपणाचे लक्षण मानले जाई. जगातील पहिले छत्रीचे दुकान "जेम्स स्मिथ अँड सन्स' 1830 मध्ये लंडनमध्ये सुरू झाले व आजही एवढ्या वर्षांनंतरही ते केवळ लंडनमधीलच नव्हे, तर संपूर्ण युरोपातील प्रसिद्ध दुकान आहे व त्यांचा व्यवसाय उत्तमरीत्या चालू आहे. 
ब्रिटिश लोक भारतात येईपर्यंत भारतीयांना छत्री माहीत नव्हती. भारतात शेती हाच प्रमुख व्यवसाय होता. त्यामुळे लोक पावसात शेतीच्या कामासाठी बाहेर पडत तेव्हा "इरले' वापरत. कोकणात बांबूचे सांगाडे बनवून त्यावर पळस किंवा रुंद पाने लावून जे आच्छादन बनवतात त्याला "इरले' म्हणतात. आजही शेतीच्या कामाला लोक इरलेच वापरतात. त्यामुळे कामासाठी हात मोकळे राहतात. आता प्लॅस्टिक वापरून बनवलेले "इरले'सुद्धा वापरतात. "इब्राहीम कुरीम अँड सन्स' या छत्र्या बनवणाऱ्या ब्रिटिश कंपनीने भारतीयांना छत्रीची ओळख करून दिली. त्यानंतर इंग्रजांच्या कारकिर्दीत भारतात छत्र्या तयार करण्याचा कारखाना सुरू झाला. त्या काळी छत्र्यांचे कापड व इतर माल आयात करत, फक्त जोडणी भारतात होई. इंग्लंडमधून छान छान छत्र्या भारतात येत; पण त्या महाग असल्याने फक्त ब्रिटिश लोकांनाच त्या वापरणे परवडत असे. 
छत्री नाव कशावरून पडले याबाबत बरीच मते आहेत. छत्रीला इंग्रजीत Umbrella म्हणतात. लॅटिन शब्द Umbella यावरून हे नाव पडले असावे. उम्बेल (Umbel) हे एक सपाट व गोलाकार असलेले मोठे फूल असते; त्यामुळे Umbrella नाव पडले, असा एक मतप्रवाह आहे. काहींच्या मते Umbra या शब्दापासून हे नाव पडले. Umbra म्हणजे सावली. छत्री उन्हापासून संरक्षण देणारी व सावली देणारी म्हणून Umbrella. युरोपमध्ये पूर्वी छत्रीला "Parasol` म्हणत. Para म्हणजे सावली व "Sol` म्हणजे सूर्य. पूर्वी ब्रिटनमध्ये छत्रीला "गॅम्प' म्हणत. कारण चार्ल्स डिकिन्सनच्या एका चित्रपटातील हिरॉईन मिसेस गॅम्प या चित्रपटात सतत छत्री घेऊन फिरत असे. 
छत्र्यांचे रंग, डिझाइन, लागणारे साहित्य यात कालामानानुसार खूप बदल घडत गेले. पूर्वी छत्र्या काळ्या रंगाच्याच असत; पण जसजसे छत्री वापरणाऱ्या महिलांचे प्रमाण वाढू लागले तसतसे रंगीबेरंगी, विविध डिझाइनचे प्रमाण वाढले. महिला नोकरीनिमित्ताने मोठ्या संख्येने घराबाहेर पडू लागल्या व रंगसंगती, डिझाइन इत्यादींबाबत त्या खूपच चिकित्सक असल्याने मागणीनुसार छत्र्या बनू लागल्या. पर्सइतकेच छत्रीलाही महत्त्व प्राप्त झाले. परदेशात तर तऱ्हतऱ्हेच्या छत्र्यांचे उत्पादन होते. हार्टच्या आकारातल्या रोमॅंटिक छत्र्या, त्रिकोणी आकारातील खांद्यावर अडकवायच्या छत्र्या, बंद केल्यावर गुलाबाच्या फुलाप्रमाणे दिसणाऱ्या रोझ छत्र्या, केळीच्या पानाचे डिझाइन असलेल्या बनाना लीफ छत्र्या, पूर्ण उमललेल्या फुलाच्या आकारातल्या फ्लॉवर छत्र्या, रायफलसारखे हॅंडल असलेल्या रायफल छत्र्या, फुलपाखराच्या आकारातल्या बटरफ्लाय छत्र्या इत्यादी. भारतातसुद्धा आता छत्र्यांवर केवळ पाने, फुले, एवढेच नव्हे, तर पक्षी, भौमितिक डिझाइन्स, एखादा देखावा बघायला मिळतो. गुजरात राज्यात तयार होणाऱ्या छत्र्यांवर तर छोटे छोटे आरसे, खडे, मोती बसवलेले असतात. 
छत्र्या वापरणाऱ्या महिलांचे प्रमाण वाढल्याने वजन कमी करण्यासाठी भरीव दांड्याऐवजी पोकळ व हलक्‍या धातूचे दांडे बनवायला सुरवात झाली. सॅम्युएल फॉक्‍स याला एका खाडीवरील पोकळ नळ्यांचा पूल पाहून छत्रीसाठी हलका पण टिकाऊ दांडा बनवण्याची कल्पना सुचली. त्यानंतर ऍल्युमिनियमचा वापर करून पोकळ दांडे बनवून छत्र्या बनवायला सुरवात झाली. पुढे शहरांचा विस्तार झाल्याने उपनगरांत राहणाऱ्या महिलांना लांब दांड्याच्या छत्र्या गर्दीत सांभाळणे त्रासदायक होऊ लागले. त्यामुळे प्रवासात सहजपणे सांभाळता येणारी व पर्समध्ये मावणारी फोल्डिंग छत्रीची कल्पना वापरात आली. 
जपानमध्ये पावसाळ्यात छत्री वापरताना काही शिष्टाचार पाळले जातात. मोठ्या शहरात रस्त्यात गर्दीत चालताना छत्र्या एकमेकांना लागतात, एकमेकांवर आपटतात व अडकतात, म्हणून जपानमध्ये गर्दीच्या शहरात छत्री घेऊन चालताना विशिष्ट लयीत छत्री वर व खाली घेतली जाते. त्यामुळे बाजूच्याची छत्री आपल्या छत्रीवर आपटत नाही. तसेच रिक्षा किंवा टॅक्‍सीतून एखादी व्यक्ती उतरत असताना रस्त्यावरील व्यक्तीने ती व्यक्ती स्वतःची छत्री उघडेपर्यंत आपली छत्री त्या व्यक्तीच्या डोक्‍यावर धरायची, असा शिष्टाचार आहे. मला वाटते, भारतासारखी गर्दीची अनेक शहरे असणाऱ्या व चार महिने पावसाळा असणाऱ्या देशांतील लोकांनाही या शिष्टाचाराची सवय होण्याची गरज आहे. 
_____________________________________________________________________________

(Reference:http://www.saptahiksakal.com/SaptahikSakal/20140805/5239146584007964974.htm)

Comments

Popular posts from this blog

आई -तृतीय पुण्यस्मरण

आठवण आईची-पाचवे पुण्यस्मरण

आई-चतुर्थ पुण्यस्मरण