लक्ष दीप उजळले! -मल्हार अरणकल्ले
संध्याकाळ भरून आली आहे. क्षणाक्षणाला गडदपणा दाट होतो आहे. पणत्यांचे, आकाशदीपांचे तेजाकार त्यावर उमटत आहेत. अंगणांत, खिडक्यांत, सज्ज्यांत, उद्यानांत तेजोमय प्रकाशज्योतींचं साम्राज्य लखलखत आहे. रांगोळ्यांची चिन्हं या तेजाक्षरांचे अर्थ खुलवीत-फुलवीत आहेत. एका अपूर्व तेजानं दीपोत्सवाचा आनंद ओसंडून गेला आहे. भरलेल्या आनंदाचा प्रत्येक कण म्हणजे त्याचं सूक्ष्मरूप असतो. इवल्या पणतीतल्या वातीच्या शीर्षावर नाचणाऱ्या ज्योतीतही ब्रह्मतेजाचं रूप सामावलेलं असतं. आपण सगळेच भव्यतेचं कौतुक करतो; पण ही भव्यता ज्या छोट्या छोट्या प्रयत्नांतून साकारलेली असते, त्या प्रयत्नांच्या वाट्याला कृतज्ञतेचा शब्द क्वचितच येतो. पणतीचा आकार बोटं जुळवून होणाऱ्या खोलगट तळव्यासारखा असतो. या तळव्याची मध्यमा इतर बोटांपेक्षा काहीशी मोठी, सशक्त असते. ही मध्यमा तळव्यातल्या सकारात्मकतेचं ज्योतिरूप असते. पणतीतली ज्योतही कडेच्या एका बिंदूच्या आधारानं उंचावलेली असते. ज्योतीचा पाया टोकदार असतो आणि तिच्या शीर्षबिंदूवरही तेजाचंच टोक असतं. मध्यभागी ज्योत विस्तारलेली असते. अंधकाराचे अनेक आळोखेपिळोखे ती गिळून टाकते. प...