मराठीचे लक्ष बहुभाषांकडे हवे... - डॉ. केशव देशमुख


गेल्या तीन दशकांतील मराठी म्हणून लिहिले गेलेले सर्जनशील साहित्य व त्यापूर्वीची समृद्ध साहित्य परंपरा केवळ श्रेष्ठच नाही, तर ती जागतिक म्हणून तसूभरही कमी नाही. फक्त अनुवादातून बहुभाषांकडे जाण्याचा प्रवास धीमा आहे. तेव्हा बहुभाषा अवगत करण्यासाठी सकारात्मक होण्याची गरज आहे. 

मराठीला ज्ञानपीठ सन्मान कमी का मिळाले आणि उशिरा का मिळाले? अशी एक रास्त मीमांसा केली जाते. याचे उत्तर मराठीचे "मराठीपुरते‘ शहाणे असेही आहे. मराठीत विलक्षण क्षमता असूनही आणि महानुभाव, वारकरी संस्कृतीचे मराठीला भव्य अधिष्ठान असूनही अनुवादांसारख्या क्षेत्रातून ही मराठी जागतिक झाली नाही, हे एक कारण कटू असले तरी खरे आहे. दाखला द्यायचा झाला तरी बाबूराव बागूल, रा. चिं. ढेरे, अशोक केळकर किंवा नामदेव ढसाळ, यशवंतराव चव्हाण, गो. नी. दांडेकर किंवा विजय तेंडूलकर, वि. द. घाटे, व्यंकटेश माडगूळकर असे वीसचाही आकडा ओलांडून सांगता येतील एवढे श्रेष्ठ लेखक मराठीत आहेत. पण "ज्ञानपीठा‘पर्यंत पोचलेले नाहीत. इंग्रजीचे ज्ञान, अनुवादाचे काम आणि या आवश्‍यक बाबीमुळे मराठीची सशक्त साहित्यसंपदा असूनही, सर्वस्वी राष्ट्रीय असलेले मराठीचे लेखक राष्ट्रसन्मानी "ज्ञानपीठी‘य ठरलेले नाहीत. आता मराठीची नजर बहुभाषा अवगत करण्याकडे असावी. कला ज्ञानशाखा आंतरज्ञान शाखाशी आग्रहाने जोडायला हवी. मराठीकडे येणारे तरुण संशोधक व विद्यार्थी यांना अनुवादाचे जाणीवबद्ध धडे द्यायला हवेत. जी मराठीत समृद्ध साहित्यकृतींची शिदोरी आहे, ती जगाच्या वाचनसंस्कृतीला कशी महानदीसारखी मिळेल, यावर लक्ष केंद्रित झाले पाहिजे. मातृभाषा जपणे हे तर अगत्याचेच आहे. शिवाय या मातृभाषेतून सर्जनशील राहणे हेही उन्नतीचे, भूषणाचे आहेच. पण मराठीच्या तरुणांना इंग्रजीसह इतरही दोनपेक्षा अधिक भाषा अप्रतिम अशा पद्धतीने अवगत असाव्यात. आपली विद्यापीठे या घटकांचा अधिकांशाने विचार करतील, अशी भावना आपण ठेवूया. याकरिता विद्यापीठांनी भाषेसारखा, विशेष मराठीसारखा विभाग "नॅशनल बुक ट्रस्ट‘ अथवा साहित्य अकादमी यांच्याशी ज्ञान ऋणानुबंधाने जोडायला हरकत नाही. महाराष्ट्र सरकारच्या मराठी विभागाचे मोठे सहकार्य मिळाले, तर मराठीच्या उन्नतीच्या वाट उजळावयाला फारसा उशीर लागणार नाही. अखिल भारतीय साहित्य महामंडळ, महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळ किंवा "पॉप्युलर, "मौज‘, "मेहता‘, "लोकवाङ्‌मय‘, "साकेत‘, "मनोविकास‘, "पद्मगंधा‘ अशा वेचक प्रकाशन संस्थांचे सहकार्य मराठीला बहुभाषाकडे जाण्यासाठी व अनुवाद-प्रकाशन कार्यासाठी घेता येणे अनाठायी ठरणार नाही.
मराठीचे इतके समृद्ध साहित्य मात्र मराठीपुरते ठेवण्याचा हा जमाना नाही. इंग्रजीचे रोज धडाधड लेखन मराठीत येते. हाच प्रवास उलटा म्हणजे मराठीचे साहित्य इंग्रजीत नेण्यासाठी होत नाही, ही खंत मराठीवाल्यांचे ज्यांचे इंग्रजी वाङ्‌मयदृष्ट्या उत्तम आहे, अशा सर्व अभ्यासकांनी मनावर घेतले पाहिजे.
आपल्याकडे मराठी भाषिक नसलेले संशोधक, लेखक, अनुवादक इंग्रजी चांगले असल्या कारणाने इंग्रजीत काम करतात आणि अव्वल अशी राष्ट्रीय ख्याती संपादन करतात आणि अव्वल असे मराठी लेखक मराठीला ऋणानुबंधाची गाठ मारून बसल्यामुळे, राष्ट्रीय "पोटेन्शियल‘ असूनही हे लेखक अनुवाद अडसरामुळे जागतिक झाले नाही, ही गोष्ट आता नीटपणे समजून घेतलीच पाहिजे. "साहित्य अकादमी‘ संस्था किंवा मराठीच्या काही बिनीच्या प्रकाशनसंस्था अनुवादात लक्षणीय काम करतात. अशा कमी पण समाधानाच्या जागा आहेत. पण बदल व्हावेत. विद्यापीठांचे विद्यार्थी एक मराठी घेऊन अधिकाधिक भाषांच्या शोधांत व संशोधनात रममाण व्हावेत. विद्यार्थ्यांची श्रम करायची तयारी आहे. फक्त विद्यापीठांनी हिरवा कंदील दाखवला पाहिजे. मग मार्ग निघतील आणि मराठीची साहित्यसंपदा इंग्रजीत प्रायः जगात जायला साह्य नक्की होईल. भले मग या गोष्टीकडे व्यवसाय म्हणूनही पाहायला हरकत नसावी. पण मराठी ही राष्ट्रीय बिरुद घेऊन उभी राहणारी भाषा झाली पाहिजे. आमच्या मराठीच्या उत्तमोत्तम साहित्यकृती विश्‍व ग्रंथागारात नेऊन आपणच बसवायची आवश्‍यकता आहे. 


"माझी मराठी‘, "माझा प्रांत‘, "माझी बोली‘, "माझे मराठी विश्‍व‘ हे तर आधी जपायला कोणाचीच ना नाही. पण गेल्या तीन दशकांतील मराठी म्हणून लिहिले जाणारे सर्व वाङ्‌मय प्रकारातील सर्जनशील साहित्य आणि त्यापूर्वीची समृद्ध साहित्य परंपरा केवळ श्रेष्ठ नाही, तर ती जागतिक म्हणून तसूभरही कुठेच कमी नाही. फक्त बहुभाषांकडे अनुवादातून जाण्याचा आपला प्रवास मात्र धीमा आहे. हे धीमेपण आपण झटकून टाकायला हवे. अंदमानात झालेल्या चौथ्या विश्‍व मराठी साहित्य संमेलनात (2015) प्रा. शेषराव मोरे यांनी त्यांच्या अध्यक्षीय भाषणात मराठीचे राष्ट्रीय न होणे आणि त्यामागील कारणांची मीमांसा केली असून, ती अर्थातच चिंतनीय, अनुकरणीय अशीच आहे. आपले अहर्निश ज्ञानोपासक असणे त्यांनी या संदर्भात अधोरेखित केले, ते अत्यंत रास्त आहे. ""मराठी भाषेसाठी "ज्ञानपीठ‘ मिळण्यास उशीर का झाला व त्यांची संख्या कमी का आहे याचे एक महत्त्वाचे कारण मराठी लेखकांची इंग्रजी कच्ची आहे हे होय,‘‘ हे प्रा. मोरे यांचे मत जसे खरे आहे, तसेच या मताबद्दल मराठी प्रियतमांनी विचार करून कृती करावी असेपण आहे. मराठी म्हणून आपले पाय मातीचे ठेवणे हे जसे खरे, तद्वतच इंग्रजीसह इतर विविध भाषांमध्ये आपण ज्ञानसंपन्न होणे मुळीच अवघड नाही. भालचंद्र नेमाडे हे या संदर्भातील लक्षणीय उदाहरण समोर आहे. बहुभाषा अवगत करण्याच्या अनेक दिशा मराठी आता स्वीकारेल. त्यासाठी आपण सकारात्मक होऊया, त्यानंतर विश्‍वाच्या वाटा मराठीला उजळावयाला वेळ लागणार नाही.
---------------------------
संदर्भ : १) मूळ लेख :मराठीचे लक्ष बहुभाषांकडे हवे... - डॉ. केशव देशमुख
 http://online3.esakal.com/NewsDetails.aspx?...dated शनिवार, 22 ऑक्टोबर 2016 - 12:30 AM IST

Comments

Popular posts from this blog

आठवण आईची-पाचवे पुण्यस्मरण

आई -तृतीय पुण्यस्मरण

आई-चतुर्थ पुण्यस्मरण