रिंग आणि सेल फोन

३९बेल लॅब्जमधल्या एका शोधनिबंधामध्ये १९४७ साली डग्लस रिंग नावाच्या माणसानं सेलफोनची संकल्पना प्रथमच मांडली. आता आपण मोबाईल फोन आणि सेल फोन हे शब्द एकाच समान अर्थानं वापरत असलो तरी त्या काळात मात्र या दोन तंत्रज्ञानांमध्ये फरक होता. मोबाईल फोन वापरून एकीकडून दुसरीकडे जाताना लोक बोलू शकायचे. पण त्यासाठी आता वापरतात तशी सेलची संकल्पना तेव्हा अस्तित्वात नव्हती. म्हणजे आता जसे एखाद्या देशाचे राज्यांमध्ये, राज्याचे गावांमध्ये आणि गावाचे छोटय़ा विभागांमध्ये तुकडे करून प्रत्येक ठिकाणी मोबाईल फोनची सुविधा पुरविणाऱ्या कंपन्या संदेशवहनासाठी मनोरे उभे करतात तसं तंत्रज्ञान रिंग या माणसानं प्रथमच सुचवलं होतं. यासाठी एका गावाच्या होणाऱ्या प्रत्येक विभागाला एक सेल असं म्हटलं गेलं आणि या सगळ्या सेल्सच्या एकत्रीकरणातून बनलेल्या जाळ्याला सेल्युलर नेटवर्क, असं नाव दिलं गेलं. ही या तंत्रज्ञानामागची ढोबळ कल्पना होती. प्रत्यक्षात ते तंत्रज्ञान जरा किचकट होतं. उदाहरणार्थ- समजा पुण्यात एखाद्या मोबाईल कंपनीला आपलं जाळं उभं करायचं असेल तर ती पुण्याचे प्रत्येक (समजा ७०) विभाग पाडेल. प्रत्येक विभाग म्हणजे एक सेल, असा हा हिशोब असेल. तसंच जसं एखाद्या रस्त्यावर सात लेन्स असू शकतील त्या धर्तीवर मोबाईल फोन्स वापरणाऱ्या लोकांच्या बोलण्याच्या सिग्नल्सचं वहन करण्यासाठी या कंपनीकडे सात चॅनेल्स आहेत असं समजूया. म्हणजेच एकावेळी सात लोकांची संभाषणं वाहून न्यायची क्षमता या मोबाईल फोनची सुविधा पुरविणाऱ्या कंपनीकडे आहे. पण जर ही सातच चॅनेल्स उपलब्ध असतील तर सगळ्या पुणे शहरात एकाच वेळी ही सातच्या सात चॅनेल्स कशी वापरता येतील? कारण प्रत्येक चॅनेल एका ठराविक फ्रीक्वेन्सीवर चालतं. मग तीच फ्रीक्वेन्सी एकाच वेळी अख्ख्या पुणे शहरात एकदाच वापरता येईल ना! उदाहरणार्थ- जेव्हा आपण पुणे आकाशवाणीचे कार्यक्रम लावतो तेव्हा त्याच फ्रीक्वेन्सीवर दुसरं रेडिओ स्टेशन आपले कार्यक्रम प्रसारित करत नसतं. नाही तर त्याचं आणि पुणे आकाशवाणीचं प्रक्षेपण मिसळून भलताच आवाज ऐकायला येईल. (त्याला काहीजण आजच्या जमान्यात संगीत म्हणतील हा भाग वेगळा!). याच धर्तीवर समजा १०० या फ्रीक्वेन्सीचा वापर करून एका मोबाईल कंपनीचा औंधमधला ग्राहक बोलत असेल तर कल्याणीनगरमधल्या त्याच कंपनीच्या दुसऱ्या ग्राहकाला तीच म्हणजे १०० ही फ्रीक्वेन्सी वापरून मोबाईलवरून कॉल करता किंवा स्वीकारता कसा येईल? कारण पुन्हा त्या औंधवाल्या आणि कल्याणीनगरवाल्या अशा दोन माणसांचं बोलणं एकमेकांमध्ये मिसळेल की! म्हणजेच एका वेळी अख्ख्या पुण्यात या मोबाईलची सुविधा पुरविणाऱ्या कंपनीला फक्त सात ग्राहकांनाच सेवा देता येईल! यावर उपाय असतो तो फ्रीक्वेन्सीच्या पुनर्वापराचा. म्हणजे औंधमध्ये आणि कल्याणीनगरमध्ये एकाच वेळी दोन वेगवेगळी माणसे त्याच (उदाहरणार्थ १००) फ्रीक्वेन्सीचा वापर करून आपलं संभाषण करू शकतात. यामागचं रहस्य म्हणजे एकमेकांपासून लांब असलेल्या विभागांमधल्या किंवा सेल्समधल्या फ्रीक्वेन्सीज सारख्याच असू शकतात. मोबाईल फोन्सच्या संभाषणांच्या सिग्नल्सची रेंज छोटी असल्यामुळे एकमेकांपासून लांब असलेल्या आणि सारख्या फ्रीक्वेन्सीज वापरणाऱ्या माणसांना काही अडचण येत नाही. पण अगदी लागून असलेल्या किंवा शेजारच्या सेल्समधल्या दोन माणसांनी मात्र तीच फ्रीक्वेनसी वापरून चालत नाही. उदाहरणार्थ- औंध आणि शिवाजीनगर इथल्या दोन माणसांनी १०० हीच फ्रीक्वेन्सी वापरून आपापलं स्वतंत्र संभाषण करायचं ठरवलं तर मात्र त्यांचं बोलणं एकमेकांमध्ये मिसळून जाईल. म्हणजेच एकमेकांपासून लांब असलेल्या सेल्समध्ये त्याच फ्रीक्वेन्सीजचा आणि म्हणूनच चॅनेल्सचा वापर करण्यात कुठलीच तांत्रिक अडचण नसते आणि म्हणूनच मोबाईल कंपन्या एकाच वेळी त्याच फ्रीक्वेन्सीजचा पुनर्वापर करून खूप जास्त प्रमाणात ग्राहकांना सेवा पुरवू शकतात. या सगळ्या तंत्रज्ञानाची पाळंमुळं रिंग यानं रोवली. रिंग याच्या संकल्पनांवर सुरुवातीला त्याच्या सहकाऱ्यांनी फारशी अनुकूल प्रतिक्रिया दिली नाही. पण त्यामुळे निराश न होता रिंग यानं आपल्या संशोधनाचा धडाका पुढे चालू ठेवून १९३४ ते १९६० या काळात यासंबंधीची डझनभर पेटंट्स मिळाली. तरीही इतिहासात त्यांच फारसं नाव घेतलं जात नाही. २००० साली वयाच्या ९३ व्या वर्षी रिंग यांचं निधन झालं. १९५० आणि १९६० च्या दशकामध्ये सेलफोनच्या तंत्रज्ञानाविषयी फारसं संशोधन झालं नाही. याच सुमाराला चालू असलेल्या ट्रान्झिस्टर, आयसी इत्यादींच्या संशोधनानंतर मात्र सेलफोनच्या तंत्रज्ञानाच्या प्रगतीला जोर धरला. या दरम्यान एमटीएस आणि आयएमटीएसही मोबाईल फोनशी संबंधित तंत्रज्ञानानं पुढे चालली होती. पण आधी म्हटल्याप्रमाणे या सुविधा मोबाईलफोनच्या असल्या तरी सेलफोनच्या नव्हत्या. सेलफोनची पहिली व्यावसायिक तत्त्वावर चालणारी यंत्रणा सुरू व्हायला १९८३ साल उजाडावं लागणार होतं. यात तंत्रज्ञानाच्या अडचणींना राजकारणाचीही जोड होती. कारण ठराविक फ्रीक्वेन्सीज आधीच टीव्ही प्रक्षेपण वगैरेसाठी राखून ठेवलेल्या असल्यामुळे त्यांची सेलफोनवाल्यांशी स्पर्धा झाली आणि त्यात खूप वेळ गेला. Reference-An Article by Atul Kahate

Comments

Popular posts from this blog

आई -तृतीय पुण्यस्मरण

आठवण आईची-पाचवे पुण्यस्मरण

आई-चतुर्थ पुण्यस्मरण