जॅकी चॅन

निष्णात नर्तकाला लाजवण्याची धमक असलेले ‘कुंग फू’ हाणामारीमधले पदलालित्य आणि बावळटपणाच्या बुरख्याआड लपलेल्या व्यक्तिरेखांनी प्रेक्षकांना गुदगुल्या ते पोट धरून हसण्यास भाग पाडणाऱ्या ‘जॅकी चॅन’ या नावाभोवतीचे वलय अगडबंब आहे. एका हाताच्या बोटावर मोजता येतील इतकेच आंतरराष्ट्रीय सन्मान लाभूनही भरमसाट प्रेक्षकप्रियता मिळविण्याचे भाग्य मिळविणारा जॅकी चॅन सारखा दुसरा ‘सुपरस्टार’ शोधूनही सापडणार नाही. लढण्याचे आणि कधीही पराभूत न होण्याचे तत्वज्ञान सांगणाऱ्या कुंग फूपटांना ब्रूस लीने जागतिक पटलावर प्रस्थापित केले असले, तरी आपल्या खाशा मस्कऱ्यांच्या ‘अ‍ॅक्शन’ मसाल्यांनी भरलेल्या चित्रपटांनी जॅकीने ‘हार्डकोअर’ कुंग फूपटांच्या चाहत्यावर्गाला या चित्रपटप्रकारापासून दूर जाऊ दिले नाही. त्याच्या चित्रपटांना अनेकदा सवंग विनोद म्हणून हिणवले जाते. तरी पडद्यावर खलनायकाला अन् त्याच्या न संपणाऱ्या टोळक्याला लोळवण्याच्या नवनवीन कल्पना पाहून त्याच्या विरोधकांनादेखील टाळ्या पिटण्याचा मोह अनावर होतो, हे तितकेच सत्य आहे. हाँगकाँगमध्ये जन्मलेल्या चान काँग-सांग म्हणजेच जॅकीचे बालपण फ्रेंच दूतावासात गेले. तेथे स्वयंपाकी वडील आणि झाडलोटीचे काम करणाऱ्या आईला या नतद्रष्ट कारटय़ाच्या रोजच्या हाणामाऱ्यांनी घेरी आणण्याचेच काय ते बाकी ठेवले होते. वैतागलेल्या पालकांनी त्याला शिक्षा म्हणून पेकिंग ऑपेरा स्कूलमध्ये दाखल केले. ही शिक्षा मात्र त्याच्या चांगलीच पचनी पडली. अभ्यासाऐवजी अठरा तासांच्या व्यायाम, हॅपकिडो, ज्युडो, कराटे, कुंग फू यांच्या जोडीला पूरक हाणामाऱ्यांच्या जगण्यात त्याचे मन रमले. पुढे ब्रूस लीच्या चित्रपटांसाठी स्टंटमन, कोरिओग्राफर म्हणून दाखल झालेला जॅकी चॅन हा ब्रूस ली नंतर कराटेहिरोंचा सम्राट बनला. सगळ्या करामती, कुंग फूमधील स्टंटबाजी डमीऐवजी स्वतच करीत असल्याने जॅकी चॅन हॉलीवूडमध्ये नावाजला गेला. जॅकीचे हॉलीवूड आणि हाँगकाँगमधले चित्रपट म्हणजे अविरत मनोरंजनाचा धो धो पाऊस म्हणून ओळखले जातात. मग तो ‘रश अवर’ असो की ‘पोलीस स्टोरी’, ‘द टक्सिडो’ असो की ‘शांघाय नाइट्स’, ‘अराऊंड द वर्ल्ड इन एटी डेज’,असो की मल्लिका शेरावतला नाचवणारा ‘द मिथ’. कुठलाही चित्रपट प्रख्यात पारितोषिकांसाठीच्या गर्दीत कधी दाखल झाला नाही. पण बॉक्स ऑफिसवर तुडुंब गर्दी खेचण्यात अपयशीही ठरला नाही. त्याच्या जगभरातील ‘कुंग फू वेडय़ा’ प्रेक्षकांना या आठवडय़ात जॅकीने नवा धक्का दिला आहे. आपल्या आयुष्याची कहाणी उलगडून दाखविण्यासाठी जॅकी मार्शल आर्ट किंवा नेहमीच्या अ‍ॅक्शन चित्रपटांऐवजी ‘सांगीतिके’चा आधार घेणार आहे. त्याचा ‘सांगीतिक पैलू’ आजतागायत या जगापासून अपरिचित राहिलेला आहे. जॅकीच्या नावावर कँटोनीज, मांदरिन,जपानी, तैवानी आणि इंग्रजी भाषेतील २० पॉप अल्बम्स आहेत. त्याच्या चित्रपटांच्या शेवटी नामावळींदरम्यान असणारी कित्येक गाणी ही त्याने स्वत: गायलेलीच असतात, गेल्या वर्षी बीजिंग ऑलिम्पिकच्या काऊंट डाऊनसाठी जॅकी चॅनने रचलेले ‘वी आर रेडी’ हे गीत चीनमध्ये वर्षभर ऑलिम्पिक अ‍ॅन्थेम बनले होते. त्यामुळे आपल्या आयुष्यातील सर्व चढ-उतार दर्शविण्यासाठी जॅकीने ‘आय अ‍ॅम जॅकी चॅन : द म्युझिकल’ या चित्रपटाची केलेली घोषणा ही केवळ दक्षिण आशिया वगळता इतर देशांसाठी चर्चेची गोष्ट बनली आहे. म्युझिकल करण्याची इच्छा व्यक्त करणारा जॅकी म्हणतो, ‘‘लहानपणी ‘साऊंड ऑफ म्युझिक’ या चित्रपटाने मला झपाटून टाकले. इंग्रजीचा गंधही नसताना तो चित्रपट मी पूर्ण पाहिला होता.’’ हॉलीवूडमधील लोकप्रिय म्युझिकल्सची परंपरा अस्तंगत होण्याच्या काळात म्युझिकलद्वारे आपल्या चित्रपट कारकीर्दीचा प्रवास दाखविणाऱ्या सांगीतिकपटाच्या कल्पनेमागे साऊंड ऑफ म्युझिकचा प्रभाव कारणीभूत असावा. आजपासून त्याचा ‘स्पाय नेक्स्ट डोअर’ चित्रपटगृहात दाखल होत आहे. दोनेक वर्षांत त्याचा संगीत चित्रपट तयार होऊन प्रदर्शित होईल. तेव्हाच जगाला असामान्य कुंग फू कौशल्याच्या जोडीला त्याच्यातील अनोळखी सांगीतिक पैलूची ओळख पटेल. ( आभार :लोकसत्ता )

Comments

Popular posts from this blog

आई -तृतीय पुण्यस्मरण

आठवण आईची-पाचवे पुण्यस्मरण

आई-चतुर्थ पुण्यस्मरण