माय नेम इज फॅन

विशाल विराट अशा त्या हरभरावृक्षाच्या अंतिम याने की टोकाच्या फांदीवर टहलत, चण्याचे घोस मोठय़ा दिलखुशीने ओरबाडत, असताना आम्हाला शाहरुख खानाने वरील विनंती केली. बेटा शाहरूख आमचा फार म्हंजे फार मोठा फॅन आहे. अर्थात, असे आमचे अनेक फॅन आहेत. साक्षात अमिताभ बच्चनदेखील त्याच्या चित्रपटाचे प्रमोशन करण्याच्या काळात आमचे श्रेष्ठत्व मान्य करीत असतो. नवल नाही, हे आमचे प्रारब्ध आहे. लोकप्रियतेला काही इलाज नसतो. खरे सांगायचे, तर या फॅनलोकांचा भलताच त्रास आम्हाला होत असतो. पण आम्ही तसे उद्धटपणाने बोलू शकत नाही. उदाहरणार्थ, अकरा नंबर चाळ, तिसरा मजला, संडासाजवळची खोली हा आमचा पत्ता कोणाला माहीत नाही? कधी कधी आमच्या चाळीतील फॅन खिडकीतून आमच्या खाजगी आयुष्यात डोकावत असतात. गेल्या सप्ताहात आंघोळीहून परत खोलीत येऊन आम्ही अंतर्वस्त्रे पेहनत असताना ही फॅनमंडळी पापाराझ्झीसारखी खिडकीला नाक लावून फिदफिदत होती. विजारीच्या येक्या नळकांडय़ात पाय घालून आम्ही खोलीभर लंगडी घालत असतावेळी त्यांच्या फिदफिदण्याचे जहरी आवाज आमच्या कानावर येत होते. अशा वेळी प्राय: आम्ही दुर्लक्ष करतो. परंतु दरवेळी तसे करता येतेच असे नाही. गेल्या साली दुसऱ्या माळ्यावरील नतद्रष्टसम्राट गोटय़ाने आमच्या पाटलोणीस पाठीमागून चिंगम चिकटवले होते आणि त्या चिंगमातून दोरी शेपटासारखी उगम पावलेली होती. असे शेपूट घेऊन आम्ही दिवसभर फिरलो. गोटय़ाने प्रात:काळीच आमची प्रजाती बदलून माणसाचे माकड करण्याचे उद्योग केले होते. एरवी या गोटय़ाच्या कमरेत लाथा घालून त्याला पालथा घालावा, अशी त्याची लायकी, पण तो आखिर आमचा फॅन आहे. फॅनचे काहीही मुआफ करायचे असते. त्याच्याकडे किंवा तिच्याकडे पाहून चुम्मे फेकायचे असतात. त्यांनी ते झेलायचे असतात. शारूख बेटय़ाला हे सारे छान जमते. शेजारी धर्मपत्नी गौरी उभी करून हा गृहस्थ बायाबापडय़ांकडे पाहात दिवसाढवळया चुम्मे फेकत असतो. ना त्याला पत्नीचे भय, ना चाळकऱ्यांचे. याच शारूखचे पाहून आम्ही तीन वर्षांपूर्वी समोरच्या चाळीतील भय्याच्या पोरीकडे पाहून चुम्मा फेकला होता. चूक तिचीच होती. ग्यालरीतील कापडे वाळत घालत असताना तिने आमचेकडे पाहून मुरकण्याचे काहीच कारण नव्हते. मुलीच्या जातीने असे करू नये. मुलीच्या जातीने असे केले, म्हणजे मुलाची जात जे काही करते, ते आम्ही केले. चुम्मा फेकला. पुढील तपशील सांगण्यात काहीच मतलब नाही. कारण भय्याकन्या जरी आमची फॅन होती, असे गृहीत धरले, तरी तिचा मूर्ख, गाढव बाप आणि तिचे तितकेच शतमूर्ख आणि शतगाढव भाईबंद हे इतर कोणाचे तरी फॅन होते. पुढील महिनाभर आम्हाला डागतराकडे मलमपट्टी करण्यासाठी जाण्यासाठी गाडी बोलवावी लागत असे. अजूनही थंडी ज्यास्त पडली की पाठीत दुखते. भय्ये मारामारीत फार अव्वल असतात, असा निष्कर्ष काढतानाच आम्ही त्यांचे नाव आमचे जीवलग मित्र राजसाहेब ठाकरे यांना सांगितले. पण भय्या असूनही राजसाहेबांनी या बापलेकांस काहीही केले नाही. वास्तविक राजसाहेबांना आम्ही आमचे फॅन समजत होतो. पण..जाऊ दया. मुद्दा शारूख खानाचा आहे. ट्विटरवर शारूखने आमच्यासाठी वरील संदेश पाठवल्याचे आम्हाला चाळीतील कोणीतरी सांगितले. शारूखने आम्हाला पाठवलेला मजकूर वर्तमानपत्रात छापूनदेखील आला असून विविध च्यानलांवर तो दाखवला जात आहे, अशीही माहिती आम्हास आमच्या चाळीतील शेजारपाजारच्या फॅनमंडळीनी पुरवली. एखाद्याला असते असे फॅन फॉलोइंग! कमालीचे एकनिष्ठ आणि डायहार्ड का काय म्हंटात ते! बेटय़ा शारूखने आम्हाला त्याचा मेसेज असा सार्वजनिक स्वरूपात का पाठवला असेल? प्रश्नच पडला. सोन्या बाभळगावकर हा आमचा असाच जबरी फॅन. ‘विनय’मध्ये मिसळ खात असताना त्याच्याकडे आम्ही आमची शंका बोलून दाखवली. ‘‘सोन्या, रे सोन्या! शारूखने असं का बरं केलं असेल? त्याला डायरेक्ट मला मेसेज पाठवता आला असता.’’ ‘‘एकादशीच्या घरी महाशिवरात्र!’’, सोन्या बेसावधपणे म्हणाला. उपवास मिसळीत त्याला खवट शेंगदाणा लागला की तो कायम हा डायलॉग मारतो, ‘‘अरे माझ्या प्राणसख्या, तू काय करण जोहर आहेस की तुझा मोबाइल नंबर शारूखच्या फोनबुकमध्ये स्पीड डायलच्या रूपात कोरला गेला असेल असं समजतोस?’’ ‘‘अरे हां, माझा नवा प्रीपेड नंबर आहे ना हा. हा नंबर खरोखर नसणार शारूख्याकडे!’’, आम्ही बाजू लावून धरली, पण तेवढय़ात बटाटापुरी आल्याने सोन्याने मुद्दय़ाला बगल दिली, ‘‘ट्विटर म्हंजे काय भानगड आहे रे सोन्या?’’ हॉटेलात एकाच टेबलावर समोर सोन्या असताना बिल भरण्याचे किरकोळ काम आपल्यालाच पार पाडावे लागते, हे ज्याला उमजले, त्याला जग कळले! आता अनायासे बिल भरायचेच आहे, तर सोन्याकडून जनरल नालेज फुकट मिळवावे या इराद्याने आम्ही सवाल केला. ‘‘मोठा पडला साहेब, लेका साधं ट्विटर म्हणजे काय हे माहीत नाही तुला? अं,’’ सोन्याने तिरस्काराने मज पामराकडे पाहियले, ‘‘ट्विटर म्हणजे.. याच्या बापानं घातलं होतं सुकं खोबरं बटाटापुरीच्या सारणात!’’ आम्ही दचकलो, पण वाक्याचा उत्तरार्ध, विनयच्या मालकवर्गाला उदेशून होता, हे उमगले. शेंगदाण्याची चटणी नामक चिखलात बटाटापुरीचे अर्धेमुर्धे कलेवर लोळवत सोन्याने नरभक्षकाच्या ताकदीने तो घास आपल्या मुखात ढकलला. सावकाश गिळंकृत करत तो पुढे म्हणाला, ‘‘मित्रा, ट्विटर हे एक नव्या पिढीचं नवं खूळ आहे. त्याला सोशल नेटवर्किंग साइट असं म्हटलं जातं. आपल्या चाहत्यांना त्यावर संदेश देता येतो. प्रोव्हायडेड, चाहत्यांना ट्विटरवर तू आहेस हे कळायला हवं! उदाहरणार्थ तू घरात पाठीच्या खालील अवयव वर करून पासला पडला आहेस आणि तुझ्यासाठी ट्विटरवर मेसेज आहे, हे तुला माहीतही नाही, तर त्याला काही अर्थ नाही. तुझ्यासारख्या आधुनिकतेच्या शत्रूंना याचा काहीही उपयोग नाही, मित्रवर्या!!’’ काहीही म्हणा, सोन्या दिल्या बिलाला जागणारा माणूस आहे. खरं बोलतो. उगीच भंकसबाजी नाही. ‘‘मग माझ्यासाठी शारूख्याने ट्विटरवर मेसेज ठेवला तो कसा?’’, आम्ही वकिली पॉइण्ट काढला. यावर मात्र सोन्या पार गडबडून वाया गेला! कारण ट्विटरवर शारूख्याने माझ्यासाठी तो मेसेज ठेवल्याचे पेपरातसुद्धाा आले आहे, हे त्यानेच मला सकाळी सांगून ‘विनय’मध्ये आणले होते. महाशिवरात्रीच्या नाश्त्यासाठी त्याने सकाळी सकाळी आमचे गिऱ्हाइक केले होते, हे उघड झाल्याने तो अंमळ गडबडला. इथे येतानादेखील लोक माझ्याकडे फार असूयेने पाहात असल्याचेही त्याने निदर्शनास आणले होते. शाहरूख खान आणि आम्ही समदु:खी आहोत. एकीकडे निष्ठावान चाहते याने की फॅनमंडळी, आणि दुसरीकडे कामाप्रती आपल्या व्यावसायिक निष्ठा यामध्ये आमच्यासारख्या लोकप्रिय विभूतीची नेहमी गोची होते. शाहरूख खानाने आमचे स्वाक्षरी अलंकृत छायाचित्र मागितले, यात काही आम्हाला विशेष वाटले नाही. बऱ्याच लोकांची ही मनिषा आम्ही पुरी करू शकलेलो नाही. अर्थात तशी मागणीही कोणी आजवर केली नसली, तरी लोकभावना आम्ही जाणतो. शंका येण्याजोगी दुसरी गोष्ट म्हणजे आम्ही ‘माय नेम इज खान’ अद्याप पाहिला नाही. आमचे परममित्र जे की, मुख्यमंत्री आशुकराव चव्हाण आणि महाराष्ट्रातील एकमेव धुतले तांदूळ याने की आराराबा पाटील यांनी पटापटा जाऊन हा चित्रपट पहिल्या दिवशी पाहून टाकला. (यांना तिकिटं काढून देणार दुसरेच! पॉपकॉर्न, सामोसे वगैरे देणार तिसरेच!! आणि हे महाराष्ट्राची बाकी कामंधामं सोडून ऑनडय़ुटी सिनेमे बघणार!!! भले!!!) आम्हाला ही सोय कोण उपलब्ध करून देणार? पण तरीही शारूख खानाच्या काही चाहत्यांनी सिनेमा पाहिलाच. पंधरा दिसापूर्वी बांद्रय़ातच बैदुलं खेळत असताना याच शारूख्याने आमचे जीवश्च कंठश्च मित्र उध्दोजी बाळाजी यांच्या गोटय़ा चोरल्या होत्या. ‘‘तुझा सेनिमा कोण पाहातो मी बघतोच. कुत्री सोडीन अंगावर!!’’ असा दम उद्धोजी बाळाजीनी शारूख खानास दिला होता. आणि वर घरी जाऊन खुद्द बाळासाहेबांना शारूख्याचे नाव सांगितले होते. त्यावरून भांडण पेटून अखेपर्यंत ते मिटले नाही, आणि उद्धोजी बाळाजीनी हा सेनिमा पाहिला नाही. त्यांनी पाहिला नाही, म्हणून आम्हीही टाळले. (खोटे का बोला?)पण तरीही असे असूनही शारूखने आम्हाला ‘रिअल हीरो’ म्हणावे? स्वत:ला फक्त पडद्यावरचा हिरो म्हणवावे? डझनानी चुम्मे फेकणारा अचानक चुम्म्यांची भीक का हो मागू लागला? फोटो का हो मागू लागला? ते देखील आमच्याकडे! छे, सोन्याने मौन पाळत साबुदाणा वडय़ाकडे मोहरा वळवला होता. ‘‘सांग ना सोन्या, सांग!’’, चहाच्या बशीत रिकामा कप आदळत आम्ही ओरडलो, ‘‘शारूख्याने सगळ्यांना हरभऱ्याच्या झाडावर चढवून धंदा साधलान् खरं ना? साले हे लोक पैशासाठी स्वत:च्या बायकोलाही त्रलोक्यसुंदरी म्हणतील!! शी:!!’’ ‘‘लेको, तुमच्यासारखे लोक आधीच हरभऱ्याच्या झाडावर चढलेले असतात. जरा फांदी वाकवूून तुमच्या हातात द्यायची खोटी. सोलाणे खायला मोकळे तुम्ही!! शाहरूखनं फक्त फांदी वाकवून दिली, तुम्ही सुटलात!! कारण विचार याचं!’’ ‘‘काय बरे याचे कारण माझ्या सोन्या?’’, अपेक्षेप्रमाणे आम्ही प्रश्न केला. ‘‘तुम्ही ना मनानं फार चांगले असता! भोळे असता भोळे!!’’ सोन्या म्हणाला, ‘‘बास.. बिल लाव!’’ शेवटची ऑर्डर वेटरला होती. चांगल्या मनाने आम्ही बिल भागवले, एवढेच. या सगळय़ा भानगडीत महाशिवरात्रीचा उपास मात्र मोडला. अहो, उपवासाला हरभरे कुठले चालायला? असो. दरम्यान आम्ही स्वाक्षरी केलेला आमचा एक फोटो ‘‘श्री. शाहरुख खान, मन्नत, बांद्रा (पश्चिम)’’ या पत्त्यावर धाडून दिला आहे! पाहूया काय होते ते! तुम्हीही द्या पाठवून फोटो!! काय?

Comments

Popular posts from this blog

आई -तृतीय पुण्यस्मरण

आठवण आईची-पाचवे पुण्यस्मरण

आई-चतुर्थ पुण्यस्मरण