मीठी मीठी बातें...
सध्या साखरेचे नाव जरी तोंडावर आले तरी ती कडू लागते. याचे कारण साखर एवढी महाग झाली आहे की, ती कडूच लागावी. मात्र साखर उद्योगात एक गोड बातमी आली आहे आणि ती मराठी माणसाशी निगडित आहे. बेळगावच्या श्री रेणुका शुगर्स लि. या तरुण उद्योजक नरेंद्र मुरकुम्बी यांच्या कंपनीने ब्राझीलमधील इक्वीपॉव ही कंपनी तब्बल १५३० कोटी रुपयांना विकत घेतली आहे. चार महिन्यांपूर्वी त्यांनी ब्राझीलची अशीच एक कंपनी विकत घेतली होती. आत्ताच्या या टेकओव्हरमुळे श्री रेणुका शुगर्स ही जगातली तिसरी आघाडीची साखर उत्पादक कंपनी ठरली आहे. ब्राझीलच्या दोन कंपन्या ताब्यात आल्यावर नरेंद्र मुरकुम्बी व त्यांच्या मातोश्री विद्या यांनी खऱ्या अर्थाने ‘साखर सम्राट’ होण्याच्या दिशेने पाऊल टाकले आहे. चार महिन्यांपूर्वी त्यांनी घेतलेल्या कंपनीमुळे रेणुकाचा समावेश जगातल्या पहिल्या दहा साखर उत्पादक कंपन्यांत झाला होता. सध्याच्या या घडामोडींमुळे देशातीलच नव्हे तर जगातील साखर उद्योगाच्या अग्रभागी आलेली ही मायलेकाची जोडी दहा वर्षांपूर्वी कुणाला विशेष माहीतही नव्हती. मुरकुम्बी कुटुंबीय हे काही साखरेच्या पिढीजात उद्योगात नाहीत. या उद्योगात त्यांची ही पहिलीच पिढी कार्यरत आहे. असे असले तरी बेळगावच्या मुरकुम्बी कुटुंबाला व्यापार काही नवीन नव्हता. खानापूर तालुक्यातील नंदगड हे त्यांचे मूळ गाव. बेळगावमध्ये अनेक बडय़ा कंपन्यांच्या एजन्सीज त्यांच्याकडे होत्या. २००० साली मुरकुम्बी कुटुंबाने साखर उद्योगात पाऊल टाकले आणि केवळ दहा वर्षांच्या काळात त्यांनी जग पादाक्रांत केले. विद्याताईंकडे या उद्योगातला विशेष अनुभवही नव्हता. नरेंद्र यांनी इलेक्ट्रॉनिक इंजिनिअरिंग केल्यावर अहमदाबादच्या ‘आयआयएम’मधून एम.बी.ए. केले होते. म्हणजे तसाही त्यांच्याकडे साखर उद्योगातला अनुभव नव्हताच. तरीही आपण या उद्योगात यशस्वी होऊ, या निर्धाराने त्यांनी साखर उद्योगात उडी घेतली. आंध्रप्रदेशातील बंद पडलेला एक साखर कारखाना त्यांनी विकत घेतला आणि बेळगावजवळ मनोळी गावी तो हलवला. प्रत्येकी पाच हजार रुपयांचे समभाग देऊन सुमारे नऊ हजार शेतकऱ्यांकडून त्यांनी भांडवल उभारणी केली. आजपर्यंत सहकारी साखर कारखाने शेतकऱ्यांना समभाग देत असत. मात्र मुरकुम्बी यांनी प्रथमच लिमिटेड कंपनीचे समभाग शेतकऱ्यांना दिले. त्यावेळी मुरकुम्बी यांच्यावर ज्या शेतकऱ्यांनी विश्वास टाकला आणि त्यांचे समभाग खरेदी केले, ते आज लक्षाधीश झाले आहेत. आजारी पडलेला साखर कारखाना ताब्यात घेऊन श्री रेणुकाची वाटचाल सुरू झाली. त्याचवेळी नेमकी साखर उद्योगात मंदीची लाट आली होती. ही मंदी जवळपास चार वर्षे होती. मात्र या मंदीतही श्री रेणुकाने चांगली कामगिरी करून दाखवली. स्थापनेच्या दुसऱ्याच वर्षी कंपनीने लाभांश दिला आणि शेतकऱ्यांना आश्चर्याचा धक्काच बसला. यानंतर श्री रेणुका शुगर्सने कधीच मागे वळून पाहिले नाही. खासगी क्षेत्रातली ही नव्या दमाची साखर कंपनी प्रगतीचा आलेख चढत होती, तेव्हा आपल्याकडील सहकारी साखर कारखाने भ्रष्टाचारामुळे आचके देत होते. अशा वेळी महाराष्ट्रातील हे साखर कारखाने भाडेतत्त्वावर घेण्याची तयारी मुरकुम्बी यांनी दाखविली. याचा पहिला प्रयोग आजरा सहकारी साखर कारखान्यात झाला. हा प्रयोग यशस्वी झाल्यावर सांगलीजवळचा मोहनराव शिंदे सहकारी साखर कारखाना त्यांनी चालवायला घेतला. हळूहळू अशा प्रकारे त्यांच्याकडे तब्बल दहा सहकारी साखर कारखाने आले. राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांनी स्थापन केलेला संत मुक्ताई साखर कारखान्याचाही यात समावेश आहे. खोपोलीला डिस्टिलरी विकत घेऊन त्यांनी तेथे इथेनॉलच्या उत्पादनास सुरुवात केली. त्याच्या जोडीला सहवीज निर्मिती प्रकल्प उभारले. हे करीत असताना त्यांनी साखरेच्या व्यापारास प्रारंभ केला. तोपर्यंत अशा प्रकारचा साखरेचा व्यापार कुणी भारतीयाने केला नव्हता. हल्दिया बंदराच्या किनाऱ्यावर दोन हजार टन क्षमतेची रिफायनरी २०० कोटी रुपये खर्च करुन उभारली. अशा प्रकारची रिफायनरी सुरू करणे, हा मूर्खपणा असल्याचे साखर उद्योगातील अनेक धुरीणांचे मत होते. परंतु मुरकुम्बी यांनी हे सर्व अंदाज खोटे ठरविले आणि आपला हा प्रकल्प यशस्वी करून दाखवला. विदेशातून कच्ची साखर आयात करून त्यावर प्रक्रिया करणे केव्हाही परवडते, हे गणित त्यांनी या प्रकल्पाच्या माध्यमातून सर्वाना पटवून दिले. मुरकुम्बी अशा कच्च्या साखर आयातीवर प्रक्रिया करून ती जगात निर्यात करतात. हल्दियातील हा पहिला रिफायनरीचा प्रयोग यशस्वी झाल्यावर त्यांनी दुसरी रिफायनरी गुजरातमध्ये उभारली. श्री रेणुकाचा आयात कच्च्या साखरेवर प्रक्रिया करुन निर्यात करण्याचा मोठा व्यवसाय झाला आहे. चार महिन्यांपूर्वी मुरकुम्बी यांनी ब्राझीलमधील साखर कंपनी ताब्यात घेतली, त्यावेळी विदेशातील एखादी साखर कंपनी ताब्यात घेणारे ते पहिले भारतीय ठरले. कंपनीचे समभाग दररोज किंमतीचे नवीन उच्चांक करीत असल्याने त्यानंतर त्यांचे नाव प्रथम अब्जाधीशांच्या यादीत झळकले. त्यावेळी त्यांच्या नावाची चर्चा झाली. कारण मुरकुम्बी शांतपणे आपले काम नेटाने करीत होते. कधीही प्रसिध्दीच्या झोतात आले नाहीत. २००५ साली श्री रेणुकाच्या समभागांची सर्वात प्रथम खुली समभाग विक्री झाली. त्यानंतर हा समभाग एकदाही विक्रीमूल्याच्या खाली आलेला नाही. सर्वात महत्त्वाचे म्हणजे त्यांनी ज्या शेतकऱ्यांकडून सुरुवातीचे ५००० रुपये भांडवल घेतले होते, त्याचे मूल्य अल्पावधीतच अकरा लाख रुपये झाले. एवढेच नव्हे तर त्यांनी अन्य साखर कारखान्यांच्या तुलनेत शेतकऱ्यांना ऊसाला चांगला दर मिळवून दिला. अशा प्रकारे त्यांनी शेतकऱ्यांचा दुहेरी आर्थिक लाभ साधला. एकीकडे सहकारी कारखानदारी रसातळाला जात असताना एक खासगी उद्योजक मात्र आपली कंपनी भरभराटीला नेऊ शकतो, हे त्यांनी सिद्ध केले आणि त्याचबरोबर सहकाराचे वेगळे चित्रही पुढे आणले. सहकारातून समृध्दी करताना राजकीय नेत्यांनी महाराष्ट्रातील साखर कारखाने आपल्या राजकीय हितासाठी वापरले. काही साखर सम्राटांनी आपण भ्रष्टाचारसम्राट आहोत, हे सिद्ध केले. राजकारण्यांनी या कारखान्यांचे दिवाळे काढले. यापैकी काहींनी आता खासगी कारखानदारी सुरू केली आणि याचसाठी आपला अट्टाहास होता, हे दाखवून दिले. महाराष्ट्राची ओळख ही एकेकाळी सहकारी साखर कारखान्यांचे माहेरघर अशी होती. आता तेच साखर कारखाने खासगी उद्योजकांच्या दावणीला बांधले गेले आहेत. महाराष्ट्रात हाताच्या बोटावर मोजता येतील, असे चांगल्या स्थितीतील सहकारी साखर कारखाने शिल्लक राहिले आहेत. बहुतांश साखर कारखाने हे दिवाळखोरीत आहेत. त्यामुळे ग्रामीण भागाची अर्थव्यवस्था कोलमडली आहे. मुरकुम्बी यांच्या यशाच्या आलेखाचे स्वागत करीत असताना ही खंत व्यक्त करावीशी वाटते. मात्र याची खंत साखर कारखान्यांच्या संचालकांना म्हणजेच राजकारण्यांना नाही. आर्थिक उदारीकरणाच्या युगात खासगीकरण हा सर्वावर एक जालीम उपाय असा अनेकांनी शोध लावला आहे. परंतु आपल्याकडे सहकार क्षेत्राच्या अकार्यक्षमतेमुळे खासगी क्षेत्राला चालना मिळाली आहे, असे खेदाने म्हणावेसे वाटते. भारतीय खासगी उद्योगाने मात्र उदारीकरणाचा पुरेपूर फायदा उठवत कॉर्पोरेट जगतावर आपली पकड घट्ट केली आहे. जगातील कंपन्या ताब्यात घेऊन भारतीय कंपन्या आपला झपाटय़ाने विस्तार करीत आहेत. श्री रेणुकाने याच मंत्राचा अवलंब करीत जागतिक साखर उत्पादनात आपला ठसा उमटविला. रिलायन्स लवकरच सुमारे १५ अब्ज डॉलर खर्च करून अमेरिकेतील दिवाळ्यात गेलेली ‘लॉन्डेल’ ही कंपनी खरेदी करण्याच्या तयारीत आहे. तर ‘टेलिकॉम जायन्ट’ भारती टेलिकॉम, झेन टेलिकॉमची आफ्रिकेतील मालमत्ता सुमारे १० अब्ज डॉलरला खरेदी करणार आहे. पुढील दशकात त्यामुळे भारतीय उद्योगाचे जागतिक पातळीवर वर्चस्व असेल, यात काहीच शंका नाही. रिलायन्स म्हटले की पेट्रोकेमिकल्स, टेलिकॉम म्हटले की भारती, स्टील म्हटले की मित्तल, साखर म्हटले की मुरकुम्बी अशी ही नावे जागतिक क्रमवारीत आघाडीवर असतील. जागतिक कॉर्पोरेटच्या खेळपट्टीवर अशा प्रकारे अनेक भारतीय उद्योजक ‘सचिन’ बनून तुफान फटकेबाजी करीत आहेत. मुरकुम्बींची ‘मीठी मीठी बाते.’ म्हणूनच लक्षणीय ठरली आहेत.
Comments
Post a Comment