मोशे दायान

देशोदेशींच्या राजकीय, सामाजिक लढय़ांचे अग्रणी आणि त्यांचे आयुष्य! विसाव्या शतकानं अनुभवलेला विलक्षण विद्युतवेगी रणसंग्राम म्हणजे अरब-इस्रायल यांच्यात झालेले १९६७ सालचे दीडशे तासांचे युद्ध. या युद्धाला कारणीभूत झाली होती ती अरबांची मुजोर वृत्ती, इस्रायलसारखा टीचभर देश अस्तित्वात येताच पेटलेल्या सूडाच्या ज्वाळा आणि त्या इस्रायलला समुद्रात बुडवून टाकल्याशिवाय क्षणभरही स्वस्थ बसायचे नाही, ही त्या पाठोपाठ उच्चारली गेलेली अरेरावीची भाषा. पण त्या आवेशाला सामोरे जाण्याचे मानसिक धैर्य असलेला नेता त्या क्षणी त्या टीचभर देशाकडे नव्हता. एश्कोल आणि एबान हेच होते इस्रायलचे त्या काळचे नेते. एश्कोल काही साधेसुधे राजकारणी नव्हते. तब्बल ११ र्वष इस्रायलचे अर्थमंत्रीपद भूषवलेले आणि इस्रायलच्या आर्थिक प्रगतीचे शिल्पकार मानले जाणारे एश्कोल हे बेन गुरियन नंतर इस्रायलचे पंतप्रधान बनले. एबानचा अरब-ज्यू प्रश्नाचा अभ्यास दांडगा होता. ज्यू राष्ट्राची मागणी किती न्याय्य आहे, हे त्यांनी संयुक्त राष्ट्रसंघाच्या महासमितीपुढे प्रभावीपणे मांडले होते, पण एश्कोल काय किंवा एबान काय, दोघेही जागतिक राजकारणात ओळखले जात ते तडजोडवादी नेते म्हणूनच. अरब आक्रमणाचे संकट टाळायचे असेल तर शांततावादी नेतृत्व चालायचे नाही, तिथे एखादे कणखर आणि युयुत्सु नेतृत्व हवे, हे इस्रायली जनतेने जाणले होते. अरब राष्ट्रांवर वज्रप्रहार करण्याचे सामथ्र्य असलेला योद्धाच आपल्याला वाचवू शकेल, असे इस्रायली नागरिक म्हणू लागले होते. त्यांना राहून राहून आठवण येत होती, ती आधीच्या २० वर्षांत इस्रायलवर दोन वेळा प्राणसंकटे आली, तेव्हा इस्रायली जनतेची ज्या एकाक्ष सेनानीने त्या संकटातून मुक्तता केली त्या मोशे दायानची. बेन गुरियन किंवा एश्कोल हे युरोपीय ज्यू, पण मोशे दायान हा शंभर टक्के ज्यू. जॉर्डन खोऱ्यातल्या डागानियामध्ये २० मे १९१५ला त्याचा जन्म झाला. स्वाभाविकपणेच येत्या दशकात येणारे २०१४-२०१५ हे त्याचे जन्मशताब्दी वर्ष. सधन शेतकरी कुटुंबात जन्मलेला हा मुलगा. मोशाव्ह या नावाने ओळखल्या जाणाऱ्या सहकारी कृषी वसाहतीची सुरूवात वडील श्मुएल यांनी केली. आई द्वोराह ही तर ज्यू राष्ट्रीय आंदोलनात पुढाकार घेतलेल्या बुद्धीवंताची मुलगी. अशा संस्कारघन वातावरणात मोशे वाढला, पण सातत्याने आजारी पडत राहिल्याने त्याला फारसे शालेय शिक्षण घेताच आले नाही. मोशे सहा वर्षांचा असताना त्याचे आईवडील नाहालालमध्ये राहण्यास आले. तिथेच तो अरबी भाषा शिकला, पण १२ व्या वर्षी मोशे हॅगनाह या ज्यूंच्या भूमीगत राष्ट्रीय स्वातंत्र्य चळवळीत सामील झाल्यानं मोशेचा बंदुकींशी जवळून संबंध आला. हॅगनाहमधलं प्रशिक्षण संपल्यावर मोशे पुन्हा काही दिवस शाळेत गेला. तिथेच त्याची रूथ नावाच्या तरूणीशी गाठ पडली. त्या मैत्रीचं रुपांतर पुढे प्रेमात आणि विवाहात झालं. एक मुलगी आणि दोन मुले त्यांना झाली. मुलगी पुढे लेखिका झाली, तर मुलगा सिनेकलावंत. १९७१ साली तब्बल ३६ वर्षांच्या वैवाहिक वाटचालीनंतर मोशेनं रूथला घटस्फोट दिला. पॅलेस्टाइनमधील अरबांच्या बंडखोरीला आळा घालण्यासाठी १९३६ साली ब्रिटिशांनी कॅप्टन विनगेट याच्या नेतृत्वाखाली एक स्वतंत्र गनिमी लढाऊ दल स्थापन केलं होतं. मोशे दायान त्यात सहभागी झाले. अल्पावधीत त्यांनी विनगेटची मर्जी संपादित केली आणि वयाच्या अवघ्या २२ व्या वर्षी दायान विनगेटचे प्रमुख मदतनीस झाले. दायान यांनी त्या संधीचा पुरेपूर लाभ उठवला, हॅगनाहमध्ये जे-जे शिकायला मिळाले ते-ते सारे त्यांनी आपल्या पथकाला शिकवायला सुरूवात केली. ब्रिटिशांचे त्याकडे लक्ष होतेच, त्यांनी ती संघटना बेकायदा ठरवली, नेत्यांची धरपकड केली, त्यात दायानही सापडले. त्यांना पाच वर्षांची शिक्षा झाली, परंतु दोनच वर्षांनी त्यांची सुटकाही झाली. ही घटना १९४१ ची. सीरिया तेव्हा फ्रान्सच्या ताब्यात होता, फ्रान्समध्ये मार्शल पेताँ यांचं हिटलरधार्जिणं सरकार सत्तेवर होतं. पेताँ सरकारच्या सैनिकांबरोबर लढण्यासाठी ब्रिटनला पॅलेस्तिनी सैनिकांची गरज होती. दायान ब्रिटिशांच्या वतीने लढण्यासाठी सीरियात गेले. लिटानी नदीच्या तीरावर उभे राहून दायान दुर्बिणीने वेध घेत असताना एकदम समोरून बंदुकीची एक गोळी आली व तिने दायान यांच्या डाव्या डोळ्याचा वेध घेतला. दायान तेव्हा जे एकाक्ष झाले, ते कायमचेच. महायुद्ध संपल्यावर दायन मायदेशी परतले, शेती करायला लागले, पण इस्रायलने आपले स्वातंत्र्य घोषित करताच अरबांनी पुन्हा हल्ला चढवला. दायान बंदूक खाद्यावर टाकून युद्धात उतरले. नेगेव्ह वाळवंटात घुसलेल्या अरबांना पिटाळून लावल्यामुळे दायान यांना ब्रिगेड कमांडरपदी बढती देण्यात आली. युद्ध संपले, पण दायान यांची लष्करातील नोकरी तशीच कायम राहिली. १९५२ मध्ये त्यांना उच्च लष्करी शिक्षणासाठी इंग्लंडला पाठवण्यात आले. वर्षभराने दायान परतले ते मेजर जनरल बनून. पण तिथल्या वास्तव्यात जर्मन, अमेरिकन युद्धतज्ञांनी लिहिलेल्या ग्रंथांचा अभ्यास त्यांनी केला. १९५५ च्या युद्धात सिनाइच्या वाळवंटात इजिप्शियन सेनेच्या वाटय़ास जो नामुष्की पत्करायला लावणारा पराभव आला, त्यामागे दायान यांचा हा व्यासंग होता. बेसावध शत्रूवर वेगाने धडक मारायची, रात्रीच्या अंधारात आपले मोर्चे बांधायचे हे तंत्र दायान यांनी ५६च्या लढाईत पुरेपूर वापरले. सरसेनापती बनल्यानंतर इस्रायलचे लष्करी सामथ्र्य वाढवायचा, प्रत्येक सैनिकाला छुप्या युद्धाचे प्रशिक्षण देण्याचा धडाकेबंद कार्यक्रमच त्यांनी हाती घेतला. अशाच एका छत्री-सैनिकाच्या प्रशिक्षणादरम्यान विमानातून उतरत असताना त्यांचा पाय मोडला. १९५८ मध्ये दायान यांनी सरसेनानीपदाचा राजीनामा देऊन राजकारणात प्रवेश केला. गुरियन यांनी त्यांना आपल्या मंत्रीमंडळात घेतले, शेती खाते दिले. दायान यांनी तिथेही आपला प्रभाव दाखवला. धनलंड दुग्धोत्पादकांना त्यांनी जागा दाखवली, पण पक्षाला गुरियन यांची धोरणे पसंत पडली नाहीत, त्यांनी गुरियन यांना राजीनामा देण्यास भाग पाडले. गुरियन यांनी पंतप्रधानपद सोडून मापाई पक्षातून बाहेर पडून नवा रफी राजकीय पक्ष स्थापन करताच दायानही त्या पक्षात गेले. ६५ साली निवडणूक लढवून ते पुन्हा संसदेत गेले. पण बहुमत न मिळाल्याने त्यांच्या पक्षास सत्ता मिळाली नाही, दायान यांना मंत्रीपदापासून दूर रहावे लागले. १९६७ मध्ये युद्धाचे ढग पुन्हा जमू लागताच तत्कालीन पंतप्रधान एश्कोल यांना, दायान यांची संरक्षणमंत्री पदावर पुनर्नियुक्ती करावी लागली, पण तीही केवळ जनमताच्या दबावापायीच. एश्कोल यांनी दायान यांना उपपंतप्रधानपद देण्याची तयारी दाखवली होती, पण मला देणार असाल तर संरक्षणमंत्रीपदच द्या, अन्यथा सैन्य दिमतीला देऊन सीमेवरच पाठवा, असा आग्रह दायान यांनी धरला आणि एश्कोल यांचा नाइलाज झाला. तिसरे अरब-इस्रायल युद्ध झाले, त्या सहा दिवसांच्या युद्धात इस्रायलचा विजय झाला. इजिप्त, जॉर्डन आणि सीरियाचा पराभव झाला, दायान यांची लोकप्रियता गगनाला जाऊन भिडली. त्यानंतरच्या योम किप्पूर युद्धात मात्र इस्रायलचा पराभव झाला. दायान यांच्या तो जिव्हारी लागला. ‘युद्धतयारी नव्हती’ अशा शेलक्या आरोपांमुळे ‘गाबरे ऑफ इस्रायल’ असा बहुमान मिळालेले दायान व्यथित झाले. राजकारणापासून ते थोडे अलिप्त झाले. संसदेचे सदस्यत्व होते, पण तेही नावापुरतेच. १९८१ साली दायान यांनीच टेलेम नावाच्या एका नव्या पक्षाची स्थापना केली. भर आजारपणातच दायान यांनी ८१ ची निवडणूक लढवली. त्या निवडणुकीत टेलेमला अवघ्या दोनच जागा मिळाल्या. कोलोन कॅन्सरनं ग्रासलेले दायान फार काळ काढू शकले नाहीत. १६ ऑक्टोबर १९८१ ला त्यांचं निधन झालं. दायान यांची राहणी अत्यंत साधी होती, मद्यपान वा धूम्रपानाची त्यांना सवय नव्हती. उगाच गप्पा मारत बसणे हे त्यांच्या स्वभावात नव्हते. युद्धतंत्र शिकणे, प्रत्यक्ष युद्धात भाग घेणे याचेच जणू त्यांना व्यसन होते. दुसरे महायुद्ध, १९४८ चे अरब-इस्रायल युद्ध, सुएझचा संघर्ष, सहा दिवसांचे युद्ध आणि योम किप्पूर युद्ध अशी पाच युद्धे तर ते प्रत्यक्ष लढले. १९३२ ते १९७४ अशी तब्बल ४२ वर्षांची लष्करी कारकीर्द त्यांनी उपभोगली. लेखन करण्याकडे त्यांचा कल होता. पुरातत्वविद्येचा त्यांना छंद होता. अनेक उत्खननांमध्ये ते प्रत्यक्ष सहभागी झाले होते. व्हिएतनामच्या युद्धतंत्राविषयी तर त्यांनी लिहिलेले आहेच, पण इस्रायलस् बॉर्डर अँड सिक्युरिटी प्रॉब्लेम्स (१९५५), ए डायरी ऑफ सिनाइ कॅम्पेन (१९६५), ए न्यू मॅप, न्यू रिलेशनशिप्स (१९६९), लिव्हिंग विथ द बायबल (१९७८), स्टोरी ऑफ माय लाइफ (१९७८), ब्रेकथ्रू - ए पर्सनल अकाऊंट ऑफ द इजिप्त-इस्रायल पीस निगोशिएशन्स (१९८१) ही त्यांची काही गाजलेली पुस्तके आहेत. इस्रायल लष्करीदृष्टय़ा बलशाली व्हावा हाच ध्यास त्यांनी आयुष्यभर रणांगणातही धरला आणि रणांगणाबाहेरही..

Comments

Popular posts from this blog

आई -तृतीय पुण्यस्मरण

आठवण आईची-पाचवे पुण्यस्मरण

आई-चतुर्थ पुण्यस्मरण