नवी बहुभाषिक तंत्रविद्या मराठीला लाभदायक
आजही आपल्या भाषेचा विचार संगणकाशी जोडून जेव्हा होतो तेव्हा तो प्रामुख्याने मुद्रणकेंद्री असतो. टंकलेखनयंत्राचा पर्याय म्हणूनच आपण संगणकाकडे पाहतो. भाषा आणि संगणक यांच्या संबंधाचा विचार खरं तर याहून अधिक खोलात जाऊन करायला हवा. माहिती-तंत्रज्ञान हा आजच्या काळातला कळीचा शब्द आहे. ही ज्ञानशाखा माहिती नोंदवण्याचे, ती नेटकेपणाने मांडण्याचे, हवी ती माहिती सहज हुडकण्याचे, माहितीची देवाणघेवाण सुकर करण्याचे नवे नवे मार्ग चोखाळते आहे. मानवी समूहात या माहितीच्या देवाणघेवाणीचं महत्त्वाचं माध्यम भाषा हेच आहे. त्यामुळेच मानवी भाषेतील माहितीवर संगणकाच्या साहाय्याने विविध प्रक्रिया कशा करता येतील याचा अभ्यास करणारी भाषासंस्करण ही ज्ञानशाखा निर्माण झाली.
मानवी भाषा वापरणाऱ्या संवादकुशल संगणकप्रणाल्या कशा रचता येतील यावर या शाखेत संशोधन होत असतं. भाषेचं उच्चारित रूप आणि लिखित रूप या दोहोंचाही सखोल अभ्यास संगणकप्रक्रियेच्या दृष्टीने होत असतो. जगातील विविध भाषांसाठी विविध संगणकीय साधनं मोठय़ा प्रमाणावर उपलब्ध होत आहेत. मराठी भाषेसाठी आपल्या समाजात यापैकी काय काय चाललं आहे याचा शोध घेऊ गेलो तर निराशाच पदरी येईल. नव्या तंत्रविद्येशी आपल्या भाषेला जोडण्याचं स्वप्नही आपल्याला अद्याप पडलेलं नाही.
संगणकावर मानवी भाषेचा वापर करण्याचं अगदी प्राथमिक स्वरूपाचं उदाहरण म्हणजे संगणकाच्या पडद्यावर आपल्याला आपल्या भाषेच्या लिपीतली चिन्हे त्यांतील मांडणीच्या वैशिष्ट्यांसह दिसणं. हे एक उदाहरण जरी विस्ताराने पाहिलं तर मराठीची स्थिती काय आहे ते कळेल.
संगणकाचा विकास हा मुख्यत: अमेरिकाखंडात झाल्याने तिथे वापरण्यात येणारी रोमी (रोमन) लिपी ही संगणक-मानव-संवादासाठी वापरण्यात आली. पण याचा अर्थ असा नव्हे की ती लिपी संगणकाला कळते. संगणकाला कोणतीच मानवी भाषा अथवा त्या भाषेची लिपी त्या अर्थी कळत नाही. फक्त 0, 1 या दोन आकडय़ांतून साकारणाऱ्या द्विमानी संख्येचा शून्यैकी संकेत संगणकाला कळतो. ती खरी संगणकाची भाषा आहे. पण त्या भाषेत संगणकाला सगळ्या आज्ञा देणं हे माणसांना कठीण आहे. त्यासाठी माणसांना संगणकाकरता आज्ञावल्या रचणं सुकर करणाऱ्या आज्ञावलीभाषा रचण्यात आल्या. सी++, जावा, पर्ल इ. आज्ञावलीभाषा वापरात आहेत. आज्ञावलीकार या भाषेत आज्ञावल्या (म्हणजे संगणकाने काय करावं आणि कोणत्या क्रमाने करावं हे ठरवून देणारा मजकूर) रचतात. या आज्ञावल्यांचं मग संगणकाच्या भाषेतल्या कार्य-क्रमात रूपान्तर होतं. आणि ते काम संगणक करतो. पडद्यावर अमुक आकृती दाखव असं संगणकाला सांगण्यासाठी प्रथम ती आकृती आणि शून्यैकी क्रमांक यांची सांगड घालणारा संकेत लागतो. त्या संकेतानुसार रचलेला टंक (फॉण्ट) आपल्याकडे असला की आपल्याला ती आकृती पडद्यावर पाहता येते, कागदावर छापून घेता येते.
रोमी लिपी संगणकावर दिसण्यासाठी आस्की (अमेरिकन स्टॅण्डर्ड कोड फॉर इन्फर्मेशन इण्टरचेंज) ही संकेतप्रणाली वापरतात. रोमी लिपीचा प्रत्येक टंक सामान्यत: आस्की हीच संकेतप्रणाली वापरत असल्याने टंक बदलला तरी मजकूर हरवत नाही. मराठी संगणकावर दिसताना मात्र ही अडचण आजही सतावते. कारण टंक तयार करणारे आस्की ही इंग्रजीचीच संकेतप्रणाली वापरतात. तीही वेगवेगळ्या प्रकारे वापरतात. म्हणजे समजा ६० या क्रमांकावर एका टंकात ध असतो तर दुसऱ्या टंकात मा असतो. म्हणजे टंक बदलला की धचा मा झालाच.
खरं तर जगातील बहुतेक सर्व लिप्यांची व्यवस्था लावणारी युनिकोड ही संकेतप्रणाली २००० सालानंतर संगणकीय भाषाप्रक्रियांत प्रामुख्याने वापरली जाते. ती वापरून इंग्रजीइतक्याच सहजतेने संगणकावर मराठी वापरणं शक्य आहे. आपल्या घरातल्या संगणकावर ती आयतीच असते. त्यासाठी एकही पैसा वेचावा लागत नाही. पण अजूनही बहुतांश मराठी लोकांना तिचा पत्ता सापडलेला नाही. मराठी प्रसारमाध्यमांतही मोजके अपवाद वगळता मराठीसाठी मागासलेलं तंत्रज्ञान वापरण्याची चढाओढ लागलेली आहे. जी वृत्तपत्रं आपल्या संगणकीय आवृत्त्यांसाठी युनिकोड या संकेतप्रणालीचा वापर करतात त्यांनीही लोकांत हे तंत्रज्ञान पोहोचवण्यासाठी निकराने प्रयत्न केलेले आढळत नाहीत. केंद्रशासनाने युनिकोड ही संकेतप्रणाली भारतीय भाषांकरता प्रमाणित प्रणाली म्हणून वापरावी असं ज्ञापन काढलं आहे. महाराष्ट्र-शासनाच्या सांस्कृतिक धोरणातही या गोष्टीचा अंतर्भाव आहे. पण अजूनही आपण फारच प्राथमिक गोष्टींत अडकलो आहोत. निकालात निघालेल्या प्रश्नांवरच चर्चा करत आहोत. या उलट जगातल्या इतर भाषा आणि लिप्या यांच्या संदर्भात काय घडतं आहे? महाजालावर इंग्रजी भाषेत ज्ञानाचा मोठा साठा आहे हे आपल्याला माहीत आहे. पण हा साठा आता बहुभाषिक होऊ लागला आहे याकडे मात्र आपण पुरेसं लक्ष देत नाही. विविध भाषा हा ज्ञानाच्या देवाणघेवाणीतला अडसर नसून तो मानवी संस्कृतीतून निर्माण झालेला मोठा ठेवा आहे अशी जाणीव जगभरात निर्माण होते आहे. त्यामुळेच संगणकतंत्रज्ञानही बहुभाषिक होत आहे. फ्रान्स, कोरिया, स्पेन, चीन, जपान इ. देशांत संगणकप्रणाल्या या त्यांच्या त्यांच्या भाषांत असतात. मायक्रोसॉफ्टसारख्या आपल्या भाषांना न जुमानणाऱ्या किंवा त्यांच्याकरता केवळ थातुरमातुर सोयी पुरवणाऱ्या संगणककंपन्या या देशांसाठी मात्र त्यांच्या भाषांतून संगणकीय साधनं निर्माण करतात. त्यांची माहितपत्रकंही त्या त्या देशांच्या भाषांत असतात. आपण मात्र आपल्या सांस्कृतिक ठेव्याला ओझं मानत आहोत. मराठी शाळा बंद पडत आहेत. ज्ञानव्यववहारातून मराठीच्या उच्चाटनाचे जोरदार प्रयत्न चालू आहेत.
जगातील एका ठिकाणी निर्माण झालेली उत्पादनं दुसऱ्या ठिकाणीही सहज उपलब्ध करणाऱ्या जागतिकीभवनाविषयी आपण नेहमी बोलतो पण लोकांच्या स्थानिक आवश्यकता लक्षात घेऊन ती उत्पादनं तयार करण्याचा म्हणजेच स्थानिकीकरणाचा विचारही जगात बळावतो आहे याकडे आपलं दुर्लक्ष होतं आहे. संगणकीय उत्पादनांच्या संदर्भात या स्थानिकीकरणाचा भाग म्हणून संगणकप्रणाल्या बहुभाषिक होत आहेत.
महाजालावर विकिपीडियासारखे लोकांच्या सहभागातून तयार होणारे कोश विविध भाषांत रचण्यात येत आहेत. गूगलसारख्या संस्था आपली उत्पादनं विविध भाषांतून उपलब्ध करून देत आहेत. गूगलच्या मराठी आवृत्त्या किती मराठी लोक वापरतात हा एक शोधाचा विषय असू शकेल. बहुतेकांना असं काही घडतं आहे याची कल्पनाही नसते.
महाजालावर विविध भाषांत माहितीचा साठा आहे. तो केवळ इंग्रजीतच आहे असं नाही. आपल्याला हवी असलेली माहिती ही विविध भाषांत असणार आहे. मग ती विविध भाषांतली माहिती हुडकणारे हुडक्ये (सर्च इंजिनं) निर्माण करण्याचे प्रयत्न चालले आहेत. आपण आपल्याला येत असलेल्या भाषेतून शोध घेऊ. पण त्या शोधमजकुराचा अर्थ उमजून त्या अर्थाची इतर भाषांतली माहितीही संगणकाने उपलब्ध करून द्यावी यासाठी प्रयत्न होत आहेत. युरोपातल्या भाषांसाठी आजही बऱ्याच प्रमाणात चांगल्या अशा संगणकीय-अनुवाद-प्रणाल्या उपलब्ध आहेत. भाषान्तर ही मुळातच कठीण गोष्ट आहे. पण तीही संगणकाच्या कवेत आणण्यासाठी प्रयत्न होत आहेत. भारतीय भाषांसाठीही आरोग्य आणि पर्यटन या दोन क्षेत्रांतील भाषान्तरं भारतीय भाषांत परस्परांत व्हावीत यासाठी केंद्रशासनाच्या आर्थिक साहाय्यातून संगणकीय तंत्रज्ञ काम करत आहेत. गूगलसारख्या संस्था विविध भाषांतील स्वामित्वमुक्त असं वाङ्मय संगणकीय स्वरूपात आणण्यात पुढाकार घेत आहेत. आपल्या विद्यापीठांच्या विविध ग्रंथालयांतील जुन्या मराठी नियतकालिकांचे अंक मात्र नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. महाजालावरील संकेतस्थळांचे पत्ते लोकांना आपापल्या लिप्यांतून कसे लिहिता येतील यावर प्रायोगिक तत्त्वावर संशोधन चाललं आहे. सीडॅक ही संस्था भारतीय भाषांसंदर्भात याविषयी काम करत आहे. बोललेला मजकूर संगणकाने एखाद्या भाषेच्या लिपीत लिहून द्यावा, लिखित मजकूर वाचून दाखवावा यासाठी संगणकप्रणाल्या निर्माण झाल्या आहेत. पण त्या अजूनही आपल्या भाषांसाठी नाहीत. कारण आपल्यालाच त्यांची आवश्यकता वाटत नाही. जिथे जिथे म्हणून मानवी भाषा आणि त्यांच्या लिप्यांचा वापर होतो तिथे तिथे संगणकीय तंत्रविद्या वापरण्याचे प्रयत्न होत आहेत.
हे सर्व पाहता येत्या काळात मराठी भाषेचं संगणकावर भवितव्य काय असेल हे आता आपण म्हणजे मराठी माणसांनीच ठरवायचं आहे. अनेक मराठी तंत्रज्ञ आज अमेरिकादी देशांच्या संगणकसंस्थांत राबत आहेत. पण आपल्या भाषेसाठी ते काय करणार आहेत? आपण सगळे मराठी भाषक आपल्या भाषेसाठी काय करणार आहोत? आपण मिळेल ते उत्पादन निमूट स्वीकारतो. आपल्याला हवं ते मागत नाही. जर अशी मागणी आपण करू शकलो तर आपल्या भाषांसाठीही हे सर्व करून द्यायला लोक तयार होतील. तंत्रविद्येच्या साहाय्याने मराठी भाषेला तंत्रारूढ करणं मुळीच अशक्य नाही. पण मराठी लोकांना आपल्या भाषेविषयी तितका आत्मविश्वास राहिलेला नाही.
नकारघंटा जरी इतक्या मोठय़ाने वाजत असली तरी ज्या मराठी लोकांना आपल्या भाषेविषयी प्रेम वाटतं आहे त्यांनी निराश होऊन चालणार नाही. उलट त्यांनी अधिक निकराने तंत्रज्ञानाच्या साहाय्याने मराठीचा वापर कसा वाढेल आणि तो आर्थिक व्यवहारात, सामाजिक व्यवहारात, राजकीय व्यवहारात आणि ज्ञानव्यावहारात कसा विस्तारेल हे पाहण्याची आवश्यकता आहे. मुळात सर्व जग इंग्रजीच किंवा आपली भाषा वगळता इतर भाषाच वापरणार आहे हा अपसमज आपण सोडला आणि प्रत्येक प्रकारचा व्यवहार मराठीतून आग्रहाने आणि सातत्याने करत राहिलो तर आपल्या भाषेला चांगले दिवस नक्कीच येतील. आणि त्यासाठी आपल्याला नवी बहुभाषिक होत चाललेली तंत्रविद्या नक्कीच साहाय्य करील.
Comments
Post a Comment