मराठी माणूस आणि मराठीचा विकास
रहम रहनुमा मरगठ्ठ अस्सी
भागे तुरंतम पीने कू लस्सी
- हीबाब अलाहिदा
(बादशहा जहांगीर यांचे दरबारी शायर आणि प्रवासी बखरकार)
उपरोल्लेखित काव्यपंक्ती फारसी भाषेत आहेत की हिंदवी भाषेत आहेत, यावर इतिहासकारांमध्ये तेराव्या शतकापासून वाद पेटला असल्याने आणि अद्याप तो विझला नसल्याने आम्ही त्यात पडू इच्छित नाही. हीबाब अलाहिदा यांचे नाव कोणाला ठाऊक नाही? इतिहासाचे अभ्यासक आणि विद्यार्थी तसेच शालेय शिक्षक आदी जमातीत हे नाव खूपच परिचयाचे आहे. अर्थात ज्यांस हे नाव ओळखीचे वाटत नसेल, त्यांनी उभ्या आयुष्यात इतिहासाचे म्हणून एकही पुस्तक वाचलेले नाही, असे आम्ही म्हणू! शिवछत्रपतींचे जानेमाने इतिहासकार बाबासाहेब पुरंदरे यांस कुणीतरी कधीतरी अलाहिदा साहेबांसंबंधी छेडले असता त्यांनी पृच्छकाकडे सपशेल दुर्लक्ष करून कुण्या ऐऱ्यागैऱ्यास तेथल्या तेथे मुजरा घातला. वर उल्लेखिलेला पृच्छक म्हणजे अस्मादिक होत. इतिहासाचे पुस्तक सोडा, इतिहास म्हणून आपली बुके खपविणारे
वपुश्रीमान बाबासाहेब तथा ब. मो. पुरंदरे यांच्याही दृष्टोत्पत्तीस जनाब हीबाब अलाहिदा यांचे नाव आजवेरी पडो नये, यापरता दैवदुर्विलास तो कोणता? हीबाब अलाहिदा हे नाव आमचेच कल्पक भेजे शरीफ (भेजा-ए-शरीफ! याने की शरीफ आदमीचा मेंदू!!) मधून धत्तुऱ्याच्या कोंबाप्रमाणे उगवले असल्याचा मनहूस आरोप कोणीतरी पुण्यामधून केल्याचे आमच्या कानी आले आहे. कुठलेही वैचारिक आरोप हे कायम पहिले पुण्यामधूनच होत आले आहेत. ‘हीबाब अलाहिदा’ हे नाव थोडके संशयास्पद वाटते ही बाब अलाहिदा असली तरी वस्तुस्थिती मात्र तशी नाही, असे आम्ही येथे नम्रपणे सांगू इच्छितो. हीबाब अलाहिदासाहब यांच्या स्वहस्ताक्षरातील काही पुर्जे आणि रुमाल आजही मौजूद आहेत. आगरा येथे ‘हरलाल की कोठी’ या ऐतिहासिक इमारतीच्या उत्खननाचे वेळी ती आम्हांस सापडली. जहांगीर बादशा आलमपन्हा यांनी वेळोवेळी आपले वालिद शहेनशहा अकबर यांचेविषयी काढलेले जहरी लब्ज, जनान्यातील काही खुरमी (पक्षी: ठेवलेल्या!) मुश्रिकांबद्दलच्या अधूनमधून प्रकट होणारा प्रेमभाव, काही हिशेब आणि त्यातील गफलती यांचा लेखाजोखा या पुज्र्यामध्ये आहे. तथापि, या असल्या भंकसबाजीच्या इतिहासात आम्हाला कधी रस नव्हता, नाही! जनाब हीबाब अलाहिदा यांनी मजलदरमजल प्रवास करीत महाराष्ट्रापर्यंत मजल मारली आणि त्याचे प्रवासवर्णन दरोबस्त लिहून काढले (आणि ते आम्हांस मिळाले!) यातच सारे काही आले. या लिखाणातून मराठीच्या अस्तित्वाचे खरे पुरावे मिळाले असून मराठी भाषा आणि मराठी संस्कृतीचे खरे चित्रच उभे राहात आहे. या संशोधनावर आधारीत आम्ही किमान पस्तीस कादंबऱ्या, अठ्ठावीस चरित्रे आणि दोनशेसोळा काव्यसंग्रह एवढी ग्रंथसंपदा उभी (खरे तर आडवी!) केली असती. पण एक संशोधन हाती घ्यावे, आणि त्याचे जोरावर उभी हयात घालवून जागोजाग भाषणे देत पुस्तके खपवण्याचे प्रयोग आम्ही करू इच्छित नाही. आमचे पुरावेच नकली, बनावट आणि बेगडी (अर्थ एकच! पण वाक्याला वजन येण्यासाठी असे लिहावे लागते!) असल्याचा आरोप आमच्या काही हितशत्रूंनी केला, त्याचे आम्हांस दुख झाले. परंतु, इतिहासाचे आलोडन आणि लोडन या दोन्ही गोष्टी एकाच वेळी ‘डन’ करणे हे आमचे ब्रीद असल्याने आम्ही हार न मानता आमचे संशोधन आाज आपल्यापुढे मांडतो आहो, हीबाब अलाहिदा यांच्या पवित्र स्मृतीस वंदन करूनच पुढे जाणे हितकारक ठरेल.
जनाब हीबाब अलाहिदा यांना मराठी भाषेचा इतका पुळका का? याचे कोडे अनेकांना उलगडले नाही. कारण उघड आहे. अलाहिदासाहेबांचे नावच मुदलात फारसे कुणाला माहीत नसल्याने असे होते. अलाहिदासाहेब जहांगीर बाश्शाच्या दरबारातील एक रत्न होते. प्रवासाच्या निमित्ताने ते त्या काळी महाराष्ट्रात येऊन गेल्याचे आढळून येते. अर्थात तसा थेट पुरावा नाही, कारण तेव्हा महाराष्ट्राचा मंगलकलश आणण्यात आला नव्हता. संयुक्त महाराष्ट्र चळवळीनेही म्हणावे तसे बाळसे धरले नव्हते. तरीही अलाहिदासाहेबांचे पुर्जे तपासत असताना आम्हाला एक्या कोपऱ्यात ‘राकेल चौदा आणे’ असा बारीक अक्षरात लिहिलेला हिशोब आढळला. ‘जहांगीर बाश्शाच्या काळी राकेल कुठे होते?’, अशी शंका आमचे थोरले सुपुत्र चि. बभ्रुवाहन तथा कुवलयापीड याने व्यक्त केली. पण अलाहिदासाहेब असे खोटे कसे लिहितील असे वाटून आम्ही त्याच्याकडे सपशेल दुर्लक्ष केले. अलाहिदासाहेब पुण्यात बुधवारात आणि मुंबईस पठ्ठे बापुराव मार्गावर आणि बेळगावच्या बोगारवेशीत येऊन गेल्याचे त्यांच्या रुमालांवरून दिसते. या सगळय़ा मुशाफिरीत त्यांनी नगद रुपये साडेसतरा (त्या काळी!) खर्च केल्याचेही दिसून येते. त्यांची अखेर इथेच मुंबईत झाल्याचीही एक शक्यता आहे. कारण ग्रॅण्ट रोडचा कोणता तरी डागतर हरामखोर असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. आता मुंबईत इतके डागतर आहेत, की नेमक्या कुठल्या डागतराबद्दल त्यांनी हे म्हटले, हे समाजायला काही मार्ग नाही!
अलाहिदासाहेबांच्या एका दस्तावेजात चक्क त्यांनी ‘हम दिल दे चुके सनम’ अशा ओळी लिहिल्या आहेत! संजय लीला भन्साळीने सरळ सरळ त्या आपल्या चित्रपटासाठी उचलल्या! हे गैर आहे. तसे पत्र आम्ही भन्साळी यास पाठवले, पण साधी पोच देण्याचे सौजन्य त्या गृहस्थाला नाही. असो. त्यांच्या रुमालातील एक चित्र पाहून तर आम्ही थक्क झालो. अर्श आशियानी जहापन्हां शहेनशहा जहांगीर यांच्यासह बसलेल्या बेगमेच्या चित्राखाली चक्क बिपाशा असे लिहिलेले वाचून आम्ही साफ उडालो! अलाहिदासाहेबांना भविष्याचे किती प्रगाढ ज्ञान होते, हेच यावरून सिद्ध होत नाही का? इतकेच नव्हे, तर जहांगीर बादशहांच्या चित्राखाली बभ्रुवाहन असेही लिहिले आहे, हे पाहून आम्ही बुचकळय़ातच पडलो. अशा या हरहुन्नरी, द्रष्टय़ा अलाहिदासाहेबांच्या संशोधनावर आधारीत असे आमचे मराठी भाषेसंबंधी निष्कर्ष आहेत. वाचक ते गांभीर्याने घेतील, अशी आशा आहे.
आपण ज्यांना मराठी म्हणतो त्यांची व्याख्या करण्याचे जे काही प्रयत्न चालू असतात, त्याला तोड नाही. महाराष्ट्रात राहातो, तो मराठी अशी एक व्याख्या आहे. मराठी बोलतो तो मराठी अशी दुसरी व्याख्या आहे. हिंदी बोलतो तो मराठी अशीही एक व्याख्या आहे! जो मराठी सोडून काहीही बोलतो, तो मराठी अशीही एक महत्त्वाची व्याख्या आहे. या साऱ्या व्याख्यांचा लसावि काढला तर फक्त एकच माणूस मराठी असल्याचा निष्कर्ष निघतो. तो म्हणजे स्वत एकमेव राजसाहेब ठाकरे!! तसे आमचे सन्मित्र श्रीमान उध्दोजी बाळाजी आणि महाराष्ट्राचे पितामह जे की दस्तुरखुद्द बाळासाहेब यांचे देखील नाव घ्यावे लागेल. किंबहुना गेले जवळपास अर्धशतक या ठाकरे कुटुंबियांनी मराठीच्या विकासासाठी इतके भरीव बांधकाम करून ठेवले आहे की यंव रे यंव! एकप्रकारे या कुटुंबास मराठी भाषेचे विकासक (डेव्हलपर या अर्थाने!) हे बिरूद सन्मानाने द्यायला हवे. त्यांच्या कामामुळे मराठी भाषेचे कल्याण झाले, असा त्याचा अर्थ नव्हे. कुठल्याही विकासकाचे काम बांधकाम करण्याचे आणि ते घरगरजूंना विकणे हे असते. पब्लिकच्या गरजा पूर्ण करणे आणि त्यांचे कल्याण करणे हा त्यांचा उद्देश असणे शक्य नाही. त्याअर्थी मराठीचा विकास खूप लोकांनी केला आहे. अनेक अज्ञजन मराठी भाषेच्या विकासाचे श्रेय आचार्य अत्रे, पुल देशपांडे, कुसुमाग्रज आदी लेखक मंडळींना देतात. पण हे केवळ हास्यास्पद विधान झाले. या लेखक मंडळींनी तेच केले, जे संतांनी या महाराष्ट्रभूमीत केले. मराठी भाषेने यांना आधार दिला, म्हणून हे मोठे झाले. आता आमचेच पाहा ना! आम्ही मराठी भाषेच्या विकासासाठी आजवर काही म्हणता काहीही केलेले नाही. मराठी भाषेसाठीच नव्हे तर घरातही इकडची काडी कधी तिकडे केली नाही! पण तरीही आमचा विचार पद्मश्रीसाठी गेली सोळा वर्षे चालू आहे, असे आम्हाला सांगण्यात येते. चालावयाचेच. जया अंगी मोठेपण तया यातना कठीण!!
कमी अधिक प्रमाणात मराठीच्या विकासासाठी प्रत्येक मराठी माणूस आपापल्या परीने हातभार लावत असतो. आपल्या पोरांना इंग्रजी माध्यमांच्या शाळेत घालून मराठी शाळा बंद पाडण्याचे सत्कार्य त्यांच्या हातून होते आहे. मराठी शाळांमध्ये काहीही मराठीचा विकास वगैरे होत नाही. मराठी शाळांना काहीही अर्थ नाही, हे आम्ही तब्बल सोळा वर्षांच्या शालेय जीवनानंतर नक्कीच सांगू शकतो. अशा शाळा बंद पाडणे हे महत्कार्य आहेच, ते पुण्याकर्मदेखील आहे. पालकवर्गाने इंग्रजी शाळांची कास धरली, ती यामुळेच. मराठीचा यामुळे खूपच उत्कर्ष आपोआप झाला, असे आमचे मत आहे. इंग्रजीच्या अधिकाधिक वापरानेच मराठी माणूस प्रगतीपथावर जाईल, व त्यायोगे मराठी भाषादेखील आपोआप समृद्धीच्या वाटेवर वाटचाल करू लागेल असा आमचा सिद्धांत आहे. आजकाल टीव्ही मालिकांपासून ते वृत्तपत्रांपर्यत सर्वत्र चुकीचे मराठी वापरले जाते. तसेच मराठी समृद्ध मराठी घरांमध्ये वापरले जाते. असे भयानक मराठी वापरण्यापेक्षा ही भाषा न वापरता तिचे जतन अधिक चांगल्या पद्धतीने होऊ शकते, यात आमच्या मनी तरी शंका नाही. असो.
लेखाच्या प्रारंभी आम्ही अलाहिदासाहेबांच्या ज्या दोन काव्यपंक्ती उद्धृत केल्या आहेत, त्याचा अर्थ तसा प्रवाही, सुलभ आणि स्वच्छ आहे. (हे भलते कशाचे वर्णन वाटते का? जाऊ द्या!) सर्वप्रथम आपण या काव्यपंक्तींच्या अर्थाकडे जाऊ.
‘रहम रहनुमा मरगठ्ठ अस्सी’ या पहिल्याच काव्यपंक्तीचा अर्थ अगदीच उघड आहे. तरीही हे मराठीविषयक संशोधन असल्याने त्याबाबत मतभेदही तीव्र आहेत. ऐंशी मराठय़ांकडे रहम याने की दयेची भीक मागणाऱ्या एका शरणार्थीचे वचन कवीने यात वर्णिलेले आहे, असे आमचे संशोधन सांगते. आता हे मराठे ऐंशीच का? शंभर किंवा पंच्याहत्तर का नाहीत? असा सवाल काही विद्वानांनी केला. त्यास आम्ही अर्थातच सबळ पुरावे आणि युक्तिवादाच्या आधारे सडेतोड उत्तर दिले. हा सवाल मुदलातच अज्ञानमूलक आहे. उपरोल्लेखित मराठे हे रहनुमा म्हणजे प्रवासी होते. मराठी माणूस अगदी गरज पडेल तेव्हाच आपले गाव नि घर सोडणारा असा असला तरी यदाकदाचित बाहेर पडलाच तर केसरी, सचिन, राजाराणी अशा ट्रावेल कंपन्यांसोबत प्राय: जातो. आता आग्य््राास जाणारी गाडी ही अशी मराठी ट्रावेल कंपनीने बुक केलेली असू शकते. रेल्वेच्या बोगीत एकंदरीत शहात्तर बर्थ कम सिटा उपलब्ध असतात. शहात्तर कम चार स्वच्छतागृहे असे मिळून ऐंशीजणांचा हिशेब लागतो. मराठे ऐंशी का होते हे कोडेही येथे उलगडते. परंतु खरी मेख आहे ती यापुढील ओळीत. ‘भागो तुरंतम पीनेकू लस्सी’ या ओळीत मराठीपणाचे सारे सार आले आहे, असे आमचे नम्र मत आहे. वाटेतील मराठी वाटसरूंनी आपापले डबे (खाण्याचे!) सोडले असतील. झणझणीत मिरच्यांचा ठेचा आणि भाकरीचा दर्वळ सुटला असेल. भर आग्य््राात मिरचीचा ठेचा काय करू शकतो हे का आम्ही सांगायला हवे? आणि मिरचीच्या ठेच्यावर उतारा ताकाचा हेही आम्ही का (उघड) बोलायला हवे? मिरचीचा ठेचा वानगी म्हणून उत्तरेतील काही पांथस्थांना दिल्यानंतर त्यांची अवस्था बिकट होऊन ते लस्सी शोधत फिरत असल्यास नवल ते काय? आग्रा येथे जाऊन मराठी माणसांने काय काय प्रताप गाजवले आहेत, याची सहीसही कल्पना या दोन ओळींवरून येते. खरे की नाही? या प्रकारानंतर तब्बल तीनचारशे वर्षांनी आलमगीर औरंगझेबाच्या नजरकैदेतून शिवाजी महाराज पळाले. महाराज मिठाईच्या पेटाऱ्यात बसून पळाले असे इतिहास सांगतो. परंतु त्यांनी हा मिरचीचा प्रयोग करून मोगलांच्या गोटातील लस्सीच्या आठवणी जाग्या केल्या असत्या तर इतिहासास वेगळे वळण लागले असते यात शंका नाही. असो.
हीबाब अलाहिदा यांचे कार्यकर्तृत्व आणि प्रतिभा यांचे वर्णन पुरेसे झाले आहे. याच अलाहिदासाहेबांनी मराठी भाषेचा जन्म, विकास आणि मृत्यू याचे भाकित करून ठेवले आहे. त्याचा परामर्श आपण येथे घेऊ. सुमारे सातव्या शतकाच्या प्रारंभी आणि सहाव्या शतकानंतर लगेचच एका अज्ञात इसमाने एक शिलालेख कोरून ठेवला. हा इसम चांगलाच नंबरी मराठी असला पाहिजे असे आमचे आताशा मत झाले आहे. अमूक अमूक काम जो कोणी करणार नाही, त्याच्या मातोश्रींविषयी अनुदार उद्गार या शिलालेखात काढण्यात येऊन गाढव या शुद्ध गाढव प्राण्याचाही त्यात उल्लेख होता. हा शिलालेख मराठीचा पहिला लिखित पुरावा मानला जातो. अर्थात आम्हाला हे मान्य नाही. कारण सहजासहजी आम्ही काहीच मान्य करत नाही! शिलालेख कुठल्या शतकातला आहे, यावर मराठी भाषेचे जन्मसाल निश्चित करणे आम्ही अज्ञानीपणाचेच मानतो. उदाहरणार्थ आम्ही यत्ता सातवीत असताना १९७८ सालचे क्यालेण्डरचे पान वहीला कव्हरसाठी वापरले, तर आम्ही १९७७ साली सातवीत होतो, असा निष्कर्ष काढणे योग्य ठरेल का? अर्थातच नाही. कारण उघड आहे. आम्ही १९७६ ते ८१ इतकी वर्षे यत्ता सातवीत काढली. (येथेच आम्हाला इतिहासाची गोडी लागली! असो!!) सांगावयाचा मुद्दा हा की शिलालेख कोठला यावर मराठी भाषेचा जन्म ठरू नये, असे आम्ही वारंवार सांगत होतो. सातव्या शतकात जो शिलालेख सापडला, तसे अनेक शिलालेख नंतर सापडू लागले. प्रत्येक शिळेवर एकाच टाइपची बेकार शिवी कोरलेली!! यास गधेगाळीचा शिलालेख असे नाव पडले. महाराष्ट्रात असे गधेगाळीचे इतके दगड सापडले की या महाराष्ट्राला उद्देशून ‘राकट देशा, कणखर देशा, दगडांच्या देशा’ अशा काव्यपंक्ती राम गणेश गडकरी नावाच्या एका कवीस लिहाव्या लागल्या. हे गडकरी नावाचेच होते. पेशाने मास्तर होते. उपजीविका म्हणून नाटके लिहीत. कविताही लिहीत. पण ती उपजीविका नव्हती. कारण तेव्हा लिज्जत वगैरे पापडांवर कविता लिहिण्याची पद्धत नव्हती. काव्यवाचनाचे जाहीर कार्यक्रमही होत नसत. आजकाल कवी असतो तो एक संगीत दिग्दर्शक पकडतो. किंवा संगीत दिग्दर्शक असतो, तो एक नव्या दमाचा कवी पकडतो. दोघं मिळून कार्यक्रम वाजवत महाराष्ट्रभर फिरतात. कविताही खपते. गाणीही खपतात. दोघांचेही बरे चालते. राम गणेशांच्या काळी हे काहीही नव्हते. परंतु त्यांना सकस लिहिण्याची अट होती. असो. मुद्दा दगडांचा, आय मीन शिलालेखांचा आहे. असे गधेगाळीचे दगड सापडून सापडून इतके सापडले की नंतर साधा दगड शोधून सापडेना! पुढे मग खरोष्ठी, प्राकृत वगैरे भाषेबद्दल अमूप संशोधन होऊन मराठी भाषेचा उगम म्हणून एका दगडाकडे बोट दाखवले गेले. मराठी भाषेचा जन्म असा दगडात झाल्याची वाचकांनी नोंद घ्यावी. यानंतर विकास असा काहीच झाला नाही, जे काही झाले ते थेट आमचे मित्र राजसाहेब ठाकरे यांनी केले! त्यांच्या नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी अशाच छोटेखानी दगडांचाच वापर करून अमराठी दुकानदारांच्या दुकानाच्या काचा फोडल्या. मराठीच्या विकासात दगड हे एक महत्त्वाचे माध्यम गेले तेराशेहून अधिक वर्षे आपली भूमिका टणकपणे वठवत आहे, हेच यावरून सिद्ध होते. मध्ये ज्ञानेश्वरी, अभंगगाथा वगैरे संतसाहित्य निर्माण झाले, त्याचे काय, असा प्रश्न आम्हाला काही विद्वानांनी विचारला असता आम्ही म्हणालो की संतसाहित्याने आध्यात्माच्या क्षेत्रात काही कामगिरी केली असेल, पण मराठी भाषेला त्यांचा काहीच उपयोग झालेला नसून उलटपक्षी आपला अजेण्डा चालवण्यासाठी त्यांना सशक्त भाषा मिळाली, असेच आम्ही म्हणू. सांप्रत मराठी भाषेचा जन्म ही एकमेव एक्सायटिंग अशी गोष्ट घडली, पुढे मराठीच्या वाटय़ाला राजकारणाखेरीज काहीही आले नाही, ही वस्तुस्थिती आाहे. आमचे श्रीमान मित्र जे की राजसाहेब ठाकरे यांनी मराठी भाषेच्या पुनरुत्थानासाठी तमाम उत्तर भारतीयांच्या कानफटात मारण्याची जी लाइन सुरू केली, त्याला तोड नव्हती. कानफटात मारणे हे मराठी भाषेचेच एक अंग आहे. गधेगाळ ऐकवण्यापेक्षा कानफटात मारणे, ही बरीच सौम्य प्रतिक्रिया मानली पाहिजे. मराठीचा जन्म अशा अशा शिलालेखातून झालेला आहे, असे जरी भय्यालोकांना सोदाहरण पटवून दिले, तरी निमूटपणे ते मुंबई बेळगाव निप्प्पाणीसह संयुक्त महाराष्ट्र सोडून जातील, याबद्दल आमचे मनी तरी कोणतीही शंका नाही.
मराठी भाषेचा मृत्यू येत्या काही वर्षांत होईल, असे काही लोक म्हणतात. हे काही लोक भयंकर असतात. ते काहीही बोलतात. आम्हाला विचाराल तर मराठी भाषेला अजून तीस वर्षे तरी मरण नाही. आमच्या सहस्त्रचंद्रदर्शनाला तेवढा अवधी आहेच. इत्यलम-
Comments
Post a Comment