आय जस्ट लव्ह मराठी
दरवर्षी मराठी दिन आला की मराठी दिनाचा टिपिकल प्रोग्रॅम समोर येतो. झाडून सगळ्या न्यूजपेपर्समध्ये कुणा एकाला तरी मराठीचं काय होणार असा गहन प्रश्न पडलेला असतो. ते नाही का मध्ये नॉस्ट्रॅडॅमसच्या भविष्यविषयक पुस्तकाची हवा तयार झाली होती. तेव्हा जो उठेल तो रोज एक नवी तारीख सांगायचा की अमक्या अमक्या तारखेला जगबुडी होणार रे होणार. पण काय झालं ? झाली का जगबुडी? काही नाही. उलट आपण आता तो इश्यूच विसरलो.
ह्या सो कॉल्ड मराठी भाषाप्रेमींचंही थोडं अधिक असंच आहे, नाही का? दरवर्षी असंच भाषा मरते मरते म्हणून ओरड होते आणि मग नेहमीप्रमाणे सगळे आरोप येऊन शेकतात ते आजच्या तरुण पिढीवर. आजची तरूण पिढी शुद्ध मराठी बोलतच नाही. त्यांच्या मराठी बोलण्यात मराठीपेक्षा इंग्रजीच जास्त असतं. आजची पिढी नेमकी कोणत्या भाषेत बोलते हेच कळत नाही. सारंच अर्धवट आहे. मराठी, हिंदी आणि इंग्रजी अशा तिन्ही भाषांमधून आजची पिढी बोलतेय. याच्या पुढची पिढी तर कदाचित मराठीतून बोलणारच नाही. मग भाषा जिवंत राहील कशी?
थोडक्यात आजची पिढी मराठी जिवंत ठेवणार नाही.. येत्या काही वर्षांमध्येच मराठीचा अस्त झालेला असेल असं मराठी साहित्याच्या कानाकोपऱ्यातून ठासून सांगितलं जातंय.
पण भाषा मरते म्हणजे नेमकं काय होतं हे कोणी आजच्या पिढीला समजावून सांगेल का?
मराठी भाषेपुरतं बोलायचं झालं तर मराठीतले अनेक शब्द आज वापरले जात नाहीत. तसंही मराठीमध्ये सध्या वापरले जाणारे सगळे शब्द संपूर्णपणे मराठी आहेत असं कुठे आहे? मराठीतही अनेक शब्द फारसी, संस्कृत यांसारख्या भाषांमधून आलेले
आहेत. तारीख, कारकून यांसारखे अगदी मराठी भासणारे अनेक शब्दही मूळ फारसी शब्द आहेत. गंमत म्हणजे आपल्याकडल्या शिव्याही इतर भाषांमधून तशाच्या तशा किंवा काही बदल होऊन आल्या आहेत. याचेच एक उदाहरण म्हणजे डँबिस ही शिवी. आपण पारतंत्र्यात असताना इंग्रज लोक भारतीय लोकांना शिव्या घालताना डॅम बीस्ट म्हणायचे. आणि त्या डॅम बीस्टचंच मराठीकरण म्हणजे आजचा ‘डँबिस’हा शब्द. मग इतकं सगळं ेअसताना मराठी बोलताना सगळे मराठीच शब्द वापरावेत असा अट्टहास का? बोलताना हिंदी, इंग्रजी शब्दांचा वापर केला तर लगेच भाषा मरते का? अगदी पुढच्या शंभर वर्षांचा वगैरे विचार करायचा झाला तर मराठी व्यवहारातून बाद होण्याची शक्यता मान्य आहे. पण घराघरामध्ये होणारा तिचा वावर संपेल असं मात्र वाटत नाही.
आजचा तरुण वर्ग ज्या प्रमाणात हॅरी पॉटर वाचतो त्या प्रमाणात कदाचित महाराष्ट्राचे लाडके लेखक असलेल्या पुलंचं लेखन त्याने वाचलं नसेल. पण त्यांचं लेखन वाचलं नाही म्हणजे मराठी मेली का? पुल, गोनिदा न वाचलेल्यांनीही संदीप खरे मनापासून ऐकला आहे. या आजच्या पिढीतल्या काही जणांना मराठीमध्ये छान कविता आहेत याची ओळख कदाचित संदीप खरेंच्या कवितांनी घडवली आहे आणि त्या कविता ऐकल्यावर मराठीतल्या इतर कविता वाचण्याचा उलटा प्रवास सुरू झाला आहे. म्हणजे संदीप खरे वाचून झाल्यावर आता कवी ग्रेस किंवा सुरेश भट वाचावसं या पिढीला वाटायला लागणं हा आशेचा किरण आमचं मराठीवर प्रेम आहे हे सिद्ध करायला पुरेसा नाही का?
आजही आम्ही पुस्तकांच्या दुकानांमध्ये जाऊन मराठी पुस्तकं विकत घेतो. फुटपाथवर पन्नास आणि शंभर रुपयांत मिळणाऱ्या इंग्रजी नॉव्हेल्सच्या तुलनेत कदाचित मराठी पुस्तकांची विक्री खूपच कमी प्रमाणात होत असेल. ही विक्री अगदी नगण्यही असेल पण तरीही जी पुस्तकं विकली जातात ती पुस्तकं तरुण पिढी विकत घेतेय ही बाब दिलासादायक नाही का? छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी, छावा, नेताजी सुभाषचंद्र बोस अशा ऐतिहासिक कादंबऱ्या अजूनही विकल्या जातात. ‘शाळा’सारख्या कादंबऱ्या घेण्यासाठी कॉन्व्हेन्टमध्ये शिकलेली मुलंही उत्सुक असतात हे पाहून तर मराठी भाषा आमची पिढी मारणार वगैरे टीकेचा विचारही करावासा वाटत नाही. ही पुस्तक आजच्या पिढीपर्यंत पोहोचणं हे सुद्धा महत्त्वाचं आहे. मराठी भाषेतल्या साहित्याचा हा खजिना या पिढय़ांपर्यंत पोहोचला म्हणून आजही हे साहित्य विकत घेण्यासाठी तरुण मुलं पुस्तकांच्या दुकानांमध्ये येत आहेत.
कदाचित आजच्या उगवत्या पिढय़ा फास्टर फेणे, गोटय़ा, चिंगी असं काही हातातही घेणार नाहीत. पण मग याचा अर्थ त्यांना मराठीच आवडत नाही का? किंवा त्यांनी मराठी सोडलंय असा आहे का? ही पुस्तकं त्यांचं डे टुडे लाईफ रिफ्लेक्ट करत नाही मग त्यांना ती का जवळची वाटावी हा विचार नाहीच येऊ शकत का? पण एकूणच पुस्तकं वाचण्याची अॅलर्जी या प्रॉब्लेमवर काही इतर सोल्युशन नाहीच का? त्या साहित्याचं ऑडिओ बुकमध्ये रूपांतर करून हे साहित्य टिकवता येणार नाही का? या पिढय़ांना वाचनामध्ये वेळ घालवण्यापेक्षा थोडय़ा वेळात अधिक मिळेल अशा माध्यमाचा अर्थात ऑडिओ-व्हिज्युअल माध्यमाचा वापर करणं जास्त आवडतं. मराठी मृत्युपंथाला लागली असं रडत बसण्यापेक्षा या माध्यमांचा वापर करून हा खजिना पुढच्या पिढय़ांकडे सोपवण्याचा विचार आणि कृती का होत नाही? बदलत्या काळानुसार सहज-सोपे बदल स्वीकारण्याचा विचार का घडत नाही? असे काही प्रश्न मराठीवर प्रेम करणाऱ्या आजच्या पिढीला पडले आहेत.
शुद्धलेखन-अशुद्धलेखन यासंदर्भात तर आजच्या पिढीवर मोठी टीका होते. ऱ्हस्व-दीर्घ लक्षात राहणं खरंच खूप गरजेचं आहे का? असं ऱ्हस्व काय नि दीर्घ काय, कोणती वेलांटी नि कोणता उकार यामुळे आम्हाला फारसा फरक पडत नाही. ऱ्हस्व-दीर्घ योग्य पद्धतीने लिहिता आलं तर छानच नाही तर त्यामुळे अडत काहीच नाही. वयाच्या पाचव्या आणि सहाव्या वर्षांपासून कम्प्युटरवर लिहायला सुरुवात केल्यावर बिचारा कम्प्युटरच आमचं स्पेलिंग सुधारायला शिकला. त्यामुळे आमचं स्पेलिंग आयतं सुधारून मिळण्याची सोय झाली. शाळेमध्ये असताना स्पेिलग पाठ करणं ही मार्काची गरज या पलीकडे आम्हाला जाणीवच नव्हती. स्पेलिंग चुकल्याने मार्क जातात एवढा समज आमच्यामध्ये रुजला आणि त्या मार्काच्या मागे धावता-धावता भाषेचं सौंदर्य जपणं काय असतं हेच आम्हाला कधी कळलं नाही. तेवढी मॅच्युरिटी जेव्हा आली तेव्हा आम्ही ते समजून घेण्याचा नक्कीच प्रयत्न करतोय. पण आमच्या आजूबाजूला अशीही अनेक मुलं आहेत ज्यांना अजूनही भाषेचं सौंदर्य काय असतं हे कळलेलं नाही. जी पिढी आमच्यावर टीका करत आहे की, आजची पिढीच मराठी मृत्युपंथाला लागण्यासाठी कारणीभूत आहे, त्या पिढीने कधी आजच्या पिढीला हे भाषेचं सौंदर्य समजावून देण्यासाठी प्रयत्न केला आहे? योग्य स्पेलिंग्ज आणि शुद्धलेखनामुळे भाषेचं सौंदर्य जोपासलं जातं हा विचार पटत नाही. एसएमएसच्या माध्यमातून फॉरवर्ड होणाऱ्या मराठी चारोळ्या, शायरी यामधूनही आम्ही भाषा जपतोय. एसएमएस करताना तर मराठी शब्दही इंग्रजीतून लिहिला जातो. तो एसएमएस वाचताना स्पेलिंग बरोबर आहे का, त्या शब्दाचा शॉर्टफॉर्म वापरलाय का किंवा लिहिलेला शब्द शुद्ध-अशुद्ध आहे का हा विचार मनात येत नाही. तिथे महत्त्वाची असते ती भावना. त्या एसएमएसच्या माध्यमातून काय एक्स्प्रेस झालंय हे महत्त्वाचं असतं. सणांना तर हटकून मराठी एसएमएस फॉरवर्ड केले जातात. नॉन मराठी मंडळीही खास मराठी एसएमएस पाठवतात. एखादी मराठी कविता छान वाटली, एखादा मराठीतलं वाक्य छान वाटलं तर ते मुद्दाम मित्रमंडळींमध्ये शेअर केलं जातंय. मराठी संस्कृती जपण्याचा हा आजच्या पिढीचा प्रयत्न टीकाकारांना खरंच दिसत नाही का? आणि हटकून मराठी ग्रीटिंग्ज घेण्याचा प्रयत्न.. मराठी कवितांमधून फीलिंग्ज जास्त चांगल्या पद्धतीने एक्स्प्रेस केले जातात, या कविता इंग्रजी ग्रीटिंग्जमधल्या मेसेजेसपेक्षा जास्त क्लोझ-टु-हार्ट आहे असं वाटतं म्हणूनच मराठी ग्रीटिंग्ज घेण्याचा हा आजच्या तरुणांचा अट्टहास..
मराठी कॅलिग्राफीही आता फुल फॉर्ममध्ये आहे. टी-शर्टवर मराठीतल्या श्रेष्ठ आणि ज्येष्ठ कवींच्या रचना कॅलिग्राफी फॉर्ममध्ये तरुण हौसेनं छातीवर मिरवतायत.
भाषा शुद्ध असावी ही इच्छा आम्हाला मान्य आहे पण तो जेव्हा अतिआग्रह होतो तेव्हा त्यापासून पळ काढण्याचे मार्ग शोधले जातात. म्हणजे मराठी भाषा बोलायची असेल तर शुद्धच बोला नाही तर बोलू नका अशी अट जर घातली तर मराठी न बोलण्याचा पर्याय स्वीकारला जाईल. खरं तर सोयीस्कर शब्द वापरूनही भाषा टिकतेय ना मग मराठीच शब्द वापरावेत हा आग्रह का? म्हणजे कम्प्युटर या शब्दाला संगणक असा मराठीतला चांगला आणि सोपा शब्द आहे. पण लहानपणापासून जेव्हा कम्प्युटर हा शब्द वापरला जातो तेव्हा हा सवयीचा झालेला शब्द सोडून दर वेळी जाणून-बुजून संगणक हा शब्द वापरणं कठीण आणि अवघड होतं. हा शब्द शोधण्यासाठी प्रयत्न करावे लागतात आणि त्या प्रयत्नांमध्ये कदाचित जे एक्स्प्रेस करायचंय ते हरवून जातं. पादचारी मार्ग या शब्दाला फुटपाथ असा सोपा शब्द आपण रोजच्या व्यवहारात वापरतो ना त्याचप्रमाणे इतर शब्दही वापरले जातात. असे इंग्रजी किंवा हिंदी शब्द सहजपणे एक्स्प्रेस व्हायला मदत करत असतील तर केवळ मराठीतले शब्द नाहीत असं म्हणून त्यावर आक्षेप का घ्यायचा? एखादी भाषा वापरायला जेवढी सोपी तेवढी ती वापरण्याचं प्रमाण जास्त असतं. संस्कृतप्रचुर मराठीपासून आजची तरुण पिढीची मराठी असा बराच मोठा आणि थक्क करणारा प्रवास या भाषेने केलाय. संस्कृतप्रचुर मराठी आता वापरात नाही म्हणून आक्षेप घेतला जात नाही. मग मराठी बोलताना किंवा लिहिताना इंग्रजी आणि हिंदी शब्द वापरून भाषा जर प्रवाही रूप धारण करत असेल तर तिला असं का अडवायचं? त्या भाषेला कुंपणं का घालायची? अशी कुंपणं घातल्याने साचलेपण नाही का येणार त्या भाषेला? भाषेचा इतिहास तर असं सांगतो की भाषा ही कोणा एकाची किंवा कोणत्या एकाच ठिकाणावरूनची नसतेच मुळी वापरणाऱ्या लोकांच्या कम्फर्टप्रमाणे त्यात शब्दांची भेसळ होत जाते. मग आधी सांगितल्याप्रमाणे संस्कृत किंवा फारसीमधून आलेल्या शब्दांमुळे आपली भाषा मरणपंथाला लागली का? की तिचे सौंदर्य कमी झाले? नाही ना? मग आत्ताच अशी ओरड का? कशासाठी?
एखाद्या मित्र-मैत्रिणीची खूप आठवण येतेय हे त्याला किंवा तिला सांगताना तुला मिस करतेय किंवा करतोय असं सांगणं आम्हाला अधिक नैसर्गिक वाटतंय. तुझी खूप आठवण येतेय हे सांगणं थोडंस बोअरिंग वाटतंय. मुद्दाम मराठी शब्दांचा केलेला वापर आम्हाला भाषेचं सौंदर्य बिघडवणारा वाटतोय. हा वापर आम्हाला कृत्रिम वाटतोय. म्हणजे मोबाइलला भ्रमणध्वनी म्हणणं जसं अवजड वाटेल तसंच काहीसं.. असे अंगावर येणारे शब्द ऐकले की त्या शब्दांपासून आणि काही वेळा त्या भाषेपासूनही पळून जावंसं वाटतं. यात खरंच काही गैर आहे का? असे शब्द जर मुद्दाम लादले गेले तर त्यापासून पळून जावंसं का वाटणार नाही?
मला मराठी भाषा आवडते किंबहुना माझं मराठी भाषेवर प्रेम आहे असं सांगताना हे वाक्य मी मराठीत म्हटलं काय आणि आय जस्ट लव्ह मराठी असं इंग्रजीत म्हटलं.. फरक काय पडतो. ती भाषा आम्ही वापरतोय हे महत्त्वाचं आहे ना? मराठीतलं चांगलं पुस्तक किंवा एखादा छानसा लेख वाचल्यावर कोणाला तरी ते पुस्तक किंवा तो लेख वाच असं आवर्जून आमची पिढीही सांगतेय. कधी तरी नेटथ्रू मुद्दाम त्याची पीडीएफ फाइल करून ते मेल्स अनेकांना पाठवले जातात. मराठीतलं एखादं छानसं गाणं ऐकल्यावर मुद्दाम ते नेटवर जाऊन डाऊनलोड केलं जातंय. ऑर्कुट, फेसबुकवरच्या मराठी कट्टय़ांवर आवर्जून उपस्थिती लावली जातेय. एखादा न कळलेला मराठी शब्द समजून घेण्याचा कधी तरी प्रयत्नही होतोय. भाषेवर असं आजच्या काळानुसार केलेलं प्रेम भाषेच्या मृत्यूला कारणीभूत ठरेल का? आमच्या पिढीचं उत्तर तरी ठाम नाही असंच आहे.
आमची ही तरुण पिढी मल्टिलिंग्वल आहे. आम्ही मराठी, हिंदी, इंग्रजी अशा तिन्ही भाषांत कम्फर्टेबल असतो. याचं कारण आम्ही शाळेत एक भाषा बोलतो, कॉलेजमध्ये दुसरी, तर ऑफीसमध्ये तिसरी, आणि घरात वापरली जाणारी आपल्या बाण्याची आपली बोली तर आहेच. यामुळे बोलताना कधी कधी गोंधळही उडतो. एका भाषेत बोलताना दुसऱ्याच भाषेतले शब्द आठवतात. पण हेही तितकंच खरं आहे की या सगळ्या भाषा येण्यामुळे आम्ही तेवढय़ा सगळ्या भाषिकांशी सहज जोडले जातो. मग हे विश्वची माझे घर म्हणणाऱ्या मराठी भाषिकांचाच या लिंक अपला विरोध का? भाषेच्या संवर्धनाबाबत जागृत जरूर राहूया पण मग असा इनसिक्युरिटीचा आततायी सूर कशाला?
मराठी भाषा व्यवहारातून नामशेष होऊ नये यासाठी आमच्या पिढीकडून थोडे अधिक प्रयत्न व्हायला हवेत हे मान्य. थोडे वाचनसंस्कार आम्हीही पुढच्या पिढय़ांपर्यंत पोहोचवायला हवेत. पण यासाठी चांगलं साहित्य कोणतं, कोणतं साहित्य भाषेवर अधिक संस्कार करू शकेल, भाषेचा कोणत्या पद्धतीने व्यायाम केल्याने बोली भाषाही अधिक समृद्ध होईल यासाठी आधीच्या पिढय़ांकडून योग्य मार्गदर्शन मिळणं आवश्यक आहे. भाषा टिकवण्यासाठी केवळ आग्रह आणि अट्टहास उपयोगाचे नाहीत. आत्ताची पिढी आणि आधीची अनुभवी पिढी यांच्या कम्बाईन्ड एफर्टस्मधून ही भाषा बहरत राहील. थोडय़ा नव्या गोष्टी आम्ही शिकतोय, थोडं तुम्ही अॅडजस्ट करा, एवढीच छोटीशी रिक्वेस्ट.
Comments
Post a Comment