मराठी मनातला गोंधळ
प्रत्येकालाच आपली भाषा प्रिय असते. पण सध्याचं भाषेवरून चाललेलं राजकारण पाहता नेमकं कळत नाही की आपण आपल्या भाषेचा बाळगतो तो अभिमान आहे की दुराभिमान?
भाषा ही आपल्या संस्कृतीचा महत्त्वाचा घटक वगैरे असते, असं म्हणतात. पण संस्कृती ही आपल्या वेगळ्या अस्तित्वाची ओळखच ना? मग या संस्कृतीवर दुसऱ्या संस्कृतीचं आक्रमण, म्हणजे आपल्या अस्तित्वालाच धोका, असं समजलं तर कुठं काय बिघडलं? दुसऱ्या एखाद्या भाषेचं आपल्या भाषेवर आक्रमण होत असेल तर साहजिकच एक प्रकारची अस्वस्थता निर्माण होते. आपली अस्मिता जपण्यासाठी धडपड सुरू होते. प्रसंगी त्याचं रूपांतर वादात होतं.
यातूनच पुढे युद्ध वगैरे झाल्याची उदाहरणंही आमच्या तरुण पिढीच्या तोंडावर फेकली जातात. पण त्याला आम्ही काय करायचं? पंगा नको, म्हणून अतिक्रमण सहन करायचं?
त्यात हल्ली आम्हाला ग्लोबलायझेशनचं एक नवं लेबल चिकटलंय. काय म्हणे तर जागतिकीकरणामुळं जग जवळ आलंय.
वर प्रसारमाध्यमांची आणि संवादाची क्रांती झालीय म्हणे. हे असे शब्द वापरणारे पुढे जाऊन असंही सांगतात की सांस्कृतिक देवाण-घेवाण वगैरे सुरू झालीय. सब झूठ! अशी देवाण-घेवाण होत असती तर युद्ध आणि दहशतवाद राहिला असता का? हे सगळे भाषणबाज लोकांचे फंडे आहेत.
जागतिकीकरणाच्या रेटय़ात सर्वात पहिला आघात होतोय तो भाषेवर. त्यातूनच भाषावाद जोर धरू लागल्याचं चित्र दिसतंय. आमची भाषा आम्ही जगवतोय की मारतोय तो आमचा प्रश्न झाला. पण तुम्ही तुमची भाषा आमच्यावर लादणारे टिक्कोजीराव कोण?
महाराष्ट्रातही गेल्या काही वर्षांत मराठीच्या मुद्दयावरून रणकंदन सुरू आहे. आम्ही इतकी वर्षे गुपचूप अपमान सहन केला. इथे तर आता आमच्याच विधिमंडळात शपथ घेण्याच्या भाषेवरून लोक आमचा अपमान करू लागलेत. या आक्रमणामुळे निर्माण झालेली अस्वस्थतेची वाफ आम्ही अशीच दवडायची का?
आज जगभरात मराठी बोलणाऱ्यांची संख्या १० कोटीच्या घरात आहे. या दहा कोटी लोकांसाठी मराठी ही केवळ भाषा नाही तर ती त्यांची अस्मिता आहे, अभिमान आहे. आता आम्हाला थेट ज्ञानदेवांचा दाखला देत काही लोक सांगतात की ‘हे विश्वची माझे घर’ असं म्हणा. म्हणून आम्ही लगेच ग्लोबल व्हायचं का? आमच्या तुक्याची गाथा देणारी इंद्रायणी.. टाळांचे बोल.. चंद्रभागेच्या वाळूत रुतणारे पाय.. पुरण पोळीतला गोडवा.. बहिणाबाईंचा शब्द.. जात्यावर फिरणारी ओवी.. सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यातला इतिहास .. शिवनेरीपासून रायगडापर्यंतचा पराक्रम.. पानपतावर सांडलेलं रक्त.. संयुक्त महाराष्ट्रासाठीची आहुती.. या साऱ्यातलं मराठीपण आम्ही विसरून जायचं का? संस्कृतीच्या प्रत्येक प्रतिकात मराठी दडलीय. या सगळ्या प्रतिकांचा हुंकार म्हणजे मराठी भाषा, हे आम्ही लक्षातच घ्यायचं नाही?
गेली तेराशे वर्षे मराठी मनामनात सगळ्यांच्या गर्दीत आपलं अस्तित्व टिकविणारी ही मराठी भाषा आज शेवटच्या घटका मोजतेय, असं कुणी म्हटलं तर आमचा विश्वास लगेच बसणारच. महाराष्ट्राच्या राजधानीतच ती आपल्या अस्तित्वासाठी झगडतेय. व्यवहारातून तर ती हद्दपार होतेय. मराठी कुटुंबातील पालकांना आपली मुलं इंग्रजी माध्यमातून शिकून साहेब व्हावीत असं वाटतं. त्यामुळं मुलांच्या अभ्यासातूनही मराठी हद्दपार होतेय. ती व्यवहारात नाही आणि ज्ञानासाठीही उपयोगाची नाही तर ती जगणार कशी? ही भाषाच राहिली नाही तर उद्या आपली ही संस्कृती राहील का? आपल्या कित्येक पिढय़ांनी कष्टानं निर्माण केलेलं आपलं अस्तित्व टिकेल का? अनेक प्रश्न मनात खदखदतायत.
मुलांच्या एका वाक्यात दोन शब्द दुसऱ्या भाषेतले असतात. इंग्रजी आणि हिंदीतले असंख्य शब्द मराठीत सर्रास वापरले जात आहेत. आधीच वाचन संस्कृती कमी, त्यात मराठी तरुणांना साहित्य वाचण्यात रस राहिलेला नाही. मुंबईची मातृभाषा मराठी, पण आज हिंदी ही येथील व्यवहाराची भाषा झालीय. मराठी माणूसच समोरच्याशी बोलताना मराठीत बोलत नाही, अशी खंत व्यक्त होतेय. मग मराठीसाठी लढणाऱ्यांनी तलवार उपसली तर काय बिघडलं?
दक्षिणेकडील राज्य आपल्या मातृभाषेबद्दल कर्मठ आहेत. तिथे हिंदी चालत नाही. चीनने आपली भाषा जपण्यासाठी कितीतरी प्रयत्न केले. जगाला आपली भाषा शिकून घ्यायला भाग पाडलं आणि शिवाय संगणकाची भाषाही बदलायला लावली. तेव्हा कुठे त्यांनी आंतरराष्ट्रीय कंपन्यांना आपल्या मातीत पाय ठेवू दिला. पण आम्ही आमच्या भाषेबाबत कठोर वागलो तर मात्र गुंड ठरतो. भाषेबद्दल आग्रही नाही राहिलो तर मग भाषा टिकणार कशी?
भाषेच्या अस्तिवाचा मुद्दा उपस्थित करून मराठीच्या भवितव्याविषयीच्या वांझोटय़ा चिंता व्यक्त करण्यातच आम्ही हयात घालवायची का? आपली भाषा टिकली पाहिजे अन् त्यासाठी काहीतरी करायला हवं असं वाटणंही आता चुकीचं ठरू लागलंय का?
एकीकडे मराठीचं अस्तित्व धोक्यात आल्याचं जे मत आहे, तो केवळ कांगावा आहे, असंही आम्हाला पटवून पटवून सांगितलं जातं. मराठीच्या १३०० वर्षांंच्या इतिहासात येथे मुघलांपासून इंग्रजांपर्यंत अनेकांनी आक्रमणे केली. त्या त्या वेळच्या सत्ताधाऱ्यांच्या भाषेचा प्रभाव मराठी भाषेवर होत राहिला म्हणे. उर्दू, इंग्रजी आणि फारसी या भाषांचा मराठीवर अधिक प्रभाव जाणवतो. पण म्हणून नाकापेक्षा मोती जड होऊ द्यायचा का?
अनेक परकीय शब्द मराठीत आले आणि पुढे ते रुढही झाले. इतके की ते शब्द नेमके कोणते आहेत हे आपल्याला आज सहज कळतही नाहीत. तसं बाराव्या शतकातलं मराठी आजच्या पिढीला कदाचित कळणारही नाही. ती जुनी भाषा खूप अवघड वाटेल. त्या भाषेपेक्षा आज आपण जी भाषा बोलतो ती आपल्याला जास्त प्रिय वाटते. पण मग याचा अर्थ मराठी बदलली की बुडाली?
मराठीच्या शुद्धीसाठी अनेकांनी प्रयत्न केलेत. सावरकरांनी तर अनेक पर्यायी शब्द सुचवून ते प्रचलित केले. हे शब्द आल्यामुळे मराठीचं काही वाईट झालं का? उलट ती सोपी झाली. पण तो एका प्रचंड विद्वत्ता असलेल्या शब्दप्रभूने केलेला यशस्वी प्रयोग होता. त्यानंतर अनेकांनी काही इंग्रजी शब्दांची मोडतोड करून किंवा थेट इंग्रजी शब्दच प्रचलित करण्याचा प्रयत्न केला.
अशा अतिक्रमणाला कायम स्वरूपी हिरवा कंदिल द्यायचा का? शब्द पचवणं आणि संस्कृतीने दूषित होणं यात फरक करायचाच नाही का? आज मराठी भाषेत येणाऱ्या नवीन शब्दांना किंवा प्रवाही अर्थांना नाही तर त्यामागोमाग चोरपावलांनी येणाऱ्या संस्कृतीला आम्ही विरोध करतो. ती संस्कृती संपेल या आरोपाला काही अर्थ उरत नाही का?
भाषा ही जर नदीसारखी सदैव प्रवाही असते, तर या नदीला दूषित करणारे नाले येऊन मिळणार नाहीत याची तर खबरदारी घ्यायला नको? की नदीने तसाच प्रवाह सुरू ठेवायचा आणि त्या दूषित प्रवाहातही ती समृद्धच होतेय असं मानून घेत राहायचं?
हीच माणसं खऱ्या नदीच्या शुद्धीकरण प्रकल्पाला अनुमोदन देतात, पण भाषेच्या शुद्धीबद्दल मात्र विरुद्ध भूमिका घेतात. काळाच्या ओघात मराठीने स्वत:मध्ये अनेक बदल स्वीकारले. पण त्यामुळे ती टिकून राहिली हे खरं की ती ती प्रदूषित झाली हे खरं? काहीच कळायला मार्ग नाही.
असंही सांगितलं जातं की आजपर्यंत जगात अनेक भाषा उदयाला आल्या आणि काळाच्या ओघात त्या मागेही पडल्या. ग्रीक आणि संस्कृत या भाषांपासून अनेक नवीन भाषा तयार झाल्या. पण त्या वापरल्या जात नाहीत म्हणून रडत बसायचं का? आणि त्या भाषा गेल्या म्हणून या देशाची संस्कृती नष्ट झाली का? संस्कृतला आम्ही देववाणी म्हणून तिच्यावर शिक्का लावला त्यामुळे ती भाषा सामान्यांची होऊ शकली नाही परिणामी ती मागे पडली. आज ती प्रचलित नाही म्हणून संस्कृती नष्ट झाली का, असंही पटवून द्यायचा प्रयत्न केला जातो. आणि आम्ही तरूण आणखीनच गोंधळतो.
एकीकडे मराठीत नवे शब्द आले म्हणून ती कुणाच्या नजरेत दूषित होत असली तरी आजच्या पिढीनं ते स्वीकारलय. त्यांच्यापुढं जगातल्या सगळ्या भाषांची, ज्ञानाची भांडारं खुली आहेत. त्यांना हवी असणारी प्रत्येक गोष्ट ते स्वीकारत आहेत. जग झपाटय़ानं बदलतंय. नवीन गोष्टी आत्मसात गेल्या जात आहेत. त्यामुळं अनेक गोष्टी मागे पडताहेत. संस्कृतीची देवाण-घेवाण होत आहे. ज्याला जे हवं आहे ते स्वीकारून नको असणाऱ्या गोष्टी सोडून दिल्या जात आहेत. याला भाषाही अपवाद नाही. अनेक भाषा बोलीभाषा इतिहासजमा होताहेत. तर अनेक नव्या भाषा, बोली उदयाला येताहेत.
पण तरुणांनी नेमकं काय करायचं ते कुणी सांगत नाही. एकीकडे भाषांचं वैभव टिकवायचं ओझंही तरुण पिढीवर टाकलं जातं. त्यांना शुद्ध भाषा येत नाही म्हणून दूषणंही द्यायची. आपली भाषा-संस्कृती टिकवून पुन्हा ग्लोबलायझेशनमध्ये टिकूनही राहायचं आणि वर आपल्या भाषेचा अभिमान बाळगूून त्यांनी कुणाशी पंगा घेतला तर गुंड म्हणून संभावनाही करायची. ही कुठली नीती? या भाषेच्या प्रश्नावर नेमकं काय करावं हे काही कळेनासंच झालंय.
भाषेकडं केवळ संवादाचं माध्यम म्हणून पाहिलं तर भाषेचे प्रश्न निर्माण होणार नाहीत, हे मान्य. पण जर त्यात अस्मिता, अहंकार आणि अभिमान आणला तर त्यातून अनेक प्रश्न निर्माण होतात, असं तरी कशाला मानायचं?
सगळ्याच गोष्टी आपण सोईनुसार वापरत असतो. पण अशा तीन-तीन भाषा सोयीने वापरायचं बंधन आमच्याच पिढीवर का? इंग्रजी ही ज्ञानभाषा आहे, ती शिकावी तर लागतेच. हिंदी तर आम्ही युपीवाल्यांची म्हणून कधी बघितलीच नव्हती. बॉलिवूडची भाषा म्हणून ती आमची होती. मराठी तर आम्ही आमचीच गृहित धरून ठेवली होती. तिच्यात अभिमानासारखं काही असतं हे कुणी डिवचेपर्यंत आम्हाला कळलंही नव्हतं. शेअर बाजाराची भाषा म्हणून गुजराथीचं आकर्षण होतं. वर शाळा-कॉलेजात संस्कृत आणि फ्रेंच-जर्मनचा धांडोळाही घेऊन झाला होता. बहुभाषिक असणं म्हणजे प्रज्ञावान असणं हा संस्कार घेऊन मध्यमवर्गीय कुटुंबात वाढलो आणि आता हे असे भाषेचे अभिमान घेऊन जगणं जरा अवघडल्यासारखंही वाटतंय.
शेवटी भाषा नेमकी कशासाठी हे कुणी आम्हाला समजावून का सांगत नाही? भाषा ही अभिमानासाठी की दुराग्रहासाठी की राजकारणासाठी की संस्कृतीसाठी की संवादासाठी? कुणी तरी समजावून सांगेल काय?
एक दिवस मराठी भाषा मरेल असं सांगितलं जातंय तर दुसऱ्या बाजूला हा केवळ देखावा आहे उगाच या विषयाच बागूलबुवा केला जातोय. कुठे मरतेय मराठी भाषा, उलट ती समृद्ध होतेय, वाढतेय. आज ती सातासमुद्रापार निघालीय असं सांगितलं जातयं. काहीजण मराठीसाठी रस्त्यावर उतरताहेत तर काहींना आपण स्वतच हे विश्वची माझे घर म्हणाणाऱ्या भाषेला आणि स्वतला संकुचित करत आहोत असं वाटतं. मराठीला वाचवा म्हणाऱ्यांना आजच्या पिढीची भाषा इंग्रजाळलेली वाटते. तर नव्या गोष्टी न स्वीकारताकालच्या गोष्टींनाच बिलगून बसणं आजच्या नव्या पिढीला मंजूर नाही. जग बदलतंय, आम्हीही बदलतोय, जे जे चांगलं ते ते स्वीकारू म्हणणाऱ्यांवर मराठी बुडविण्याचा आरोप होतोय. यातलं खरं काय? कुणाची बाजू बरोबर आणि कुणाची चूक हे ठरविताना मराठी तरुणाच्या मनात गोंधळ उडालेला आहे.
Comments
Post a Comment