अट्टल- किशोर पाठक


परवापरवाची गोष्ट. संक्रांतीला विदांना एका कार्यक्रमाचं निमंत्रण देण्यासाठी मुंबईत गेलो. फक्त ब्याण्णव वर्षांचे तृप्त विदा. कायम स्वत:त मग्न नजर. तळाचा वेध घेत जाणारी. खास कोकणी तुकतुकीत रंग. वय उतरत गेलेलं तरीही चेहऱ्यावर, शरीरावर दुधावरच्या घट्ट सायीसारखी घनदाट कांती. पांढरी बंडी, गोल ढोपरावर सरकलेला लेंगा आणि थकलेला धीरगंभीर अनुनासिक स्वर !
पहिला प्रश्न, 'जेवलात?'
नंतर पाणी. तब्येतीमुळे कार्यक्रमास येण्यास नम्र नकार. नंतर म्हणाले, 'तीळगूळ घेऊन जा.'
संथ चालीत स्वत: चालत विदा आत गेले. तीळगुळाचा लाडू हातावर ठेवला. मी नमस्कार केला. म्हणाले, 'नमस्कार करू नका.'
म्हटलं, 'का? असे पाय आता कमी आहेत ज्यांच्यावर डोकं टेकावं.'
तसे म्हणाले, 'सांगतो. डोकं टेकावं अशी माणसं तीनच ! एक साने गुरुजी, दुसरे सेनापती बापट, तिसरे बाबा आमटे !'
नंतर क्षणभर थांबले आणि म्हणाले, 'बाकीचे आहेत पण नमस्कार केल्यावर हात धुवून घ्यावे लागतात...'
हा खास विदांचा स्पर्श, रोखठोक, शब्दांना खरबरीत करणारा, भावनांना कोरडेपणा नाही तर नेमकेपणाने धार देणारा, खमक्या आणि अट्टल हे परवलीचे शब्द प्रेमाने वापरणारा आणि जगणारा, मुक्तीमधले मोल हरवले म्हणता म्हणता मोल, अमोल जपणारा !
विदांनी नव्वदीच्या घरात कवितालेखन बंद केलं. अमृतमहोत्सवात माणसं रुसलेल्या अक्षरांना वारंवार बोलावून त्यांना बळेबळेच पुस्तकात कोंबतात आणि त्यावर अमृताच्या थेंबाचा स्प्रे मारतात. परंतु, 'मी आता लेखन बंद केलंय' हे म्हणण्याचं धाडस विदाच करू शकले आणि अष्टदर्शनाच्या अदभुत रचनेने ज्ञानपीठाचं स्वागत घरी केलं. मराठीतल्या ज्ञानपीठाची गंमतच आहे. ज्या तिघांना मिळाले ते तिघेही ऋषीच ! भौतिक मानसन्मान आणि पुरस्कारांबाबत उदासीन, मिळाले तर कृतज्ञ ! कुठे धावधाव नाही, इतरांचा पत्ता कापून स्वत:ला सन्मान चिटकवणं नाही परंतु माणसांशी अपार जवळीक असलेले.
विदांचा हा वेगळेपणा सर्वांना अचंबित करणारा. सुमाताईंच्या 'रास'मध्ये विदांच्या तऱ्हेवाईकपणाचे, व्यावहारिक घासाघीस करण्याचे प्रसंग आहेत. ते त्यांनाच शोभतात. एरवी भाजीवाल्याशी भाव करणाऱ्या विदांनी इतरांना इतकं मुक्तहस्ते वाटलं की 'कबीर सन्मान' सार्थ व्हावा. हीच रोखठोक माया त्यांनी शब्दांवर केली म्हणूनच 'तुझी माझी धाव आहे दातापासून दाताकडे' हे ते लिहू शकले.
शब्दांचं रूप, आशय, आकार, रंग, गंध, लय, ताल ह्यांचं अमोघ, अप्रूप असलेले विदा शब्दांशी विलक्षण दंगामस्ती करत आणि आशय पक्क्या पाकासारखा गोटीबंद रूपात बाहेर येई. त्याला अंगभूत जाणिवेचा प्रखरपणा असायचा तशीच लडिवाळ मायेची शाल असायची.
विदांची कविता निर्वस्त्र होऊन भोगावी. मन नि:संग होऊन झोकून, सोपवून द्यावं त्या विशाल शब्दरूपाला मग बघावं विदा कसे घुसतात ते ! त्यांच्याच शब्दात सांगायचं तर
'पाहिजेत शब्द । विश्वाला आवळणारे ।
अणूला उचलणारे । रक्तात मिसळणारे ।
गरोदर मातेला लागतात डोहाळे ।
सगुण शब्दांचे ।।'
विदांचा प्रत्येक कवितासंग्रह नवं काव्यरूप घेऊन आला. त्याने छंद आशयाची मोडतोड तर केलीच परंतु त्या शब्दांना अर्थाची नवी जोड देऊन अदभुत कलाकृती निर्माण केल्या. त्यांना विरूपातून अरूप आणि सरूप केलं विदांनी आणि तेही बिनदिक्कतपणे, न घाबरता. त्यामुळे गणपतीच्या विरुपिकेने उठलेल्या वादळांमधेही विदा 'अट्टल' राहिले. समाजधुरिणांचा कडवट विरोध सहन करताना शब्दांमधली आग, विखार, विचार, हेटाळणी, शिव्याशाप सारं सारं अनुभवत राहिले. म्हणत राहिले,
'देणाऱ्याने देत जावे।
घेणाऱ्याने घेत जावे ।'
कारण ह्याच अनुभवातला तोच तोच पणा विदांनी अनुभवला.
'तोच पलंग, तीच नारी ।
सतार नव्हे एकतारी ।'
या साध्या ओळींमधलं रांगडं वास्तव विदा मांडत राहिले.
सर्वांशी खेटून आपल्याच मस्तीत राहणारे विदा सदानंद रेग्यांशी जवळीक साधतात. 'येतो का मस्ती करायला' हा बालसुलभ खोडकरपणा आणि खोडी काढण्याची वृत्ती विदांच्या लेखणीत आहेच. म्हणूनच ते म्हणतात,
'जो बाटलीत आहे,
आहेच तो बुचात ।'
हे सत्य नास्तिकाच्या डोक्यात हाणतो मी ।
विदांनी कवितांमधले सगळे प्रकार वापरले, कुस्करले, अभावितपणे आले ते घेतले आणि आशयाचं मानगूट धरून 'फॉर्म' सोडून चालत राहिले. मग अभंग, गझल, मुक्तछंद ह्या साऱ्या बाबी त्यांना बाह्यरूपाशी झुंजत राहाव्या अशा कधी वाटल्याच नाहीत म्हणून अभंगांनाही त्यांनी शेक्सपीअरला भेटवलं. विल्यमची आणि तुक्याची भेट थेट उराउरी घालण्याचं वेगळं कसब आणि प्रतिभेची अजोड ताकद विदांचीच होती. एरवी या दोन व्यक्तींची भेट घडवून देणारा 'दुभाषी' तेवढ्याच ताकदीचा हवा. 'उरातले थेट उरामध्ये' घालण्याची समर्थता विदांची होती.
अनुभवाने परिपूर्ण भिजून ते ओवीचे होतात. अभंगात निरूपण होतात, गझलेत शेर होतात, मुक्तछंदात वाघ होतात, यंत्रांची कळ दाबून त्यांना माणसांच्या तालावर चालायला लावतात, मुलांचं बोट पकडून एटू लोकांच्या देशात जाऊन येतात, कोकणातल्या आजीचे गरे आणि अमसुलाच्या आंबट तुरट गोड चवीने कुळागारात फिरत राहतात.
केवळ कवितेत विदा थांबले नाहीत. त्यांच्यात गो. वि. करंदीकर होते. त्यांच्या समिक्षेला आकाशाचा अर्थ प्राप्त झाला. अरिस्टॉटलचे काव्यशास्त्र, परंपरा आणि नवता, अमृतानुभवाचे अर्वाचिनीकरण, राजा लिअर ही गद्यपरंपरा मराठी भाषेला आणि वाङ्मयीन घराण्याला बाळसेदार करून गेली.
विदांनी लेखकाची आणि लेखनाची मस्ती पुरेपूर अनुभवली. एरवी हट्टी, हेकेखोर, तुसडा, व्यवहारी, भांडखोर असा वाटणारा हा माणूस मित्रांमध्ये विलक्षण खुलायचा.
सभा-संमेलनांमध्ये विदा, बापट आणि पाडगावकर दोघांबरोबर कायम वावरले. परंतु त्यांचा खाक्या काही औरच असायचा. जेव्हा पब्लिक खो खो हसायची तेव्हा ते बारीक नजरेने न्याहाळत राहायचे आणि चष्म्याच्या काचांवरून 'असं का?' अशा आविर्भावात पहायचे.
विदांना एकदा एकाने सहज विचारले, 'तुम्ही गावोगावी कवितावाचन करता. हजारात मानधन घेता आणि दोन चार कविता ऐकवता हे कसं?' विदा ठणकावून म्हणाले, 'मी जे मानधन घेतो ते माझ्या कविता वाचण्याचे नाही, माझ्या सोबतच्या इतरांच्या कविता ऐकण्याचं मी मानधन घेतो.'
पाडगावकर, बापट, विदा हा 'ट्रिपल डोस'. तो एकदम घ्यायचा असं गमतीनं लोक म्हणत. परंतु यातील विदांची मात्रा वेगळीच होती. बापट- पाडगावकरांची बाळं दिसायला गोंडस लडिवाळपणे रसिकांना बिलगत, परंतु विंदांचं बाळ मुळातच द्वाड. त्याला जवळ केलं तर मिशी ओढणार, चिमटे घेणार ! आधी तोंड स्वच्छ धुवा, नवतेच्या चुळा भरा, परंपरांची मिस्त्री लावणं बंद करा आणि तोंडाचा वास येतो दूर रहा हे ठणकावून सांगणारी कविता !
कविता वाचणं, अनुभवणं याचा कठोर अनुभव घ्यायचा असेल तर विदा नावाच्या खडकावर झुंज घ्यावी. जसजशा धडका देत रहावं तसतशी विदांची कविता छिलक्यांनी रक्तबंबाळ करीत जगण्याचा भीषण आशय उघडा करते. बेगडी सामाजिक वास्तवाच्या गराड्यातून, पोचट प्रेमकवितांच्या संकरातून, प्रतिमांच्या गिर्रेबाज विळख्यातून, तोंडपुज्या वाहवाच्या धाकातून, सभा-संमेलनांच्या भूल देणाऱ्या व्यापातून, वेगळेपण गिळंकृत करणाऱ्या वाङ्मयीन मठांपासून, स्वत:ची टिमकी वाजविणाऱ्यांपासून विदा सतत वेगळे, दूरदर्शी आणि सारं पचवून व्रतस्थ राहिले.
साहित्य संमेलनांच्या राजकीय उरूसात ते यायचे परंतु कविता सोडून कशात नसायचे. त्यांनी कधीच पदाचे आमिष बाळगून हिरीरीने गट उभे केले नाहीत. त्यांचा गट हा 'मी तर बाबा पछाडलेला' असा कवितांनी पछाडलेल्यांचा होता. तो अस्सल होता म्हणून इतक्या लोकांमध्ये वावरूनही त्यांची कविता ही तळहातावरच्या तेजस्वी सूर्यबिबाच्या प्रतिमेसारखी अम्लान, ओजस्वी, अटळ राहिली. कबीर, जनस्थान, ज्ञानपीठ असे मोठमोठाले पुरस्कार सन्मान दारात येऊनही ते मांडवाखाली सारे विसरून खऱ्या साध्या माणसाशी खेळत राहिले. तालावर टाळी देत राहिले. समेवर झुलत राहिले.
ते गेले, जातानाही मागे बरंच काही ठेवून गेले ! आयुष्यभर पुरावे असे निर्भीड शब्दांचे घट्ट श्वास, नकार देण्याची हिमत असलेली अक्षरं आणि खादीच्या शर्टाआड असलेलं विराट प्रेमळ आकाश ! विदांच्याच शब्दात सांगायचं तर,
त्याचे ते अस्ताव्यस्त गहनगाज शब्द
ओळींच्या चिमटीत सापडले नाहीत
म्हणून कापू नका, रक्त येईल
त्याच्या शब्दांना प्रत्येक अक्षर जामीन आहे- किशोर पाठक

Comments

Popular posts from this blog

आई -तृतीय पुण्यस्मरण

आठवण आईची-पाचवे पुण्यस्मरण

आई-चतुर्थ पुण्यस्मरण