'मरतुकड्या' समाजाची भाषा कशी जगेल?- अनंत सामंत


प्रश्नांची मांडणी आपण नेहमीच चुकीच्या दिशेने करीत असतो. भाषेचे जतन, संवर्धन आपण कसे करणार? भाषा समाजाचे संवर्धन करीत असते. त्यामुळे समाजाचे जतन, संवर्धन झाले की आपोआपच भाषेचेही जतन, संवर्धन होते.
भाषेमुळे समाजाची संस्कृती तयार होते. तो समाज प्रगल्भ होतो. भाषेमुळेच त्याला प्रेरणा मिळते. जो समाज आपली भाषा सोडतो तो त्याच्या अस्तित्वालाच मुकतो.
आईच्या हातचे जेवण नाकारून, घरचे जेवण सोडून जो केवळ फास्टफूडवरच जगतो त्याच्या अंगावर अनावश्यक सूज वाढते. अकाली मृत्यूलाही त्याला सामोरे जावे लागते. ज्यावर तुमचे भरण-पोषण होते तसेच परिणाम तुम्हाला पाहायला मिळतात.
आईच्या हातच्या जेवणाचे महत्त्व वेगळे सांगण्याची गरज नाही; पण स्वत:च्या जीवनाचे महत्त्व कळणेही गरजेचे आहे.
ज्या समाजात आपण राहतो तो समाज टिकवा, त्याचे संवर्धन करा. भाषेचे जतन, संवर्धन करण्याची गरजच राहणार नाही. ते आपोआपच होईल.
समाजातील काही घटक, तरुण पिढी काही वेळा समाजापासून वेगळे व्हायला लागतात. असे का व्हावे?
- समाजाला अभिमान वाटावा असे काहीतरी त्या समाजात सापडले पाहिजे. तसे काहीच जर सापडले नाही, तसे आदर्श व्यक्तीला समाजातून मिळाले नाहीत तर तो त्यापासून दूर जाऊ लागतो.
समाजालाही असे काही तरी द्या, ज्यामुळे तो समाज, त्यातल्या व्यक्ती उभ्या राहतील.
याआधीच्या काळात असे आदर्श होते, अभिमान वाटावा असे साहित्य निर्माण होत होते. पण आज काय दिसते?
- पैसा हेच सर्वस्व झाले आहे.
सत्ता, संपत्ती, वैभव.. याशिवाय अन्य कोणत्या गोष्टींना आज समाजात सन्मान मिळताना दिसतो आहे?
कुठलेही क्षेत्र घ्या, कुठलेही उदाहरण घ्या, व्यासपीठावर 'सन्माननीय' म्हणून ज्या व्यक्ती बसलेल्या दिसतात, त्यातील किती माणसे सत्ता-संपत्ती-अधिकार यातले काहीही नसताना 'सन्माननीय स्थानी' पोचलेली असतात?
कवितांचा खून पाडणारी माणसे आज साहित्य संमेलनांच्या व्यासपीठावर मिरवताना दिसतात, रस्त्यावरच्या माणसांना यमसदनी पाठवणारे सुपरस्टार होतात.
अशा समाजाकडून अपेक्षा बाळगणेच चुकीचे नाही का?
- राजा आणि माध्यमे याबाबतीत निश्चितपणे काही करू शकतात.
बादशहा अकबराने शास्त्रीय संगीत, भाषेला प्रोत्साहन दिले, राजाश्रय दिला. त्यामुळे शास्त्रीय संगीताचा प्रचार, प्रसार झाला.
'यथा राजा तथा प्रजा' आणि 'यथा प्रजा तथा राजा' !
दोन्हीही बाजूंनी हे खरे आहे.
समाजात जर 'आदर्श' असतील तरच व्यक्तीला त्या समाजाबद्दल आत्मीयता वाटेल, आपुलकी वाटेल. आपणही त्याच समाजाचा एक घटक आहोत याबद्दल अभिमान वाटेल आणि त्या समाजाला जगवावे, वृद्धिगत करावे याविषयीची जाणीव, कळकळ त्याच्या मनात निर्माण होईल.
अभिमान वाटाव्या अशा कोणत्याच गोष्टी व्यक्तीला आपल्या समाजात आढळल्या नाहीत, तर तो आपोआपच त्या समाजापासून दूर जायला लागतो. ज्या समाजात असे 'आदर्श' त्याला सापडतील, दिसतील त्या समाजाकडे तो वळतो. असे झाले की तो समाज, ती भाषा त्या दुसऱ्या समाजात लुप्त होते, संपते- अनंत सामंत

Comments

Popular posts from this blog

आई -तृतीय पुण्यस्मरण

आठवण आईची-पाचवे पुण्यस्मरण

आई-चतुर्थ पुण्यस्मरण