चटका


सोमवार हा आठवड्यातील पहिला दिवस जरा जास्त घाईगडबडीचा असतोच . तसा  तो २९ जुलै २०१३ला पण होताच. या गडबडीत दुपारी बायकोचा फोन आला तो आमच्या सोसायटीत ट्रान्सफार्मर किंवा तत्सम कशाचा तरी प्रचंड मोठ्या आवाजानिशी  स्फोट झाला हे सांगण्यासाठी .  थोडा वेळ कोणालाच कसे काही कळाले नाही आणि त्या प्रसंगी तिथे उपस्थित असलेले सर्वजण कसे हादरले /घाबरून सैरावैरा वाट मिळेल तसे कसे पळत सुटले वगैरे .पण त्या नंतर जे काही वर्णन तिने सांगितले ते ऐकून क्षणभर अंगावर काटा आला आणि नेमके काय झाले असावे याविषयी तर्क-वितर्कांचे चक्र डोक्यात सुरु झाले. तिने कोणाला तरी पाठमोरे;पेटलेल्या अवस्थेत  आणि जीवाच्या आकांताने ओरडत पळतांना बघितले . त्या वेळी तिचे अवसान गळाले आणि जो मानसिक धक्का तिला बसला तो फोनवर बोलतांना पण स्पष्टपणे जाणवत होता पण नेमके काय  झाले असावे या विषयी काहीही माहिती तेव्हा मिळू शकली नाही .  विचार करता करताच ऑफीसची वेळ संपली  आणि घराकडे निघालो . सोसायटीत पोहचेपर्यंत मी पण नेमके काय झाले असावे याविषयी भीतीयुक्त उत्कंठा बाळगून होतो . तिथे पोहोचल्यावर कळल कि सोसायटीच्या मैला शुद्धीकरण प्रक्रिया प्रकल्पामध्ये  मिथेन गॅसच्या टाकीचा काहीतरी तांत्रिक कारणाने स्फोट झाला. त्या वेळी तिथे उपस्थित असलेल्या दुसऱ्या एका कर्मचार्याच्या माहितीनुसार   आमच्या   सोसायटीचे व्यवस्थापक  श्री. शंकर कामठे साहेब मैला उपसा करण्यासाठी विजेचा पंप सुरु करण्यासाठी सोसायटी ऑफिसला लागूनच  असलेल्या खोलीत शिरले. ते पंपाचे बटन दाबतात न  दाबतात तोच क्षणार्धात कानठळ्या बसविणारा आवाज होऊन गॅस टाकीचा स्फोट झाला आणि आगीचा लोळ उसळून अत्यंत जोराच्या झटक्यामुळे  कामठे साहेब काही फूट दूर ढकलले गेले.  त्यांच्या शरीराच्या पुढील भागाने पेट घेतला विशेषतः अंगावरच्या कपड्यामुळे कमरेच्यावर जरा जास्तच आग लागली होती आणि त्या त्रासामुळे ते विझवण्यासाठी  कामठे साहेब पळत होते . तेव्हा तिथे उपस्थित असलेले इतर कर्मचारी दोन -तीन कर्मचारी कामठे साहेबांच्या अंगाला लागलेली आग विझवण्याच्या प्रयत्नांत किरकोळ भाजले. एवढे सर्व कमी होते  म्हणून कि काय सोसायटी ऑफिस आणि जिथे स्फोट झाला त्या खोलीवरचा १५ बाय ४० फुटाचा ७"/८" सिमेंट -स्लॅब झटक्यात कोसळून पडला. त्या वेळी घरी असलेल्या काही सदनिका धारकांनी त्वरीत सर्व जखमी कर्मचार्याना जवळच्या इस्पितळात हलविले. या  दरम्यान स्फोट झाला त्या   मैला शुद्धीकरण प्रक्रिया प्रकल्पाच्या आजूबाजूला असलेल्या सद्निकामधील बहुतेक सभासद विशेषतः महिला आणि लहान मुले अत्यंत घाबरून आरडा-ओरडा करत  तळ  मजल्याकडे सैरावैरा पळत सुटली.काही घरातच दारे-खिडक्या घट्ट बंद करून भेदरून लपून बसली. स्फोटाचा आवाज काही किलोमीटर दूरवर ऐकू गेल्याचे कळले. घटनास्थळी जे काही दृश्य दिसले ते बघून प्रत्येकालाच धक्का बसला असेल कारण इतके दिवस सुरळीत काम चाललेल्या स्थळी असे सर्व जे काही घडले ते प्रथम दर्शनी अनपेक्षित आणि अकल्पनीय असेच होते. स्फोट झाला हे कळल्यावर घटनास्थळी पोलिस आले त्यांनी रीतसर पंचनामा वगैरे केला. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन महापौर आणि महापालिकेचे संबंधित विभागाचे अधिकारी भेट देऊन गेले.बातमी वर्तमानपत्र , खासगी वृत्तवाहिनीवर झळकली. चौकशीअंती  सोसायटीचा मैला शुद्धीकरण प्रक्रिया प्रकल्प  एक वर्षापासून बंदच असल्याचे कळाले.  सोसायटीचा कारभार हळू हळू का होईना पण सुरु झाला.  कामठे साहेब वगळता स्फोटात जखमी झालेल्या इतर कर्मचार्याना उपचारानंतर घरी सोडण्यात आले. कामठे साहेबांच्या जखमांचे स्वरूप पाहून डॉक्टरांनी तातडीने ऑपरेशन करण्याचा सल्ला दिला ज्याला सोसायटीच्या पदाधिकार्यांनी  लगेच मंजुरी दिली. दुसऱ्या -तिसऱ्या दिवशी  ऑपरेशन पार पडले आणि   कामठे साहेबांची तब्ब्येत हळूहळू सुधारत असल्याचे कळले. त्यामुळे सर्व सोसायटी सभासद  व कर्मचारी जरा चिंतेतून सावरल्यासारखे झाले. कारण कामठे साहेब फारच मन मिळाऊ आणि ऑफिसची काळ-वेळ वगैरे बाजूला ठेऊन सर्वाच्या अडी-नडीला धावून जात  असत. काही सभासदांच्या कुटुंबीयांसोबत  तर  त्यांचे अगदी जिव्हाळ्याचे संबंध होते. पण धोका अजून टळला नव्हता. सर्व जण  आपापल्या दैनंदिन कामात मग्न झाले. आणि ……आणि माघच्या शनिवारी ( दि . ३ ऑगस्ट २०१३)  पुन्हा एकदा दुपारी  बायकोचा फोन आला…. घडू नये आणि कळू नये ते वर्तमान घडले आणि कळले ………कामठे साहेब हे जग  सोडून गेल्याचे. आतल्या आत धस्स झाले मन सैर भैर झाले आणि नकळत हुंदका  दाटून आला. पुन्हा दिवसभर जीवाला हुरहूर लागून राहिली. माणूस नात्यागोत्यातला  असो व नसो पण  नेहमी आपल्या नजरेसमोर असला की आपण नमस्कार करून ख्याली विचारतोच. आणि त्यातूनच एक अनौपचारिक नाते प्रस्थापित होते त्यामुळेच कि काय फार वाईट वाटले, जीवाला चटका लागला. जन्माला  आलेला जीव एक ना एक दिवस अंतिम प्रवासाला जातोच जातो पण हे काही वय( ३५/३६ वर्ष ) नव्हते कामठे साहेबांचे जाण्याचे. सहजच मनात त्यांच्या कुटुंबाबद्दल विचार आला. त्यांच्या मागे आई वडील ,भाऊ ,दोन मुली आणि पत्नी आहे.बघता बघता कामठे साहेबांना  जाऊन आठ दिवस  झालेही.  वर्तमानपत्रात छापून आल्याप्रमाणे दोषी व्यक्ती /संस्थेवर कार्यवाही (?) करण्यात  येईल ही पण कामठे  साहेबांच्या कुटुंबियांचे झालेले नुकसान काही भरून काढता येणार नाही. परमेश्वर कामठे साहेबांच्या आत्म्याला शांती देवो आणि त्यांच्या कुटुंबियांना या प्रसंगातून सावरण्यासाठी सर्वपरी बळ  देवो हीच मनापासून प्रार्थना.          
     

Comments

Popular posts from this blog

आठवण आईची-पाचवे पुण्यस्मरण

आई -तृतीय पुण्यस्मरण

आई-चतुर्थ पुण्यस्मरण