जगातील सात विषारी आश्चर्ये

‘रशियातील चेर्नोबिल अणुभट्टी परिसराला भेट’, ‘ग्रेट पॅसिफिक गार्बेज पॅचचा फेरफटका’, ‘उजाड अ‍ॅमेझॉन जंगलातली सहल’, ‘चीनमधील ई-भंगारदर्शन’, ‘भारतातल्या (गटार) गंगा-यमुना नद्यांची परिक्रमा’, ‘कॅनडातल्या सँड ऑइल खाणींचं पर्यटन’, ‘टेक्सासमधल्या रिफायनरी व्हिला येथे फेरफटका’ अशा जाहिराती छापून आल्या तर कुणी सामान बांधून उत्साहानं प्रवासाला निघेल? पण  न्यूयॉर्कचा अँड्रय़ू ब्लॅकवेल हा तरुण पत्रकार व चित्रपट निर्माता अशा साहसी-पर्यटनाच्या मोहिमांसाठी नेहमीच तयार असतो. या विलक्षण व आगळ्यावेगळ्या अनुभवांवर त्यानं अलीकडेच एक पुस्तक लिहिलं आहे. मानवनिर्मित विषारी पदार्थाच्या विळख्यातल्या सात प्रदेशांत फिरून आल्याचा अनुभव त्याच्या या पुस्तकात वाचायला मिळतो. भारत, कॅनडा, चीन, रशिया व अमेरिका येथील ही ठिकाणं असून, एक चेर्नोबिलचा प्रतिबंधित परिसर व पॅसिफिक सागराचा पाण्यातला भाग सोडला तर इतर पाच ठिकाणी दाट मानवी वस्ती आहे.
२६ एप्रिल २०१२ रोजी रशियातल्या युक्रेनपासच्या चेर्नोबिल अणुभट्टीच्या दुर्घटनेला २६ वर्षे पूर्ण झाली. आता तिथं जिवावर उदार होऊन पर्यटन करू पाहणाऱ्या मंडळींसाठी पूर्ण तयारीनिशी एक दिवसाची सहल आयोजित केली जाते. अजून कमी मात्रेचा किरणोत्सार परिसरात असूनही साहसी मंडळी जातात आणि आपले अनुभव  इंटरनेटवर नोंदवतात. ब्लॅकवेलने मात्र अधिक काळ राहून आपले अनुभव व निरीक्षणे नोंदवली आहेत. अणुभट्टी फुटल्यावर ४ कि.मी. अंतरावरच्या प्रिप्य्रात या गावातली सुमारे ५०,००० माणसं २४ तासांत सुरक्षित जागी हलवण्यात आली. अणुभट्टीत काम करणाऱ्यांचीच ती वस्ती. त्या गावातल्या इमारती, उद्यानं, नदीकाठ व परिसरात लेखक वाचकांना फिरवून आणतो. प्रत्यक्ष स्फोटाच्या वेळचं वर्णन वाचताना आजही अंगावर काटा येतो. पुढं किरणोत्साराच्या प्रभावाखालचं ३० कि.मी. त्रिज्येचं क्षेत्र प्रतिबंधित म्हणून घोषित करण्यात आलं. रिअ‍ॅक्टर परिसरातल्या म्युझियममध्ये आग विझवणाऱ्या टीमचं शिल्प उभारण्यात आलं आहे. अणुभट्टीच्या फुटलेल्या प्रचंड घुमटाखाली जाऊन जिवावर उदार होऊन पाण्याचा फवारा मारणारे हे खरे हीरो काही आठवडय़ांतच मृत्युमुखी पडले. पण त्यांनी आपलं कर्तव्य बजावलं नसतं तर किरणोत्सार ८०० कि.मी. दूरवर पसरला असता. आजच्या ओसाड व उजाड परिसरात उगवलेली झाडं, नदीतलं पाणी, जलचर व वनचर पाहून ब्लॅकवेल स्तंभित होतो. स्फोटामुळे इथल्या परिसराला उपद्व्यापी माणसाच्या हस्तक्षेपविना आपल्या पद्धतीनं जगायला व वाढायला संधी मिळाली हा या स्फोटाचा साइड इफेक्ट आहे असं तो नोंदवतो.
‘ग्रेट पॅसिफिक गार्बेज पॅच’ या प्रकरणात एका पर्यावरणरक्षक व प्रेमीचमूबरोबरच्या तीन आठवडय़ांच्या सागरसफरीचं वर्णन आहे. सॅन फ्रॅन्सिस्कोपासून २००० मैल प्रवास केल्यावर प्रचंड मोठी कचराकुंडी असून, प्रवाह योग्य असेल तर तो प्लास्टिकचा समुद्र पाहावयास मिळतो. त्याचा एकूण आकार दोन टेक्सास राज्यांच्या भू-प्रदेशाइतका भरेल अशी वर्णनं वाचून ब्लॅकवेल या जलप्रवासात सामील होतो. इतका मोठा साठा काही पाहावयाला मिळत नाही. त्यामुळे निराश होऊन सॅन डिएगोच्या वाटेवर परतीच्या प्रवासाला लागतो खरा, पण निष्काळजीपणानं पाण्यात टाकून दिलेल्या वस्तू पाहून  सुन्न होतो. विघटन होऊ शकत नसलेल्या प्लास्टिकचे बारीक कण जलचरांच्या पोटातून आपल्याही पोटात येऊ शकतात या कल्पनेने अस्वस्थ होतो.
आपल्याकडेही काही वेगळी अवस्था नाही असा विचार मनात येत असतानाच गंगा-यमुना व कानपूर शहराच्या प्रकरणाशी आपण येऊन ठेपतो. इंटरनेटवरच्या बातम्या वाचून ब्लॅकवेल या प्रवासाची आखणी करतो. दिल्लीतले विद्वान पंडित, पर्यावरणवादी व प्रेमी तसेच गंगा शुद्धीकरण प्रकल्पाधिकारी यांच्याशी बोलतो. नदीकाठावर राहणाऱ्या, प्रदूषित पात्रावरच उपजीविका करणाऱ्या सामान्य जनांनाही भेटतो. ‘नदी प्रदूषण हटाव’वाल्यांच्या वृंदावन ते दिल्ली लाँग मार्चमध्ये सामील होऊन त्यांचा ‘गोरा कृष्ण’ बनतो. भारतीयांच्या गंगाप्रेमाला व गटारगंगेतलं पवित्र  पाणी गडू व कमंडलूत भरून घेण्याच्या मानसिकतेला मनोमन कुर्निसात करतो.
अ‍ॅमेझॉनच्या घनदाट जंगलात सर्वच काही मंगल नाहीए व सोयाबीनच्या लागवडीकरिता प्रचंड प्रमाणावरती झाडं तोडून जमीन निर्माण केली जात आहे, एवढं सबळ कारण ब्लॅकवेलसाठी पुरेसं ठरतं. जंगलाचे अनेक पैलू व विविधांगी ज्ञान  देण्यात तोयशस्वी झाला आहे.
चीनमधल्या कोळशाच्या खाणी व ई-कचऱ्याची विल्हेवाट लावणारी गावं हा आणखी एका साहसयात्रेचा विषय आहे. स्वस्त व मस्त असा चिनी माल घेऊन भलीमोठी जहाजं युरोप-अमेरिकेत व आशियातही जातात. परतताना जागोजागीचा ई-कचरा गोळा करून घेऊन जातात. कॉम्प्युटरचे भाग सुटे करून व वितळवून सोने व इतर उपयोगी धातू निराळे करण्याचे कुटिरोद्योग काही शहरांत चालतात. त्यातलं प्रमुख शहर लिन्फेन. तेथील शहरवासीयांना चेहरा झाकून वावरावं लागतं. त्यााची वर्णनं व विषारी धुराची छायाचित्रं नेटवर पाहून ब्लॅकवेल तिथं जाऊन थडकतो. त्याच्याबरोबर आपणही आठ-दहा वर्षांच्या सिगारेट पिणाऱ्या व मदर बोर्डावरचे सुटे भाग सफाईदारपणे उचकटणाऱ्या मुलांना भेटतो. अख्खा सर्किट बोर्ड उकळत्या सोल्डरवर धरल्यावर उसळणारी विषारी वाफ व तिचंच अधिराज्य असलेलं गाव पाहून आपणही हबकतो. शेजारीच हाँगकाँग- तैवानमधल्या फॅबमध्ये याचं उत्पादन होतं. तेव्हा घेतलेली पराकोटीची काळजी व स्वच्छता डोळ्यापुढे येऊन दोन्हीतला विरोधाभास स्पष्ट होतो.
शेवटची दोन प्रकरणं ही प्रत्येकाच्या जिव्हाळ्याची म्हणजे तेलाच्या थेंबाशी निगडित आहेत. एक अमेरिकेतलं तर दुसरं कॅनडातलं. टेक्सासमध्ये १९०१ मध्ये ल्युकास नावाच्या वेडय़ा पीराला तेलाची पहिली विहीर गवसली व आज तिथं रिफायनरीव्हिले नावाचं साम्राज्यच उभं राहिलं आहे. तिथं कच्चं तेल घेऊन येणारी जहाजं व प्रदूषण, कायद्यांना बगल देत पर्यावरणरक्षणाचं नाटक वठवणाऱ्या बडय़ा तेल कंपन्या, पक्षीप्रेमी व प्रदूषित पाण्यातही मच्छीमारी करणारे या सर्वाचीच दखल ब्लॅकवेलनं घेतलेली आहे. कॅनडामध्ये काही भागांत तेलानं माखलेल्या वाळूचे साठे आढळले आहेत. त्यासाठी डोंगर पोखरण्याचा अवाढव्य उद्योग सुरू झाला आहे. वाळूला चिकटलेलं तेल वेगळं करून शुद्धीकरणाकरिता टेक्सासला पाठविण्याचा उपक्रम चालू आहे. त्याकरिता पाइपलाइन टाकण्याचे बेत  आहेत. ‘मुस्लीम तेलाला उत्तर’ असा आव आणला जात आहे. ब्लॅकवेलने या दोन्ही प्रदेशांचं घडवलेलं दर्शन मुळातून वाचावं असं आहे.
ही आगळीवेगळी सात जागतिक आश्चर्येच म्हणायला हवीत. या सर्वच ठिकाणच्या रहिवाशांना या अतिजहाल विषारी वातावरणाची व त्यामुळे होणाऱ्या दुष्परिणामांची पूर्ण कल्पना असूनही नाइलाजानं राहणारे आणि आव्हान स्वीकारून परिणामांना न जुमानता काम करत राहणारे बहाद्दर पुष्कळ आहेत!
पर्यावरण व प्रदूषण हे विषय हाताळताना पुष्कळ वेळा टोकाची भूमिका घेऊन एकांगी व प्रसंगी अतिरंजित लिखाण केलं जातं. या पुस्तकात हा दोष कुठेही जाणवत नाही. ब्लॅकवेलनं सर्व बाजू नीट समजावून घेऊन, अनेकांशी चर्चा करून व तटस्थपणानं या नाजूक विषयाचे विविध पैलू उलगडून दाखवले आहेत. पुस्तकाचा एकंदर बाज रंजक गोष्ट सांगण्याचा, अवघड संज्ञा व संकल्पना सर्वसामान्य वाचकाला सहज समजतील अशा शैलीत मांडण्याचा आहे. त्याकरिता विनोदाचा वापरही अनेक ठिकाणी केला आहे. ‘केवळ पर्यावरण हवे की केवळ विकास’ याऐवजी ‘पर्यावरण आणि विकास’ हीच भूमिका श्रेयस्कर ठरते. लेखकाची भूमिका तशीच असल्याचं पानोपानी व मुखपृष्ठावरही जाणवतं. नारंगी रंगाच्या छत्रीखाली दोन पाठमोऱ्या व्यक्ती नदीकाठी उभ्या असून पलीकडच्या तीरावर उजाड अणुभट्टीचा परिसर व इमारती दिसतात. पाण्यातल्या प्रतिबिंबात आकाशाची निळाई पसरली असून काठावरची झुडपं जगण्याचा आशावाद प्रकट करतात.
व्हिजिट सनी चेनरेबिल
अँड अदर अ‍ॅव्हेंचर्स इन द वर्ल्ड्स मोस्ट पॉल्युटेड प्लेसेस :
अँड्रय़ू ब्लॅकवेल,
रोडले बुक्स,
पाने : ३०६, किंमत : १६ डॉलर्स.

Source-http://www.loksatta.com/sampadkiya-news/seven-poisonous-marvels-of-the-world-175549/)

Comments

Popular posts from this blog

आठवण आईची-पाचवे पुण्यस्मरण

आई -तृतीय पुण्यस्मरण

आई-चतुर्थ पुण्यस्मरण