मेघायन-आचार्य वसंत गोडबोले

मेघांचे विश्व विविध आहे. त्यातही वैचित्र्य आहे. तसे हे मेघविश्व बाराही महिने अंबरात असतेच, पण पावसाळ्यातील मेघविश्व सर्वाधिक महत्त्वाचे असते.
‘ये रे घना ये रे घना’ किंवा ‘घन घन माला नभी दाटल्या’ यांसारखी भावगीते अंबरीतल्या मेघांनी मनाचा मयूर कसा भाववर्तन करतो ते दर्शवितात. मानवीच नव्हे, तर सर्व चरांना हे मेघविश्व आकर्षित करते. चराचरांवर जीवन वृष्टी करून जीवन फुलविणारे, जीवनातून जीवन अंबरी त्या रूपाने धारण करणारे जीवनधारी मेघ समस्त मानवी जीवनाचे आधार आहेत. कवींच्या कल्पनाविलासाला मेघविश्व उधाण देत आले आहे.
तसे हे मेघविश्व बाराही महिने अंबरात असतेच, पण पावसाळ्यातील मेघविश्व सर्वाधिक महत्त्वाचे असते यात तीळमात्र संशय नाही. हे मेघविश्व वैविध्यपूर्ण, अनाकलनीय, अवर्णनीय, अथांग, अमर, अतक्र्य आवाक्यात न येणारे, अनादी, अनंत आहे. मनाचा ठाव घेणारे, मनावर आघात करणारे, मन प्रफुल्ल करणारे, अर्निबध, संचारी, अंबरीचे मेघविश्वाची सहल या अक्षरयानाने करण्याचा हा प्रयत्न आहे.
पाण्याचा संचय असणारे हे मेघ विविध नावांनी संबोधिले जातात. त्यांचा प्रकारही जसा ठरविता येत नाही, तसा आकारही ठरविता येत नाही. या मेघविश्वाचा वेध घेता येतो, अंदाज घेता येतो, बस! इतपतच आपली विज्ञानप्रगती यावर आपली पकड ठेवू शकते. यापलीकडे त्या मेघविश्वावर कोणीही सत्ता चालवू शकत नाही. जमिनीपासून उंच आकाशात या क्षितिजापासून त्या क्षितिजापर्यंत अंबरी संचार करणारे मेघ सर्वाच्या नजरा आकाशाकडे वळवितात. ढग, मेघ, बादल, क्लाऊड इ. इ. अनेक नावे, संबोधने यांना दिली तरी त्यांना त्याचे काहीही सोयरसुतक नसते. ना ते कोणत्या नावाशी निगडित होत, ना कोणते नाव त्याज्य हे सांगत. नामकरणाशी त्यांना कसलीही बांधीलकी नाही.
या मेघांचे निसर्गाशी सूत्र असते. भूपृष्ठाशी, अवनीशी गोत्र असते व आकाशाशी क्षेत्र असते. आकाशातील संचार व प्रवास यासाठी वायुबरोबर करारपत्र असत. पाण्यातून निर्माण होणारे व परत पाण्यात रूपांतरित होणारे हे विश्व मेघांचे ‘पाणी असशी, पाणीच होशी’ असे म्हटले तर वावगे होणार नाही. यांच्या संचाराला सारे आकाश मोकळे असते. कोणत्याही देशाच्या हवाई क्षेत्राचं यांना काहीही देणं घेणं नाही व यांच्या प्रवासावर कोणतेही भौतिक र्निबध कोणी घालू शकत नाही. याचे ढोबळमानाने जरी कोणी वेधशाळेच्या अंदाजावरून वेळापत्रक केले तरी ते पाळतीलच याची काहीच खात्री नाही. यांच्या लहरी कोणासही समजत नाहीत तर त्या पाळणे दूरच. ते कोणाचेही ताबेदार नाहीत. दरवर्षी यांचे वेळापत्रक वेगवेगळे असते. ते कोणीही ठरवू शकणार नाहीत. त्यांची स्वायत्तता अबाधित आहे. तिला विज्ञानही आव्हान देऊ शकत नाही तर ते स्वत:च विज्ञानाला असलेले आव्हान आहे व न सुटता येणारे अवघड असे निसर्गाचे कोडे आहे.
वाङ्मयात यांचा वापर उपमा, अलंकार आदीरूपाने विपुलतेने केलेला आढळेल. काव्य, नाटक, कादंबरी, संतवाङ्मय, प्रणयकथा, साहस कथा इ. सर्व प्रकारांत या मेघांचा संचार शब्दरूपात आहेच. आपल्या जीवनातही हे मेघ अनेकरूपांनी प्रत्यही येत असतात. प्राकृतिक, भौतिक मेघ, भावनिक मेघ व आधिदैविक, आधिभौतिक व आध्यात्मिक मेघ असे यांचे स्थूलमानाने वर्णन करता येईल. यापैकी भावनिक मेघ, आधिभौतिक, आधिदैविक व आध्यात्मिक मेघ दिसत नाहीत प्राकृतिक मेघाप्रमाणे पण मानवी जीवनात ते प्रचंड उलथापालथ करतात. ‘रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग। अंतर्बाह्य़ जग आणि मन।।’ या अभंग पंक्तीत मनाचे जे समरांगण आहे तेथे भावनिक मेघांचा संचार आहे. त्यांच्याशी सामना करावयाचा प्रकार वेगळा असतो. तो दृश्य नाही, पण तरीही परिणाम दृश्य असतात. हे मेघ वेगळे, यांची निर्मिती वेगळी, त्यांचे परिणाम वेगळे, प्रकृती वेगळी, प्रवृत्ती वेगळी. या मेघविश्वाबद्दल प्रथम आपण प्राकृतिक, भौतिक मेघांचे विश्वाचा संचार करून नंतर याकडे वळू. कारण भावनिक मेघांचे विश्व प्रत्येकांचे मनात असते व मनकवडे झाल्याशिवाय परमनाचा ठाव घेता येत नाही. त्यामुळे ते विश्व संचारणे दुरापास्त असले तरी एका विशिष्ट मर्यादेपर्यंतच विहरता येते, त्याचा ऊहापोह या लेखात करण्याचे योजले आहे. 
मेघांची उत्पत्ती समुद्राच्या पाण्यापासून होते हे सर्वज्ञात आहे व त्यामागील विज्ञानही सर्वज्ञात आहे. समुद्राचे पाणी जरी खारे असले तरी मेघांपासून होणारी जलवृष्टी खारी नसते, यामागील विज्ञान वेगळे समजावून सांगण्याची गरज नाही. आपणास या लेखात विज्ञानाची कारणमीमांसा करावयाची नाही तर जीवन आणि मेघ यांच्याकडे भावनिक, ललित दृष्टीतून बघावयाचे आहे. खाऱ्या पाण्यातून निर्माण होऊनही वृष्टी मात्र खारी नसण्याचा हा गुणधर्म संत साहित्यातही एक उपमा म्हणून अत्यंत समर्पकरीत्या वापरला आहे. ‘मेघवृष्टीने करावा उपदेश’ असे संत तुकाराम एका अभंगात सांगतात. सर्वत्र सारखा उपदेश करावा, आपपर भाव न ठेवता जसा मेघ वर्षतो तसा. मेघापाशी वृष्टी करताना आपपरभाव ठेवला नाही जात. श्रीमंत, गरीब, उच्चनीच कशाचाही ते विचार करत नाहीत. धरतीवर वर्षांव करणे एवढेच त्यांचे कर्तव्य ते पार पाडतात. हातचे काही राखून ठेवत नाहीत तसेच खरे साधुसंत असतात, नव्हे त्यांनी तसे मेघासारखे करावे असे संत तुकाराम महाराज सांगतात. मेघाच्या वृष्टीत खारेपण नसते, तसा हा उपदेश असावा. उत्पत्तिस्थानाचा अवगुण त्यात नसावा.
मेघांचे विश्व विविध आहे. त्यातही वैचित्र्य आहे. सूर्यकिरणांच्या उष्मेमुळे सागरजलाचे बाष्प मेघरूपाने अवकाशी जमते व वायूच्या गतीवर त्याची भ्रमंती  होते. पर्वतांच्या उंच शिखरांमुळे ते अडले जातात व बाष्पाचे सेंद्रिकरण झाले की ते सगळे जल पृथ्वीवर वर्षांव करून मोकळे होतात. या मेघांनाही काही निकष लावून त्यांचे वर्गीकरण केले जाते व त्यांच्या रंगावरून, आकाशातील दिसण्याच्या स्थानावरून काही अनुमाने, ठोकताळे बनविले जातात. खेडय़ापाडय़ात आजही ही अनुमाने, ठोकताळेच त्या जनतेची वेधशाळा-वाणी मानली जाते. या मेघांचा अधिपती वरुण समजला जातो. वरुण देवतेची उपासना मेघवृष्टीसाठी केली जाते. काही सूक्तेही पूर्वजांनी यासाठी तयार केली. ‘पर्जन्यसूक्त’ हे त्यातलेच एक. याच्याही अनुष्ठानाने मेघवृष्टी होते असे मानतात. तसेच हे मेघ थोडासा आडमुठेपणा करत असावेत म्हणून त्यांच्या वृष्टीसाठी यज्ञ पण निर्माण केला गेला. ‘यज्ञात भवति पर्जन्य:’ हे स्मरत असेलच. तेव्हा कर्मकांडातूनही यांना प्रसन्न करण्याचे प्रयत्न केले गेले व आजही ते केले जातात याची असंख्य उदाहरणे आहेत. यात श्रद्धा वा अंधश्रद्धा आहे का नाही याच्याशी येथे काहीही संबंध नाही पण वस्तुस्थिती हीच आहे. पर्जन्यवृष्टी न झाल्यास बेडूक-बेडकीचे लग्न लावणे, महादेवपिंडीस पाण्यात बुडविणे इ. इ. सारखे अनेक प्रकार केले जातात.  
हे मेघ अखंड आकाश व्यापतात. यांना कुठलाच एफएसआय लागू पडत नाही. शालेय जीवनातील पाठय़पुस्तकातल्या एक धडय़ात ढगांचे प्रकार सांगितले होते. त्यातील ‘कुंजीर मेघ’ हा प्रकार अजूनही आठवतोय. हत्तीच्या आकाराचे हे प्रचंड मेघ.. बाकी इतर प्रकार स्मरत नाहीत. हे नामाभिधान आम्ही शाळेतील एका शिक्षकांना त्यांचा वर्ण व आकार यावरून दिले होते. ही त्यांना दिलेली उपमा पुढे त्यांना कळल्यावर त्यांनी अख्ख्या वर्गाला चोपवृष्टी करून आपला राग शांत केला, पण ही उपमा चालूच राहिली. हा मेघप्रकार त्यामुळेच कायम स्मरणात राहिला. हा प्रकार पावसाळ्यात अंबरी दिसतो, जेव्हा हे महाकाय मेघ वेगवेगळे इतस्तत: भटकताना दिसतात. कधी कधी एकदम प्रचंड मोठा समूह आकाशात संचार करतो तर कधी सगळे आकाशच ते व्यापतात व निळ्या आकाशाचा काहीही मागमूसही दिसत नाही. मेघ दिवस असो वा रात्र, अवकाशात विहरत असतातच. त्यांचा प्रवास हा वाऱ्याच्या प्रवाहाची गती व दिशा यावर अवलंबून असतो. काही मेघ विरळ असतात व एखादा पिंजलेला कापूस उडावा वाऱ्यावर तसे फिरतात. काही वेळा मेघांचे पुंजके रांगोळीचे ठिपके वेगवेगळ्या आकाराचे काढावेत तसे विखुरलेले दिसतात. काही वेळा मेघांचे प्रचंड आकारात दर्शन होते. एखाददुसरा लहान मेघखंड त्यावरून विहरताना पाहून हत्तीच्या कळपाची आठवण होते. त्यात हत्तीचे पिल्लू एकटे जसे कळपात फिरते तसेच हे दृश्य दिसते. ‘आभाळ भरून आलंय’ म्हणतात ते अशा महाकाय मेघांमुळेच. मेघांचा वर्ण किती प्रकारचा असतो याची वर्गवारी करणे उत्तम चित्रकारालाही जमणार नाही. चित्ताकर्षक, विलोभनीय अप्रतिम रंगछटांची उधळण या मेघविश्वात प्रत्ययास येते. त्यांचे बदलते आकार पाहणे हेसुद्धा मनोरंजनच असते. हळुवारपणे पाहता पाहता एखादा चराचा आकार (मानवी देह, प्राणी, पक्षी इ.) यांच्यात प्रकट होतो व मनास आनंद देतो. अर्थात मेघांनी हा आकार ठरवून घेतलेला नसतो तर तो निसर्गातील नियमाप्रमाणे म्हणजे वायुप्रवहनाने होतो तरी ते आनंददायी आकार मनास किती आनंदी करतात ते प्रत्यक्ष अनुभवावे म्हणजे समजेल. ही अनुभूती शब्दापेक्षा मोठी असते म्हणूनच ती शब्दबद्ध करूनही पूर्ण होत नाही.
काही मेघ तांबूस तर काही पिवळसर तर काही नािरगी, तपकिरी इ. विविध रंगछटा दाखविणारे असतात. काही मेघ शुभ्र पांढऱ्या रंगांचे असतात. या पांढऱ्याशुभ्र धवलरंगी मेघांचे तसे कोणी स्वागत करीत नाहीत. कारण त्यांचेपाशी देण्यासारखे जीवन नसते. उलटपक्षी काळ्या जलदांचे स्वागत सर्व करतात. पांढरे मेघ शेतकऱ्यांना चिंतातूर करतात. निराधार वृद्धांसारखे त्यांचे भटकणे सुरू असते-वृद्धाश्रम शोधायला. ते ना काव्याचा विषय होत ना कथेचा ना कादंबरीचा. कोणताही कालिदास यांच्यातर्फे निरोप पाठवीत नाही. पांढरे केस झालेल्या म्हणजे पर्यायाने वृद्धत्व आलेल्यांची घरात किती किंमत असते, समाजात किती व राजकारणात किती हे आपण पाहातोच, तसेच उपेक्षेचे जिणे या शुभ्र मेघांच्या प्राक्तनी असते. काळया मेघांचे मात्र सर्व थरांतून मनमुराद कौतुक असते. त्या परमेश्वरालाही आपण ‘घन:श्याम’ म्हणतो. सावळ्या रंगाचे देवपण मनाला का मोहवते आणि हाच रंग धारण करून परमेश्वरही काय सांगतो काय दाखवतो बरं? ‘घन:श्याम सुंदरा..’ ही भूपाळीसुद्धा त्याचे कौतुक करते तेव्हा हे सावळे काळे मेघ मोठे नशीबवान आहेत. काळी मुलगी पत्नी म्हणून करण्यास कोणी तयार नसते, पण काळ्या मेघांचे सर्वजण स्वागत करतात.
कालिदासानेही आपल्या प्रेयसीला निरोप या मेघाकडूनच पाठविला. नितांतसुंदर काव्य आहे ते कालिदासाचे. ‘आषाढस्य प्रथम दिसे..’ असा हा आषाढ महिन्यातील मेघसमूह प्रतिभेवर किती विलक्षण परिणाम करतो. प्रतिभा बहरते, प्रतिभा उजळते असा हा प्रतिभा व प्रतिमा कार्यक्रम हे घननिळे करतात. ‘घन घन माला नभी दाटल्या, कोसळती धारा’ अशी प्रतिभेच्या मेघातून धारा वर्षवणारी ही घन, मेघमाला त्यांच्या दर्शनानेच मन उचंबळिते साहित्यिकांचं. रसिकाचं, साध्या माणसाचं आणि जो तो आपल्या प्रतिभा कुवतीप्रमाणे प्रतिभेचा आविष्कार करतो. हे सगळं घडतं ते त्या श्यामल गडद काळ्या मेघांमुळे. ‘गडद गडद गडद निळे, जलद भरूनी आले’ किती सुंदर काव्यपंक्ती आहेत या. मोठे नशीबवान हे काळे काळे मेघ. ‘त्या सावळ्या तनूचे मज लागले पिसे गं’ असे हे प्रतिभेचे पीस सर्व थरातील जनतेला लागणारे हे श्यामल घन- मेघ. यांचं आकर्षण किती, कसे असावे याला काही मर्यादा नाही. हे काळे मेघ त्या सविता सूर्यनारायणालाही झाकून टाकतात. भर दिवसा अंधारून येत म्हणतात इतकी त्यांची व्याप्ती असते. काही वेळा तर तीन तीन, चार-चार दिवस सूर्यदर्शनही होत नाही. पावसाळ्यात अंबरी या काळ्या मेघांचेच राज्य असते. ग्रीष्माचा उष्मा शमन करून तप्त धरतीला सुजलाम सुफलाम होण्यासाठी लागणारे अमृत घट असतात हे काळे मेघ. काळा पैसा, काळी कृत्ये, काळी माणसं, काळी रात्र, इ. इ. पेक्षा हे काळेपण वेगळे एकदम वेगळे. जीवनाला उजाळा देणारे, जीवन फुलविणारे, जीवन समृद्ध करणारे, जीवनदायी काळेपण. विठ्ठलानेही काळा रंग याच जाणिवेतूनच निवडला असावा. आषाढात काळ्या मेघांच्या बरसणाऱ्या सरी अंगावर झेलीत काळ्या विठ्ठलाच्या दर्शनासाठी जाणारे आषाढवारीतले भक्त त्यातून मिळणारा चिरस्थायी अमृतानंद घेत असतात. धरती व मन, चर व अचर सर्वाना हवेहवेसे वाटणारे हे काळे मेघ. पण हेसुद्धा लपंडाव खेळण्यात पटाईत. अंबरी आले तरी हे वृष्टी करतीलच असे नाही. आशा-निराशेच्या खेळांना पण हे मेघ कारणीभूत ठरतात. नुसतं आभाळ येतं नि जातं असही म्हणण्याची पाळी आणतात. ओढ निर्माण करतात व ओढही लावतात व ओढ देतात. तोंडचं पाणी पळवतात. आश्वासन देऊन ती न पाळणाऱ्या मंत्र्यांनी याचा गुण घेतला की या मेघांना ती सवय मंत्र्यामुळे लागली कोणास ठाऊक. हुलकावणी जरी देत असले तरी ती सर्वत्र सदा नसते आणि स्थळ आणि काळपरत्वे तिचे नियमित होणे नसते हेही लक्षात ठेवावे. सुगीची स्वप्नं कृषिवलांच्या मनी निर्माण करणारे हे मेघ त्या स्वप्नांचा कधी कधी चुराडा करतात हेही खरे आहे. कधी अवृष्टी, अल्पवृष्टी वा कधी अतिवृष्टी करून. तरीही मेघांवरचे प्रेम कमी होत नाही. कारण मानवाचे मन मोठं आशादायी असतं. सूर्याची किरणे अडविणारे मेघ कधी त्याच किरणामुळे-चंदेरी कडा लेवून आकाशात मिरवतात आणि हे त्याचं रूप मानवाने निराशेपासून हताश न होण्यासाठी मनाला धीर देण्यासाठी धारण केले आहे. प्रत्येक मेघास चंदेरी किनार असते. EVERY CLOUD HAS SILVER LINING हा वाक् प्रचार पाहा. म्हणजे वर उल्लेख केल्याप्रमाणे हे मेघ कल्पनांना, विचारांना कसे प्रेरक ठरतात ते कळेल.
हे मेघ कोठे अतिवृष्टी करतात, कोठे अल्पवृष्टी करतात तर कोठे अवृष्टी करतात याचा र्सवकष अंदाज घेता येत नाही. कधी ते संततधार धरतील तर कधी रिमझिम बरसतील. ‘रिमझिम झरती श्रावणधारा, धरतीच्या कलशात’ हे भावगीत श्रावणातल्या रिमझिम पावसावरचे आहे. कधी हे मेघ ऊनपावसाचा खेळ दाखवतात. श्रावण महिन्यात हे दृश्य हमखास प्रत्ययास येते. बालकवींनी त्याचे वर्णन कवितेत फार सुंदर केले आहे. ‘श्रावणमासी हर्ष मानसी, हिरवळ दाटे चोहीकडे। क्षणात येते सरसर शिरवे, क्षणात फिरूनी ऊन पडे।।’ हे मेघ श्रावण महिन्यात आणखी एक विलोभनीय दृश्य सादर करतात- ते म्हणजे ‘इंद्रधनू.’ सप्तरंगाची ही कमान कधी पूर्वेला तर कधी पश्चिमेला दिसते. कधी कधी एकावर एक दोन इंद्रधनुष्ये दिसतात. (जास्तीत जास्त एकावर एक अशी तीनच इंद्रधनुष्ये दिसतात. यात प्रकाशकिरण परिवर्तनाचे विज्ञान आहे! फिजिक्स म्हणजे पदार्थविज्ञानाचे पुस्तकात याचे शास्त्रीय कारण स्पष्ट केले आहे. आकृत्यांसह ते वाचावे.) हा मनोहारी सप्तरंगी पट्टा पाहताना मन कसे प्रसन्न होते याचा अनुभव घ्यावा म्हणजे कळेल. बालकवींनी त्याच कवितेत ‘वरती बघता इंद्रधनुचा गोफ दुहेरी विणलासे। मंगलतोरण काय बांधले, नभोमंडपी कुणी भासे।।’ असे सार्थ वर्णन केले आहे. मेघांच्या वृष्टीमुळे नद्या, नाले, भरभरून वाहतात. धरतीवर हिरवळ उमलते. पिकांचे बी-बियाणे पेरले जाते. तसेच आशा-आकांक्षाचेही. हे सर्व चैतन्य मेघ आणतात आणि म्हणूनच पावसाळा ही पुढील आठ महिन्यांचे जीवन ठरविणारा असतो.
इतर रंगीत ढगांचे मानवी जीवनाला फारसे सोयरसुतक नसते. तो एक प्रकाशकिरण विकरणाचा खेळ म्हणावे एवढेच. या रंगीत ढगांमुळे वा पांढऱ्याशुभ्र मेघांमुळे मोरही आनंदाने पिसारा फुलवून नाचत नाही. अर्थात हे जीवनदायी मेघ नव्हेतच. पण यांच्या रंगावरूनही काही शुभ-अशुभाचे मानव ठोकताळे बांधतोच. मेघ पावसाळ्यात जरी आकाशात फिरत असले तरी त्यांनाही धरतीच प्रेम असते बरं का! हिवाळ्यात व पावसाळ्यातही हे कधी कधी दऱ्याखोऱ्यात वस्तीला येतात व दिवस उगवला की परत वर आकाशाकडे प्रस्थान ठेवतात. काही वेळा यांना धुके म्हणतात, पण तीही मेघांचीच उपजात. हे दृश्य मोठे विलोभनीय असते. या धुक्यामुळे कधी कधी वाटही दिसेनाशी होते. मोठे गडद धुके हे प्रकार घडवते. प्रवास थांबतो धुक्यात वाट हरवल्यामुळे.
मेघ पर्वतशिखरांवर सर्वाधिक वृष्टी करतात. पठारी भागात त्यामानाने कमी. तसेच घनदाट अरण्यातही खूप वृष्टी करतात. मानवाने निसर्गाचा तोल सर्वागीण बिघडवल्यामुळे मेघांनीही आपले वृष्टीप्रमाण बदलविले आहे हे सत्य आहे.
तसे हे मेघ फार उंच शिखरांवर पावसाचीच नव्हे, तर हिमाची वृष्टी करतात. वृष्टी कोणतीही असो, हिमाची वा जलाची त्याचे कारकत्व या मेघांचेच. काही वेळा या मेघांपासून पाऊस पडावा म्हणून विमानातून सिल्व्हर ऑक्साइडसारखे द्रव फवारणी करून कृत्रिम पाऊस पाडण्याचे प्रयत्न झाले, पण त्यात अद्याप अगदी अल्प यश मिळाले असावे. कारण हे प्रयोग यशस्वी ठरल्याची कोणतीही प्रमाणे आज विश्वासार्ह उपलब्ध नाहीत. असो. मानव या मेघांवर हुकमी सत्ता चालवू शकत नाही एवढे आजमितीस खरे आहे. या मेघमाला मानवाला निर्माण करता येत नाहीत, पण त्या बरसल्यावर त्या पाण्याचे नियोजन व उपयोग तो करू शकतो हे खरे. जास्तीत जास्त पर्जन्यवृष्टीचा उपयोग करून घेणे विज्ञानबळावर मानवाला साध्य झाले आहे. तरीही अद्याप मेघदोहन जास्तीत जास्त करण्याचे, मेघांवर नियंत्रणाचे, मेघनिर्मितीचे मानवाला जमले नाही आणि म्हणूनच आजही आपले जीवन मेघवृष्टीवर अवलंबून आहे हे सत्य आहे.
हे मेघ आकाशातून जलवृष्टी करतात, पण पुष्कळदा एक वेगळंच संकट अस्मानातून पृथ्वीवर कोसळतात. तसे हे मेघ अबोल असले तरी काही वेळा त्यांच्यातही संघर्ष होतो. मोठय़ा आवाजात तो आवाज कधी कधी काळजाचा थरकाप उडवितो. ही मेघगर्जना त्या संघर्षांचा आवाज असते. मेघांचा हा गडगडाट अगदी तारसप्तकाच्याही वरच्याच पट्टीतला. असं म्हणतात की रावणाचा पुत्र मेघनाद हा जन्मला तेव्हा त्याचा आवाज या मेघांच्या गडगडाटासारखा उमटला म्हणून त्याचे नाव मेघनाद ठेवले. असो. हा मेघसंघर्ष ध्वनी, मेघगर्जना कधी सुरू होतील व किती वेळ हे मेघयुद्ध, संघर्ष चालेल याचे भाकीत नाही करता येत. कधी हळू, कधी तीव्र, कधी मध्यम तर कधी छोटय़ा समयाच्या तर कधी दीर्घ तान घेतल्यासारख्या या मेघगर्जना जेव्हा कानठळ्या बसविण्याच्या तीव्रतेने उगम पावतात, तेव्हा काळजाचं पाणी पाणी होतं, थरकाप होतो. अर्थात जेथे संघर्ष होतो
तेथे ठिणगी ही पडणारच आणि याच न्यायाने तेथे विद्युल्लता निर्माण होते. ही चपला कडकडाट करून सारे आकाश लख्ख प्रकाशाने क्षणभर उजळून टाकते. लहानमोठय़ा आकाराच्या कडकडाटी विजा आकाशात चमचमतात त्या मेघांच्या लहानमोठय़ा संघर्षांतूनच आणि या विजांनाही कधी कधी धरतीचं आकर्षण वाटलं की त्या धरतीवर कोसळतात आणि नाश करतात. प्राणहानी, वस्तीहानी, वृक्षहानी इ. इ. लहानमोठी हानी त्या करतात. जीवन देणाऱ्या जलदांचं हे संघर्षत्युत्पन्नरूप संहारकारीच. सूर्यापोटी शनैश्वर तसे. विजांचा कडकडाट, चमचमाट व धरतीवर कोसळणे हे त्या मेघसंघर्षांचे व्याप्ती व तीव्रता यावर अवलंबून असते. ढगांचा गडगडाट, विजांचा चमचमाट व पर्जन्यवृष्टी असा का क्रम आहे. आपण निसर्गवाचन करत नाही. त्यामुळे आपले अनुभवविश्व थिटे पडते. साधुसंत, लेखक, निसर्गाचा अभ्यास करीत. त्यामुळे त्यांच्या लिखाणात एक वेगळाच साज असे. प्रख्यात तत्त्ववेत्ता सॉक्रेटिस याचे उदाहरण उचित ठरेल म्हणून येथे देत आहे. त्याची पत्नी झांटिपी अतिशय तापट स्वभावाची होती. सॉक्रेटिस सदासर्वकाळ तत्त्वज्ञानात गुरफटून शिष्यांच्या गराडय़ात. एकदा तो असाच शिष्यांबरोबर तत्त्वचर्चा करत बसला होता घरी. झांटिपीने त्याला काही वस्तू बाजारातून आणावयास सांगितल्या होत्या, ते तो विसरून तत्त्वचर्चेत मग्न. तिने आतून मोठय़ा खडय़ा आवाजात त्याला ओरडून सांगितले दोनतीनदा, तरी हे महाशय तत्त्वचर्चेतच मग्न. थोडय़ा वेळाने ती बाहेर आली व हातवारे करून कडाडली. पण परिणामशून्य. मग आतून एक पाण्याने भरलेली बादली घेऊन आली व सॉक्रेटिसच्या डोक्यावर ओतून तावातावाने बादली आपटून बाहेर निघून गेली. सॉक्रेटिस अगदी शांतपणे आपल्या तत्त्वज्ञानाचे धडे शिकवतच राहिला. तेव्हा शिष्यांनीच त्याला याबद्दल प्रतिक्रिया विचारली व आपण एवढे शांतपणे अविचलतेने कसे राहिलात? असा प्रश्न केला असता तो हसून शांतपणे म्हणाला, ‘अरे यातही निसर्ग नियम मला दिसला. प्रथम ढग गडगडतात, मग विजा कडकडतात आणि मग पाऊस पडतो. तसेच प्रथम तिने गडगडाट केला, मग कडकडाट व शेवटी बादलीभर पाऊस पाडला’. शिष्य यावर स्तंभित झाले.
 मेघांचा साहित्यिक तत्त्वज्ञ यांचेवरही असा प्रभाव पडतो.
मानवी जीवनात हे मेघ भावनारूपाने प्रगटतात व ते भावनारूपी मेघ त्याच्या डोळ्यात त्या भावनारूपाने दिसतात व त्याप्रमाणे त्याची कृती/वागणे होते. असा त्या व्यक्तीचा दुसऱ्या व्यक्तीशी संबंध म्हणा, आचार म्हणा, व्यवहार म्हणा जसा येतो तसा तो त्या भावनाविश्वाचा कारक ठरतो. हे भावनिक विश्वमेघ त्याच्या डोळ्यातून कधी अश्रुरूपाने वाहतात तर कधी क्रोध-संतापाच्या ठिणग्या त्यातून उद्भवतात तर कधी ते काही भावनांचे रंग दाखवतात. ‘डोळ्यात वाच माझ्या तू गीत भावनांचे’ यात हे भावनामेघी विश्व डोळ्यात पाहाता येते, असा आशय आहे.
आता आधिदैविक, आधिभौतिक व आध्यात्मिक मेघ म्हणजे एक प्रकारची संकटे होत. ते मेघ केव्हा कसे येतील ते सांगता येत नाही. शारीरिक पीडा देणारे दु:ख, आजार. काही अतक्र्य गोष्टी तर मृत्यूसारखे आघात हे नियतीचे मेघ पोहचवितात. त्यांना स्थळ, काळ, वेळ, व्यक्ती इ. इ. कोण सांगते कोणास ठाऊक. हे मेघ दिसत नाहीत, पण ते येतात व परिणाम करून जातात. राष्ट्रावरही गंभीर समस्यांचे मेघ येत असतातच. राजकीय आपत्ती, परचक्र, दुष्काळ इ. निसर्ग आपत्ती याचे हे मेघ राष्ट्रजीवनात प्रचंड अशी उलथापालथ करतात. हे जीवनहारक समस्यामेघविश्व असते. याची क्षितिजे, काळवेळ, स्वरूप, व्याप्ती इ.इ.चे कसलेही भाकीत करता येत नाही. थोडा फार सामना करता येतो, पण हे विश्व नष्ट करता येत नाही. मानवी जीवन आहे तोपर्यंत हे मेघविश्व व त्याचे कालचक्र सुरू राहणारच.
मेघांबद्दल एवढे लिहूनही मला समाधानाचे मेघ दिसत नाहीत. विचारांचे जेवढे मेघ आले तेवढय़ांचे मी अक्षरजलात रूपांतर करून लेख लिहिला, तरी अद्याप बरेच विचारमेघ कल्पनांबरी भटकत आहेत. पुढे-मागे त्यांना प्रतिभाशिखरांनी अडवून दुसरा लेख लिहीन. असे हे मेघायन जलदांचे आपणा समस्त चरांतरी भावलेले, भरलेले अनंत, अक्षय पण मूर्तही, आपले व विश्वाचे जीवन सुजलाम् सुफलाम करणारे- इत्यलस.

(Source-http://www.loksatta.com/lokprabha/rain-and-clouds-162925/)

Comments

Popular posts from this blog

आई -तृतीय पुण्यस्मरण

आठवण आईची-पाचवे पुण्यस्मरण

आई-चतुर्थ पुण्यस्मरण