बालपणीचे खेळ मजेचे-- सुरेंद्र शेट्ये

आताच्या काळी चित्रविचित्र वाटतील असे कितीतरी खेळ लहानपणी आम्ही मुले खेळायचो. आताच्या मुलांना त्या खेळांतला ‘ओ की ठो’ सुद्धा कळणार नाही. आमच्या पिढीबरोबरच ते जुने खेळही इतिहासजमा होण्याच्या मार्गावर आहेत. ते तसे होण्यापूर्वी कागदोपत्री त्यांचा उल्लेख राहावा असे मनोमन वाटते. त्यासाठीच आजचा हा लेखनप्रपंच.
आजच्या सारखी क्रिकेटची महागडी कीटस् आणण्याएवढे पैसे असायचे कोणाजवळ? तेव्हा आपले आमचे ते खेळ म्हणजे ‘बिन पैशाचा तमाशा’ सारखे! मुले एकत्र जमायचा अवकाश की, नेट - बॅट - बॉल - टेबलाशिवाय खेळता येण्यासारखे खेळ मैदानावर आणि घरातही सुरू व्हायचे.
क्रिकेट खेळायचे झाले तरी त्याच्यासाठी बॅट - बॉलची गरज असायचीच असेही नाही. माडाच्या चुडताचा दांडा तासून केलेली ‘पिड्या’ ची बॅट आणि कुळागारातल्या ‘बेड्यां’चे बॉल मिळाले तरी विश्वचषकाच्या चुरशीने क्रिकेटचा खेळ रंगत असे. या सामन्यांचे वैशिष्ट्य म्हणजे त्यात ‘मॅच फिक्सिंग’ नसायचे. जिंकण्याच्या अहमहमिकेनेच खेळ रंगत असे. निर्णयाप्रत पोहोचत असे!
आट्यापाट्या, हुतूतूबरोबरच खोखो ही दोन प्रकारचे असत. उभा खोखो आणि बैठा खोखो. पाठशिवणीचा खेळ असायचा. एकाने डाव अंगावर घेऊन बाकीच्यांंना एकेक करून बाद करीत राहायचे. लंगडी हाही असाच एक अफलातून प्रकार. लंगडी, लंगडी करीत म्हणत आपल्या प्रतिस्पर्धी भिडूंना पकडण्यासाठी जीव तोडून धावण्यातील मजा काही औरच!
मुला मुलींनी एकत्र खेळायचा असाच एक प्रकार म्हणजे ‘कायल्यांनी’. खडूने जमिनीवर अथवा रेघोट्यांनी मातीत वर्तुळे अथवा चौकोन काढून हा खेळ एक शिंपली घेऊन खेळला जायचा. तो कसा खेळला जायचा याचे वर्णन करणेही महाकठीण!
नंतर खेळायचो ‘डब्यांनी’! डबा दूरवर फेकून देऊन लपायचे आणि एकमेकांना हुडकून काढत त्याचे नाव घेत अमका डबा अन् तमका डबा करत हा खेळ खेळायचो. मजा यायची. नंतर आंधळी कोशिंबिर पण खेळायचो. डोळे बंद करून बाकीच्यांना पकडण्यात वेगळेच थ्रील अनुभवायचो. लगोर्‍या नामक एक खेळ असायचा. कौलांचे फुटके तुकडे एकावर एक रचून ठेवून चेंडूने ते पाडून मग पाठीवरचा बॉल चुकवून त्या लगोर्‍या पुन्हा लावण्यातली खुमारी काही औरच असायची!
मग तो सुप्रसिद्ध विटी दांडू! आपल्या कोकणीत त्याला म्हणायचे ‘कोयणे बाल’ किंवा ‘बाल - तोणक्यांनी.’ ते ‘मिल’, त्यावरून ‘कोलली’ जाणारी विटी. मग दांड्याने मोजायचो हात. कसला खेळ! तरी पण मस्त रमायचो!
पाऊस सुरू झाला की बैठे खेळ सुरू होत. त्या बैठ्या खेळांतही आम्ही मुले रमायचो. पत्ते निघायचे बाहेर. त्या तिथे मग डाव मांडले जायचे गाढव, पाच - तीन - दोन आणि रमीचे.
चिंचोके घेऊन सुद्धा खेळायचो. आता नाही खाव्याशा वाटत त्या चिंचा, आवळे आणि बोरे! मग चिंचोके तरी कुठून जमविणार? मग ‘तिकटी’ करायचो आणि खेळायचो. तांबुलफळ्यांनी पण खेळायचो. गोट्यांनी अर्थात ‘गड्‌ड्यांनी’ पण खेळायचो. गोटीवर गोटीचा नेम साधत ती दूरवर नेत. मग जमिनीवर कोरलेल्या एका लहानशा खड्‌ड्यात ती घालताना तहानभूक विसरून जायचो. डावांवर डाव रंगायचे.
काहीच नसले तर बाहुला बाहुलीच्या लग्नाचा खेळही खेळला जायचा. त्या खेळातली मजा तर काय वर्णावी! अंतरपाट धरून अक्षता टाकून साग्रसंगीत बाहुला बाहुलीचे लग्न लावले जाई. गणपती अथवा देवबाप्पा पूजनाचा खेळही रंगायचा. चांगला देव्हारा सजवून त्यात एखादी मूर्ती ठेवून तिची पूजा करून तीर्थप्रसाद वाटून पूजेचा खेळ खेळला जायचा.
आताच्या मुलांना फक्त संगणक आणि भ्रमणध्वनीवर खेळायचे असते. फार तर व्हिडिओ गेम्स आणि पीएसपी. फेसबुक आणि इंटरनेट मिळाले तर काय विचारता! तासन्‌तास त्याच्यापुढेच बसून राहतील. मोबाईल, फेसबुकवर एवढे मित्र, पण बाहेरच्या जगात कोणी विचारीत नाही कुत्रं अशी परिस्थिती आज होऊन राहिली आहे.
अन् मग तो सर्वांच्या आवडीचा खेळ - अंताक्षरीचा! त्याला ना आदि, ना अंत. अगदी समरसून आठवणीतील एकेक गाणे पहिल्या गाण्यातील शेवटचे अक्षर पकडून गात बसायचे. आताची गाणी आठवणीत राहतील तर आठवतील! म्हणून अंताक्षरीत ओठांवर येतात ती सर्व जुनीच गाणी. आताची गाणी इन्स्टंट सुचतात आणि इन्स्टंट विसरूनपण जातात! अंताक्षरीचा खेळ मात्र अफलातून खरा!
असे हे आमच्या लहानपणीचे विविध खेळ! त्यांची मजा और, त्यांचा आनंद और!..

Comments

Popular posts from this blog

आई -तृतीय पुण्यस्मरण

आठवण आईची-पाचवे पुण्यस्मरण

आई-चतुर्थ पुण्यस्मरण