यंत्रयुगाची आधारभूत वस्तू- चक्र

चक्र किवा चाकं हा माणसानं लावलेला अत्यंत महत्त्वाचा तसाच मूलगामी यांत्तिक शोध म्हणता येईल. एखादी अवजड वस्तू एका जागेवरून दुसऱ्या जागेवर नेताना माणसांची शक्ती अपुरी पडत असेल तर गोलाकार वस्तूंवर ती चढवून ढकलत पुढं नेता येऊ शकते, हा आज साधा, सरळ आणि सोपा उपाय सुचायला मानवानं काही शतकं घेतली असणार, यात काय शंका? पण एकदा का ही यांत्तिक क्लृप्ती माणसाच्या ध्यानी आली, चाकाशिवाय एखादंसुद्धा यंत्र सापडणं कठीण, अशीच अवस्था झाली. युरोपात घडून आलेल्या औद्योगिक क्रांतीनंतर तर लहान-मोठ्या घड्याळाच्या काट्यापासून ते मोटरकार तसंच जेट इंजिन आणि संगणकाच्या 'डिस्क ड्राइव्ह' पर्यंत चाकाचाच वापर होत राहिला आहे. केंद्रबिदूभोवती म्हणजे अक्षाभोवती किवा आसाभोवती फिरणारं चाक हेच तत्त्व वापरलं जात आहे. इसवी सन पूर्व सुमारे ३५०० वर्षांपूर्वी मेसापोटेमियात (म्हणजे आताच्या इराकमध्ये) मातीची भांडी बनवणाऱ्या कंुभाराच्या चाकाचं अस्तित्व पुरातत्व संशोधकांना सापडलं आहे. या मेसापेटोमियातच इ.स. पूर्व ३२०० च्या सुमारास चाकाच्या साह्यानं चालणारे 'रथ' होते, असंही आढळून आलं आहे.
अवजड सामान एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी वाहण्यासाठी चाकाचा उपयोग होऊ शकतो, हे ध्यानी आल्यानंतर आपल्या स्वत:च्याच प्रवासासाठी 'रथा'सारखं वाहन निर्माण करणं हे माणसाला सहजशक्य झालं. प्राचीन ईजिप्तमध्ये इ.स. पूर्व २००० वर्षं तरी असे रथ वापरले. इ.स. पूर्व १४०० वर्षांपर्यंत युरोपमध्येही स्वतंत्रपणे रथ निर्माण केले गेल्याचं समजतात. 'चाका'ची कल्पना तशी साधी, सोपी असल्यानं अनेक संस्कृतीत स्वतंत्रपणे ते तयार झालं असणार, यात शंका नाही. फक्त गोलाकार चाकात सुधारणा कोणत्या संस्कृतीत किती केली, एवढाच शोध पुरातत्वज्ञांना घ्यावा लागला. तरीही इंका, अॅझटेक, माया या सुधारणा भरपूर झालेल्या संस्कृतींना 'चाका'ची सुधारणा करता आली नाही.
चाकाचा उपयोग कुंभारानी मातीची भांडी घडवण्यासाठी करण्यापूर्वी भांडी नव्हती का? तर ती होती. पाणी भरून ठेवायला, धान्यसाठा भरून ठेवण्यासाठी, अन्न शिजवण्यासाठी भांड्यांचा वापर पूर्वीही केला गेला. म्हणून तर पुरातत्वज्ञ हस्तकौशल्यानं घडविलेली भांडी आणि कुंभाराच्या चाकावर घडविलेली भांडी असा कालमापनासाठी फरक करतात.
युरोपातील औद्योगिक क्रांतीनंतर म्हणजे एकोणिसाव्या शतकात खऱ्या अर्थानं चाक या कल्पनेचे अनेकविध आविष्कार पाहायला मिळाले. किबहुना आजपर्यंत अक्षरश: हजारो प्रकारे चाक उपयोगात आणलं गेलं आहे.
वैदिक आर्य रथ बनवण्यात आणि त्याचं सारथ्य करण्यात वाकबगार तर होतेच, पण त्यांना रथ या वाहनाविषयी प्रचंड प्रेम होतं. ते युद्धात रथांचा भरपूर प्रमाणात वापर करीत. रथकार हे ऋभू होते असं म्हटलं जातं. ऋभूंनी एक सुंदर रथ बनवून तो अश्विनींना दिला असं वर्णन ऋग्वेदात आहे. इतर रथांना दोन चाकं असत, तर अश्विनींना दिलेल्या रथाला तीन चाकं होती म्हणे. 'भारतीय संस्कृतिकोशा'त चाकाचे जे भाग सांगितले आहेत, ते असे- पत्री (धातूची धाव), प्रधी (घेर), वर्तुळ (मुख्य चाक), अर (आरे), नभ्य (तुंबा) आणि अक्ष (म्हणजे आस). आसाचे टोक छिद्रातून निघू नये म्हणून जी खुंटी ठोकत तिला आणी असं नाव होतं. कोशात रथाचं वर्णन केल्याप्रमाणे अक्षावर रथाचा कोश म्हणजे मुख्य भाग असे. त्याला ईपा नावाचा जोखडाला जोडणारा एक उभा दांडा असे. जोखड घोड्यांच्या मानेवर ठेवत. घोडे सरळ रेषेतच धावावेत म्हणून जोखडाच्या दोन्ही टोकांना छोटे छोटे दांडे बसवत. त्यांना शम्या म्हणत. रथाचा वेग काबूत राहावा म्हणून एक वजनदार लाकूड खालच्या भागात लटकावत. त्याला कस्तंभी म्हणत. मोठ्या रथाला चार चाकंही लावत. पुढं पुढं तर सहा, आठ, दहा अशा चाकांचे मोठे रथही तयार झाले. रथाला क्वचित हत्ती, बैल, गाढवं, खेचरंही जोडत. पण बहुधा घोडेच रथ ओढण्याच्या कामी लावत. घोड्यांच्या पाठीवरून कक्षा (*पट्टा) बांधत, तोंडात लगाम देत. रथाचा मोठा दांडा १८८ अंगुली, जोखड ८६ अंगुली, तर आस १०४ अंगुली असावा, अशी मोजमापं शुल्बसूत्रात दिली आहेत. मोजमापं अंगुलीत करण्याची प्रथा आज गमतीचीच वाटते. शिवाय पत्री, प्रधी, अर, नभ्य, आणी, कोश, शम्या, कस्तंभी... हे शब्दही आज प्रचारात नाहीत. आणि त्यांचे अर्थही आता विस्मृतीत गेले आहेत. रथांचं यांत्तिकीकरण होऊन रेल्वे (अग्निरथ) आणि मोटरकार (तैलरथ) निर्माण झाले. तत्त्व मूळचेच, फक्त मूलगामी सुधारणा होत गेल्या. 'मनोरथा'सारखे शब्दप्रयोग मात्र वापरले जातात. 'चित्ररथा'सारखे शब्द तयारही केले जातात.
रथ-कल्पना प्रतीक म्हणून आजही वापरात आहे. ती तशी सदैव राहिली आहे. कठोपनिषदातला श्लोक प्रसिद्ध आहे-
''आत्मानं रथिनं विद्धि शरीरं रथमेवतु।
बुद्धितु सारथि विद्धि मन: प्रग्रहमेव च ।।''
'हे नचिकेता, आत्मा हा रथी, शरीर हे रथ, बुद्धी हा सारथी आणि मन हे लगाम आहे, असं समज.'
ऋग्वेदाच्या सहाव्या मंडलातलं ४७वं संपूर्ण सूक्त रथ-प्रशस्तीचंच आहे. त्यातल्या एका ऋचेत रथाला इंद्राचं वज्र, मरुताचं सैन्य, सूर्यबिबाचा गाभा, वरुणाचं अंतरंग म्हणत रथ-प्रशस्ती केली आहे.
रथ-सप्तमी, रथ-नवमी साजरी होताना आताआतापर्यंत कुठंकुठं दिसत होती. एखाद्या सुदृढ परंपरेचं कालबाह्यतेच्या निकषावर दुर्बलीकरण कसं होत जातं, हे दाखवणारीच ही उदाहरणं. 'जगन्नाथाच्या रथा'ची प्रचंड यात्रा पाहण्यास आजही भाविक गर्दी करतात. या रथाच्या अवाढव्य चाकांखाली सापडून चिरडले गेल्याची उदाहरणं प्रतिवर्षी घडतात. त्यावरूनच चाकाखाली सापडणाऱ्यांचा विनाश करणाऱ्या प्रचंड शक्तीसाठी इंग्रजीत र्क्षीससशीपर्रीीं असा शब्दप्रयोग रूढ झाला. वास्तविक र्क्षीससशीपर्रीीं हा 'जगन्नाथ' या शब्दाचा अपभ्रंश. जगन्नाथ हा विष्णूचा एक अवतार. 'जगन्नाथाचा रथ' माणसाला चिरडू शकतो, 'जगन्नाथ नव्हे ! पण शब्द-प्रयोगातला पहिलाच शब्द अपभ्रष्ट होऊन इंग्रजीत गेला आणि स्वीकृत झाला, त्याला कोण काय करणार?
महाराष्ट्रातील भिल्लांमध्ये रथ-नृत्य किवा रथाचा नाच करण्याची प्रथा आहे. एकाच्या खांद्यावर दुसऱ्याला उभं करून रथ बनविला जातो आणि अशा अवस्थेत हे भिल्ल वर्तुळाकार नाचतात. गोमंतकातली प्रथा जरा वेगळी आहे. तिथं देवाच्या जत्रेत किवा रथसप्तमीच्या दिवशी बिनचाकाचा रथ तयार केला जातो. मग त्या बिनचाकी रथाच्या खाली दोन-दोन दांडे घालून ते दांडे खांद्यावर घेतात आणि चौघड्याच्या साथीनं नाचतात. 
अशा रीतीनं जगभरच्या अनेक प्राचीन संस्कृतीत चाकाच्या साह्यानं बनवलेल्या रथाची महती दाखवली गेली. 'महाभारता'त कर्णाच्या रथाचं चाक युद्धात ऐनवेळी जमिनीत रुतून बसल्याची कथा सर्वज्ञात आहेच. प्राचीन संस्कृतीतल्या कथांवर आधारलेल्या चित्रपटांत रथांचे आकर्षक प्रकार पाहायला मिळतात. ते कसं विसरता येईल? चार्लटन हेस्टन आणि रिचर्ड बर्टन यांच्या विलोभनीय अभिनयानं नटलेल्या 'बेनहर' चित्रपटात दोघांच्याही रथांनी अप्रतिम कामगिरी केली होती, हे आजही अनेकांच्या स्मरणात असणार.
चाकाचा शोध लागल्यामुळे रथ हे वाहन तयार झालं. त्या चाकात गरजेनुसार सुधारणा होत राहिल्या. ईजिप्त, असीरिया, बाबिलोनिया अशा संस्कृतीत युद्धसमयी रथांचा अतोनात वापर झाला. हडाप्पा संस्कृतीच्या अवशेषांत त्यांचे दोन सांगाडेही सापडले. यावरून सिधू संस्कृतीचे लोकही रथाचा उपयोग करत असं ध्यानी येतं.
चक्र किवा चाक याच्या शोधामुळे कमी शक्ती वापरून अधिक कार्य साधणं शक्य झालं, म्हणून चक्र ही यंत्रयुगाची आधारभूत वस्तू मानली जाते. कुंभाराचं चाक - प्राचीन काळी त्याला कुलालचक्र म्हटलं जाई - ज्या ईजिप्तमध्ये लहान-मोठी गाडगी वा मडकी बनवण्यासाठी सर्वप्रथम निर्माण केलं गेलं, तिथं तर या चाकाचा 'देवतांची देणगी' म्हणूनच गौरव होतो. त्या चाकाला 'प्टा' या देवतेचं प्रतीक समजतात. आपल्या संस्कृतीत कुंभाराचं चाक सृष्टीच्या उत्पत्तीचं प्रतीक समजलं जातं. विधात्याला कंुभाराची तर कुंभाराच्या चाकाला विश्वचक्राची उपमा देणाऱ्या कितीतरी पंक्ती काव्यात आढळतात. अर्थात् प्रत्येकवेळी चक्राचा उपयोग जीवन-सुधारासाठीच होतो असंही नाही. शुक्रनीती आणि नीतिप्रकाशिका या ग्रंथात चक्राचं आयुध म्हणून वर्णन केल्याचं 'संस्कृतिकोश' सांगतो. हे आयुधचक्र कसं होतं? चक्र ही वाटोळी तबकडी असून, तिचा घेरा दहा हात असतो. तिला मध्ये भोक असतं, असं म्हटलं आहे. 'अग्निपुराणात'ही हे आयुधचक्र कसं बनवावं याचीही माहिती एका श्लोकात दिली आहे - चक्राचा परीघ सहा हातांचा असावा, त्याला बाहेरून धार असावी. तिची नाभी चांगली असावी. तिच्यात तीन हात लांब दांडा बसवावा. चक्राच्या पात्याच्या तीन शिखा असाव्यात. त्याला लोखंडाचे दात करावे. ते फिरवण्यासाठी पाश असावा वगैरे वगैरे. 
पाशाच्या साह्यानं चक्र गरगर फिरवून ते फेकत दांडा हातात राहतो आणि फेकलेलं चक्र फिरत जाऊन शत्रूला कापून काढतं. अग्निपुराणात चक्राचे सहा 'उपयोग' सांगितले आहेत - कापणं, फोडणं, पाडणं, फिरवणं, लोळवणं, करतवून तुकडा पाडणं. असं चक्र फिरवायला शक्ती आणि युक्ती दोन्ही लागतात. भगवान श्रीकृष्ण आपलं सुदर्शन-चक्र फेकण्यात निष्णात होता, हे सर्वज्ञात आहे. आता अशी चक्रं वापरणारेही नाहीत आणि वापरायलाही कुणाला येत नाही.
एखाद्या शोधाचा वापर सत्कर्मासाठी करायचा की दुष्कर्मासाठी अशा दोलायमान मन:स्थितीनं माणसाच्या मनात घर केलं, ते या चक्रापासूनच, असंही समजता येईल.

Comments

Popular posts from this blog

आठवण आईची-पाचवे पुण्यस्मरण

आई -तृतीय पुण्यस्मरण

आई-चतुर्थ पुण्यस्मरण