ग्रंथविश्व : ‘दुर्मिळ म्हणींचा अनमोल खजिना’

‘अंगापेक्षा बोंगा मोठा’ ही म्हण ‘शेती’विषयक विभागात वर्गवारी करून नोंदलेली वाचून अडखळलो. ‘बोंगा’ म्हणजे मक्याच्या दाण्यांनी टच्च भरलेलं कणीस व ‘अंगा’ म्हणजे कणीस; ज्याला फाडून बाहेरही आलेलं दिसतं ते त्याचं बाहेरचं पातळ आवरण. ही अनोखी माहिती आढळली ती ‘मराठी प्रोव्हर्बस’ या १८९९ साली ऑक्सफर्ड प्रेसनं प्रकाशित केलेल्या तीनेकशे पानी पुस्तकात. संग्राहक व रूपांतरकार आहेत रेव्हरंड आल्फेड मॅनरिंग (मिशनरी ऑफ दि चर्च मिशनरी सोसायटी). सुमारे दोन हजार म्हणींचा हा संग्रह ‘बुक्स.गुगल.कॉम’वरती अलीकडेच अगदी फुकट वाचावयास मिळाला. त्यात अगदी नमनालाच ही म्हण छापलेली आहे. पुढचीच म्हण ‘आवळा देऊन कोहळा काढणार’ ही मात्र या विभागात चपखल बसणारी आहे.
मिशनरी मंडळी म्हणजे केवळ धर्मातरं करायला आलेली जमात या समजुतीला छेद देणारी जी अनेक कामं आहेत, त्यात ग्रंथलेखनाचं व त्यासाठी घेतलेल्या अफाट मेहनतीचं स्थान फार वरचं आहे. हे साहेब महाराष्ट्राच्या कुठच्या भागात होते, किती काळ होते वगैरे काहीच माहिती  सुरुवातीच्या तीनपानी प्रस्तावनेत आढळत नाही. सरळ विषयालाच हात घालून ते लिहितात, ‘मराठी म्हणींचं इंग्रजी भाषांतर बहुधा प्रथमच प्रकाशित होत असावं. यात बोली भाषेतल्या सतत व सहजच वापरात असणाऱ्या म्हणींचाच समावेश केलेला आहे. इंग्रजी भाषेच्या वाढत्या प्रचार व प्रसारामुळे हे मराठी भाषकांचं धन नाहीसं होण्याची शक्यता आहे. उपलब्ध पुस्तकांतून तसेच माझ्या परिचयातल्या विविध स्तरांतल्या स्त्री-पुरुषांकडून मी फार प्रयत्नानं त्या मिळवल्या आहेत. यात चुका वा त्रुटी राहिल्या असण्याची शक्यता आहे. जाणकार व विद्वान त्या नजरेस आणून देतील अशी आशा आहे. म्हणींचं विषयानुरूप वर्गीकरण करणं हे फारच अवघड काम होतं. इंग्रजी भाषांतर करताना शब्दश: न करता आशय व भावार्थ समजावा हे धोरण ठेवलेलं आहे.’ कुणाचंही नाव न घेता असंख्य मित्रांचं ऋण मान्य करीत चुकांची जबाबदारी लेखकानं स्वत:कडे घेतली आहे.  एकूण चौदा विभागांमध्ये दोनेक हजार म्हणींची विभागणी केली आहे. ते विभागही मोठे मजेशीर आहेत. शेती, पशुपक्षी, मानवी शरीर व अवयव, नीतीनियम, अन्न, आरोग्य व आजार, घर, पैसा, विविध नावं, निसर्ग, नातीगोती, धर्माचरण, उद्योग  व्यवसाय व शेवटी वर्गवारी शक्य नसलेल्या म्हणी शेवटच्या विभागात दिल्या आहेत. प्रत्येक विभागाचे पुन्हा पोटविभाग. उदा. शेती विषयात पुन्हा पिकं, अवजारं, शेतकरी व मशागत अशा चार भागांत म्हणी नोंदविल्या आहेत. प्रत्येक म्हण प्रथम देवनागरीत दिली असून, लगेच खाली तिचा उच्चार रोमन लिपीत आहे. त्याच्या खाली इंग्रजी अनुवाद व भावार्थ दिलेला आहे.
नातीगोती या वर्गवारीत नवरा-बायको, सासू-सून, स्त्रिया व विधवा असे चार पोटविभाग असून, त्यांच्या १७५ म्हणी नोंदलेल्या आहेत. त्यातली पहिलीच म्हण आहे ‘ आगलीचा असा तसा आणि मागलीचा गुलाम जसा’. या म्हणीत दोन बायकांच्या दादल्याचं चपखल वर्णन आहे. या म्हणीच्या अर्थापाठोपाठ ‘पहिल्या बायकोला मूल होत नसेल तर हिंदूंमध्ये दुसरी बायको करायची प्रथा आहे’ असं लेखक नमूद करतो. यातलीच पुढची म्हण पण लक्ष वेधून  घेणारी आहे. ‘आगलीला मिळेना चोळके (चोळी) मागलीला उकरतो बोळके (पैसे पुरून ठेवलेले गाडगे).’ सवतीमत्सरावर पुष्कळ म्हणी असून, त्यात इरसाल अशाही पुष्कळ आहेत. उदा. ‘आपण विईना सवत साहिना’. जोरू का गुलाम अर्थाची म्हण अशी- ‘जिचा नवरा दासट तिचा संसार चोखट’. त्यावर मल्लिनाथी करताना लेखक म्हणतो, ‘एकहाती कारभार मिळाला तर भारतीय स्त्री उत्तम व्यवस्थापन करते.’ त्याचा पडताळा ‘जो बायकोशी भला तो खाई दूध खवा’ ही म्हण वाचताना लागलीच येतो. शूद्रांमध्ये वापरातल्या- ‘तासा आड बैल आणि दिशाआड बायको मारावी’- या म्हणीचा अर्थ देऊन साहेबानं त्याच्या  देशातली इंग्रजी म्हण दिली आहे. ती अशी- `A spaniel, a woman and a wall-nut tree, the more they are beaten the better they will be.'    यावरून मनुष्य नावाचा प्राणी व त्याचे व्यवहार इथून तिथून जगाच्या पाठीवर सर्वत्र सारखेच असल्याचं दिसतं.
सासू व सुनेच्या नात्यातील ‘चार दिवस सासूचे चार दिवस सुनेचे’ ही म्हण इथे आहेच. पण ‘बोले धुवे लागे सुने’ यात ‘बोले धुवे’ चा अर्थ ‘बोलताना, धुताना’ असा दिला आहे. पण ‘धुवा’ म्हणजे मुलगी असा अर्थ असेल तर मग याच म्हणीचा अर्थ  ‘लेकी बोले सुने लागे’ असाही होऊ शकतो अशी पूरक माहिती लेखकांनं दिलेली आहे. ‘सासू मेली ठीक झाले घरदार हाती आले’ अशी सुनेच्या तोंडची म्हण असून, उत्तरार्धातला थोडा फरक करून ‘सासू मेली ठीक झाले तुपाचे गाडगे हाती आले’ अशी आणखी पण एक म्हण दिली आहे. मुलांवरील म्हणींत ‘अशी लेक हवी घरोघरी जावई’  व ‘असा लेक दाणा घरोघरी सुना’ या दोन म्हणी मुलामुलींची लग्नं विनासायास व सहज जमावीत असा आशावाद प्रकट करणाऱ्या आहेत. ‘आपले ते बापडे दुसऱ्याचे ते कातडे’ या म्हणीतला शेवटचा शब्द ‘किरटे’ पण असू  शकतो व या म्हणीचे आणखी एक रूप ‘आपले ते गोजिरवाणे दुसऱ्याचे ते लाजिरवाणे’ असल्याचं नोंदवून लेखक इंग्रजी म्हण पण देतो- Every man thinks  his own geese swans.' असा तुलनात्मक अभ्यास पुष्कळ पानांवर आढळतो. ‘असेच म्हण ग म्हातारे घर घेतले मेल्याने’ या म्हणीचा कालखंड थेट पेशव्यांच्या काळाशी जोडलेला वाचावयास मिळतो. नाना फडणीस व घाशीराम कोतवालाच्या काळात पुणे शहरात सुरक्षिततेची शेखी फार मिरवली जात असे. त्याचा नक्षा उतरवण्याचं काही चोर ठरवतात. रात्री नऊनंतर शहराचे दरवाजे लावून घेतले जात असत. पण एका म्हातारीच्या घरातली सर्व चीजवस्तू लुटून  त्या ऐवजासकट तिलाच ताटीवर बांधून ही चोर मंडळी शहराबाहेर पडायचं ठरवतात. रस्त्यावरून मोठय़ानं बोंबा मारत व शोक करीत जाऊ लागतात. ‘घर घेतले मेल्याने’ असं ती किंचाळू लागली की ही प्रेतयात्रेतली ही चोरांची टोळी तिच्यावर आवाज काढून ओरडत , ‘असेच म्हण ग म्हातारे घर घेतले मेल्याने.’ अखेर ती प्रेतयात्रा नानांचे सर्व पहारे ओलांडून शहराच्या बाहेर जाते. सतत मदतीचा धावा करणाऱ्याला ही म्हण वापरात येऊ लागली. एक कळ सोस, अपत्याचा लाभ अन् घरातल्यांचा मान मिळव असं सांगणारी ‘एक तिडीक दे आणि घरची धनीण हो’ अशी एक म्हण आहे. तर कुणीच समाधानी नाही असं दर्शवणारी म्हण- ‘एक पुती रडती दुपुती रडती सातपुती रडती आणि निपुती ती पण रडती.’ मानवी भावनांचं यथार्थ दर्शन घडवते. अगदी ‘फुकाची बाईल कशाला राहील’ व ‘बायकांची अक्कल चुलीपाशी’ या म्हणीपण आहेत.
‘लग्न’ या विषयावर क्रमांक १६८४ ते १७१५ अशा तिसेक म्हणी आहेत. ‘उतावळा नवरा गुडघ्याला बाशिंग’ तर आहेच पण ‘उतावळी बावरी आणि म्हाताऱ्याची नवरी’ अशी आता फारशी प्रचारात नसलेली म्हण आढळते. नवरदेवाचे घोडे हे वरातीमागे असून चालत नाही. पुढेच हवे. पण मूळ म्हण मात्र  ‘गावामागे वेडे व वरातीमागे घोडे’ अशी आहे. ‘वरातीमागून घोडे व्याह्य़ामागून पिढे (स्टूल किंवा खुर्ची)’ अशी पण एक म्हण दिलेली आहे. ‘अध्र्या हळकुंडानं पिवळा’ असं पुरुषांना म्हणतात. तीच म्हण स्त्रियांसाठी ‘दीड हळकुंडानं पिवळी’ अशी दिली आहे. त्यातला दीड शब्द पुन्हा पुरुषांसाठी ‘दीड शहाणा’मध्ये भेटतो. लग्न करणे व घर बांधणे एका म्हणीत एकत्र आलं आहे.- ‘लग्न म्हणते करून पहा घर म्हणते बांधून पहा.’ वरकरणी दिसायला सोप्या वाटणाऱ्या गोष्टी प्रत्यक्षात किती अवघड असतात हे यात सांगितलं असून, त्यात ‘गुऱ्हाळ म्हणते लावून पहा’ अशी तिसरी ओळ पण आणखी एका म्हणीत जोडलेली आढळते.
अशा बऱ्याच गमतीजमतीच्या म्हणी या पुस्तकातल्या चौदा विभागांत विखुरलेल्या आहेत. त्या मुळातूनच वाचण्यात गंमत आहे. त्यासाठी ‘गुगल’वर जाऊन Marathi Proverbs हा शोध शब्द (की वर्ड) टाईप करा की पहिल्या पानावरच ही लिंक मिळेल. ती उघडलीत की अगदी हातात धरून वाचावं तसं पुस्तकाचं प्रत्येक पान उलटून पाहता येईल. त्यावरचा मजकूर हवा तितका लहान मोठा करून वाचता येईल. हव्या त्या पानावर पटदिशी जाता येईल. जरूर भासल्यास सगळं पुस्तक आपल्या संगणकावर उतरवूनपण घेता येईल. ज्या काळात स्त्रियांची बातच सोडा, पुरुषांच्या पण शिक्षणाचा अगदी आनंदीआनंद होता अशा काळात या म्हणी व वाक्प्रचारांमुळेच समाजात सूत्ररूपानं भावभावना, विचार व व्यवहार अगदी थोडक्या शब्दांत व्यक्त होत असतं. त्यांचा नेमका अर्थपण अशिक्षितांपर्यंत अचूकपणे पोहोचत असे. पुरुष मंडळी रोजच्या बोलण्यात व व्यवहारात त्यांचा वापर करीतच. पण घरोघरी आई, आजी, मावशी, काकू, आत्या, सासू, लेक व सून अशा विविध रूपांतल्या स्त्रियांच्या तोंडी ह्य़ा म्हणी सतत असत व एका पिढीपासून दुसरीकडं सहजपणे पोहोचत असत. ज्या शिक्षक, संशोधक, अभ्यासक व विद्यार्थ्यांना मराठी म्हणींचा अर्थ इंग्रजीतून समजावून घ्यायची व समजावून द्यायची पाळी येत असेल त्यांच्याकरिता हे शंभर वषार्ंचं जुनं पुस्तक आजही नक्कीच उपयोगाचं आहे. त्यासाठी तरी संकलनाचं हे काम करणाऱ्या साहेबाचं आपण ऋणी असावं. Marathi Proverbs'- collected and translated by Rev. Alfred Manwaring, Oxford, at the Clarendon Press, 1899.

Comments

Popular posts from this blog

आठवण आईची-पाचवे पुण्यस्मरण

आई -तृतीय पुण्यस्मरण

आई-चतुर्थ पुण्यस्मरण