पराभव की प्रगल्भता ? (लेखक- डॉ. संजय ओक)


When faced with senseless drama, spiteful criticisms and misguided opinions, walking away is the best way to stand up for yourself.  To respond with anger is an endorsement of their attitude. 

- Dodinsky
Change your thoughts today.
डॉडिन्स्कीच्या या वचनाने आज माझ्या मनाचा ठाव घेतला.  कोणत्याही क्षेत्रात कार्यरत असताना जसजशी कार्यालयीन प्रगती होते, तसतसा छुपा विरोध हा वाढू लागतोच. सुंदर वेलीच्या खोडावर बांडगुळ वाढावा, तसा. हा निसर्गाचाच नियम आहे. कधी कधी आपल्याला त्याची पुसटशीही कल्पना नसते. पण संत एकनाथ म्हणालेच होते की, थुंकणारा सिद्धेश्वर बाबाही आलाच. विरोधाला कार्यकारणभाव नसतो. तुमची प्रगती डोळ्यात सलते आणि डोक्यात भणभणू लागते तेव्हा कारस्थानांच्या बिया पेरल्या जातात. खुरटय़ा विचारांचे कावळे एकत्र जमू लागतात आणि व्रणार्त शिशूच्या पंखावर चोच मारण्याची संधी शोधू लागतात. मग तुमच्यावर आरोप होतात- गरव्यवस्थापनाचे, गरकारभाराचे, भ्रष्टाचाराचे! तुम्ही भांबावता.. हडबडून जाता. कारण हा हल्ला तुम्हाला अपेक्षित नसतो. आणि मग तुम्ही प्रत्युत्तराची तयारी करू लागता. शब्दाला शब्द वाढतात.. त्यांची धार तिखट होते.. प्रसारमाध्यमांना आयते खाद्य मिळते. आणि नेमक्या याच क्षणी तुमच्या हातून आजवर न झालेली गफलत होऊ शकते. सत्यनिष्ठ, प्रामाणिक कर्मचारी कामाच्या ओझ्याने दबून जात नाही; पण मिथ्या आरोपांच्या हल्ल्यामुळे खचून जातो. त्याच्या आत्मविश्वासाला तडा जातो आणि मग प्रत्युत्तरे देण्याच्या घाईगर्दीत तो आजवर सांभाळलेले संतुलन गमावून बसतो. नुकसान हे या क्षणाला होते. त्यामुळे जेव्हा तुम्ही अर्थशून्य नौटंकीला सामोरे जाल, विषारी टीकेचे फूत्कार ऐकावे लागतील, तुमच्याबद्दलची व्यक्त होणारी मते चुकीच्या मार्गावर दाखविलेल्या दिशांचे प्रतििबब ठरू लागतील, तेव्हा ताठ मानेने उभे राहायचे आणि एकही शब्द न बोलता तेथून निघून जायचे, यातच खरे शहाणपण आहे. 
हा पळपुटेपणा नाही. ही पाठ दाखविण्याची प्रवृत्तीही नाही. तर ही शहाणी, समंजसपणाची, सन्मानाची भूमिका आहे. प्रत्युत्तर देणे, आवाज चढवणे म्हणजे एका अर्थी होणाऱ्या आरोपांना स्वीकृती देण्यासारखेच ठरते. प्रत्येक प्रत्युत्तराची एक वेळ असते. अपमान विसरायचे नसतात, तर ते मनाच्या हळव्या कोपऱ्यात जपायचे असतात. त्यांची बोच रोज लागता कामा नये; पण त्यांचा सल मात्र खोलवर दडलेला बरा. कारण तो पुढच्या वाटचालीला मार्गदर्शक ठरतो. 
मी स्वत: माझ्या व्यावसायिक कार्यकालात या उक्तीला यथार्थ सामोरा गेलो आहे आणि आकांडतांडव न करता शांत राहिलो, याचे मला नेहमी मागे वळून पाहताना समाधान आहे.  यश पचविणे एक वेळ सोपे; पण आरोप रिचवणे खूप कठीण.  'हेचि फल काय मम तपाला?' याचा वारंवार मनाच्या खिडकीत येणारा प्रत्यय सहन करणे सोपे नाही. कोणत्याही मॅनेजमेन्ट स्कूलमध्ये हे शिकविले जात नाही.  Things that they don't teach you at Harvard मध्येच या प्रसंगाचा समावेश होतो.
मग हे शिकायचे कसे? वेळ आणि अनुभव यापेक्षा मोठे गुरूनाहीत. आरडाओरड करायला शक्ती लागत नाही, ती शांत राहायला लागते. अशावेळी बाळगलेले मौन हे तुमच्या दुर्बलतेची निशाणी नसून तुमच्या आत्मिक शक्तीचा तो साक्षात्कार आहे. आणि ही शक्ती एका दिवसात येत नाही. तिचा 'थेंबे, थेंबे' संचयच करावा लागतो. तुमच्या निघून जाण्यात तुमचा पराभव नसतो, तर ती तुमची प्रगल्भता असते. आरोप करणाऱ्यांचे पितळ उघडे पडतेच, आणि कालांतराने इतरांनाही सत्य समजते. तोपर्यंत तुम्ही बरेच लांबवर गेलेले असता. 
..गेल्या शतकातील आणि या दशकातील महान व्यक्तिमत्त्वांमध्ये मी स्टीव्ह जॉब्सचा विचार करतो. ज्या 'अ‍ॅपल'ची मुहूर्तमेढ स्टीव्हने रोवली, त्यातून त्याला हद्दपार केले गेले.. बोभाटा झाला.. बाजूला होताना स्टीव्ह एवढेच म्हणाला, 'एक दिवस तुम्हाला तुमची चूक उलगडेल आणि तुम्ही मला परत बोलवाल. अर्थात तेव्हा मी माझ्या अटींवर परत येईन.' 'अ‍ॅपल'मधून बाहेर पडल्यावर स्टीव्हने 'नेक्स्ट' आणि 'पिक्सर'ची बांधणी केली आणि कालांतराने त्याचे शब्द खरे ठरले.  स्टीव्ह परत 'अ‍ॅपल'चा सर्वेसर्वा झाला. आज आयफोन- सहा हातात घेताना मला स्टीव्ह, डॉडिन्स्कीचाच संदेश परत देता होतो आणि सांगतो..
Change your thoughts today.

(Original Link-Loksatta-http://www.loksatta.com/lokrang-news/defet-of-maturity-940136/)

Comments

Popular posts from this blog

आई -तृतीय पुण्यस्मरण

आठवण आईची-पाचवे पुण्यस्मरण

आई-चतुर्थ पुण्यस्मरण