आई नावाचे विद्यापीठ

आई नावाचे विद्यापीठ 

श्री गणेश चतुर्थी -२९/०८/२०१४ ,शुक्रवार

बहुधा कोणी तरी अत्यंत समर्पक रित्या म्हटलेले आहे कि व्यक्तीची खरी किंमत ती गेल्यावरच कळते.
 दर वर्षीप्रमाणे गणपती बाप्पाच्या आगमनाची लगबग उत्साहात सांग्र -संगीत सुरु होती.सकाळी गणेश स्थापना ,पूजा विधी यथा सांग पार पाडून झाल्यावर संध्याकाळी ८. १५ वाजता घरून फोन आला आणि ........  आणि फोनवरचा निरोप ऐकून आभाळ कोसळणे काय असू शकते याचा अंदाज देणारी अत्यंत वेदनादायक बातमी कळाली ती आई गेल्याची.  क्षणभर आपल्याला कोणीतरी चुकून फोन केला किंवा आपल्या ऐकण्यात काही तरी गल्लत झाली असे वाटले पण त्यानंतर फोन येत राहिले आणि आणि................ काय पुढचे फार काही आठवत नाही पण १५ मिनिटाच्या आत पुण्याहून गावी/ घरी जाण्याची तयारी करून निघालोसुद्धा घराबाहेर सहकुटुंब. मिळेल त्या वाहनाने कसा-बसा पोहोचलो गावातल्या घरी.तेव्हा मात्र आतापर्यंत दाबून धरलेल्या भावना अनावर होऊन मुक्तपणे रडलो ,आजूबाजूलाही सर्व जण त्याच मनस्थितीत असल्याने काही बोलवेना पण कुणाशी. आम्ही पाचपैकी चार भावंडे आणि आमचे वडील-अण्णा यांच्या बरोबरच आमचे इतर सर्व परिवारजन उपस्थित असल्याने दुःखाचा आवेग म्हटले तरी लवकर ओसरत नव्हता. आमचा धाकटा बंधू अजून त्याच्या नोकरीच्या ठिकाणाहून यायचा बाकी होता. तो येतो न येतो आणि आईच्या कुशीत एकदा शिरतो न शिरतो तोच इतर नातेवाईक मंडळीनी प्रथेप्रमाणे अग्नि-अंतिम संस्काराची तयारी केली आणि यथावकाश ऋषी पंचमीच्या दिवसी साधारणत दुपारी आईचे अंतिम संस्कार  पार पडले आणि तेथून घरी परत येतांना आपण नेमके काय गमावले याची पावलोपावली आठवण यायला सुरुवात झाली ती आजपर्यंत काही थांबायचे नाव घेत नाही. आई अचानक कायमची निघून जाण्यापूर्वी अगदी दीड दोन महिनेआधी आमच्या पुणेस्थित घरी दवाखान्यातील उपचारासाठी ७/८ महिने आमच्या सोबतच होती.त्या दरम्यान आईची थोडीबहुत का होईना पण सेवा करण्याचा योग आला त्याबद्दल देवाजीचे किती आभार मानावे? त्या वेळीच बहुधा आईला पुढचा अंदाज आला होता कि काय असा दाट  भ्रम नव्हे सत्यच आता आईच्या एक-एक आठवणीतून उलगडत जातेच आहे.असो !
आता पुढचे आयुष्यभर कडू-गोड प्रसंगी "आता आई असती तर" "आता आई पाहिजे होती " याची हुरहूर/सल लागून राहणारच आहे. पण आईला आठवतांना;आईने आपल्याला जन्म देण्याव्यतिरिक्त अजून नेमके काय दिले याचा नुसता विचारच मनात रुंजी घालत असतांना दररोज आईच्या व्यकित्मत्वाचा एक नवा पैलू उलगडत जातांना दिसतो आहे/दिसणार आहे.
जगभरच्या साहित्यात/पौराणिक कथांमध्ये मातृ-पितृ महात्म्य यथोचित उल्लेख करून गौरविले आहेच नानाविध उपमा ,शब्द-अलंकारांनी,पण मला आता तरी असे वाटते  आहे कि आई म्हणजे चालते बोलते चैतन्यमयी विद्यापीठच असते प्रत्येक सुदैवी जीवाच्या आयुष्यात;जिथे जो-तो आपल्या वकुबाप्रमाणे जीवन शिक्षण घेऊन बाहेरच्या जगात भरारी घेण्यासाठी, संघर्ष करण्यासाठी सिध्द होत असतो. वडिलांचा आदरयुक्त धाक तर माउलीची प्रेमळ सावली असते प्रत्येकाच्या आयुष्यात एक मोठा आसरा. आता माउलीची प्रेमळ सावली  तर हरविली कायमची जे मन काही मानत नाही.पण तिचा आभास,तिच्या आठवणी तर आहेतच/राहतीलच कायमच्या सोबत. तिने वडिलांच्या साक्षीने दिलेले संस्कार रुपी संचित देखील आहेच सोबतीला येथून पुढे आयुष्यभर ,ज्याच्या जोरावर बघूया काय पांग फेडता येतात ते मातृ-पितृ ऋणाचे.  

आता फ. मु.शिंदेची एक अत्यंत हृदयस्पर्शी अशी कविता तेवढी आठवते.  

"आई एक नाव असत
घरातल्या घरात गजबजलेलं गाव असत
सर्वात असते तेव्हा जाणवत नाही
आता नसली कुठच तरी नाही म्हणवत नाही

जत्रा पांगते पाल उठतात
पोरक्या जमिनीत उमाळे दाटतात
आई मनामनात तशीच ठेउन जाते काही
जिवाचे जिवालाच कळावे अस जाते देऊन काही

आई असतो एक धागा
वातीला उजेड दाखवणारी समईतील जागा
घर उजळते तेव्हा तीच नसत भान
विझून गेली अंधारात की सैरावैरा धावायलाही कमी पड़त रान

आई घरात नाही मग कुणाशी बोलतात गोठ्यात हंबरणाऱ्या गाई ?
आई खरच काय असते,
लंगड्याचा पाय असते, वासराची गाय असते
दुधावरची साय असते, लेकराची माय असते

आई असते जन्माची शिदोरी
सरतही नाही आणि उरतही नाही."
..................................................        

Comments

Popular posts from this blog

आई -तृतीय पुण्यस्मरण

आठवण आईची-पाचवे पुण्यस्मरण

आई-चतुर्थ पुण्यस्मरण