कथा एका शहराच्या यशस्वी पुनर्निर्माणाची- अनिरुद्ध पावसकर

गामधील सुनियोजित शहरांचा विचार केला तर असे लक्षात येते, की या सर्व शहरांमधील उत्कृष्ट नियोजन हे भागीदारीमुळे शक्‍य झालेले आहे. भागीदारी ही राज्यकर्त्यांची व नगर नियोजनामधील तज्ज्ञ व्यक्तींची. त्यासाठी दोघांनाही एकाच ध्येयाने झपाटलेले असणे अत्यावश्‍यक आहे. एक- उत्कृष्ट शहराची निर्मिती करणे, अशा कितीतरी भागीदाऱ्या सांगता येतील. ग्रेटर लंडनसाठी चर्चिल आणि पॅट्रिक ऍबरक्रॉम्बी, इस्लामाबादसाठी जनरल आयुब खान आणि डॉक्‍सियिडिस, नवी दिल्लीसाठी पंडित नेहरू आणि ल्युबरक्रॉम्बी, चंडीगडसाठी पंडित नेहरू व ली कारबुझियर या सर्व नगरनियोजनकारांची बुद्धिमत्ता, कल्पनाशक्ती, इ. चे कौतुक करावे तितके थोडे. परंतु या राज्यकर्त्यांना तर सलामच केला पाहिजे. त्यांची दृष्टी, त्यांचे नेतृत्व व मुख्य म्हणजे नियोजनकारांना त्यांनी नियोजन करण्यासाठी दिलेले संपूर्ण स्वातंत्र्य. अशीच एक अत्यंत यशस्वी आणि हेवा वाटावा अशी भागीदारी साऱ्या जगाने एकोणिसाव्या शतकाच्या मध्याला बघितली. पॅरिस शहराची पुनर्निर्मिती करताना लुईस नेपोलियन बोनापार्ट व जॉर्ज हाऊसमन यांच्या भागीदारीने साध्य केलेल्या जादूने संपूर्ण जगाला भुरळ पाडली, ही वस्तुस्थिती आहे. ज्याप्रमाणे या भूतलावर जन्माला आलेली प्रत्येक व्यक्ती शेवटी मृत पावते, त्याप्रमाणेच कुठल्याही शहराचा जन्म झाल्यानंतर त्याचा मृत्यूदेखील अटळ असतो, यावर नगरनियोजनकारांचे एकमत आहे. फरक इतकाच, की काही शहरे शंभर वर्षांतच मृत पावतील, तर काही अजून काही शतकांनंतर. त्या टप्प्याला "Decay‘ असे संबोधण्यात येते. असा टप्पा आल्यानंतर त्या शहराला नवीन रूप धारण करणे क्रमप्राप्त असते. एखादा साप जशी आपली कात टाकतो व नवीन कातडे धारण करतो, काहीसे तसेच.

आपल्यापैकी बऱ्याच जणांना कल्पनादेखील नसेल, की एकोणिसाव्या शतकाच्या मध्याला पॅरिस म्हणजे जणू नरक होता. पॅरिसचा मध्यवस्तीतला भाग हा अत्यंत जास्त लोकसंख्येची घनता असलेला, अंधारी, भीतिदायक व अनारोग्य परिस्थिती असलेला होता. काही भागात तर "एक व्यक्ती प्रति तीन चौरस मीटर‘ इतकी घनता होती. अशा भयावह परिस्थितीमध्ये रोगराई नाही पसरली तरच नवल. कॉलऱ्याने तब्बल सोळा वर्षे नुसते थैमान घातले होते!

नव्याने जन्माला येणाऱ्या सात बाळांपैकी चार बाळांचे मृत्यू होत होते. सन 1848 च्या साथीमध्ये तर पॅरिसच्या मध्य भागामधील पाच टक्के बाळांचे दुर्दैवी मृत्यू झाले. वाहतूक मुक्तपणे फिरू शकत नव्हती. मध्य पॅरिसमध्ये रस्त्यांची जास्तीत जास्त रुंदी पाच मीटर, तर कमीत कमी एक ते दोन मीटर होती, असे सांगितले तर आता विश्‍वास बसणार नाही. नागरिकांमध्ये प्रचंड प्रमाणात असंतोष होता. लुव्रसारखी अप्रतिम जगप्रसिद्ध वास्तू अत्यंत अनाकर्षक इमारतींनी झाकली गेली होती. संपूर्ण शहर विद्रूप झाले होते.

नेपोलियन बोनापार्ट व त्यानंतर राजे लुईस - फिलीप यांनी पॅरिस सुधारण्यासाठी प्रयत्न जरूर केले होते, परंतु त्यांना त्यामध्ये म्हणावे तसे यश मिळाले नव्हते. फ्रान्समधील पहिल्या थेट अध्यक्षीय निवडणुकांमध्ये 1848 मध्ये नेपोलियन बोनापार्टचा पुतण्या लुईस नेपोलियन बोनापार्ट निवडून आला. "पॅरिस‘ हे फ्रान्सचे हृदय असून, या महान शहराला सुंदर करण्यासाठी सर्व प्रयत्न एकवटूयात, रस्ते रुंद करू, कामगार वर्गासाठी भरपूर ऊन-वारा मिळू शकेल, अशी घरे बांधूयात, शहराला तंदुरुस्त करूयात‘ असे भावनात्मक आवाहन त्यांनी नागरिकांना केले. जवळजवळ संपूर्ण बालपण इंग्लंडमध्ये गेले असल्याने लुईस नेपोलियनवर इंग्लंडमधील नियोजनाचा प्रभाव असणे स्वाभाविक होते. त्याने त्याची पॅरिससाठीच्या नियोजनाची संकल्पना राबविण्यासाठी जॉर्ज हाऊसमन या अभियंत्याची निवड केली व त्याला स्वतःची अपेक्षा सांगून मुक्त हस्ताने काम करण्याची मुभा दिली. रस्ते रुंद करण्यासाठी जमीन अधिग्रहणाचे सर्व अधिकार हाऊसमनला देण्यात आले. त्यासाठी त्याने संसदेकडून परवानगी घेणे गरजेचे नव्हते. पॅरिसच्या मध्यावरच असलेला चौक मोठा करून दोन्ही दिशांचे रस्ते रुंद करण्यास हाऊसमनने सुरवात केली. अस्तित्वातील घरे पाडून, नागरिकांना मोबदला देऊन जागेवरून हटविण्यात आले. पहिल्या टप्प्यामध्ये साधारण दहा किलोमीटरचे रस्ते करण्यात आले. मध्यवस्तीत एक अत्यंत देखणे हॉटेल बांधण्यात आले. पॅरिस बघायला येणाऱ्या पर्यटकांसाठी पॅरिसचे जणू वैभव दिसावे, हा त्याचा मानस होता. पन्नास मिलियन फ्रॅंकचे बजेट दोनशे पंचाहत्तर मिलियन फ्रॅंकवर गेले. परंतु पॅरिसवासीयांना लगेच फरक जाणवला. खेळती हवा, सूर्यप्रकाशाचा अनुभव घेता येऊ लागला.

दुसऱ्या टप्प्यामध्ये हाऊसमनने कामाचा झपाटा लावला. हजारो कामगार दिवसरात्र काम करू लागले. पॅरिस शहरच एक प्रचंड मोठी बांधकामाची साइट झाली. शहरातील महत्त्वाचे चौक प्रचंड मोठे करण्यात आले. रस्तारुंदीदेखील मोठ्या प्रमाणात हाती घेण्यात आली. चौक देखणे दिसू लागले. सव्वीस किलोमीटरचे रस्ते करण्यात आले. एकूण अंदाजित खर्च 180 मिलियन फ्रॅंक असताना प्रत्यक्ष खर्च 410 मिलियन फ्रॅंक झाला. नागरिक मोबदल्यासाठी कोर्टात धाव घेऊ लागले. दुकाने, ऑफिसेस पाडल्यामुळे धंद्यामध्ये होणारे नुकसानदेखील अतिरंजित करून सांगू लागले व वाढीव मोबदल्यासाठी दावा करू लागले. त्यातच लुईस नेपोलियन याने पॅरिसच्या सभोवतालचा काही भाग पॅरिसमध्ये समाविष्ट केल्याने पॅरिसचे क्षेत्रफळ दुपटीपेक्षा जास्त वाढून सुमारे 7100 हेक्‍टर इतके झाले. हाऊसमनने धडाका लावून तिसऱ्या टप्प्यात अंदाजे 28 किलोमीटरचे रस्ते प्रस्तावित केले. याचबरोबर पॅरिसमध्ये मोठमोठे पार्क बनविण्याचे काम होती घेतले. यापूर्वी पॅरिसमध्ये फक्त चार पब्लिक पार्क होते. नेपोलियनने लंडनमधील हाइड पार्कच्या धर्तीवर पार्क उभारण्याची हाऊसमनला सूचना केली व हाऊसमनने विविध भागांत चार प्रचंड पब्लिक पार्कदेखील उभारले. जुन्या बागांना नवे स्वरूप देण्यात आले. एकूण सहा लाख नवीन झाडे लावण्यात आली. पॅरिस हिरवेगार दिसू लागले. "पार्क, बागा इ. शहराची फुले असून, त्यांची निगा राखणे अत्यंत आवश्‍यक आहे, तसेच या एकमेव अशा जागा आहेत जिथे गरीब व श्रीमंत असे दोन्ही प्रकारचे लोक येऊन आपला मानसिक व शारीरिक ताणतणाव दूर करू शकतात, असा हाऊसमनचा ठाम विश्‍वास होता. पॅरिसच्या सर्व ऐंशी नेबरहुडमध्ये किमान एक पार्क किंवा बाग असणे आवश्‍यक असून, कुठल्याही नागरिकाला आपल्या घरापासून दहा मिनिटांचे अंतर चालून बागेत येता आले पाहिजे, असा त्यांचा आग्रह होता व त्या दृष्टीने त्याने काम सुरू ठेवले.

पॅरिसमधील विविध धार्मिक स्थळांचे नूतनीकरण करण्याबरोबरच त्याने दहा चर्च, पाच मंदिरे व दोन सिनेगॉग नव्याने बांधली. मोठ्या बांधकामांबरोबरच लहान बाबीदेखील त्याच्या नजरेतून सुटल्या नाहीत. सार्वजनिक स्वच्छतागृहे- किऑस्क, इ. मोठ्या प्रमाणावर उभारण्याबरोबरच उद्यानांच्या सीमाभिंतींचे डिझाइन, स्ट्रीट फर्निचर इ. बाबींवर त्याने खूप मेहनत घेतली. पॅरिसमधील इमारतींना स्वतंत्रपणे न बघता एकत्रितपणे शहराच्या आर्किटेक्‍चरचा भाग समजून इमारतींचे बाहेरील फसाड बांधकामासाठी वापरण्यात येणाऱ्या ब्लॉक्‍सचा प्रकार, रंग, आकार इ. च्या समानतेवर त्याने भर दिला. यापूर्वी फक्त विटा आणि लाकूड यांचा वापर बांधकामामध्ये होत असे. परंतु हाऊसमनने क्रीम रंगाचा लाइमस्टोन वापरण्याचा नियम केला. तसेच प्रत्येक दहा वर्षांनंतर नागरिकांनी इमारतीच्या बाहेरील बाजू स्वच्छ करून परत रंगरंगोटी करावी असे बंधन घालण्यात आले. पॅरिस अत्यंत देखणे दिसू लागले.
जमिनीमधील मलनिःसारण आणि पाणीपुरवठ्याच्या जुन्या नलिका मोठ्या प्रमाणावर बदलण्याचे काम हाती घेण्यात आले. अपार मेहनत घेऊन त्याने पाणीपुरवठा व मलनिःसारणाचे जाळे सक्षम केले. कचरा हटविण्यासाठी मोठी यंत्रणा उभी केली व नागरिकांनी कचरा सार्वजनिक ठिकाणी टाकल्यास त्यांना दंड आकारायला सुरवात केली. पॅरिसवासीयांचे आरोग्य सुधारू लागले. लोकांना आपल्या शहराचा अभिमान वाटू लागला. पर्यटनामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली. शहराचे आर्थिक आरोग्य झपाट्याने सुधारू लागले. पॅरिस जगभरामध्ये आकर्षणाचा केंद्रबिंदू झाले, आणि हा चमत्कार घडला फक्त पंचवीस वर्षांमध्ये! सारेच कसे अचाट!

मोकळ्या जमिनीवर नवीन शहर वसविणे ही प्रचंड आव्हानात्मक बाब आहे. मात्र अस्तित्वातील शहराचा एकशे ऐंशी अंशामध्ये कायापालट करणे, ही बाब तर कर्मकठीण. पण प्रबळ इच्छाशक्ती, प्रभावी नेतृत्व, महान दूरदृष्टी व अपार मेहनत यांचा संगम झाला तर काहीतरी भव्यदिव्य घडू शकते, हे मात्र निश्‍चित.

(लेखक पुणे महापालिकेत कार्यकारी अभियंता आहेत.)
Source: www.esakal.com,
सोमवार, 25 ऑगस्ट 2014

Comments

Popular posts from this blog

आई -तृतीय पुण्यस्मरण

आठवण आईची-पाचवे पुण्यस्मरण

आई-चतुर्थ पुण्यस्मरण